घुंगराची लेक भाग ३

Submitted by कथकली on 15 February, 2013 - 10:04


पात्रांचा गोंधळ नको म्हणून संदर्भासाठी फॅमिली ट्री काढलंय. नवीन वाचणार्‍यांच्या पण गोंधळ नको म्हणून.

गोजरबाई

शेवंताबाई
।----------------------------।
चंदाबाई ताराबाई (मानलेली मुलगी) --- ( रेश्मा, अशोक)

प्रेमाबाई

मयुरी, दिपक

क्रीडासंकुल खचाखच भरलं होतं. कार्यक्रमासाठी सगळं सांस्कृतिक खातच कामाला लागलेलं. सकाळपासून प्रेमाबाईंना बरं वाटत नव्हतं. तरी कशाबशा तयार झाल्या. मेक अप केला. हा काही संपूर्ण प्रेमाबाईंचा कार्यक्रम नव्हता. एकच गाणं नाचायचं होतं. मांडव शोभा म्हणून. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. चंदाक्का म्हणाल्या ,”मी पण येते. तुला बरं नाही. दिपकला म्हणाल्या तू ही चल आमच्याबरोबर तिघे संध्याकाळी निघाले.

"आता रंगमंचावर आमंत्रित करतोय, ज्येष्ठ लावणी नृत्यांगना प्रेमाबाईं सांगवीकर यांना. प्रेमाबाईं हसत हसत रंगमंचावर आल्या. पार्श्वसंगीत वाजायला लागलं ढोलकी कडाडू लागली. तशी त्यांच्या अंगात वीज संचारली. टाळ्यांच्या कडकडाटात त्या विंगेत परतल्या. दिपक आणि बाई तिथेच उभे होते. प्रेमाबाईं आल्या आणि चंदाक्कांच्या पायाला नेहमीप्रमाणे हात लावला. चंदाक्कांच्या डोळ्यातून अश्रु वहात होते. प्रेमाबाईंना त्यानी कवटाळले आणि त्या धाडकन कोसळल्या. आयोजकांची धावपळ झाली. सांस्कृतिक खात्याकडून अँब्युलन्स बोलवण्यात आली. चंदाक्कांना इस्पितळात दाखल केलं. दिपकनं घरी फोन केला. माणसे धावत आली.

“घाबरू नका. त्या आता शुद्धीत आहेत. पण आपण त्यांना आय. सी. यु. तच ठेऊया. सगळ्या चाचण्या करतोय. चोविस तासात सगळे रिपोर्ट्स येतीलच”. डॉक्टर म्हणत होते. कळल्या सरशी सारे धावत आले. प्रफुल, प्रिया लगोलग आले. प्रफुल आल्यावर सगळ्यांना जरा धीर आला. नाही म्हटल तरी घरचा डॉक्टर होता. ताराक्कांनी तर जेवण-खाणच सोडलं. हॉस्पिटलातच ठिय्या देऊन बसल्या. त्यांचा सौंदत्तीच्या यल्लमा देवीवर फार विश्वास. तिला नवस बोलून झाला. चंदाक्कांची प्रकृती ढासळत होती. अवघं घर तणावाखाली.

प्रफुल डॉक्टरांशी बोलून बाहेर आला तेंव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता. प्रेमाबाई, ताराबाई, प्रिया, दिपक , अशोक साऱ्यांनी प्रफुलला गराडा घातला. प्रफुल जे समजावत होता ते जसंच्या तसं कुणाला समजत नव्हतं. आम्हाला समजेल असं बोल की जरा. ताराबाई म्हणाल्या.
आक्का म्हणजे काय झालं की बाईला सौम्य हार्ट अ‍ॅटॅक आलाय. आता तपासणीत असं कळतय की तिच्या दोन्ही किडण्या काम करीना झाल्यात. तिला डायालिसीसवर ठेवणार आहेत.
“ते काय असतं"? प्रेमाबाईंनी विचारलं.
“अगं हे बघ आपलं अशुद्ध रक्त शुद्ध करायचं काम जो भाग करतो ना त्यांना किडनी असं म्हणतात म्हणजे मुत्रपिंड. त्या काम करीना झाल्यात. म्हणून रक्तातली अशुद्ध द्रव्य वाढून त्रास होतोय.
त्या मुळे हार्ट अटॅकही आला असावा. मुत्रपिंडांचं हे काम एका मशिनवर चालू ठेवलयं त्याला डायालिसीस असं म्हणतात.

मग त्येला काय दवा बिवा काय हाये का नाई?

आहेत अक्का. चालू आहेत उपचार. पण कायमचा उपचार म्हणजे सर्जरी करून मूत्रपिंड बदलणे. किडनी ट्रान्स्प्लॅन्ट म्हणतात त्याला. ऐकता ऐकता. ताराक्कांच्या डोळ्याला धारा लागल्या.
त्यांना पुढचं काही दिसेना. त्या मटकन खाली बसल्या. प्रियानं त्यांना सावरले.
"चला घरी. मी सगळं सांगतो मग. इथे नको आता. अशोक आणि प्रिया थांबतील इथे आपण ताराक्काला सोडूयात घरी.

