चारचौघी - १३

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2013 - 03:15

या कादंबरीच्या शेवटच्या तीन भागांपैकी हा पहिला भाग आहे. वाचकांचे व प्रतिसाददात्यांचे, तसेच मायबोली प्रशासनाचे मनापासून आभार मानतो.

=========================

'आपल्या चौघींच्या सुखाला प्रियंकाची नजर लागली' हा जयाने काढलेला विचित्र निष्कर्ष कोणीही मान्य करत नव्हते. जो कुलश्रेष्ठ तर कडाडून विरोध करत होतीच, पण नीलाक्षीही जयाला समजावत होती. प्रियंका शेजारच्या रूममध्ये 'आज मी अभ्यासासाठी म्हणून एकटीच तिकडे राहते' असे म्हणून निघून गेल्यावर जयाने कुजबुजत हे विधान केले आणि दोघींनी ते हाणून पाडले. एकोणीस वर्षाची प्रियंका इनोसन्ट होती. तिच्यामुळे खरे तर ग्रूपमध्ये स्पिरिट डेव्हलप झाले होते. बरीच मजामजा तिच्यामुळे सुरू झालेली होती. सिमच्या बाबतीत जे घडले त्याला पूर्णपणे नसली तरी बर्‍याच अंशी सिम जबाबदार होती. आशिषच्या पार्टीत झालेला रेप ही एकच बाब कदाचित तिच्या नियंत्रणाबाहेरची असावी. पण त्यानंतरचे बोल्ड फोटोशूट आणि तिघे जळून मरण्याशी कदाचित असलेला संबंध आणि त्यातून कस्टडीत रवानगी होणे याला तरी सिमच पूर्णपणे जबाबदार होती. खरे तर आता निली आणि जो असे म्हणू लागलेल्या होत्या की सिमसारखी मुलगी आपल्या बरोबर होती हेच नवल आहे. सिमचे वर्तुळच वेगळे होते. तिचे विचार, आकांक्षा आणि योजना सामान्य नव्हत्या. आपल्याशी 'अलाईन' होणार्‍या नव्हत्या. वेगळ्याच मार्गावर तिचे आयुष्य होते आणि केवळ सहा महिन्यांसाठी तो मार्ग आपल्या मार्गांच्या जरा जवळून गेला इतकेच. दोघी सिमला दोष देत नव्हत्या, पण सिम आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे हे मात्र मान्य करून बसलेल्या होत्या.

घडलेल्या घटनांमुळे सिमसाठी 'जवळची मैत्रीण' हीसुद्धा प्रत्यक्षात पारंपारीकच विचार करणारी व या समाजाच्या विचारांचे अंधानुकरण करणारीच व्यक्ती निघालेली होती. 'चारचौघीं'च्या वाटचालीतील हा अतिशय 'सायलेंट' पण त्याहून अधिक, खरे तर सर्वाधिक महत्वाचा टप्पा होता. कोणत्यातरी बिंदूपर्यंत सिमला आपल्यातील मानणार्‍या या दोघी आता सिमला परकी मानू लागल्या होत्या. ज्या विश्वात स्त्री शोषित असते आणि शोषणाविरुद्ध लढा देण्यात आयुष्य खर्ची घालते तेथे सिमेलिया स्वतःहून देहप्रदर्शन करत होती. अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्याशी जवळून निगडीत झालेली होती. तिच्या घरचेही तिला सहाय्य करू इच्छित नव्हते. हा सगळा दोष सिमचा आहे हे या दोघींनी नकळतपणे ठरवून टाकलेले होते. वास्तविक रेप झाल्यानंतर सिमने गोयलची ऑफर स्वीकारली नसती तर तिच्या हाती काहीही लागले नसते आणि ती उगाचच उद्ध्वस्त झाली असती हे कोणी लक्षात घेत नव्हते. जनसामान्यांमध्ये कशी का असेनात पण एक प्रतिमा निर्माण झाल्यानंतर सिमच्या हाती आलेली पैसा आणि प्रसिद्धीची ताकद तिला तीन खून करण्याचे बळ देऊन गेली आणि सूड घेण्याची क्षमता देऊन गेली याकडे या दोघी डोळेझाक करत होत्या. सिमला तिचे आयुष्य साधेसुधे असावे असे म्हणायचेच नव्हते. ग्लॅमर क्षेत्रात आल्यानंतर लाज जपत राहणे मूर्खपणा ठरेल हे सिमही जाणून होती. पण तिच्याबाबतीत जे जे काय झाले ती निव्वळेक घटनांची साखळी नव्हती ज्यात सिम मनाला येईल तशी रिअ‍ॅक्ट होत गेली. तिच्याबाबतीत जे झाले ते तिच्यावर लादले गेलेले होते. तिचा रेप झाल्यानंतरही तिच्यासाठी एखादी सोज्वळ असाईनमेन्ट देणे गोयल आणि सीरीनच्या हाती होते. पण 'ही आता नासलेलीच आहे, ही काय विरोध करणार, हिला टिकायचे असले तर कपडे काढावेच लागतील' हा अहंकार त्यामागे होता. तुच्छता आणि शोषणवृत्ती त्यामागे होती. जळून मरण्याआधीच्या क्षणापर्यंतही त्या तिघांना सिम परत हवी होती. हा त्यांचा वर्चस्ववाद होता. सिमचे आणि या तिघींचे मार्ग वेगळे नव्हते. फक्त मार्गातील अडथळे वेगळे होते, वेगळ्या बाह्यस्वरुपाचे होते. वर्चस्ववादाला या तिघीही सामोर्‍या जातच होत्या, अगदी दैनंदिन जीवनातही! जो ला बसमध्ये शाळकरी मुलेही चिकटू पाहात होती. निलीचे तर कोवळे बाल्यच त्या वर्चस्ववादात नष्ट झालेले होते. जयाला विवाहाचा अर्थ स्वतःपुरता बदलून घ्यावा लागलेला होता. पण हे अडथळे 'सामान्य जीवन जगताना येत असणारे अडथळे आहेत' असा पक्का समज या तिघींनी करून घेतलेला होता. सिमच्या आयुष्यात, स्वातंत्र्याने जगण्यात आलेले अडथळे हे सिमने निवडलेल्या असामान्य मार्गावरील वाटचालीचे परिणाम मानत होत्या त्या! आणि हीच मोठी चूक होती. केवळ ग्लॅमरवर्ल्डमध्ये ठसा उमटवायचा या उद्देशाने स्त्री आलेली असली की तिने काहीही सहन करण्याची तयारी ठेवावी अशी नकळत निर्माण झालेली अपेक्षा खरे तर या तिघींना सामान्यच बनवत होती. एकमेकींसोबत व्यतीत केलेले आनंदाचे उत्फुल्ल क्षण आणि मैत्री या दोन्हींच्या स्मृतींना तिलांजली देऊन त्या आता मनाने सिमपेक्षा आपण खूप वेगळ्या आहोत असे समजू लागल्या होत्या. खरे तर सिमेलियाला आत्ता या तिघींची खूप गरज होती. पण सिमेलिया ती सिमेलियाच! असहाय्यतेला आणि एकटेपणालाच आपले सामर्थ्य बनवण्याची अद्भुत लढाऊ वृत्ती गेले महिनाभर ती दाखवत होती. या तिघी मात्र 'राहात होती बाई ती आमच्याबरोबर, आम्हाला कधी अशी वाटलीच नव्हती' असे वाक्य आता होस्टेलवरील इतर मुलींशी बोलताना बिनदिक्कत टाकू लागल्या होत्या.

