चारचौघी - १४

Submitted by बेफ़िकीर on 15 February, 2013 - 03:04

पोटात तुटत होते तिच्या! भसीनच्या सेलवरचे ते सगळे मेसेजेस 'अनरेड' असे मार्क करून ती भल्या पहाटेच त्याला न उठवताच तिथून निघाली. गेट लावताना एकदा तिने त्या बंगल्याकडे व्यथितपणे पाहिले. ह्या बंगल्यातील प्रत्येक खोली आणि प्रत्येक कानाकोपर्‍यात तिच्या आठवणी होत्या. त्या सगळ्या आठवणी आता तिरस्करणीय झाल्या होत्या. नकोश्या वाटत होत्या. त्याच बंगल्यात एक आणखीन स्त्रीही होती. जी साडे तीन वर्षे जिवंत असूनही नसल्यासारखी नुसती पडून होती. तिच्या असहाय्यतेचा एक प्रकारे आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी वापर केला ही एरवीही पोखरणारी जाणीव जो ला आत्ता फारच तीव्रपणे बोचली. मनात आले की त्या मेल्यासारखे पडलेल्या बाईला गदागदा हालवून उठवावे आणि तिच्या पायावर डोके ठेवून माफी मागावी आणि म्हणावे की तुझ्या या अवस्थेमुळे काही बायकांचे भावविश्व उद्ध्वस्त होत आहे. उठून संसाराला लाग, मुलांकडे बघ. पण प्रत्यक्षात भसीनची पत्नी उठली असती तर जो ची मानही तिच्यासमोर वर झाली नसती. मिसेस भसीन त्याच वास्तूत आणि जिवंत असताना तिच्यादेखत त्याच रूममध्येही कित्येकदा भसीनबरोबर आपण काहीबाही केलेले आहे हे आठवून स्वतःच्याच नजरेतून उतरत होती ती!

सकाळचे पावणे सहा! अजून फटफटलेले नव्हते. अंधारच होता. पण आत्ता जो ला भीती वाटत नव्हती. तिच्या पायांना ताडताड चालताना कसल्यातरी दु:खद भावनेपासून दूर जायची इच्छा होती जणू! वाहन मिळू शकेल का हा विचारही मनात येत नव्हता. मन तुडुंब भरलेले होते विचारांनी! होस्टेलवर जाईपर्यंत तिला नुसताच विचार करायचा होता.

आपण काय केले! काय मिळवले आणि काय घालवून बसलो! हे नीट ठरवता येत नव्हते. जे क्षण भसीनबरोबर व्यतीत केले ते आपल्यासाठी आनंदी क्षण होते. फक्त इतकेच की एका क्षणात त्या सगळ्या क्षणांचा आनंदी रंग पालटून त्यांना काळाकुट्ट रंग प्राप्त झाला होता. जे सुख मिळवले ते आता काटेरी होऊन मनाला ओरखडत होते. पण मग ते सुख जेव्हा मिळत होते तेव्हा आपल्याला ते सुख का वाटत होते? याचा अर्थ आपलीही जबाबदारी तितकीच होती. पत्नी व मुले असलेल्या एका विवाहीत व पोक्त वयाच्या माणसाकडून आपण शरीरसुख प्राप्त करू इच्छित होतो हे खरे होते. त्यासाठी आपणही योजना करत होतो, त्याला मोहात पाडू पाहात होतो, त्याच्या बोलावण्याची वाट पाहू लागलो होतो. मग आज काय झाले? केवळ त्याच्यादृष्टीने हा सगळा एक असा खेळ होता की ज्यात आपली भूमिका एक शरीरसुख देणारे यंत्र अशी होती ही वस्तूस्थिती आज सहन होत नाही आहे? का? का सहन होत नाही आहे? भसीनने विश्वास सांभाळावा, निष्ठा सांभाळावी हे आपल्याला कोणत्या आधारावर वाटत होते? आपण कोठे निष्ठेने वागत होतो? त्याच्या मोठ्या होत असलेल्या मुलांना ह्या गोष्टीतले अगदीच काही कळत नसेल असे नसणार. सेक्स म्हणून काहीतरी असते इतके नक्कीच माहीत असलेली ती मुले आहेत. त्या मुलांच्याही मनात कधीतरी येत असेल की आपले वडील बहुधा जे आईबरोबर करू शकत नाहीत ते पद्मजा आंटीबरोबर करत असतील की काय असे! नेमके काय करतात हे माहीत नसले तरी मनात हा विचार येऊ शकत असेल त्यांच्या! पण बोलायचे वय नाही म्हणून गप्प असतील. आजूबाजूला राहणार्‍यांनी कधी ना कधी आपल्याला आत जाताना, बाहेर पडताना पाहिलेले असेल. साहिल ड्रायव्हरने पाहिलेले आहेच. कंपनीत काही जणांना आपल्या आणि भसीनमधील किंचित वाढलेल्या जवळीकीचा सुगावा एखादवेळेस लागलाही असेल किंवा निदान काहीतरी वेगळे होत आहे इतपत संशयही आलेला असू शकेल. नीलाक्षीची तर नजरच सांगते की तिला वाटत आहे की आपण कुठेतरी गुंतलेलो आहोत. आपल्यापेक्षा वयाने लहान असल्याने ती काही बोलत नाही इतकेच. प्रियंकाला तर सगळे आधीपासूनच माहीत आहे. ही सगळी बदनामी होण्याचे पोटेन्शिअल असलेली वस्तूस्थिती ज्ञात असतानाही आपण भसीनकडे जात होतो. फक्त आज त्याचा दृष्टिकोन कळल्याकळल्या आपल्या दृष्टीने हे सगळे घृणास्पद का झाले? आपण या सगळ्याकडे एक निव्वळ गंमत म्हणून का बघू शकत नाही?