“माज्या घ्या काढून्. जितक्या असतील तितक्या. घ्या म्हणावं डाक्तरला. पण आक्काला वाचवा.” ताराबाई म्हणत होत्या.

असं नसतं ग बाई. दोनच असतात प्रत्येकाला. त्यातली एकच देता येते दुसऱ्याला" आजाराची गंभीरता हळूहळू लक्षात येत होती.

"पण पेशंटच्या रक्ताच्या नातेवाईक हा उत्तम दाता ठरू शकतो असे डॉक्टर म्हणतात.”
प्रेमाबाई हटूनच बसल्या. माझीच किडनी काढा म्हणून. प्रफुल समजावत त्याना होता. अग ते म्हणाले म्हणजे तसंच काही नाही. देणार्याचं वय, ईतर इतिहास सगळं जमावं लागतं.

ताराक्का हे सगळं ऐकत होत्या. मुक्याने. शून्यात बघत. एकट्याच. जणू काही तिथे नसल्या सारख्या. त्यांच्या डोळ्यासमोरून स्मृती फेर धरून नाचत होत्या त्या स्मृती त्यांना थेट त्यांच्या बालपणात घेउन गेल्या. निपाणी गावात भीक मागणारी एक मुलगी. न कळत्या वयाची. ज्या वयात आईच्या अंगा खांद्यावर असायचं, बापाच्या आश्वासक संरक्षणाखाली वाढायचं त्या वयात त्याच बापानं भीक मागायला लावलेली. उपाशी पोटी भीक मागायची. बाप मिळालेले पैसे हिसकावून घ्यायचा अन जायचा चिलीम ओढायला. मग पोटाच्या खळगी साठी पुन्हा भीक, पायपीट, लोकांची उष्टी-खरकटी धुंडाळायची. कसे बसे पोट जाळायचे. भीक मागायला भांडवल काय तर गोड आवाज. जन्मजात संगीताची जाण. कुठलंही गाणं ऐकलं की ते तसंच्या तसं म्हणता यायचं त्याच्याच आधारावर भीक मिळायची. काही काही घरात ही गेली की गाणं म्हणून घ्यायचे मग भीक घालायचे. गावात काही नाचगाण्याचा कार्यक्रम असला की ती बाहेर उभं राहून ऐकायची. बाजारात वाजणाऱ्या चित्रपटातल्या कॅसेट ऐकत तासन तास रेंगाळायची.

अशीच एकदा घरी येता येता मोकळ्या मैदानावर तंबू दिसला. आतून ढोलकीचा, तुणतुण्याचा बारीक आवाज येत होता. हिला कुतूहल वाटलं
तंबूच्या आत् फटीतून पाहिलं तर कुणी दिसेना आवाज मागच्या बाजूकडून येत होता. मागे गेली. कनातीच्या आत वाकून पाहिलं. दोघी तिघी बायका बसल्या होत्या. एक दाढीवाला बाबा पेटी वाजवत होता. ती ऐकतच राहिली. समाधीच लागली तिची. ऊन वाढले जमीन तापली तसे पाय भाजायला लागले पण जावेसे वाटेना. शेवटी नाईलाज झाला. रोज यायला लागली बायका गाणी म्हणायच्या. तिच्या आवडीचाच विषय होता. त्यांची सगळी गाणी तिला ओळखीची झाली. अर्थ काही समजत नव्हता. सूर मात्र जसेच्या तसे यायचे. वाकून बघता बघता त्यांच्याबरोबर गुणगुणायची. त्या हाकलायच्या तेवढ्यापुरती जायची. परत हजर. एकदा त्यातल्या बाईने तिला बोलावलं गाणं म्हणून घेतलं. खूप आवडलं सगळ्यांना. ती बाई म्हणाली तू येतेस का आमच्यात? ही हो म्हणाली आणि गेली त्यांच्यात. ती आजतागायत त्यांच्यातलीच होऊन राहिली होती.