चारचौघी! चारचौघी वजा एक! तिघी!

ती 'एक' वजा का झाली? कारण तिचा रेप झाला होता? तो तर निलीचाही केव्हाच झाला होता. तोही सलग चार वर्षे! मग ती 'एक' वजा का झाली? तिने जगासमोर कपडे काढले म्हणून? मग अश्या जाहिरातींमधील मुली कधी 'आपल्यातल्या' नसतातच असा समज होता का या तिघींचा? त्या मुलीही कुठेतरी राहात असतात, त्यांनाही आई, वडील, भाऊ, बहिणी आणि मैत्रिणी असू शकतात. त्यांनाही निव्वळ व्यावसायिक कारणांसाठी अर्धनग्न व्हावे लागते. हे समजण्याची कुवत नव्हती या तिघींमध्ये? जर होती, तर ती 'एक' वजा का झाली चारचौघींमधून? कारण तिचा रेप करणार्‍यांकडूनच तिने असाईनमेन्ट मिळवण्याची अत्यंत बाजारू प्रवृत्ती दाखवली म्हणून? मग तिने काम घ्यायला नको होते? मग काय करायला हवे होते? होस्टेलवर रडत बसून तिला या तिघी पोसणार होत्या? कधीपर्यंत? जर पोसणार नव्हत्या आणि जर दुसरे काम तिच्या हातात नव्हते, तर ती 'एक' वजा का झाली? कारण तिने तिच्या घरच्यांशी संबंध सोडले होते? मग नीलाक्षीनेही सोडले होते की? जयाने तर पंधराव्या दिवशी लग्नही मोडले होते. मग या दोघींना वजा का नाही केले? फक्त सिमच वजा का झाली? निर्लज्ज होती म्हणून? एका भयानक हत्याकांड किंवा अपघाताशी निगडीत होती म्हणून? पण ती जर खुनी असलीच तर तिने बलात्कार्‍यांनाच मारले ना? मग ती वजा का झाली?

ती वजा झाली कारण या उरलेल्या तिघी 'चारचौघीं'सारख्याच होत्या. त्यांच्यात काहीही असामान्यत्व नव्हते. समाजाने ठरवलेल्या अलिखित नियमावलीनुसार जगत नसणारा आपल्यातील नसतो हे त्यांना मान्य करायला अतिशय सोपे वाटत होते. झगडा द्यायची, तोही कोण्या एका सिमसाठी, तयारीच नव्हती यांची! आणि यांना झगडा द्यायचे कारणही नव्हते. मरत दुसरेच कोणीतरी होते. आम्ही का त्यात बरबाद व्हावे?

चारचौघीसुद्धा चारचौघींना एकटे पाडतात, तोंडघशी पाडतात याचे उदाहरण होत्या जो, नीलाक्षी आणि जया!

सिमेलिया जगाला फाट्यावर मारत होती तेव्हा या तिघी आपापले आयुष्य अधिक सुरक्षित आणि अब्रूदार करण्यात गुंतलेल्या होत्या. आणि चक्रावणारे अनुभव घेऊन या तिघी होस्टेलच्या रूमवर रि-असेंबल झाल्या होत्या तेव्हा सिमेलिया कस्टडीतून या देशाच्या कायद्यावर, न्यायव्यवस्थेवर आणि त्या दोन्हीच्या मर्यादांवर थुंकत होती. आयुष्यातील बेस्ट व सेफेस्ट पॉलिसीज निवडल्याचा भास निर्माण करून पद्मजा कुलश्रेष्ठ या चारजणींच्या ग्रूपची निर्विवाद लीडर ठरलेली होती तो काळ आता मागे पडला होता. आता नायिकेचे पद गेले होते सिमेलियाकडे आणि या तिघी वाटचाल करत होत्या सामान्यत्वाकडे!

