रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान :2

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 13 February, 2013 - 14:47

रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान :2

१९५० ते १९८२ पर्यंतची आपली जगप्रसिद्ध कारकीर्द करणारी ‘व्हर्जिनिया झिआनी’ ही सोप्रोनो गायिका .’कमेंदेतोर of द इटालियन रिपब्लिक’ हे व इतरही अनेक जागतिक स्तरावरील बक्षिसे तिने मिळवली .रोमानियाच्या ‘किंग मिशेल’ ने ‘Nihil Sine Dio’ हा सर्वात मोठा खिताब तिला दिला . गलात्स ची ‘इलियाना कोत्रुबास’ या सोप्रनो गायिकेने १९६५ मध्ये नेदरलँड्स मधली ‘एस हरटोजेनबोश’ ही महत्वाची स्पर्धा जिंकली . अनेक गाणी गाऊनतिने जगभरात आपले नाव केले . तीमिश्वारा शहरातील आयोलंडा बलाश ऑलिम्पिक चम्पियन होती.’जगातील ६ फुटापेक्षा जास्त उंच उडी मारणारी’ ही पहिली स्त्री’ रोम मधील १९६० सालच्या ऑलिम्पिकमध्ये तिने २ गोल्ड्स मिळवली . १९५७ ते ६६ पर्यंत १५० स्पर्धा तिने जिंकल्या !
बुखारेस्त च्या ‘लिया मनोलिऊ’ ने थाळीफेक मध्ये ३ ऑलिम्पिक मिळवली. ३५ व्या वर्षी वाढलेल्या वयामुळे रोमानियन टीम मधून काढून टाकलेल्या ‘लिया’ ने स्वतः प्रक्टिस करून १९६८ मधल्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड पटकावले. पुढे १९९२ ते ९६ या काळात ती रोमनिअन सिनेट मेम्बर (लेजिस्लेचर) झाली. १९४८, ४९,५० ची टेनिस टूरनामेनटस ची टायटल्स घेणारी ‘व्हर्जिनिया रुझीची’, १९७८ ची फ्रेंच ओपन चेम्पियान्शीप तिनं मिळवली. १९७३ चं ऑस्कर पटकावणारी ‘आना असलान’ , जगप्रसिद्ध बायोफिजीसिस्ट ‘फ्लोरेन्तिना मोसोरा’ आणि अशा कितीतरी ! रोमानियाची अंतर्गत परिस्थिती प्रतिकूल असतानाचे रोमानियन स्त्रीचे हे यश अधिकच उठून दिसते !

रोमानियाचा अध्यक्ष चाउशेस्कू असताना १९७७ ते १९८१ या काळात रोमानिया वर परदेशी कर्जांचा बोजा एकदम वाढला, तो तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स वरून १० बिलियन अमेरिकन डॉलर्स वर गेला. चाउशेस्कूच्या स्वतंत्र धोरणांमुळे IMF (International Financial Organisation) व जागतिक बँक आणि चाउशेस्कू यांच्यातील संघर्ष वाढू लागला . यामुळे इतर कुठल्याही राष्ट्रांची मदत न घेता १९८९ पर्यंत चाउशेस्कूने रोमानियन जनतेवर अन्याय करत ह्या कर्जाची परतफेड केली. यासाठी अन्नधान्य आणि कारखान्यातील उत्पादने परस्पर निर्यात केली जाऊ लागली . जनतेच्या खाण्या-पिण्या वर निर्बंध लादले गेले.देशांतर्गत अर्थ व्यवस्था कोलमडली. या काळात रोमानियन स्त्री ला घराबाहेर पडून काम करावे लागले तरी घरातील तिची जबाबदारी घरच्या पुरुषाने वाटून घेतली नाही. युद्धकाळात लोकसंख्या कमी झाल्याने गर्भनिरोधाकांवर बंदी आली आणि संतती नियमन कायदा विरोधी मानले गेले.