एक स्त्री म्हणून काहीतरी गमावलेलेच गेले आहे अशी भावना नैसर्गीक आहे का? की समाजाच्या अदृष्य दडपणामुळे ती मनावर येते? क्षणभर असा विचार केला की झाले ते झाले, अजूनही भसीन आपल्याला मिळाला तर आपण त्याला स्वीकारू आणि कोणतीही कमिटमेन्ट नसलेले हे निव्वळ शारीरिक नाते जोपासू, तर काय होईल? आपल्याला भसीनचे मनही गुंतायला का हवे होते? याचे कारण हे आहे की आपण आपल्या शरीराला सबकुछ समजत आहोत. आपले शरीर म्हणजेच आपण असे मानत आहोत. ते कोणी स्वतःच्या शरीर सुखासाठी वापरले की मग ते त्याचेच झाले असे मानत आहोत. जो वापरत आहे त्याच्याकडून शरीराची किंमत म्हणून मन अपेक्षित ठेवत आहोत. हाही एक व्यवहारच की? मी माझे शरीर तुला अर्पण केले म्हणून तू माझा विश्वास कधीही मोडू नयेस ही अपेक्षा हा एक सरळसोट व्यवहार का नाही? व्यवहारच आहे. पण तो व्यवहार करण्याचे आपल्याला आपोआपच का वाटते? संस्कृती आणि समाजाच्या अदृष्य दडपणामुळे? की निसर्गतःच देणे आणि घेणे हे निगडीत असतात म्हणून?

मी काय गमावले आहे? अब्रू? ती वाचवून मी कधीपर्यंत आणि का इन्टॅक्ट राहणार होते? भसीनच्या बेडमध्ये अब्रू उधळताना सायलेंटली मी काय एक्स्पेक्ट करत होते की त्याने कमिटेड असावे? असे एक्स्पेक्ट करत होते की त्याच्या बायकोनंतर त्याच्या आयुष्यात आलेली पहिली व शेवटची स्त्री मी असावे? असे का? नेहमी असेच का की पुरुषाला काहीतरी मिळाले आणि स्त्रीने काहीतरी गमावले? माझ्या मनातून हा विचार हद्दपारच का होत नाही आहे की मी आधी जशी होते तशीच अजूनही आहे, फक्त आता भसीन माझ्या आयुश्य्यातून वजा झालेला आहे. ही नालायक संस्कृती आणि तिची ही दडपणे का सोसू?