जयाची कहाणी न ऐकण्यासारखी, न सांगण्यासारखी आणि न वाचण्यासारखी होती! राहुलची आजी सिरियस असल्याने दोन महिन्यांनी करावयाचे लग्न तीन दिवसांत कसेसे आटोपले आणि तोवर कशीबशी जिवंत असलेल्या त्या म्हातारीचा आशीर्वाद घेऊन दोघे मुंबईला आले. तिकडे दोन दिवसांनी म्हातारीने प्राण सोडला, पण राहुलने जयाची सुचवणी, की आपल्याला पुन्हा बुलढाण्याला अंतिम दर्शनासाठी जायला हवे, अमान्य केली होती. राहुलला आजीबद्दल काहीही नव्हते. आजीचेच स्वप्न होते नातवाचे लग्न डोळ्यासमोर व्हावे आणि नातसुनमुख दिसावे.

राहुलचा पगार तुटपुंजा होता आणि तंबाखूशिवाय बाकी काही व्यसन नव्हते. पण अत्यंत घाणेरडी राहणी होती. त्याला लग्नाचा अर्थच समजलेला नव्हता. सहजीवन जगताना तडजोडी, नवीन स्वप्ने, त्यांच्या पूर्ततेसाठीच्या प्रयत्नांवर चर्चा, नव्याची नवलाई असे अनेक आकर्षक घटक मनाची जागा बळकावतात या वस्तूस्थितीपासून तो बराच दूर होता. एका डबड्या रेडिओवर नुसताच गाणी ऐकत तर गाणीच ऐकत बसायचा. रेडिओ कानाला लावून बसला की तंद्रीच लागायची जणू त्याची! खोलीच्याच एका कोपर्‍यात त्याने थुंकण्याची सोय करून ठेवलेली होती. एकट्या पुरुषाला लागणारे सामान जुजबीच असले तरी ते व्यवस्थित असू शकते हे त्याला जणू माहीतच नव्हते. जयाने कंबर कसून त्या टीचभर खोलीची केलेली साफसफाई राहुलच्या तोंडातून 'अरे वा' ही तीन अक्षरे काढण्यासही कमी पडली होती. पण हे सगळेच ठीक होते. म्हणजे ठीक नव्हते, पण सुधारणा होण्याइतपत तरी होते. पण अनेक बाबी सुधारणा होण्याच्या पलीकडच्या होत्या. त्याची आर्थिक परिस्थिती, जी लग्नाआधी जरा जास्तच रंगवून सांगण्यात आली होती, त्यातून बाहेर पडून काहीतरी जरासे तरी दिव्य करण्याची त्याची कोणतीही तयारी नव्हती. त्या विषयावर जया बोलू लागली तर तो तिच्यावर खेकसत होता. म्हणत होता की 'हे जे जसे आहे तसे आहे, आणि हे तुला आधीपासून माहीत होते, मग होकार कशाला दिलास'! आता जयाला आणि तिच्या घरच्यांना इतकी डिटेल्स खरंच माहीत नव्हती आणि त्यांनी कसून चौकशी केली नाही हे थोडेसे चुकलेही होते. पण हा माणूस सुधारणा करण्याच्या विचारांचाच नव्हता. 'तू जर घरी दुपारी चार वाजता पोचतोस तर पाच ते आठ आणखीन एक नोकरी करू शकशील' हे जयाचे वाक्य त्याला अपमान वाटला. त्यावर जयाने तिची स्वतःचीही नोकरी करण्याची पूर्ण तयारी आहे हे सांगितले. तर त्यावर तो म्हणाला आमच्या खानदानात बायका नोकरी करायला बाहेर पडल्या तर पुरुषांनी बांगड्या भरल्या आहेत असे मानण्यात येते. हा मोठा पौरुषत्वाचा अभिमान पहिल्याच रात्री बिनबुडाचा असल्याचे लक्षात आले होते. शारिरीक संबंधांशिवाय दुसरा विचारही डोक्यात नसलेल्या राहुलला प्रत्यक्षात संबंध करताच आले नव्हते. मनात शंकांची जळमटे असूनही जयाने ते विचार बाजूला सारून दुसर्‍या दिवशी घर लावणे, थोडी खरेदी, सुताराची चौकशी वगैरे गोष्टी केलेल्या होत्या. पण सलग आठवडाभर प्रयोग केल्यानंतर राहुल नपुंसक असल्याची तिला खात्री पटली होती. यातही तिढा असा होता की ते तसे नाही हे दाखवायचा त्याचा अविरत प्रयत्न असायचा आणि त्याचा इगो दुखावू नये म्हणू काहीतरी फारच सुखद वाटत आहे अशी भावना जयाला स्वतःच्या चेहर्‍यावर धारण करावी लागायची. याचे कारण तिने एकदा नापसंती व्यक्त करणारा चेहरा केला तर त्याने तिला चक्क मारहाण केली. जया एक शाळेतील शिक्षिका होती. अत्यंत चांगले विचार शिकवून सुजाण मुले घडवण्यामध्ये ती सक्रीय असताना तिला स्वतःलाच कौटुंबिक पातळीवर असले अनुभव यावेत हे तिच्यासाठी फार मोठ्या मानसिक उलथापालथी घडवणारे ठरले. पुढेपुढे राहुल सतत हेच सिद्ध करू पाहायचा की तो पूर्ण पुरुष आहे आणि प्रथम त्याच्या त्या प्रयत्नांना समजूतदारपणे साथ देणारी जया पुढे पुढे चिडचिडी होऊन नेमका उलट प्रयत्न करू लागली. त्याचा परिणाम खापर तिच्यावर फोडण्यात आणि दररोजच तिला काही फटके बसण्यात होऊ लागला. उच्चारल्या जाणार्‍या शिव्या जयाने फक्त मवाली दारुड्यांच्या तोंडी कधीकाळी ऐकलेल्या होत्या. जयाच कुरूप असल्याने आपल्याला इच्छाच होत नाही असा एक विचित्रच स्टँड आता राहुलने घेतलेला होता. मात्र दहा हत्तींचे बळ आणून तो तिला स्वतःला पूर्ण उद्युक्त करण्यासाठी झगडायला लावायचा आणि त्या त्याच्या प्रयत्नांचे स्वरूप अतिशय ओंगळवाणे असायचे, घृणास्पद असायचे. त्या प्रयत्नांची जयाला शिसारी केव्हाच आलेली होती, पण आता त्या प्रयत्नांत सहभागी न होण्यासाठी मार खावा लागला तरी बेहत्तर पण त्याची साथ द्यायची नाही हे तिने ठरवून टाकले.