या कम्युनिस्ट राज्यात प्रत्येक घराला एक छोटे कार्ड मिळे. त्यावर घरात रहाणार्या सदस्यांची नवे व वये लिहिलेली असत. आपल्या पैशानेच परंतु प्रत्येक व्यक्तीला अर्धा ब्रेड दिवसाला मिळे. व त्या कार्डावर त्या तारखेवर फुली मारली जाई. त्यानंतर त्या किंवा इतर कोणत्याही दुकानात पैसे असूनही ब्रेड विकत घेता येत नसे ! प्रत्येकाला एक ग्लास दुध मिळे .त्यासाठी दर रोज पहाटे तीन पासून रांगेत उभे राहा ! तुमचा नंबर आल्यावेळी तुम्ही हजार नसलात, तर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला दुध मिळणार नाही. अशा रीतीने खाण्यापिण्यावर निर्बंध आणि संतती नियामानावर बंदी ! स्त्रिया भीतीने गुपचूप गर्भपात करवून घेत. त्या काळात तिला योग्य ते उपचार व औषधेही मिळवता येत नसत .कारण कुणाला कळून बातमी सरकारपर्यंत गेली तर कारावास ! समाजात ठीक ठिकाणी चाउशेस्कूचे खबरे असत. आपली जिवलग मैत्रीण किंवा शेजारीणही खबरी असण्याची शक्यता ! हे दडपण सतत असे. सारiच चोरीचा मामला ! त्यामुळे स्त्रिया व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण त्यावेळी रोमानियात इतर सर्व युरोपियन राष्ट्रांपेक्षा कितीतरी जास्त होते !१९८९ च्या डिसेंबर मध्ये रोमानियात रक्तरंजित क्रांती झाली. १९९० पर्यंत रोमानिया खर्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकले नाही. समुद्रातील एखाद्या छोट्या बेटाप्रमाणे इतर सर्व जगाशी संपर्क तुटलेल्या रोमानियाची कल्पनाही आपल्याला भयावह वाटते !
अर्थातच कम्युनिस्ट कंट्री असल्याने विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणाची , राहण्या खाण्याची काळजी घेणे व जागतिक पातळीवर त्यांना संधी देणे हे मोठे काम सरकारने केले हे उघडच आहे. पण देशातील हiलाखीच्या परिस्थितीमुळे खचून न जाता मेहनत व प्रयत्नातील सातत्य रोमानियन स्त्रीने सोडले नाही हे प्रकर्षाने जाणवते.

