सफर सातमाळा रांगेची - दिवस पहिला

Submitted by सह्याद्रीमित्र on 12 February, 2013 - 01:10

नाशिक जिल्हा!!!! काय या नावात जादू आहे कळत नाही राव !!! केवळ या नाशिक जिल्ह्याला सह्याद्रीने बहाल केलेल्या मूर्तिमंत रौद्रपणावर फिदा होउन हा संपूर्ण नाशिक जिल्हा शब्दश: चाटून - पुसून काढलेले अनेक ट्रेकर्स सापडतील!!! अगदी कळसूबाई AMK पासून ते पार साल्हेर - मुल्हेर पर्यन्त एकही किल्ला असा नाही ज्याने ट्रेकर्सच्या मनात घर केल नसेल.मुंबईच्या 'शिखरवेध' संस्थेच्या जगदीश पाटील या आमच्या मित्राने 'Mumbai Hikers' वर "१९-२० जानेवारी २०१३ रवळ्या - जवळया - मार्कंडया - सप्तश्रुंग - रामसेज" हा 'पिल्यान' पोष्ट केल्या केल्या बहुदा दुस-याच मिनिटाला त्याचा भ्रमणध्वनी खणाणला. "मी पुण्याहून ओंकार ओक बोलतोय.पैसे कुठे अन कसे भरायचे ते सांग ". फोन बंद!!! जगदीशनेही अगदी ट्रेकरच्या तत्परतेने मला संपूर्ण कार्यक्रम मेल केला.भारीच होता तो!!!! पुण्यातल्या आमच्या भटक्या जमातीतल्या लोकांना "येणार का" अशी विचारणा करताच ठरलेलं उत्तर आलं "२ दिवस ? नाही जमणार". "सिक्स्थ सेन्स" वगैरे तसली काहीतरी भानगड असते ना ती बहुदा माझ्यातही असावी .या नकारासुरांच्या पत्रिकेमध्ये सातमाळेचा योगंच लिहिलेला नाही हे मी क्षणार्धात ताडलं आणि जगदीश ला एकच जागा reserve ठेव असं सांगून मी त्याचीही आगाऊ डोकेदुखी वाचवली (अवांतर माहिती - मी येतो मी येतो करणारेच शुक्रवारी "अरे जरा प्रॉब्लेम आहे.मला जमत नाहीये" असा निर्विकारपणे फोन करतात आणि ऑर्गनायझरच्या डोक्याला शॉट देतात.जरा तुमच्या ट्रेक्स चा महान इतिहास आठवून बघा.मी पुढे सांगण्याची गरज नाही ). १९ तारखेच्या आधीच्या शनिवारी मी जगदीशला हा फोन केला तेव्हा अर्थातच साहेब कोणत्यातरी मोहिमेवर होते.तरीही पुण्याहून कोणीतरी एवढा उत्साह दाखवतंय म्हणल्यावर त्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला असावा.फायनली मी गाडीत खुर्ची मिळवली!!!