दुसर्‍या दिवशी जयाने समजूतदारपणे राहुलला सांगितले की लग्न म्हणजे फक्त शारिरीक संबंधच असे नाही. तसेही, शारिरीक संबंध नीट प्रस्थापित व्हावेत यासाठी अनेक उपचार असू शकतात. आपण दोघेही तज्ञांना दाखवू शकतो. तू काळजी करू नकोस. हळूहळू सगळे नीट होईल. आधी आपण एकमेकांना नीट समजून घेऊ. घर, नोकरी, आर्थिक परिस्थिती याबाबत योजना करू.

हे ऐकून राहुल उसळला. त्याला जो विषय टाळायचा होता, नेमका तोच विषय समोर आलेला होता. आपल्या शारिरीक संबंधांमध्ये काहीतरी अपूर्णता आहे हे जयाने मान्य केलेले त्याला नको होते. त्याला एक तर तिने त्याला पुरुष मानायला हवे होते किंवा स्वतःला परीपूर्ण नसलेली स्त्री मानायला हवे होते. पण जया तसे मानत नसल्याचे दिसताच त्याने मारहाण करून तिला दोन तास घराबाहेर काढले. त्या दिवशी जयाने पहिल्यांदा माहेरी फोन लावून पहिली तक्रार केली. पण तिची तक्रार विशेष ऐकलीच गेली नाही. जो मार्ग इतर लाखो स्त्रियांना सुरक्षितता, अब्रू व सामाजिक स्थान मिळवून देतो तो विवाह हा आपल्याला अतिशय योग्य वाटत असलेला मार्ग प्रत्यक्षात अतिशय घाणेरडा आणि किळसवाणा आहे हा अनुभव जयाला आतल्याआत गुदमरवत होता. ती एकदा स्वतःलाही हे समजावून सांगत होती की पुढेमागे राहुल बदलेलही, सुधारेलही! पण आता दिवसेंदिवस तो हिंस्त्र होऊ लागला होता आणि अधिकाधिक शिसारी येईल अश्या अपेक्षा ठेवत होता. पावित्र्य, मांगल्य, उत्कटता हे शब्दही त्याच्या आसपास फिरकत नव्हते. जयाला स्वयंपाक येत नाही हेही सिद्ध करायला तो आता सरसावला होता.

जयाला नोकरी नसणारा नवरा चालला असता. नोकरी गेली आहे आणि दुसरी शोधतो आहे असे म्हणणारा चालला असता. गरीब नवरा चालला असता. जयाला 'बायकोला नोकरी करू न देणारा' नवरा चालला असता. एक वेळ दोन दोन दिवस आंघोळ न करणारा नवराही चालवून घेतला असता. व्यवस्थित स्वयंपाक करूनही टीका करणारा नवरा चालला असता. एकवेळ थोडासा व्यसनी असता तरी चालला असता. इतकेच काय, हद्द म्हणजे नपुंसकतेचा शाप लागलेला नवराही तिने पदरात पडलाच असता तरी कदाचित आपला मानला असता, माहेरच्यांच्या सुखासाठी का होईनात! पण नपुंसक आहे हे मान्य न करता आणि कोणत्याही उपचारांसाठी तयार न होता उलट मी पूर्ण पुरुष आहे हे तूच मान्य कर आणि माझ्यातील पौरुषत्व जागे करण्याची जबाबदारी तुझी असून ते तुला करता आले नाही तर तूच योग्य स्त्री नाहीस हे म्हणणारा नवरा जयाला अजिबात चालला नसता.

एक क्षण असा आला, की तेव्हा जयाच्या शुद्ध सात्विक मनाने तिचा तिलाच निर्वाळा दिला, की ही व्यक्ती सुधारणे व नॉर्मल होणे अशक्य आहे. 'धिस इज हेल'! आपण येथे आयुष्य काढणे हे स्वतःहून स्वतःला नरकात ठेवणे आहे. जगाच्या भीतीने, माहेरच्या आणि सासरच्यांच्या अब्रूसाठी, एकटी बाई कशी जगणार या भीतीने, लोक काय म्हणतील या चिंतेने रोज अधिकाधिक काळवंडत बसायचे. मार खायचा, शिसारी येईल असा अर्धामुर्धा प्रणय करायचा आणि त्याला तो पूर्ण पुरुष असल्याचे खोटेच सुख प्रदान करून स्वतः निव्वळ एक वस्तू बनून राहायचे हा मूर्खपणा ठरेल. जग आणि माणसे गेली खड्ड्यात, आपण या क्षणी इथून पळून जायचे. तो कल्पनाही करू शकत नसेल की आपण पळू शकतो, अश्याच वेळी पळणे आपल्याला शक्य आहे. एकदा त्याला चाहुल जरी लागली की आपल्या मनात त्याला सोडून जाण्याचे विचार आहेत, तर तो जिवानिशी प्रयत्न करून आपल्याला अडवेल. याचे कारण त्याच्या महान पौरुषत्वाची परंपरा असलेल्या घराण्याची अब्रू टांगली जाऊ नये म्हणून! त्याला धमकी वगैरे देत बसायचेच नाही की 'मी निघून जाईन' वगैरे! फक्त निघायचे. लोक, माहेर, सासर, नवरा आणि लग्न खड्ड्यात गेले!