१९८९ च्या क्रांतीनंतरही (युरोपियन कम्युनिस्ट देशांपैकी सर्वात पहिली क्रांती रोमानियात झाली आणि कम्युनिझमच्या सर्वात तीव्र झळाही रोमानियालाच लागल्या .)रोमानियन स्त्री घराबाहेर पडून काम करतच राहिली . आता तिच्या पुढे आदर्श होता पश्चिमी युरोपियन स्त्रीचा आणि अमेरिकन स्त्रीचा .आता रोमानियन स्त्रियांना जास्त हक्क मिळाले . गर्भापातावरील व गर्भनिरोधाकांवरील बंदी उठवली गेली . पूर्वी बाळंतपणासाठी फक्त ६० दिवस रजा मिळत असे, ती आता दोन वर्षांपर्यंत वाढवली गेली आहे आणि लहान मुलांच्या संगोपनासाठी ही रजा आई-वडील या दोहोंपैकी कुणालाही घेता येते.अर्थातच ज्याचा पगार कमी , त्याने ही रजा घ्यायची अशी विभागणी असते.
रोमानियन्स हेआॅर्थोडाॅक्स ख्रिश्चन्स आहेत. आजही समाजामध्ये चर्च मध्ये जाऊन लग्न करणे हे महत्वाचे मानले जाते . या परंपराप्रिय समाजामध्ये लग्नसंस्थेबद्दल आदर आहे, कुटुंबव्यवस्थेवर विश्वास आहे. रोमानियन स्त्रीला आपलं घर आणि घरसंसार सांभाळण्याच आपलं कौशल्य यांचा अभिमान वाटतो. शहरी स्त्रिया पश्चिमी स्त्रियांप्रमाणे पेहेराव करतात तर खेड्यातील स्त्री पारंपारिक पेहेरावात दिसते . भौतिक गोष्टींपेक्षा नवर्याचे प्रेम व परस्पर विश्वास या गोष्टींना ती जास्त महत्व देते. सुंदर, सडपातळ व आपल्या दिसण्याविषयी विशेष काळजी घेणारी ही स्त्री चटकन नजरेत भरते. माणुसकी, धार्मिकता, दयाळूपणा या गुणांकडे ती सहज आकर्षित होते. शहरी स्त्री उद्योग-व्यवसाय , नोकरी यांकडे वळली आहे पण खेड्यातील स्त्रिया अजूनही नोकरीच्या अभावी घरकाम, शेतावर काम करणे व मुलांना वाढवणे अशी कामे करतात. एका मोठ्या international co. त ह्युमन रिसोर्सेस manager चे पद सांभाळणारी नेला म्हणते,” शहरातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर managers म्हणून काम करतात. त्या उच्चशिक्षित असून ५ वर्षे जॉब केल्यावर नवीन चालेंजेसना सामोरे जाण्यासाठी नोकरी बदलण्याची तिची तयारी असते. बिझनेस असोसिएट, डायरेक्टर अशा मोठ्या पदावर असलेल्या स्त्रियांना पगार आणि इतर सवलती पुरुषांच्या बरोबरीने मिळतात.”
“पण ही समानता घरी आल्याबरोबर संपून जाते .” तमारा म्हणते. “बाहेर रोमानियन स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते. आणि घरी आल्यावर रोमानियन पुरुष चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसतो.त्याला घरकाम करणे अपमानास्पद वाटते. स्त्रीला स्वैपाक, धुणीभांडी, स्वच्छता, मुलांचे अभ्यास घेणे हे सर्व एकटीला करावे लागते. थोडक्यात काय, स्त्रियांना घरच्या सर्व जबाबदार्या व व्यावसायिक जबाबदार्या अशी तारेवरची कसरत करावी लागते.
रोमानियन स्त्री तिची जिद्द, चिकाटी, मेहनती स्वभाव आणि जास्त तास थांबून काम करण्याची तयारी या गुणांमुळे नोकरीच्या जागी ओळखली जाते.परंतु नोकरीच्यi जागीसुद्धा खुपजण पारंपारिक विचारांचे असतात. त्यामुळे ‘ही कामे स्त्रियांची-ही कामे पुरुषांची हा भेद असतोच. यामुळे तिला हव्या त्या पद्धतीने करियर घडवता येत नाही . स्त्रीची योग्यता व पदव्या पुरुषाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त असल्या तरी त्याच पदासाठी तिला तिची पात्रता सिद्ध करण्यासाठी जास्त तास थांबून कामे करावी लागतात. आणि पगार मिळताना मात्र त्याच पदावर काम करणाऱ्या पुरुषाला स्त्रीपेक्षा पुष्कळदा जास्त पगार मिळतो .” नेला म्हणते,”बाळंतपणासाठी इथे दोन वर्षेपर्यंत राजा मिळते, व त्यानंतर त्याच जागी , काम करण्याची संधीही . पण हीच संधी आम्हाला कामाच्या जागी दुय्यम स्थान देते.”