आपण भसीनला विरोध करू शकत नव्हतो का? करू शकत होतो. केला नाही. का? कारण आपल्याला तो आवडला होता. आपल्या हेच लक्षात नव्हते की आपल्याला त्याच्यापासून मिळणारे जे सुख आहे ते आपल्या नशिबात प्रथमच आलेले असल्याने त्या सुखामुळे आपले भसीनवर प्रेम बसलेले आहे. आपल्यापुरते आपण असे गृहीत धरत होतो की त्याने आपल्याशी एकनिष्ठ राहावे. पण हे नाते कधीतरी संपुष्टात येईल याची आपल्याला तेव्हाही जाणीव होतीच. मुले मोठी होतील, कदाचित आपल्याला वेगळा जॉब मिळेल, काहीही होईल आणि हे नाते कधीतरी संपेल हे आपल्याला माहीत होते. निव्वळ सुखासाठी आपण प्रत्यक्षात कोणतीही कमिटमेन्ट न घेता भसीनकडून प्रेम मिळवले. तेही त्याच्या बायकोला तिच्या नकळत फसवून. मग चूक कोणाची? तेही ठीक आहे. समजा चूक माझी. पण भसीनचे काय? त्याच्यादृष्टीने मी एक फक्त वापरण्याची बाबच का असावे? कंटाळा आला की फेकून दिले असे खेळणे का असावे? त्याचे मन का गुंतू नये?

भसीनच्या वागण्यात आधी कधीही असे सूचक काहीही का नव्हते? प्रियंका होस्टेलवर आल्यावरच हे कसे काय झाले? आपल्यासाठी लावलेल्या भावनिक सापळ्यात आपण अलगद सापडणे इतके सोपे आहे का हे सगळे? आपल्याला कुठेतरी शरीरसुखाची हाव होती आणि ती अश्या ठिकाणी पूर्ण होत होती जिथे पूर्ण गुप्तता पाळली जाईल याची आपल्यालाच खात्री होती. ही खात्री आपण कधी तपासलीच नाही असे का? का कधीही भसीनला असे विचारले नाही की हे तू कोणाशी कधीही बोलणार नाहीस ना? मुळात आपल्याला असे वाटतेच का आहे की गुप्तता पाळणे यावरच सगळे सुख अवलंबून होते? समजा नाही गुप्त राहिली ही गोष्ट, तरी त्या त्या क्षणांना त्या त्या क्षणी असलेले, अ‍ॅटॅच झालेले महत्व कसे काय वजा करावे? काही उत्कट क्षण आत्ता नकोसे वाटत असले तरीही ते उत्कट होते हे आपल्याला मान्य होत आहे ना? मग गुप्तता ही प्राथमिक अट का? कश्यासाठी?

भसीन आपल्याबाबत आधीपासूनच तसा विचार करत होता आणि प्रियंकाच्या मार्फत त्याने सापळा लावला अशी ही थिअरी आहे का? की कोणत्यातरी क्षणी भसीनही अ‍ॅक्च्युअली गुंतलेला होता आणि नंतर कंटाळला? हे कसे समजणार? प्रियंकाइतकी लहान वयाची मुलगी भसीनच्या जाळ्यात मुळात कशी काय सापडली? खरोखरच तो तिचा कोणी नातेवाईक आहे की कोणीच नाही आहे? ती कोण आणि कुठली आहे? त्यांच्यात हे संबंध कधीपासून आहेत? ती तर फक्त एकोणीस वर्षांची आहे. मग हे झाले कधी? तेही इतके की तिने स्वेच्छेने उद्यापासून येईन असे म्हणावे? निलीवर तर वयाच्या कोवळ्या वर्षांमध्येच रेप झालेले होते. पण प्रियंका स्वेच्छेने हे करत आहे, इतर स्त्रियांनाही कदाचित भुलवून भसीनच्या जाळ्यात आणून सोडत आहे. त्यासाठी भसीन तिला काही देतही असेल. मग आपल्यासारख्याच कंपनीत आणखीही काही स्त्रिया असतील का ज्या भसीनला आधी वश झालेल्या असतील आणि आता भसीनने त्यांना झिडकारलेले असेल? भसीन मुळातच असा असेल की निव्वळ आपण फुकटाफाकट जाळ्यात अडकलो म्हणून असा झाला असेल? आपण पहिल्याच वेळी विरोध केला नाही ती अवस्था आलीच कशी? दोन गोंडस मुलांचा लळा, भसीनबाबत निर्माण झालेला सॉफ्ट कॉर्नर, मिसेस भसीनबाबतची कणव आणि अनेकदा आलेल्या सहवासातून उत्पन्न झालेली जवळीक याच्या आधारावर भसीनने आपल्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा ठेवली व ती व्यक्त केली. त्याच सर्व गोष्टींच्या आधारावर आपणही असे मानत गेलो की येथे हे सुख दिले आणि घेतले तर कदाचित आयुष्यात एक सुखद कालावधी येईल, जसा तो आलाही!