हा निर्णय घेतल्याच्या सोळाव्या तासाला प्रवास करून जया मुलवानी लेडिज होस्टेलचा फॉर्म पुन्हा भरताना मॅनेजमेन्टला म्हणत होती की जो कुलश्रेष्ठ राहते तीच रूम मला परत द्या!

जयाची कहाणी ऐकून हतबुद्ध झालेल्या जो, निली आणि प्रियंकाने तिला लगेचच पुन्हा स्वीकारलेले होते. तिकडे बुलढाण्यात जयाने माहेरी सगळा प्रकार सांगितला होता. माहेरच्यांनी सासरच्यांना दम भरून पुन्हा आमच्या मुलीच्या मागे लागू नका म्हणून सज्जड दमही भरला होता. हे एक नवलच ठरले होते. जयाला माहेरचा त्यामुळे चांगलाच आधार वाटला होता. पण राहुल इकडे होस्टेलवर उगवला. त्याला जया भेटलीच नाही. नीलाक्षीने राहुलला फेस केले. राहुल भडकलेला होता. पोलिस आणेन म्हणत होता. नीलाक्षीने त्याला सांगितले की पोलिसांचे नांव काढलेस तर स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाहीस अशी अद्दल घडेल. आणि पुन्हा जयाचा विचार केलास तर एक हात मोडून दुसर्‍या हातात मिळेल. कसे काय कोणास ठाऊक, पण मुंबईत एकटाच आणि निराधार असलेल्या राहुलला तो दम पुरेसा पडला. जयाच्या आयुष्यातील एक किळसवाणा अध्याय संपला. अजूनही ती स्वतःच्या अंगावर पडणारे राहुलचे हात, त्यातली निरर्थक वखवख आणि घृणास्पद अपेक्षा यांच्या आठवणींमुळे उद्विग्नच असायची. पण निलीच्या अथक प्रयत्नांनी ती हळूहळू बदलतही होती.

प्रत्यक्षात शरीर संबंध न येताच जयावर बलात्कार झालेले होते.

या बलात्काराला कोणते नांव होते? लैंगीक शोषण? कौटुंबिक पातळीवरील लैंगीक अत्याचार? मानसिक पातळीवरील रेप?

नाव काहीही असो! जयासाठी पुरुषांच्या जगाचे सर्वात विद्रूप स्वरूप जवळून अनुभवणे म्हणजे रेपच होता. आजवर निलीला पुरुषांचा तिटकारा का होता याची पूर्ण कल्पना जयाला आता आली होती. पुरुष म्हंटला की त्याच्याकडे बघावेसेच वाटत नाही हा नवीनच अनुभव जया घेत होती. फुलण्याआधी आतल्या आत स्वतःला आक्रसून घेत होती. नुसत्या आठवणीनेही वांत्या होतील असे राहुल वागला होता, पण ते ऐकून घ्यायला कोणत्याही प्रकारचे न्यायालय स्थापन झालेले नव्हते.

सिमच्या कहाणीमुळे आलेली भकास रिक्तता आणि जयाच्या कहाणीमुळे आलेली खिन्नता या पार्श्वभूमीवर उदास मनाने आज सकाळी जो ऑफीससाठी आवरत होती. दोन आठवड्यांपूर्वी भसीनची मुले नाशिकला गेलेली असताना त्याच्याघरी त्याच्याबरोबर घालवलेली रात्र तिच्यासाठी स्वप्नवत रात्र ठरली होती. खरे तर दोघे झोपलेच नव्हते. लाल झालेले डोळे घेऊन पुन्हा सकाळी ऑफीसला जाताना जो ला भयंकर लाज वाटली होती. पण त्याचवेळी तिचे शरीर पिसासारखे झालेले होते. जो ला असे वाटले होते की निलीला बहुतेक आपला किंचित संशय आलेला आहे. अचानक ऑफीसची कामे इतकी जोरदार कशी काय सुरू झाली असे निलीला वाटत असावे असे जो ला वाटत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून आणि पूर्ण काळजी मात्र घेऊन जो पुन्हापुन्हा भसीनला भेटत राहिली होती. भसीनला संबोधतानाच्या पातळ्या वेगात बदलल्या होत्या. आधी सर, मग मिस्टर भसीन, मग भसीन,मग दीपक आणि आता ती त्याला दीप म्हणू लागली होती. भसीनमधील परिपक्व हळुवारपणा मागेच कोठेतरी हारवलेला होता. पहिल्या रात्रीच्या उत्कंठेतील पुरुष वागेल तसे आता भसीन रोजच वागू लागला होता. जो साठी ही बाब सुखद होती हे खरे, पण भसीन ऑफीसच्या कामाबाबत मात्र तिला अधूनमधून बोलूही लागला होता. त्याचे ते बोलणे जो च्या मते व्यावसायिकतेची परमावधी होती. पर्सनल लाईफमध्ये आपण एकमेकांचे कोणीही असलो तरीही ऑफीसमध्ये काम महत्वाचे हा भसीनचा दृष्टिकोन तिच्या मनातील भसीनबाबतचा आदर वाढवतच होता. तरीही कोठेतरी भसीनने आता आपल्याला निदान बोलू नये असेही वाटत होते आणि त्याचे बोलणे खटकतही होते. भसीनसमोर दोन वेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस देताना खरे तर ती मधूनच मेटाकुटीला येत होती. पण बेडमधील पार्टनरशीप तिला हवीशी असल्याने ऑफीसमधील क्षुल्लक बोलणे ती इग्नोर करत होती. पण हळूहळू खटकण्याचे प्रमाण वाढत होते याचे आणखीन एक कारण होते. भसीन तिला गृहीत धरू लागला होता. दोन्ही वेळी, दोन्ही ठिकाणी! अजूनही जो एकदाही 'नाही' म्हणालेली नव्हती, पण कदाचित लवकरच आपल्याला नाही म्हणावे लागेल असे तिला वाटू लागलेले होते.