फनिका (नाव बदलले आहे.) ही इंजिनियर म्हणून ज्या कंपनीत काम करत असे, ती कम्पनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झाली. त्यानंतर तिने एका छोट्याशा गावी हॉटेल चालवले. रोमानिया हे युरोपियन युनियन मधील एक राष्ट्र . इथे बेरोजगार व्यक्तींना युरोपियन युनियन तर्फे व्यवसायासाठी कर्ज मिळते. फनिका स्वतः इंजिनियर असून, तिच्याकडे कल्पक योजना असूनही रोमानियन पारंपारिक विचारसरणीच्या आणि पुरुषसत्ताक पद्धतीच्या समाजात तिला या फंडासाठी स्वतः च्या नावात अर्ज करता आला नाही. कर्जासाठी तिला नवर्याच्या नावानेच अर्ज करावा लागला. हे कमी आहे कि काय म्हणून इथे घरगुती अत्याचार ,विनयभंग, बलात्कार वगैरेंसाठी अजूनही स्त्रीच दोषी मानली जाते. परंपरेच्या जोखडात अडकलेली रोमानियन स्त्री आपल्या हक्कांसाठी व पुरुषांनी दिलेल्या अन्याय्य वागणुकीसाठी आवाज उठवत नाही. त्यांचा घरी अपमान होत असेल, नवर्याकडून मारहाण होत असेल तरीही त्या पोलिसात तक्रार नोंदवत नाहीत, एवढेच नवे, तर आपल्या मित्र-मैत्रिणीला वा परिवारालाही विश्वासात घेऊन या गोष्टी सांगत नाहीत कारण आपल्याला अशी वागणूक मिळते हे सांगायची त्यांना लाज वाटते.
२००३ मध्ये रोमानियात ‘द नेशनल ऑर्गनायझेशन ऑफ लिबरल वूमन’ ही संस्था स्थापन झाली. रोमानियाची ‘वूमन्स लीग’ म्हणते,’अस्तित्वाच्या या लढ्यात स्त्रियांना नगण्य स्थान आहे.’ लग्न झालेल्या स्त्रियांची गणना इथला कायदा लहान मुलांमध्ये करतो.या किंवा अशांसारख्या स्त्रीहक्कांसाठी लढा देणाऱ्या विनानफा तत्वावर चालणाऱ्या संस्था मदतीला तत्पर असूनही नवर्याविरुद्ध आवाज उठवणार्या महिलांचे प्रमाण केवळ ८-९% च आहे. काडीमोड दिली तर घर-दर जाईल,मालमत्तेची विभागणी होईल व नवीन घर घेणे किंवा भाड्याने घेणे,इतर बिले भागवणे, मुलांना सांभाळणे या सार्या गोष्टी आपल्या पगारात शक्य नाहीत असे ती म्हणते. कारण युरोप मधील आर्थिक संकटामुळे देश परिस्थितीच्या विळख्यात सापडलेला, अपुरे पगार !
इंटरनेशनल कंपनीत फायनान्स सेक्शन मध्ये काम करणारी ‘सोरीना’ म्हणते, “मुलीचे आईवडील तिला पाठींबा देण्यासाठी व आपल्या परीने मदतीसाठी तयार असतात. पण मुलगी या गोष्टी आई-वडिलांपर्यंत जाऊ देत नाही. घरातल्या गोष्टी घरातच राहतात.विशेषतः खेडेगावांमध्ये हे जास्त पाहायला मिळते.” तमारा म्हणते,”आमच्याकडे गणतंत्र राज्य आहे, पण गणतंत्र म्हणजे काय हेच समाज अजून जाणत नाही.”मिडिया व tv वर स्त्रीविषयक कार्यक्रम नाहीत असे नाही, पण बरेचसे कार्यक्रम ‘स्त्री आपल्या घराची चौकटच कशी सांभाळत बसेल’ याचा विचार करूनच दाखवले जातात.
आज अंतर-राष्ट्रीय खेळांमध्ये भरपूर गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या मुली आहेत,ऑस्कर फॉर क्लासिकल म्युझिक घेणारी अन्जेला जॉर्ज आहे, आंतरराष्ट्रीय यशासाठी २०११ चे युरोपियन बॉर्डर ब्रेकर अवार्ड घेणारी पॉप सिंगर एलेना अपोस्तोलीनू आहे,
‘If you want something said, ask a man , if you want something done, ask a woman!’ या श्रीमती मार्गारेट थाचरयांच्या उक्तीची आठवण करून देणारी ‘fortune 50 International most powerful women’ मध्ये झळकणारी- रोमानियातील सर्वात मोठ्या कंपनीची CEO – मारियाना जॉर्ज आहे!
मोठ्या शहरात स्त्री मेयर्स आहेत,राजकारणात मोठ्या पदांवर स्त्रिया आहेत,सन २००० मध्ये सिनेट वर फक्त दोन स्त्रिया होत्या आणि पार्लमेंट मध्ये ५.५% . पण आता ही सांख्य वाढते आहे. पण युरोपियन युनियनचा ३०% कोटा अजून फार दूर आहे.
आजचा रोमानियन तरुण बदलतो आहे,शहरात पुरुष स्त्रीला घरात निम्मानिम मदत करू लागला आहे. असं २५-२६ वर्षाच्या ख्रिस्तिना, वाना यांसारख्या तरुणी सांगतात.