फेसबुक हे एक असं प्रकरण आहे की जे तुमचे फोन चे पैसे आणि वेळ अगदी विनासायास वाचवतं. शुक्रवार उजाडेपर्यंत मी आणि जगदीश फेसबुक वरूनच संपर्कात होतो आणि मी कधी,कुठे.किती वाजता यायचं हेही ऑनलाईनच ठरलं. शनिवारी पहाटे ४ पर्यंत नाशिक CBS ला ये अशी सूचना विरुद्ध पक्षातर्फे करण्यात आली. पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून मी शुक्रवारी रात्री ८ ची नाशिक येशियाड पकडायला शिवाजीनगरला पोहोचलो आणि यष्टी म्हामंडळाच्या शासकीय नियमानुसार ८ ची गाडी ९.३० ला निघाली !!!! या दीड तासाच्या प्रदीर्घ कालावधीत म्हामंडळाच्या मा.अध्यक्षांनी किती 'मुक्ताफळे' खाल्ली हे फक्त आम्हालाच माहित आहे !!! गाडीच्या डायवरच्या सौं नी बहुतेक त्याच्या नावाने "गाडी फाष्ट चालवलीत तर याद राखा" असा advance मधेच शंख करूनच त्याची रवानगी केली असावी. कारण Accelerator वर आपले चरणकमल ठेवताच त्याला गृहलक्ष्मीचा चेहेरा आठवत असावा.त्यामुळे आम्ही नाशिकला जे ३ पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं त्यासाठी पहाटेचे ४ उजाडले (सदर गाडी विनाथांबा होती.साधी असती तर काय झालं असतं ही कल्पना करून बघा). नशिबाने अजून जगदीश पोहोचला नाहीये अस वाटेपर्यंत मुंबईकरांचा काटेकोरपणा अजिंक्य आहे याची प्रचीती आली कारण मी पोचल्याच्या ५-७ सेकंदातच फोन वर "जगदीश पाटील" अशी अक्षरं दिसली आणि मी ष्टयांडबाहेर धाव घेतली. मी आणि जगदीश आधी ऑर्कुट आणि सध्या फेसबुक मित्र.पर्सनली आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो.अस्मादिकांनी गाडीत प्रवेश केल्यानंतर त्या पहाटेच्या शांत वातावरणात भसकन गाडी सुरु झाल्याच्या आवाज झाला आणि गाडी दिंडोरीच्या दिशेने निघाली. गाडीत तरी बरी झोप मिळेल हे माझ स्वप्न भंग व्हायला पहिली काही सेकंदच पुरेशी होती कारण संपूर्ण गाडी घोरपडींनी भरलेली होती (ता.क.घोरपडी = घोरत पडलेले).त्यामुळे संपूर्ण प्रवासात गाडीच्या वतीने डायवर जागा होता अन प्रवाश्यांच्या वतीने मी आणि जगदीश !!