आज ऑफीसमधून भसीन सहा वाजता निघाला तेव्हा जो ला नुसतेच 'बाय' म्हणाला. आज का कोणास ठाऊक पण जो ला फार वाटत होते की त्याची एकांतात भेट घेता यावी. पण आज त्याचा मूड नसावा. त्यामुळे तिनेही तसे कोणतेही सिग्नल्स पाठवले नाहीत. पण चक्क सात वाजता ती बाहेर पडली तर साहिल नावाचा ड्रायव्हर तिची वाट पाहात थांबला होता.

"काय रे??"

"बसा मॅम... गाडी सांगितली होती तुमच्यासाठी"

जो सुखावली. होस्टेलवर या गाडीतून पुन्हा एकदा दिमाखात उतरता येईल आणि त्याचे कारण भसीन आपली घेत असलेली काळजी हे आहे ही जाणीव सुखदच होती की! पण...

... पण गाडी दुसरीकडेच वळली..

"साहिल? कुठे चाललायस?"

"मॅम, भसीन सरांनी घरी बोलावलंय... मीटिंग आहे म्हणाले"

साहिलच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते. भसीन साहेबांच्या घरी जायचे आहे हे पद्मजा मॅडमना माहीत कसे काय नाही याचे आश्चर्य! आणि जो च्या चेहर्‍यावर संमिश्र भाव होते. आज तिलाही भसीनच्या मिठीत आवेगाने जावेसे वाटत होते. पण भसीनने तसे अजिबात न सुचवता एका ड्रयव्हरकरवी आपल्याला ते सांगावे हे भयंकर खटकलेले होते.

जो साहिलला उद्देशून काही बोलली नाही किंवा तिने प्लॅनही चेंज केला नाही. याचे कारण साहिलला उगाच जास्त काही कळू नये ही तिची इच्छा होती. मुळात साहिलला हे कळले आहे की सर मॅडमना थेट घरी बोलावू शकतात हेच चुकीचे आहे असे जो चे मत होते. ते ती आज भसीनला स्पष्टपणे सांगणार होती. तिच्या मनात अनेक विचार होते.

हे काय चाललेले आहे? भसीनला आपल्याला भेटावे वाटते त्याहीपेक्षा आपल्या मनातील इच्छा जास्त जोरदार असते. आणि तेच बहुधा त्याला कळलेले असते की काय म्हणून तो असा आपल्याला गृहीत धरतो की काय? हे असे गृहीत धरणे चूक आहे. एक प्रकारे हा हक्क त्याने बजावणे हे कसे मॅनली वाटते आपल्याला! पण ही इज नॉट माय मॅन! मी त्याची आणि तो माझा खरे तर कोणीच नाही आहोत. मग केवळ दोघांच्या इच्छा या बळावर आपण एकमेकांना भेटत आहोत? आज त्याला विचारावेच का की हे असे भेटणे, याचे नांव काय आहे? समाजाच्या दृष्टीने हे कोणते नाते आहे? तुझी पॅरलाईझ्ड बायको, तुझ्या इच्छा अपुर्‍या असणे आणि मी तुझी शैय्यासोबत करण्यास तयार असणे, त्यातही तू पुन्हा एरवी अतिशय सभ्य असणे, आपल्यातील संबंध सुरू व्हायच्या आधी तू कधी चुकूनही मला तसे काहीही सुचवलेले नसणे या सगळ्याचा अंत काय? तुझ्या मनात काय आहे? हे असे किती दिवस? आपण भसीनकडे काय मागू शकतो? मिसेस भसीन असे टायटल मागू शकत नाही. एखादे प्रमोशन मागीतले तर आपण आणि वेश्या यात फरक नाही. नुसता सहवास मागीतला तर तो तर तो देतच आहे. गुप्तता बाळगण्याचे आश्वासन मागायची गरजच नाही कारण तो स्वतःच प्रचंड गुप्तता पाळत आहे, ही आजची साहिलकरवी निरोप सांगण्याची गोष्ट विरळाच! सोक्षमोक्ष लावायची वेळ काही आलेली नाही आहे, पण निव्वळ या नात्याचा एखादा अर्थ लावायला हवा इतपत आपण जवळ निश्चीत आलेलो आहोत. आपल्या अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही इतपत जवळ नक्कीच आलेलो आहोत. पण आपल्या अपेक्षा तरी काय आहेत? त्याने आपल्याला काय समजावे? तेच तर आपल्याला समजत नाही आहे.

प्रियंकामुळे आपण भसीनच्या इतके जवळ आलो म्हणून आपला प्रियंकावरही जीव आहे. इतका जीव की जया जे म्हणते की तिची दृष्ट लागली, ते आपल्याला नुसतेच खोटे वाटत नाही आहे तर जयाचा रागही येत आहे. बिचारी प्रियंका! या वयात एकटी राहून जमेल तितकी आनंदात राहायचा प्रयत्न करते. दुसर्‍यांना आनंद देते. ती आल्यापासून ग्रूपमध्ये अधिकच मजा यायला लागली. तिच्याबाबत जयाने असे बोलायलाच नको होते.

असो! भसीनचे घर आलेच!

कारच्या खिडकीतून आजूबाजूच्या घरांकडे उडता दृष्टिक्षेप टाकून कोणी भोचकपणे बघत नाही ना याची खात्री करून जो बाहेर आली आणि भसीनच्या घराची बेल वाजवून उभी राहिली. साडे सात वाजलेले होते म्हणजे मुले नुकतीच खेळून आलेली असणार. अभ्यास करत असतील. आपण आहोत म्हंटल्यावर त्यांचा अभ्यास खोळंबणार! पण तेही आपल्याला आणि भसीनला आवडतेच!