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आधीपासून ते दुसर्या महायुद्धापर्यंत स्त्रीचे कार्यक्षेत्र घर- मुलेबाळे इथपर्यंतच मर्यादित होते. खेड्यात स्त्रीला शेतीची कामे करावी लागत.
दुसर्या महायुद्धानंतर कम्युनिझम च्या काळात स्त्रियांना बाहेर पडून काम करावेच लागले.परंतु त्यांच्या पर्स मध्ये आता काही कमाई होती. त्यामुळे आलेल्या स्वातंत्र्याची लज्जत थोड्याफार प्रमाणात चाखता येत होती.यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढला असणार. याच काळात शिक्षण सर्वांसाठी मोफत सुरु झाले आणि अगदी खेडोपाडी देखील शाळा सुरु झाल्या, याचाही फायदा स्त्रियांनी घेतला असणार !१९८९ च्या क्रांतीनंतर पब्लिक सेक्टर मध्ये जरी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती, तरी प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये त्यांच्या कार्यकुशलतेची दाखल घेतली गेली आणि इथे खर्या अर्थाने रोमानियन स्त्रीची प्रगती सुरु झाली असे दिसते.
भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजा राम मोहन राॅय, रविन्द्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, माधवराव रानडे , टिळक, आगरकर वगैरेंनी समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले त्याबरोबरच स्त्रियांच्या शैक्शणिक प्रगतीसाठीही प्रयत्न सुरू झाले.धर्म, जाती व शिक्शण याबाबत या लोकोत्तर पुरुषांनी सुधारणा घडवल्या. जिथे बदलण्याची गरज होती, तिथे त्यांनी समाजाची मानसिकता बदलली, हे मोठेच कार्य ! आणि त्यांच्या बरोबर स्वर्णकुमारी देवी, रमाबाई सरस्वती, रमाबाई रानडे, मालती पटवर्धन, सरोजिनी नायडू या स्त्रियांनी हे काम पुढे नेले.
फक्त ५०% समाजाला म्हणजे स्त्रियांना परिस्थितीत बदल व्हावा असं वाटण पुरेस नसतं, परिस्थिती बदलवण्याला ते कारणीभूत होतच असं नाही.भारतामध्ये स्त्री मुक्तीसाठी केलेल्या सुधारकांच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम स्त्रीने केले असे दिसून येते.तरीसुद्धा खेड्यापाड्यात आजही खर्या अर्थाने स्त्री परंपरेच्या जोखडातून मुक्त झाली आहे का, हा प्रश्न राहतोच !
स्वतंत्र रोमानियात असे दिसते कि त्यांना एक जागरूक नागरिक बनण्यासाठी स्वतंत्र रोमानियाचे सुंदर स्वप्न पाहणारा समाज आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणारा नेता मिळाला नाही. याचे कारण कम्युनिझमच्या काळातच समाजातले विचारवंत तुरुंगात टाकले गेले, किंवा देश सोडून निघून गेले. आजही उच्चशिक्षितानचा काल देश सोडून जाण्याकडे दिसतो.
इथे रोमानियन स्त्रीचा झगडा स्वतःसाठी खर्या अर्थाने एकटीचाच आहे , कारण कम्युनिझमच्या काळात नागरिकांची वैयक्तिक मालमत्ता सरकारजमा होऊन सर्वांना राहायला सरकारी घरे, समान पगार, सारखे जेवण-खाण ! या सिस्टीमचा इतका धसका रोमानियन नागरिकाने घेतला आहे, कि जो तो स्वतः पुरतेच पाहतो. म्हणजे आपलi ओनरशिप flat अगदी स्वच्छ व सुंदर सजवलेलi असतो , पण घराबाहेरचा कॉमन जिना स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणीच घेऊ इच्छित नाही कारण ती कॉमन property आहे. अशा मानसिकतेचा परिणाम म्हणून स्त्रियांनी एकत्रित होऊन स्वतःच्या प्रगतीसाठी पूल पुढे टाकणे रोमानियन स्त्रीला शक्य होत नाही.आणि ही मानसिकता बदलण्यासाठी ज्या नेत्याची गरज आज रोमानियाला आहे, त्याची चाहूल दूरदूर पर्यंत लागत नाही.तरीही सर्व शक्तीनिशी रोमानियन स्त्री आपल्या प्रगतीसाठी झटते आहे असेच चित्र इथे दिसते. पण या मुठभर स्त्रियांची प्रगती म्हणजे सर्व रोमानियन स्त्रियांची प्रगती असे सरसकट विधान करता येत नाही.खेड्यांमध्ये आजही ८ वी च्या पुढचे शिक्षण मिळू शकत नाही व शहराच्या गावी मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे तर राहणे-खाणे व इतर खर्च करणे पैशांच्या अभावी शक्य नाही.काहींना मुलांच्या शिक्षणाचे महत्व काय आहे, याचीच अद्याप समाज नाही.
जो आत्मविश्वास आज भारतीय स्त्री मध्ये दिसतो, तो सर्व-सामान्य रोमानियन स्त्री मध्ये नाही कारण पुरूषसत्ताक पद्धत हे एक आणि वर्षानुवर्षे कम्युनिस्ट नेत्यांनी आपल्या हाती घेतलेले निर्णयाचे अधिकार.तरी शहारी तरुण पिढीत स्त्री व पुरुष दोघेही हातात हात घालून चालताना दिसतात. घर स्त्रीच्या मालकीचे कि पुरुषाच्या याचा विचार न करता रोमानियन स्त्री परस्पर विश्वास व प्रेम हा सुखी जीवनाचा पाया समजून लग्न करते आणि पुरुष घरातल्या जबाबदार्या वाटून घेतो, स्त्रीच्या करियर साठी प्रसंगी नोकरी बाजूला ठेवून मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतो, हा बदल नक्कीच आश्वासक आहे !