नाशिक - कळवण रस्त्यावर दिंडोरीच्या पुढे नांदुरी फाट्याच्या आधी उजवीकडे वणी - बाबापुरचा फाटा आहे.तिथे पोहोचायला ५ वाजले.हा रस्ता पुढे सुरतला जात असल्याने २४ तास सुरु असणा-या चहाच्या टप-या या वाटेवर आहेत.जगदीश आमच्या चहाची सोय करायला खाली उतरला आणि मागून मी आणि अजून एक जणही त्याच्या बरोबर निघालो.मुंबईच्या लोकांना जगात सगळीकडेच समुद्र आहे असं वाटत असावं.कारण त्या उकाड्याची सवय असल्याने हाडं गोठवणा-या त्या थंडीतही जगदीश मे महिन्यात जळगावला फिरत असल्यासारखा विदाऊट स्वेटर आरामात बागडत होता. "तुला जर्किन देऊ का" असं मी ट्रेकरदाक्षिण्य दाखवताच "अरे सोड.ही काय थंडी आहे का" हे त्याचं उत्तर ऐकून मला त्या थंडीतही बेकार घाम फुटला !!! कालांतराने आमची आख्खी गाडी जागी झाली आणि जगदीशने आणलेल्या डोसा आणि चटणीवर आडवा हात मारून आणि नंतर त्या चहादात्याला जवळपास दिवसभराची कमाई देऊन गाडी मुलाणे खिंडीकडे निघाली. गाडीतून दिसलेलं ते सूर्यनारायणाच सोनेरी रूप कोणत्या शब्दात वर्णाव!!! अहाहा केवळ झकास!!! बरोबर ७ वाजता आम्ही मार्कंडया- रवळ्या - जवळया च्या खिंडीत पोचलो आणि गाडीला दोन दिवसांसाठी रामराम ठोकला. सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणामध्ये उजळून निघालेला मार्कंडया अप्रतिम दिसत होता.या खिंडीतून उजवीकडची वाट जाते रवळ्या - जवळयाला तर डावीकडची मार्कंडयाला.आमच्या पिल्यान परमाने आधी रवळ्या - जवळया करायचे असल्याने ग्रुप इंट्रोडक्शन नंतर मोर्चा रवळ्या - जवळयाकडे वळाला.या ओळखपरेडी मध्ये मला झालेला साक्षात्कार म्हणजे मी सोडून बाकी १६ च्या १६ लोक शिखरवेधचे अंग्रेज के जमाने पासूनचे सदस्य होते.यातले १३-१४ लोक तर शिखरवेध फॉर्म व्हायच्या आधीपासून जगदीश बरोबर ट्रेक करत आले आहेत हे ऐकून मला "इन्फ़िरिटि कॉम्प्लेक्स" की काय म्हणतात तो यायला सुरुवात झाली.आमच्या ग्रुप मध्ये अनेक सिनियर लोक पण होते.पण तोंडावर सिनियर वगैरे म्हणालात तर तुमची खैर नाही असला धमकीवजा सल्ला आम्हाला ट्रेकच्या सुरुवातीलाच मिळाला होता (थोडक्यात त्यांच्या मागून त्यांना सिनियर म्हणायला त्यांची हरकत नसावी !!!). रवळ्या - जवळयाच्या चढाची सुरुवात अगदीच सिंपल टाईपची होती.नवखा असल्याने पहिल्याच दिवशी इज्जत का फालुदा नको म्हणून मी जगदीश बरोबर सर्वात पुढे होतो.हा ग्रुप एकमेकांना चांगलाच परिचित असल्याने एकमेकांना पूर्ण नावाने कोणीच हाक मारत नव्हतं.प्रत्येकाच्या नावाच्या अर्ध्यावरच "या" हा विभक्ती प्रत्यय जोडून नामकरण विधी सुरु होता.त्यामुळे जगदीशचा जग्या उर्फ जग्गू , अविनाश चं अव्या वगैरे आधीच झालेला होता.नशिबाने मी शेवटपर्यंत "ओंकार"च राहिलो (पुढच्या ट्रेक मध्ये मलाही या नुतननामकरण विधीत सहभागी व्हायला आवडेल). रवळ्या - जवळयाच्या चढाला सुरुवात केल्यापासून वीसेक मिनिटात आम्ही एका लहान पठारावर पोहोचलो. मार्कंडयाचा उगवतीच्या सोनेरी कोवळ्या किरणांमधला देखणा 'व्ह्यू' जब्ब्बरदस्तच होता.या पठारावरून सुरुवातीच्या रवळ्या किल्ल्याचं सुंदर दर्शन होतं.आजचं आमचं पहिलं लक्ष्य रवळ्याच होता !!!!