दार उघडले तसा साहिल रिव्हर्स घेऊन निघून गेला. दारात तारवटलेले डोळे घेऊन अधाशी नजरेने बघत भसीन उभा होता.

"दीप???"

"कम ऑन इन डिअर"

"आत्ता ड्रिंक घेतलंस???"

"ओह यॅ"

"दीप तू मला बोलावणार होतास याची मला कल्पनाच नव्हती... असती तर मी जरा.. "

"आवरून आली असतीस.."

"हो.. आय मीन.. साहिलला हे कळावं.. असं मला नाही वाटत दीप.."

"ओह साहिलची काळजी सोडून दे... तो एक शब्द इकडचा तिकडे करत नाही... आणि तू आवरून यावंस असं मला वाटत नव्हतं..."

म्हणजे???"

दार लावून आत आलेल्या भसीनने जो ला स्वतःजवळ खेचत तिच्या खांद्याचा किस घेत तिच्या कानात सांगितले..

"दिवसभर कामाने थकल्यानंतर तुझ्या अंगाला जो वास येतो दॅट टर्न्स मी ऑन"

क्षणभर त्याच्या व्हिस्कीचा वास नको झाला जो ला! पण जे करायला ती इथे आजवर आणि आजही आलेली होती तेच तो करत असल्यामुळे थोडी सुखावलीही. पण पटकन त्याच्यापासून दूर होत आत बघत म्हणाली..

"किड्स??"

"मित्राच्या घरी राहायला गेली आहेत..."

जो च्या चेहर्‍यावर खट्याळ हास्य आले. ती म्हणाली..

"स्वतःहून?? की तू पाठवलेस???"

"मी त्यांना म्हणालो की तुम्ही स्वतःहून जा, ते त्यांना मान्य झाले"

खदखदून हासत जो ने भसीनला मिठी मारली. म्हणाली..

"आणखीन काय काय आवडतं माझं?"

"तोंडी परिक्षा कशाला? थेट प्रात्यक्षिकच करू की?"

स्वर्गसुखाच्या लाटेवर स्वार होऊन तासाभराने जो किनार्‍यावर आल्यासारखी धपापत पडली तेव्हा भसीन तिला म्हणाला..

"बाहेरचे खाणे नको वाटतेय आता.... असे वाटते की कोणीतरी करून खायला घालावे..."

"यू मीन... मी रूमवर जायचे नाहीये आज???"

"प्रश्नच नाही रूमवर जायचा!"

"आहा.. म्हणे प्रश्नच नाही..."

"मी सोडेन तेव्हा जायचं..."

"काय खायचंय???"

"एनीथिंग दॅट यू प्रिपेअर..."

"मला येतं सगळं.. पण तुला काय आवडतं ते सांग..."

"फ्रीजमध्ये बघ काय काय आहे ते..."

पाऊण तास जो किचनमध्ये स्वयंपाक करत होती. भसीन सतत तिच्याशी लगट करत होता. सुख सुख म्हणजे आणखीन काय असे जो ला झालेले होते. मिसेस भसीन असल्यासारखे वाटत होते. निलीला फोन करून तिने होस्टेलवर अ‍ॅप्लिकेशन करायला सांगून ठेवले होते. निलीच्या स्वरात किंचित डोकावणार्‍या शंकेकडे पूर्ण दुर्लक्ष करून जो स्वयंपाकावर लक्ष केंद्रीत करत होती. कारण अशी सुखद रात्र नेहमी येत नव्हती. मागून विळखा घालून कानाशी कुजबुजणारा उघडा बंब भसीन तिच्या स्वयंपाकाच्या हालचाली मर्यादीत करत होता. त्या अडचणीतून कशीबशी वाट काढत ती हासत हासत पदार्थ ढवळत होती.

जेवणे झाल्यावर तिने विषय काढायचा ठरवले.

"दीप.. कॅन आय अस्क यू समथिंग???"

"शुअर"

"दीप.. हे असे... आपण.. म्हणजे... आपण भेटतो आहोत खरे... पण.. कधीतरी मुले मोठी होतील.. कधीतरी कोणाला तरी काहीतरी कळेल.. कधीतरी तुझी मिसेस बरी होऊ शकेल.. कधीतरी.. तू... तू मला कंटाळशीलही.."

"मला माहीत नव्हते की तू हे कधी विचारशील जो... पण कधीतरी हा विषय काढशील याची कल्पना होती. त्यावर माझे उत्तरही ठरलेलेच आहे. या कंपनीत मी तुझी प्रगती करणार. जेणेकरून आपल्या पोस्ट्समधील अंतर कमी होईल. तू मला डायरेक्ट रिपोर्टिंग आहेस तशीच राहशील याची काळजी घेणार. या कानाचे त्या कानाला काहीही कळू देणार नाही. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना सगळे नीट समजावून सांगणार. तुला कधीही अंतर देणार नाही. पण तुला मोकळीक मात्र देणार. म्हणजे तुलाच माझा कंटाळा आला तर तू वेगळी व्हायला स्वतंत्र आहेसच. आणि माझी बायको बरी होण्याची तीळभरही शक्यता नाही. पण झालीच तर तिचा स्वभाव असा आहे की ती माझ्यापेक्षा तुझे प्रेमाने करेल. जो, हे आपले पाचजणांचे कुटुंब आहे. कदाचित तुला मिसेस भसीन असे नाव नाही लावता येणार कारण कायद्याच्या अनंत अडचणी आणि हा नालायक भोंदू समाज आडवा येईल म्हणून! पण आपले प्रेम अबाधित आहे आणि राहील. आणि मला वाटते प्रेम ही भावना अशी आहे की तिच्यापुढे इतर अटी नसतातच. मात्र एक स्त्री म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल नितांत आदर आहे. तू कधीही वेगळी होऊ शकतेस. पण मग मी खूप एकटा होईन. पण ते कसेबसे सोसेन मी. पण जोवर तू माझ्यासोबत आहेस, मी तुला कधीही अपमानीत किंवा बेअब्रू होऊ देणार नाही. वेळ पडलीच तर सगळ्या जगाला ओरडून सांगेन की माझ्या मुलांना एक जिवंत आई आवश्यक आहे आणि जो कुलश्रेष्ठ त्यांची ती आई आहे"

गहिवरलेल्या जो ने भसीनच्या गळ्यात हात टाकले आणि कुजबुजत म्हणाली..