आपल्या या संबंधांचा आपल्या कामावर काय परिणाम झाला? भसीनने ऑफीसमध्ये पूर्ण व्यावसायिकता आणि गुप्तता बाळगली. खरे तर कामावर काहीही परिणाम झाला नाही. उलट काही सोयी सवलती मात्र मिळत राहिल्या, ज्या आता अर्थातच नाकारायच्याच आहेत. उदाहरणार्थ नो कार! नो कंपनी कन्व्हेयन्स! लेट वगैरे जायचेच नाही. आणि टायमिंग संपल्यावर एक मिनिट थांबायचे नाही. भसीनने परत अपेक्षा व्यक्त केली तर स्वच्छ नकार तर आपण देणारच आहोत, पण त्याला हे कळू न देता की आपल्याला त्याचे खरे स्वरूप कळलेले आहे. असे का? भसीनशी आपण भांडू का शकत नाही? कारण भसीनने कोणतीही कमिटमेन्ट केलेलीच नव्हती. आपण मागीतलेली नव्हती.

जे झाले ते काय होते? लैंगीक शोषण? विवशतेचा गैरफायदा? चांगल्या स्वभावाचा गैरफायदा? तो आपण का घेऊ दिला? भसीनने कोठे आपल्याला कधी फरफटत घरी नेले होते या सुखासाठी? याला बलात्कार म्हणता येईल का? आपण म्हणालो तर त्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? की आपल्यालाच मूर्खात काढतील? आपल्यालाच मूर्खात काढतील. कंपनीत भसीनवर सेक्श्युअल हॅरॅसमेन्टची केस करता येईल का? कोणत्या बेसिसवर करणार? प्रत्येकवेळा परिस्थिती अशीच होती की आपण नकार देऊ शकत असूनही आणि स्वतःला त्या गोष्टीपासून सहज दूर ठेवू शकत असूनही आपणहून त्या सिच्युएशनमध्ये गेलेलो आहोत.

मला राग का येत आहे? विश्वासघात झाला म्हणून? मला राग येत आहे कारण मी अब्रूला सर्वोच्च समजते. समाजही मला तेच समजायला भाग पाडतो. जे गेले ते काहीच नव्हते असे मला म्हणता येत नाहीये. समजा प्रियंका यात इन्व्हॉल्व्डच नसती आणि पुढेमागे भसीननेच आपल्याला अव्हेरले असते तर आत्ताइतकाच राग आला असता का? कदाचित नाही कारण आपल्या मनाची तेव्हा ही तयारी असती की हे कधीतरी होणार होतेच. म्हणजे आता तिसरी एक व्यक्ती आपले रहस्य जाणून आहे यामुळे आपल्याला नग्न झाल्यासारखे वाटत आहे. प्रियंकाचा गळा दाबावासा वाटत आहे आणि भसीनला भोसकून ठार करावेसे वाटत आहे. हे सगळे फक्त रहस्यभेद झाल्यामुळेच ना? म्हणजे पुढेमागे जर चार पाच वर्षांनी भसीन म्हणाला असता की आता मुले मोठी झाली आहेत आणि इतरही काही लोकांच्या डोळ्यावर आपले भेटणे येत आहे तर आपण आता एकमेकांपासून थोडे लांब होऊयात, तर आपण ते थोड्या अधिक शांतपणे आणि परिपक्वपणे स्वीकारले असते का? की ते नाते अधिकच गहिरे होत गेले असते? जे झाले असते, नसते असल्या जर तर मध्ये गुंतण्यापेक्षा हा विचार करूयात की आता काय?

