मी पाहिलेला पहिला जागतिक माणूस

Submitted by अमेय२८०८०७ on 13 February, 2013 - 04:10

जाणत्या वयापासून अवती भवतीच्या बऱ्या- वाईट घटनांच्या जाणिवा मनात घर करायला लागतात. मनाचे असंख्य पापुद्रे आणि स्तर अशा अनुभवांनी भरून जायला सुरुवात होते. त्या - त्या वेळी लक्षात आले नाही तरीही अंतर्मन अशा लक्षणीय गोष्टींचा संग्रह करीत असते. अवचित त्या गोष्टी नवीन संदर्भाने सजग मनासमोर येतात आणि त्यांच्या झळाळीने पुन्हा एकदा लख्ख प्रकाश पडतो. काही मळभ आलेले असेल तर ते दूर होते, डोळ्यात पाणी येते खरे पण आसू हलकेच पुसले की नवीन वाट दिसू लागते, काही प्रश्नांचा उलगडा झाल्यासारखे वाटते.
" कै. श्री. व्यंकटेश ह. सांगावकर" म्हणजेच सरांची आठवण आली की मला हे सर्व आणि खूप काही दाटायला लागते. त्यांची वामनमूर्ती, जस्ती काड्यांचा चष्मा, गणवेषासारखा त्यांचा तो पांढरा शुभ्र पोशाख आणि इंग्रजी भाषेच्या निरगाठी घनगंभीरपणे उकलून दाखवणारा निरंतर आवाज, हे सगळे एका ध्वनी-चित्रफितीप्रमाणे डोळ्यासमोर नाचायला लागते. माझ्या वाढत्या समजेनुसार सरांकडून काय मिळाले याची कृतज्ञताही उत्तरोत्तर वाढत गेली आहे.
सर आम्ही जिथे शिकत होतो त्या शाळेतून कित्येक वर्ष आधीच निवृत्त झाले होते पण शिक्षणाच्या ध्यासातून अथवा शिक्षकी वृत्तीतून कधीच बाहेर पडले नव्हते. तसे ते शेवटपर्यंत पेशातच राहिले, एखादा चित्रकार, कवी अथवा (सच्चा) समाजसेवक राहतो तसे! या पायी आर्थिक - भौतिक सुखे नाकारून, कुटुंबियांपासून वेगळेपणा स्वीकारून आणि खालावणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी बेदखल करून ते शिकवत राहिले. माझ्यासारख्या कित्येक आयुष्यांवर अमीट छाप टाकत गेले. लोकभाषेत बोलायचे तर निवृत्तीनंतर सर इंग्रजी विषयाचे पाचवी पासून पुढे कुठल्याही वर्ग, पदवी, पदव्युत्तर इयत्तांपर्यंतचे 'खाजगी क्लास' घेत होते. पण त्या दहा- बाय- बाराच्या दोन खोल्यात सर जे काही मंथन करीत होते त्याला खाजगी क्लास म्हणणे हे रवी शंकरांच्या सतार वादनासंबंधी " काय तरी तारा आवळून आवाज काढतात" म्हणण्यासारखे हास्यास्पद आणि खोटे ठरेल. सरांच्या शैक्षणिक कार्याचा नाद सतारी सारखाच खोल आणि भावपूर्ण होता.
त्याला क्लास कसे म्हणावे! हल्ली वर्तमान पत्रातून रकाने भरून येणाऱ्या जाहिरातवाल्यांची सुबक व्यावसायिकता त्यात नव्हती, गुळगुळीत माहितीपत्रके नव्हती आणि 'एका सत्रासाठी दोन हजार, दोन सत्रांच्या बुकिंगवर पंधरा टक्के सूट' अशा तऱ्हेचा 'आर्थिक अप्रोच' तर मुळातून नव्हता. जिथे कुणालाही एका पैशाची फी नव्हती तिथे सूट काय देणार? सरांची खोली म्हणजे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चाललेले ज्ञानाचे अग्निहोत्र होते. सर सुद्धा माणूसच आहेत, त्यांना जेवण अंघोळ वगैरे आन्हिके करावी लागतात असा प्रवाद होता पण त्यांना जेवताना अथवा थकून झोपताना बघितलेला माणूस अजून सापडला नव्हता. कधी तरी सर संध्याकाळी आवडीने कांदा भजी खातात अशी अफवा होती, अर्थातच प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता.
आम्ही सरांना पाहिले ते अखंड काम करतानाच. 'अखंड' शब्दाच्या प्रत्येक अर्थछटे सारखे भव्य आणि तेजःपुंज कार्य करताना, ज्यांच्या पूर्वीच्या सात पिढ्या इंग्रजी बोलल्या नव्हत्या आणि ( सर नसते तर ) पुढच्याही सात बोलल्या नसत्या, अशा पोरांना खडाखड इंग्रजी बोलायचा विश्वास देताना - इंग्रजी हा परीक्षेतला अडथळा आहे हा समज खोटा करताना, ज्यांच्या अंगी मूलभूत आवड आहे अशांना एक भाषा म्हणून वैशिष्ट्ये समजून सांगताना! डॉक्टरने रुग्णाची 'तबियत' पाहून डोस ठरवावा तसे सर विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार डोस ठरवीत असावेत. बरं ह्यात वरकरणी कुठेही भेद-भाव अथवा डावे-उजवे नसे. विद्यार्थी म्हणून सगळे सारखे होते. फरक होता तो एकाच अभ्यासक्रमावर खुबीने केलेल्या प्रक्रियेत. दुबळ्या विद्यार्थाला अवघड होणार नाही आणि हुशार मुलाला भूक भागली नाही- असे वाटणार नाही, अशा प्रकारचे ज्ञान एकाच सत्रात वितरीत करणारा शिक्षक पुढे कधीच दिसला नाही.