"मी तुझ्यापासून वेगळी होईन असे तुला खरंच वाटते दीप?"

ती रात्र जरा लवकरच सुरू झाली. साडे सहा वाजताच प्रणय रंगात आला. आज तर शारिरीक इच्छांना भावनिक पावत्यांचीही जोड होती. जगाची भीती, अब्रूचे दडपण, कसलाच अडथळा मध्ये नव्हता. जो ने स्वतःला भसीनवर उधळले. इतके उधळले की भसीन तिची साथ द्यायला अपुरा पडला. प्रणयसुखाने नखशिखांत भिजून दोन शरीरे असहाय्य शारिरीक अवस्थेत सुखाची परमावधी गाठून विलग होऊन पडली तेव्हा पहाटेचे अडीच वाजलेले होते. आता उद्या ऑफीसला कल्टीच मारावी लागणार असे वाटत होते खरे! पण..

.. पण जो ला कशाने तरी जाग आली.. पहाटेचे साडे पाच वाजले असावेत.. तिच्या लक्षात आले... भसीनचा सेल तिच्याबाजूच्या साईड टेबलवर होता आणि तो व्हायब्रेट झाला होता... सहज म्हणून जो ने तो उचलला.. तर त्यावर एक एस एम एस होता..

'झालं की नाही?'

हे कोण कोणाला विचारत आहे याचा जो ला उलगडा झाला नाही. तिने वळून भसीनकडे पाहिले. आत्ता उघडानागडा अस्ताव्यस्त भसीन नाईट लँपमध्ये अचानकच कुरूपसा भासला जो ला! तो घोरत होता. म्हणून जो ने आधीचे मेसेजेस पाहायला सुरुवात केली.

भसीनने कोणालातरी मेसेज पाठवला होता.

"यू आर हॉटेस्ट इन बेड, धिस लेडी हॅज लॉस्ट मॅजिक लोंङ बॅक, फ्रॉम टुमोरो, यू स्टार्ट शोईंग अप अगेन"

जो ला त्या मेसेजचा अर्थ डोक्यात घुसवायला फार प्रयास पडले. प्रथम तिला वाटले की भसीनने ते स्वतःच्या बायकोबाबत कोणालातरी लिहिलेले असावे. पण नको तीच शंका खरी ठरत होती असा विचार तिच्या मनाला चाटून गेला. तो मेसेज जो बाबत भसीनने कोणालातरी केलेला होता... आणे ते जे कोणतरी होते तिचे पुढे उत्तरही होते...

एक खिदळणारा स्मायली आणि पुढे टेक्स्ट

'ओक्के सर.. शॅल बी अगेन अ‍ॅट यूअर सर्व्हिस फ्रॉम टुमोरो.... गुड नाईट'

हा नंबर... जो ला हा नंबर अंधुक आठवत होता.. कधीतरी सेव्ह करताना तिने हा नंबर दोनचार वेळा पुटपुटूनही पाहिलेला होता..

जो ने तडक स्वतःचा सेल हातात घेतला.. हळूच तो नंबर डायल केला.. आणि नांव दिसले..

घामाने निथळत... हातापायांना कापरे भरलेल्या अवस्थेत ... नग्नावस्थेतील जो उठून क्रोधातिरेकाने घोरणार्‍या भसीनकडे पाहात होती...

ते नांव होते... प्रियंका

=========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला भाग. पुर्ण करायच मनावरच घेतलयत जणु Happy
आणि मला त्या प्रियांकाबद्दल आधीच शंका आली होती. जेव्हा ती जो ला भसीनची कहाणी सांगते तेव्हा.

छान

आता कहाणी फार फिल्मी होऊ पाहते आहे.

चांगले "भसीन" पण बरयाच जणींना भेटू शकतात की!

आता प्लीज हे सांगू नका की बेडरूम मध्य कॅमेरा लावून हे सगळे तो शूट पण करतो.

now the spotlight on जो कुलश्रेष्ठ.......
अब तेरा क्या होगा जो.....
वहि होगा जो दुसरोन्के साथ हुआ..... at least ईसे तो बक्श दो बेफिकिरजी... :p

छान वळण... Happy
मला वाटतं काय लिहायचं ते आपण लेखकावरच सोडूया...आजपर्यन्तच त्यांच लेखन पाहता ते काही chip लिहीतील अस मला तरी नाही वाटत Happy

उत्तम
परत एकदा सिद्ध झाले कि एक स्त्रि दुसरया स्त्रिच्या विनाशाला कारणीभूत होते !
सुज्ञान महिला वाचक या बाबत सहमत होतील

पुढील दोन अंतिम भागाची वाट बघत आहे !! बहुदा शेवट दुखांत असावा...

पण एक विनंती, माणसाने आशावादी असावे... शेवट गोड कराल तर बरे

भुक्कड व सनम पुढे सुरु होणार का?

परत एकदा सिद्ध झाले कि एक स्त्रि दुसरया स्त्रिच्या विनाशाला कारणीभूत होते !
सुज्ञान महिला वाचक या बाबत सहमत होतील ???????

हे काय????

मग राहुल आनि जया बाबत काय ???? राहुल्ने जय्या चे काय केले ???

don't generalize