।।वर्तुळावरचा वर्णाश्रम।।

Submitted by कमलाकर देसले on 12 February, 2013 - 11:38

।।वर्तुळावरचा वर्णाश्रम।।
-सगुण निर्गुण /महाराष्ट्र टाइम्स दि .१२ फेब्रुवारी २०१३

प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गुणांचा आहे. प्रत्येकाची आवडनिवड, कर्म भिन्न आहे. एकाच गुणवत्तेच्या माणसांनी समाज बनत नाही. भिन्न गुणवत्ता योग्य आणि मानवीय पद्धतीने कामाला लावून संतुलित समाजव्यवस्था आकाराला येते. कम्प्युटरच्या भाषेत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन शब्द आहेत. सॉफ्टवेअरमध्ये ज्ञान आहे, तर हार्डवेअरमध्ये कर्मशीलता... हे मिळून कम्प्युटरची व्यवस्था तयार झाली. व्यवस्थेसाठी आपल्याला सॉफ्टवेअर-हार्डवेअर हा भेद स्वीकारवाच लागतो. पैकी सॉफ्टवेअर श्रेष्ठ की हार्डवेअर असा श्रेष्ठ-कनिष्ठ वाद निर्माण करावा का? वर्णव्यवस्थेत ज्ञान सांगणारा श्रेष्ठ, सेवा करणारा कनिष्ठ असा सोयीचा अर्थ घेतला जातो. त्यातून शोषण सुरू होते. मी कृष्णाला विचारले, ‘तुलाही वर्णव्यवस्थेत भेद आणि शोषण अभिप्रेत आहे का? कारण इथल्या व्यवस्थेत तसाच अर्थ घेतला जातो.’ कृष्ण म्हणाला, ‘चारी वर्णांपैकी कुणीच श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्व समान आहेत. आपापल्या गुण आणि स्वभावाप्रमाणे आचरण करून प्रत्येकजण मुक्त होऊ शकतो. ज्ञान, शक्ती, व्यापार, सेवा- ज्याचा जो स्वभाव त्याने तेच करावे. त्यातच दु:खमुक्तीचे रहस्य लपले आहे.’

आतापर्यंत आपण भूमितीच्या उभ्या रेषेवर वर्णव्यवस्था बसवित आलो. जो वर तो श्रेष्ठ. खालचे कनिष्ठ. किंवा आडव्या रेषेवर मांडत आलो वर्णव्यवस्था. जो पुढे तो श्रेष्ठ आणि मागे तो कनिष्ठ. वर, खाली, मागे आणि पुढे हे शब्दच भेदाचा आलेख मांडतात. मग कसे सिद्ध व्हावे, की सर्व वर्ण समान आहेत? सर्वांचे कार्यात्मक आणि भावात्मक मूल्य एकच आहे?

खूप चिंतन केल्यावर काहीतरी क्लीक झाल्यासारखे वाटले. कृष्णाचे म्हणणे पटले. कुठलाच वर्ण एक-दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व वर्ण समान आहेत. कनिष्ठ कुणीच नाही. आपणच आपल्यालाच टाळी द्यावी असं समाधान माझं माझ्यापुरतं मला मिळालं. मी कागदावर एक वर्तुळ काढलं. घड्याळातल्या बारा, तीन, सहा आणि नऊच्या जागांवर खुणा केल्या. आणि त्यावर ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र हे शब्द लिहिले; आणि लक्षात आले या चारींपैकी मला कुणालाच मागे, पुढे, खाली, वर किंवा श्रेष्ठ, कनिष्ठ ठरविता येत नव्हते. वर्तुळावरच्या वर्णाश्रमात खरी समानता दिसली. बनेल बुद्धिवंतांनी वर्णाश्रम उभ्या-आडव्या रेषेवर आणला. भेद आणि शोषणाला खतपाणी मिळालं. जिज्ञासा म्हणून ज्ञानेश्वरी उघडली. चवथ्या अध्यायातला ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टम...’ या श्लोकावरच्या ज्ञानोबारायांच्या ओवीने माझ्या विचाराला माऊलीचा आधार मिळाला. माऊली ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र या चौघांच्या समान पात्रतेविषयी लिहितात... ‘एथ एकचि हे धनुष्यापाणीl परी जाहले गा चहुं वर्णीl ऐसी गुणकर्मकडसणीl केली सहजेंll' अर्थ- अर्जुना, हे सर्व लोक एकच असून, गुण व कर्म यांच्या योगानें चार वर्णांची व्यवस्था सहज झाली.
कमलाकर देसले

Group content visibility: 
Public - accessible to all site users