आता लवकरात लवकर दुसरा जॉब बघायचा. भसीनकडे पुन्हा पाय ठेवायचा नाही. प्रियंकाला काहीही दाखवायचे नाही की आपल्याला काही कळलेले आहे. हे येथपर्यंत ठीकच आहे. पण शरीराला लागलेली सवय?

त्या सवयीचे काय? सन्यासिणी व्हायचे? की शांत राहून वर्षादोनवर्षांनी सरळ एखादा माणूस बघून लग्न करायचे? आता आपल्याला कश्या प्रकारचा पुरुष मिळणार? किमान चाळिशी गाठलेला, बीजवर वगैरेच! तो आपण मिळवणार कारण आपल्याला स्थैर्य हवे असणार. मग लवकर लग्न करणे हाच सूज्ञपणा नसता का झाला? काय तीर मारला आपण वयाची बत्तीशी येईपर्यंत अविवाहीत राहून? आणि या शरीरावर जागोजागी झालेल्या भसीनच्या स्पर्शांमुळे निर्माण झालेली भूकेची जाणीव कुठवर मारत राहायची? थोपवत ठेवायची? की भसीन झाला की आणखीन कोणी, मग आणखीन कोणी? असे? तसे केले तर कदाचित भसीनने केलेल्या फसवणुकीची बोच कमी होईल का? की तसे काहीही न करता कालांतराने ही बोच आपोआप कमी होईल? चार दिवस भसीन भेटला नाही तर अस्वस्थ होतो आपण! बेभान होऊन भसीनकडे अवेळी जावे असे वाटते. स्त्री आहे म्हणून भावना नसाव्यात? जेव्हा भसीनला मी हवी असते तेव्हाच मला भसीन मिळावा अशी रचना कश्यामुळे? मला भसीन हवा आहे आणि फक्त माझा म्हणून हवा आहे याला काहीच किंमत का नाही? त्याच्या आठवणींनी बेचैन झाले की आता काय करायचे? तिरस्कार वाटेल हे ठीक आहे, पण मनाच्या तळाशी कुठेतरी हेही वाटणारच ना की ते सुख हवे आहे? मग ते कसे मिळवायचे? एक स्त्री म्हणून मन मारून राहायचे. कारण आपणच कोणाला उद्युक्त करायला गेलो तर समोरचा बोट दिले की हात धरणारा असणार यात शंका नाही. म्हणजे योग्य जोडीदार मिळेपर्यंत एकटेपणा! ही भूक अशी असते की ती पूर्ण न होताही जगता येते, अगदी सहज! विधवा नसतात का जगात? एकट्या बायका असतात. परित्यक्ता असतात. आपण तश्याच एकट्या आहोत. काही विशेष नाही. पण एक गोष्ट विशेष आहे. आपण फसवल्या गेलेल्या एकट्या आहोत. त्या सुखाची चटक लावून मग फसवल्या गेलेल्या. नवरा असता आणि मेला असता तर मन मारणे सोपे झाले असते. हे असे चटक लागल्यानंतर फसवले जाणे आणि मग मन मारणे सोपे आहे? पण आपण इतके नग्न विचार का करत आहोत? याशिवायही हजारो विषय आहेत आयुष्यात. पण ते विषय आपले मन व्यापू शकत नाहीत. सवय लागेल. सवय होईल. थोडा वेळ जाईल, पण सावरू आपण यातूनही.

पण अश्या किती पद्मजा कुलश्रेश्ठ या समाजात असतील? की ज्या फसवल्या गेल्या असतील किंवा चुकून जाळ्यात सापडल्या असतील? त्या सगळ्या काय करत असतील? भांडत असतील? मारत असतील फसवणार्‍याला? की गाजावाजा न होऊ देता स्वतःलाच दोष देऊन मूकपणे आतल्याआत आक्रंदत असतील?