निष्णात शिक्षक असूनही सर प्रत्येक दिवशी काय शिकवायचे याची जय्यत तयारी करीत असत. त्यांच्याकडे किमान पन्नासेक फळे होते. दररोज संध्याकाळी सगळे फळे साफ सूफ दिसायचे, पण दुसऱ्या दिवशी अगदी साडेपाचच्या शिकवणीला सुद्धा सगळे भरलेले असायचे. अंबाबाईचे देऊळ देवांनी एका रात्रीत बांधले म्हणतात. आम्हालाही वाटायचे कोणी देवदूतच सरांचे फळे रोज रात्री लिहून जातो म्हणून. रात्री साडेनऊपर्यंत शिकवून पुन्हा इतकी मेहनत घेणे साध्या मनुष्याच्या अंगाबाहेरचे काम वाटायचे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर कार्यरत असूनही कार्य-आंधळे कधीच नव्हते. रसिक होते, बहुश्रुत होते. काळाचे त्यांना चांगले भान होते. सामाजिक जाणिवा प्रखर होत्या. वयानुसार मुलांच्या बदलत्या अभिव्यक्तिची त्यांना समज होती. दोन वर्गांच्या मध्ये कधी-मधी होणारे अवांतर बोलणे ही सुद्धा आम्हा मुलांना पर्वणी होती. त्यांना विनोद चालत असे, चांगले काढलेले चित्र दाखवले तर समरसून दाद देत, चर्चा करीत. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम करण्यास त्यांचे प्रोत्साहन असे. 'शामची आई' कादंबरीवरील अथवा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजीच्या परीक्षांसाठी स्वखर्चाने बसवायचे, चांगले गुण मिळाल्यावर पुन्हा बक्षीसही द्यायचे. सर म्हणजे आदर्श आहे असा डंका न पिटताही आदर्शाच्या थेंबा थेंबानी भरलेले चैतन्याचे झाड होते.
मला जवळ जवळ दहा एक वर्षे सरांचा सहवास लाभला. आज आठवण आली की ही दहा वर्षेही कमी वाटू लागतात. पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावे आणि गोणपाटावर जाऊन बसावेसे वाटते. सरांचा किंचित खरखरीत, जीवनाचे असंख्य पावसाळे पाहिलेला, असीम मायेने भरलेला हात डोक्यातून फिरावा असे वाटते. एखादा निबंध लिहून शाबासकी मिळवावी असे वाटते आणि आता असे काही होणे शक्य नाही, हे उमजून खिन्नता दाटून येते. काहीतरी अजून बोलायला हवे होते, अजून काही घ्यायचे राहून गेले या भावनेने अपराधी वाटत राहते.
अशातच सरांची प्रसन्न चर्या दिसते. आश्वासक शब्द आठवतात. अवघ्या वेळात मिळालेली शिदोरी आयुष्यभर पुरली आहे, अजूनही पुरणार आहे या समाधानाने धीर येतो. इतक्या मुलांच्या कृतज्ञतेचे पुण्य मिळून सर पुण्यात्मा झाले असतील आणि त्यांची व्यापक दृष्टी आपल्या शिष्यांच्या जीवनांचा नक्कीच मागोवा घेत असेल, असा विश्वास जाणवू लागतो.
काही दिवसांपूर्वी सहकाऱ्यांशी जेवणाच्या टेबलावर चर्चा रंगात आली होती. प्रत्येक जण बऱ्यापैकी जग फिरून पाहिलेला होता. वेळी अवेळी भेटलेल्या - भावलेल्या जागतिक कीर्तीच्या माणसांचे संदर्भ काढणे चालू होते. मला क्षणात सर आठवले. आपल्या विद्यार्थ्याला जगातील उत्कृष्ट साहित्य, काव्य - कला यांची ओळख झाली पाहिजे, त्यांनी हुषार म्हणवून घेण्यासोबत सुसंस्कृतपणाही अंगिकारला पाहिजे या नि:स्वार्थ भावनेने सरांनी चालवलेल्या अहोरात्र ज्ञान - यज्ञाचा दर्जाही जागतिकच होता, विद्यार्थ्यांच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचे तडजोड न करता सदैव 'शिकवते' राहण्याचा ध्यास अपूर्व होता. या अर्थाने सांगावकर सर हे मी पाहिलेला पहिला 'जागतिक विचारसरणी जोपासणारा आणि कामात जागतिक दर्जाचा हव्यास धरणारा' माणूस होते.
एक खंत मात्र आयुष्यभर राहील. कधीतरी केरसुणी घेऊन सरांची खोली झाडून काढायला हवी होती, कदाचित मनावरची आणखी काही जळमटे वेळीच निघून गेली असती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही अशी व्यक्तिमत्वे फार खोलवर ठसा उमटवून जातात आयुष्यभर सोबत करेल असा.
खरेच भाग्यवान आहात. अतिशय छान भाषेत उभे केलेत सरांचे व्यक्तिचित्रण. धन्यवाद !

