'पाऊस पूर्णतेचा'

Submitted by अमेय२८०८०७ on 14 February, 2013 - 07:53

धुंद मिठीची चिंब वेदना
पाऊस आला पहिला वहिला
ओलेता मी - ओलेती तू
गंधही ओला श्वासांमधला

ये जवळी अन ओढुनि घे मज
बोटांचे बोटांशी हितगुज
स्वप्नसुरांसम कोसळणाऱ्या
ह्या धारांच्या मौक्तिकमाला

नवलाईची जादू नवखी
आग लाविते ओली तलखी
दाहामधुनि शांतवणाऱ्या
सहवासाचा शोध आगळा

आज गवसती स्पर्श वेगळे
प्रेमसुखाचे मर्म आकळे
मनमोरांच्या शृंगाराला
हिरवाईचा वर्ख लाभला

तृष्णा नवथर आज निमाली
सागराकडे नदी निघाली
अधिऱ्या अल्लड तरुणाईला
पूर्णत्वाचा अर्थ उमजला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!