तिला आठवलं गाणं म्हणता म्हणता आतून तिच्याच वयाची, एक गोरीपान तरूण मुलगी डोकावली. "ही आमची चंदा.” ती बाई म्हणाली, तुझी अक्का. बहीणच तुझी मोठी.
चंदा तिच्याकडे बघून गोड हसली. दोघींचं जे नात जुळलं त्या दिवसापासून ते आजतागायत त्यात वितुष्ट नाही आलं कधी. अगदी 'त्या' काळात देखील
चंदाक्का सुरेख नाचायची. नैसर्गिकच होतं तिचं नाचणं. तशी ही गायची. दोघी बोर्डावर नाचायच्या. दोघी कष्टाळू. कलेशी इमान राखणार्‍या. दोघींच्यात एक नैसर्गिक सुसंवाद होता. बोर्डावर अन आयुष्यात सुध्दा. जोडीदार आला तो ही एकाच वेळी. खऱ्या अर्थाने आयुष्य शेअर केलं होतं दोघींनी. दोघींना मुलं झाली ती देखील सारखीच. एक मुलगा एक मुलगी एकीच्या सुख दुःखाची दुसरी सर्वार्थाने साक्षीदार होती. दोघींची आयुष्य म्हणजे एकाच बिंबाची दोन प्रतिबिंबे होत्या जणू, सारख्याच आकाराच्या. आणि आता एक प्रतिबिंब असं विस्कटू पहात होतं.ताराक्का भानावर आल्या.

"ते काय नाय. मी माजीच किडनी देनार बाईला. आताच्या आता मला बाईकडे घेउन चल प्रफुल.” ती किडनी दिल्याबिगर मी जेवायची नाय"
मयुरीनी मग त्याना सगळ समजाऊन सांगीतलं.
बरं बाई उद्या चल तू हॉस्पीटलात. डॉक्टरांना सांगुया आपण. प्रफुल अक्कांची समजूत घालत म्हणाला.
तडक त्या त्यांच्या झोपायच्या खोलीत लावलेल्या यल्लम्मा देवीच्या तसबिरी जवळ गेल्या आणि म्हणाल्या.

"आई आज पोतुर तुज्याकडं काय मागितली नाही मी, तुज्या किरपेशिवाय". पण आज एक मागतेय ते नाही म्हणू नकोस.”
"माज्या बाईला त्ये किडनी का काय म्हनत्यात त्येची गरज हाय. मला माजी किडनी बाईला द्यायची हाय. कुणी काही म्हनलं तरी त्ये डाक्टरचं सगळ काय जुळायचं असतया त्ये समद जुळून येऊदे.
पन बाईचे प्रान वाचू दे. तुला काय बी द्यायला तयार हाये मी".
अक्कांनी हात जोडले. डोळे मिटले. तोच खाळकन आवाज आला खोलीत ताराक्कांचे घुंगराचे चाळ खिळ्याला अडकवले होते ते एकाएकी पडले आणि त्यातले घुंगुर सुटे सुटे होऊन खोलीत इतस्ततः पसरले. मयुरी येउन पहाते तर ताराक्का अशा उभ्या. डोळ्यात पाणी.

"काय झालं गं" मयुरीने येऊन विचारलं.
"काय नाय गं. आईनं कौल दिला.” ताराक्का डोळे पुसत म्हणाल्या.

दुसर्या दिवशी सकाळीच प्रफुल, प्रिया, मयुरी ताराक्का सगळे हॉस्पिटलात गेले.
"पेशंट यांची आई आहे का? “
“हो तसंच समजा हवं तर" ताराक्का म्हणाल्या.
"रक्ताचं नातं नसेल तर कठीण आहे”, डॉक्टर म्हणाले.
"तरीपण बघुया तपासून.”
ताराक्कांना तपासण्यात आलं. ताराक्कांचा रक्तगट, हिस्टरी, सगळं तपासण्यात आलं. एक्स रे, स्कॅन देखील केलं. सारे रिपोर्ट तीन दिवसात आले. आणखी एक महत्त्वाचा रिपोर्ट यायचा होता. तो ही आला.

“फॅंटॅस्टिक" शी कुड बी अ सुटेबल डोनर! पण या पुढे यांना नाचता येणं कठीण आहे. डॉक्टर सारे रिपोर्ट पाहून म्हणाले. ताराक्कांना ऐकून धन्य वाटलं.

आणखी आठच दिवसांनी हे किडनी रोपणाचं यशस्वी ऑपरेशन डॉक्टरांनी केलं. चंदाक्कांच्या शरीराने ही किडनी स्विकारली. रजिस्टन्स वगैरे कॉम्प्लीकेशन्स झाली नाहीत. काही आठवड्यात दोघींना डिसचार्ज मिळाला.

आता ताराबाई, बोर्डावर नाचत नाहीत. त्यांनी एक डान्स अकॅडेमी काढली आहे रेश्माच्या मदतीने. तिथे त्या शिकवतात. प्रेमाबाई सुद्धा आता नाचत नाहीत. त्या संपूर्ण घराकडे बघतात. रेश्मा आणि मयुरी चित्रपटात स्थिरावल्या आहेत. चंदाक्का मात्र या आपल्या घुंगराच्या लेकींकडे पहात कौतूकानं घरभर बागडत असतात.
…......................................................................................................

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा शेवटी आवरल्यासारखी वाटते... हा भाग तेवढा आवडला नाही.

शेवट असाच होता तर flashback मधे किंवा थोडी वर्तमान, थोडी भूत असे करत लिहिली असती तर उत्कंठावर्धक झाली असती.