उज्वला अन्नछत्रे
बुखारेस्ट .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उज्ज्वला ताई,

खूप सुंदर लेख. हा वाचनातून कसा निसटला ते कळत नाही.

मी ऐकलंय की रोमानियात भटक्या जिप्सी लोकांची बरीच वस्ती आहे. तुम्ही ज्याला गावाकडच्या स्त्रिया असं म्हणतात त्यांच्यात या जिप्सी महिलांचा समावेश होतो का?

अवांतर : जिप्सी लोक स्वत:स रोमा असे म्हणवून घेतात आणि रामाचे वंशज समजतात.

आ.न.,
-गा.पै.

छान लेख.थॅचर बाईंचे वाक्य जबरी आहे. लिहून घेतले आहे. क्रांतीनंतर रोमानिया मध्ये सरकारी अनाथालयात खूप मुले सापडली व त्यांना कोणीच घरी घेऊन जायला तयार नव्हते असे वाचले होते. तेव्हा कसेही करून त्यातल्या एका तरी मुलाला घरी घेऊन यावे असे फार वाट्ले होते. स्त्रीयांची कहाणी आपल्या भारता पेक्षा वेगळी आहे असे दिसत नाही. कसे व्हायचे हया विचाराने मन खिन्न होते. तुमच्या तिथे मैत्रिणी झाल्या असतील ना?

खूप माहितीप्रद अन छान लेखन.लेखिकेची निरिक्षणे जबरदस्त आहेत.. ज्ञानेश्वर मुळ्येंची रशियन स्त्रीविषयक निरिक्षणे आठवली.
आभार उज्ज्वलाजी.

गामा, गावाकडच्या लोकांचा उल्लेख करताना त्यात या जिप्सींचा समावेश नाही. हे जिप्सी खरेतर आपल्या पंजाबातले... भटके लोक...

गामा, महागुरू
तुम्हाला लेख आवडला हे वाचून आनंद झाला.

अश्विनीमामी, खरं आहे तुमचं ! मन खिन्न होतं ! आणि या लेखाच्या दोन्ही भागात मिळून ज्या स्त्रियांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याशी माझी मैत्री झाली आहे. आणि त्या सगळ्या धडाडीच्या स्त्रिया आहेत.

भारतीजी, तुम्हाला लेख आवडला हे वाचून आनंद झाला.
तुम्ही द्न्यानेश्वर मुळ्येंच्या लेखाचा उल्लेख केला आहे,तो कुठे वाचायला मिळेल ?

सिडने शेल्डॉनचं 'विंन्डमिल्स ऑफ द गॉड्स' नावाचं नॉवेल वाचलं होतं. शेल्डॉन महाशयानी रंगविलेला रोमानिया अस्वस्थ करुन गेला. आज परत एकदा त्या पुस्तकाची आठवण झाली....

वा उज्वलाताई.. फार दिवसानी माबो वर सकस अनुभवसिद्ध, मेहनतीने केलेले लिखाण वाचायला मिलाले. आम्ही आपले आभारी आहोत एवढा मोठा लेख टाईप करणे हे एक वेगळेच कौतुकाचे काम आहे. मूळ लेखही मोठा दर्जेदार आहे. आवडला.

युरोपाच्या प्रवासात ट्रेन आणि इतर गर्दीच्या जागी येऊन अंगलगट करणार्‍या (आणि खिसा-पासपोर्ट छू मंतर करणार्‍या) रोमानिअन मुलींबद्दल काळजी घेण्यास सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर हा लेख रोमानियन स्त्रियांबद्दलचे मत बदलवण्यास भाग पाडणारा आहे.