मार्कंडयाचा अर्ली मॉर्निंग व्ह्यू

रवळ्या किल्ल्याचा बेलाग नजारा

वरती दिसणा-या रवळ्या किल्ल्याचं झालेलं हे दर्शन म्हणजे निळ्या आभाळाखाली सह्याद्रीने स्वत:च्या अभेद्यपणाचा दाखवलेला मूर्तिमंत अविष्कार!!! केवळ दिलखुलास!!! हा फोटो जिथून काढला आहे तिथून रवळ्या - जवळयाच्या मधली खिंड फारशी लांब नसली तरी किमान अर्ध्या - पाऊण तासांची नक्कीच आहे. ग्रुप मधल्या बाकीच्या मेम्बरांचं पूर्वट्रेकाख्यान चालू होतं. त्यात अनेक रंग भरले जात होते.साहित्यातल्या नवरसांपासून ते अगदी अमुक एका ट्रेकच्या शेवटी पिलेला उसाचा रस काय ****** होता इथपर्यंत चर्चेचा विषय जाऊन पोचला. मी मात्र आपण या सगळ्या घटनांचे साक्षीदार का नव्हतो याबद्दल स्वत:चीच मापं काढत फक्त त्यांच्याबरोबर चालण्याचा जन्मसिद्ध हक्क पार पडत होतो. हा लांबलचक वॉक संपला तो गोठावजा दिसणा-या दोन घरांपाशी. आता तुम्ही जर घरांकडे तोंड करून उभे असाल तर मागे आपण आलेल्या मार्गावर लागलेला रवळ्या किला आहे तर समोर चौकोनी कातळकड्याचा जवळया किल्ला आहे. माणसाने आधी जवळयावर जाऊन येताना रवळ्या करून खाली पुन्हा मुळणबारीत उतरावं.पण आम्ही हा ठराव पास करायच्या आतंच कुठून तरी उंचावरून जग्गूच्या हाक ऐकू येऊ लागल्या, "उजवीकडून या रे.व्यवस्थित पायवाट आहे ". आयला !!! म्हणजे आमच्या ग्रुपात काही वेळापूर्वी "जगदीश हरवला" अशी जी ओरड झाली होती त्याचा शोध आत्ता लागला होता.जग्गू कधीच रवळ्याचा रॉकफेस चढून वर पोचला होता!!! रवळ्या - जवळयाच्या खिंडीतल्या या दोन इतिहासजमा झोपड्यांच्या वस्तीला ' तिवारी वस्ती ' असं नाव आहे.तिथून रवळ्याकडे तोंड केल्यावर ( आता पुन्हा रवळ्या कोणता आणि जवळया कोणता हे कन्फ्यूजन झालं असेल तर वरती वाचा !!! ) डावीकडच्या कड्यावर साधारणपणे १०-१२ फुटांचा एक कातळटप्पा दिसतो.तोच किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता.आता सध्या तिथे रॉकफेस आहे म्हटल्यावर पूर्वी तिथे पाय-या होत्या हे तर उघड आहे. पाय-या होत्या आणि आत्ता नाहीत म्हणजे त्या नक्कीच गो-यांनी उडवल्या असणार.अगदी करेक्ट !!! त्यांनी तोफा डागल्या म्हणूनच आता ब-याच ठिकाणी आपली विनासायास जायची हौस फिटत नाही आणि दोर बाहेर काढावाच लागतो.आम्हीही याला अपवाद नव्हतो.जग्गू म्हणजे पूर्ण तयारीनेच आला होता!!! आम्ही वर पोहोचेपर्यंत दोर लागलासुद्धा!!! या वाटेने जाताना मध्येच एक गुहेवाजा भूयार असून पुढे थोडा "चिमणी क्लाईम्ब" सारखा भाग असून तो एकदम सोप्पा आहे. जग्गू ने टाकलेल्या त्या दोरावरून हेलखावे खात सगळे एकदाचे वर पोहोचले. इथून थोडं पुढे गेल्यावर रवळ्याचा उंच माथा आणि त्यावर नेणारी खड्या चढाईची पायवाटही दिसते. रॉकफेस पासून रवळ्या माथा गाठायला अर्धा-पाऊण तास पुरे!!! वाटेत पाण्याची टाकी आहेत.काही चांगली,काही खराब तर काही कोरडी.रवळ्या माथ्यावर तो अतिशय बोअर चढ चढून गेल्यावर धुक्यातून नुकत्याच वर आलेल्या मार्कंडया व सप्तश्रुंगचं जे काही अफलातून दृश्य दिसलं त्याला तोडच नाही!!! मागे क्षितीज रेषेवर साल्हेर - मुल्हेर ने डोकी उंचावली होती.जवळयाच्या मागे संपूर्ण सातमाळा रांग दिसत होती.धोडप,इखारा,लेकुरवाळी,हंड्या,कोळदेहेर,
राजदेहेर,इंद्राई,चांदवड,कांचना...आणि कितीतरी!!! बाकी रवळ्यावर अवशेष काहीच नाहीत .पण हा नजारा तृप्त करून टाकतो.

तिवारी वस्तीच्या पठारावरून रवळ्या..