निलीवर निदान नकळत्या वयात रेप झाला. सिमेलियावर निदान सरळ सरळ पिक्चरमध्ये दाखवतात तसा रेप झाला. जयावर निदान वैवाहिक आयुष्यात नवर्‍याकडूनच चुकीची वागणून मिळाली. या तिघींची केस अशी आहे की त्या थेटपणे जगातील एका माणसाकडे दोषी म्हणून बोट दाखवू शकतात.

आपली केस अशी आहे की सर्व बोटे आपण आपल्याचकडे दाखवू शकतो, दाखवायची झालीच तर!

आय लव्ह्ड भसीन अ‍ॅन्ड ही नेव्हर लव्ह्ड मी! सो आय फील आय हॅव बीन रेप्ड! आय हॅव बीन एक्स्प्लॉइटेड!

याला काही अर्थच नाही. सिमेलियाने तीन खून केले असतील तर खरच काहीही चूक नाही तिची. या जगात नर आणि मादी या शिवाय दुसरी जमात नाही आणि संस्कृती नावाची हेडमास्तरीण फक्त मादीला शिक्षा देत आहे. कारण तिला हेडमास्तरणीचे पदच नरांनी देऊ केलेले आहे. माझ्या मनात प्रियंका आणि भसीनला मारण्याचा विचार येणे अत्यंत नैसर्गीक आहे. याचे कारण मी जरी भसीनच्या बायकोला तिच्या नकळत फसवलेले असले, तरी मी फसवले गेले आहे हे मला कळलेले आहे. भसीनच्या बायकोला कधीच कळणार नाही की ती फसवली जात होती कारण ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. तिला फरकच पडणार नाही. पण मला पडतो. मी भसीनवर जे उधळले ते माझ्याकडील सर्वाधिक मौल्यवान असे काहीतरी होते. त्याच्या बदल्यात भसीनकडून किमान आदराची भावना आणि निदान एक चांगला मित्र म्हणून विश्वासार्हता अपेक्षित करणे ही माझी चूक नाहीच. ते अध्याऋत आहे. ते वदवून घ्यायला हवे होते असे मुळीच नाही. भसीन काही दूधखुळा नाही की मी निदान विश्वास आणि गुप्तता या अपेक्षा ठेवेन हेही त्याला समजू नये. दोन मुलांचा बाप आहे तो. एका स्त्रीच्या कामभावना खुलवायचे कसब जर इतके लाजवाब असेल त्याच्याकडे तर त्या स्त्रीचे मन जाणायचे कसबही असणारच.

आपण आपल्या मनातील विचारांचे असे सूक्ष्म सूक्ष्म तंतू प्रथमच इतके वेगळे काढत आहोत. किती बरे वाटत आहे. एक भूमिका तयार होत आहे. ती भूमिका समर्थनीय असल्याचे आपले आपल्यालाच पटत आहे. समर्थन तयार आहे. भूमिका घ्यायला आपण तयार आहोत. भसीनचा आपल्या आयुष्यात आपल्याशी आता काहीही संबंध येणार नाही याची तातडीने काळजी घेण्याच्या प्रयत्नाला लागायचे. प्रियंकापासून हळूहळू दूर व्हायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही चूक करून आपण आता बसलेलोच आहोत, तर निदान मनात पश्चात्ताप येऊ द्यायचा नाही. ताज्यातवान्या मनाने जगाला पुन्हा एकदा सामोरे जायचे.

जो, एका विवाहीत परपुरुषाने तुला नग्नावस्थेत वारंवार पाहिले आणि वारंवार भोगले आणि तो अजूनही जिवंत आहे आणि जे झाले ते जगाला सांगायला मुखत्यारही आहे याची भीती बाळगू नकोस. बी बोल्ड. बी कॉन्फिडन्ट! धिस इज नॉट द एन्ड ऑफ द लाईफ! मे बी, इट्स अ न्यू बिगिनिंग! शांत हो! शतकानुशतके स्त्री या गोष्टींना सामोरी जात आहे. 'आपल्याबाबतीत हे असले काही कधी होणारच नाही' हा तुझा भ्रमतरी निदान नष्ट झाला हे काय कमी आहे का?