माझ्या पिढीत असे दिग्गज होते ज्यानी वाशिमसारख्या विदर्भातील आडगावात असूनही मला शेली , बायरन अन वर्डस्वर्थच्या स्कॉटलँडची सफर करवून आणली. मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे जावून आल्यावर त्या>ना भेटलो तेव्हा त्यांचे पैलतिरी लागलेले स्वप्नील डोळे पहाण्याजोगे होते.
त्या सर्वांच्या आठवणी तुम्ही जागृत केल्यात
सुंदर अतिव सुंदर

काहीतरी अजून बोलायला हवे होते, अजून काही घ्यायचे राहून गेले या भावनेने अपराधी वाटत राहते.
>>>
छान लिहिलय

मी ही सांगवकर सरांची विद्यार्थिनी आहे - तुम्हाला माहित असेल किंवा नसेल. पूर्वाश्रमीची स्मिता करंदिकर! तुमचे वडिल मला ओळखतात. माझी आई टोपीवालाच्या प्रायमरीत शिक्षिका होती.
अमेय, हा तुनचा लेख मी तरुण-भारत मधे वाचला म्हणजे विजय शेट्टीने मला तो पाठवला आणि तो अंक मी जपून ठेवला आहे. मस्त लिहिला आहे.
-- श्रुत्ती/स्मिता

सरांकडून तुमच्या नावाचा उल्लेख आठवतो. तुम्हाला बहुतेक इंग्लिशला दहावीत ९२ मार्क पडले होते जे आपल्या क्लासचे 'रेकॉर्ड' होते, ते मोडणार्‍यास आमच्यावेळी १५१ रू.चे बक्षीस होते (१९९२ चे १५१!). मला ९० मिळाले, त्यामुळे १५१ नाही पण १०१रू सरांनी दिले होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात असणार्‍या अशा गुरूंची आठवण तुमच्या या लेखामुळे तुम्ही करवून दिलीत Happy धन्यवाद Happy
खूप छान लिहिलंय... शेवटाची ओळ अगदी अगदी खरी! Happy

हो, मला माहित नाही की सर माझ्या नावाचा उल्लेख करत असत ते. कारण तोंडावर स्तुती करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि मी दहावीत असताना सरांशी पैज लावून ९२ मार्क मिळवले होते - त्यावेळी तेवढे मार्क कोणाला मिळत नसत. मी रत्नागिरी जिल्ह्यात इग्लिश विषयात प्रथम आले होते, सरांबरोबरच्या आठवणी सुखद होत्या पण त्यांच्या अंतिम काळात मी त्यांना मदत करु शकले नाही मला कोणी कळवलेही नाही याचे दु:ख मनाला पोखरत रहातं. असो. त्यांच्या स्मृतीत मालवणच्या शाळेत आम्ही सर्व माजीविद्यार्थ्यांनी 'ज्ञानमंदिर' उभारले आहे. ते तुम्ही पाहिलेच असेल. नसेल तर जरूर पहा. तुमच्याशी ओळख झाली असती तर बरे वाटले असते. पंडीत सरांनी तुमच्यातर्फे ज्ञानमंदिराला मदत दिली होती.
-- स्मिता

खुप मनस्वी लिहिलंयस अमेय. ख-या अर्थानं 'गुरूवर्य' म्हणता येईल त्यांना.
तू आणि स्मिता खरंच खुप भाग्यवान विद्यार्थी.

दुबळ्या विद्यार्थाला अवघड होणार नाही आणि हुशार मुलाला भूक भागली नाही- असे वाटणार नाही, अशा प्रकारचे ज्ञान एकाच सत्रात वितरीत करणारा शिक्षक पुढे कधीच दिसला नाही>>> ही जाण प्रत्येक शिक्षकाकडे हवी. पण ती किती अवघड गोष्ट आहे. तू किती समर्थ शब्दात ते पोचवलंयस Happy