मान्य, तू सूड घेऊ शकत नाहीस. पण म्हणून स्वतःचा सूड घेऊ नकोस. स्वतःला जप. मनाला उभारी दे. स्वतःशी बोल जो, खूप गप्पा मार स्वतःशी. अगदी वेडी वाटलीस कोणाला तरी चालेल. पण स्वतःची सगळ्यात चांगली मैत्रीण हो. धीर धर! अजून खूप जगायचे आहे. शक्यता आहे की, यापुढील आयुष्य खूप चांगलेही असू शकेल. या जखमेवर खपली बसेल, हळूहळू तीही जाऊन एक व्रण उरेल. कालांतराने तोही दिसेनासा होईल. पण तू उरलेलीच असशील. हासायला शीक जरा! झाले ते झाले! हे बघ होस्टेल आलेसुद्धा! निली उठून चहा घेत असेल. तिला विश कर. आज सरळ रजा टाक! गेली उडत ती भसीनची नोकरी आणि ते अर्धवट प्रोसेस झालेले क्लेम्स! यू हॅवन्ट लॉस्ट एनीथिंग! यू आर स्टिल द सेम चार्मिंग अ‍ॅन्ड कॉन्फिडन्ट पद्मजा कुलश्रेष्ठ!

जो रूमचे दार ठोठावणार त्या आधी ते लोटलेलेच असल्याचे तिला समजले. तिने ते हलकेच ढकलले आणि आत पाऊल टाकले आणि टेन्शनच आले तिला! निली, जया आणि प्रियंका तिघीही टक्क जाग्या होत्या आणि तिच्याचकडे पाहात होत्या. आपण हल्ली रात्रभर कुठे जातो हा विषय डिस्कस होतो की काय आणि मूर्ख प्रियंकाने काही सांगितले की काय ही भीती वाटली जो ला! चाचरतच तिने जयाकडे बघत विचारले.

"तिघीही जाग्या झालात इतक्या लवकर?? काय झाले???"

जया म्हणाली...

"झोपलोच नाही आहोत रात्रभर"

धस्स झाले जो च्या छातीत. आपला अंदाजच बरोबर असणार याची तिला जाणीव झाली.. अधिकच चाचरत आणि निलीला घाबरत तिने विचारले..

"का.. काय झाले निली?? इतके... काय बोलत होतात???"

निलीने एक सुस्कारा सोडला आणि जो च्या डोळ्यात ठामपणे डोळे मिसळत म्हणाली..

"आय अ‍ॅम मॅरींग पै"

=============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंट्रेस्टींग!!
जो च्या विचारांतली उलथापालथ, निश्कर्षाचा भाग फार सुंदर लिहीला गेलाय....

brilliant!!.. बेफिकीर,
जो च्या मनातील विचार खुप सुंदर मांड्ले आहेत..
पुढचा भाग लवकर येउद्या.....

पुन्हा एकदा, स्त्री मनात काय घडतंय ह्याचं अतिशय उत्तम चित्रण!
पुढचा भाग शेवटचा ना बेफिकीर?
येउ देत लौकर!

मस्त मस्तच. तुमच्यासारखे स्त्री मन नवरा ओळखेल तर कीती बरे होइल ना Happy (की वाईट):(

लवकर येऊद्या पुढचा भाग

तू सूड घेऊ शकत नाहीस. पण म्हणून स्वतःचा सूड घेऊ नकोस. स्वतःला जप. मनाला उभारी दे. स्वतःशी बोल जो, खूप गप्पा मार स्वतःशी. अगदी वेडी वाटलीस कोणाला तरी चालेल. पण स्वतःची सगळ्यात चांगली मैत्रीण हो. धीर धर! अजून खूप जगायचे आहे. शक्यता आहे की, यापुढील आयुष्य खूप चांगलेही असू शकेल. या जखमेवर खपली बसेल, हळूहळू तीही जाऊन एक व्रण उरेल. कालांतराने तोही दिसेनासा होईल. पण तू उरलेलीच असशील. हासायला शीक जरा! झाले ते झाले!
खरच खुप छान विचार आहे हा...कोणत्याहि depressing situation मधुन बाहेर आणेल असा....
good going ... बेफिजी...