रवळ्या वरील एक टाके..अशी अजून तीन चार आहेत...

रवळ्याचा कातळटप्पा..वर निवांत बसलेला जग्गू दिसतोय...

पुढचा मार्कंडया व मागे सप्तश्रुंग..रवळ्या माथ्यावरून..

साडेअकरा वाजले असावेत.आम्ही रवळ्या माथा उतरायला सुरुवात केली आणि पुन्हा रॉकफेस पाशी आलो.चढताना आवश्यक नसला तरी उतरताना सेफ्टी म्हणून रोप हवाच!!! आता पुन्हा तिवारी वस्ती पाशी आल्यावर (म्हणजे सगळे नाहीत..फक्त मी आणि डॉ.सागर बोरकर) जवळयाच्या वाटेचा शोध घ्यावा लागणार होता.सागरला तिथे काही पक्षी दिसल्यावर त्याने फोटोसाठी तिकडे धाव घेतली आणि मी जवळयाच्या वाटेचा अंदाज घेऊ लागलो.या तिवारी वस्ती पाशी एक थंड पाण्याचा जिवंत झरा आहे.चव बेस्ट!! मी वाट विचारायला कोणाला तरी फोन लावणार इतक्यात कोलाहल ऐकू येऊ लागला.दहा मिनिटांनी सात - आठ गावकरी बाया आणि मागून एक म्हातारबुवा अवतरले (मी तेच म्हटलं ...एकटे म्हातारबुवा एवढा कल्ला कसा काय करू शकतील!!!!) .क्षणाचाही विलंब न करता मी म्हातारबुवांना गाठून वाट विचारली आणि मागून जग्गू आणि मंडळी प्रकट झाली.तिवारी वस्ती पासून जवळयाचा जो कातळकडा दिसतो त्याच्या सर्वात डावीकडच्या धारेवर पाय-या खोदल्या आहेत.जवळया उजवीकडे,रवळ्या डावीकडे ठेवत तिवारी वस्तीकडे पाठ करून आपण त्या धारेच्या दिशेने निघालो कि वाटेतच एक मोठठ झाड आडवं येतं. त्याच्याच उजवीकडून गेलेली ठळक पायवाट जवळयाच्या पाय-यांपर्यंत घेऊन जाते.पण आम्ही झाडाला न जुमानता सरळ पुढे गेलो आणि मग काय विचारता..साक्षात बेअर ग्रिल्स अंगात संचारल्यासाखं मी,जग्गु आणि राहुल कांबळे निवडूंगातून अंग घासत आणि बोरी बाभळीशी झगडत एक तासाने पाय-यांपाशी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला.अजूनही त्यातल्या ओरखडल्याच्या आणि खरचटल्याच्या खुणा तिघांच्याही अंगावर आहेत!!! बाकीच्यांनी मग आम्ही सुचवलेल्या राजमार्गाने येणं केलं आणि सेना जवळया माथा गाठण्यास अखेर यशस्वी झाली.जवळयाच्या दरवाजाच्या मार्गावर कातळात पाय-या खोदलेल्या असून शेवटी हरिहर किल्ल्यासारखा भुयारवजा दरवाजा आहे.दरवाजाच्या आधी उजवीकडे एक फारसी शिलालेख कोरलेला दिसतो.पुढे जवळयाचा भग्न बुरुज दिसतो आणि रवळ्या सारखंच रखरखीत मोठं पठार दिसतं.जवळयावर तटबंदी थोडीफार शिल्लक असून जोत्यांचे काही अवशेष आहेत.एक पाण्याचं जोडटाकंहि दिसतं.वरून रवळ्या प्रमाणेच दृश्य दिसतं.पण फार खास नाही!!

जवळया..याच्या डावीकडे जी धार दिसतीये तिकडे पाय-या खोदल्या आहेत.

जवळयाच्या दरवाज्या जवळचा फारसी शिलालेख...

जवळयाचा बोगदावाजा दरवाजा व पाय-या..

धोडप किल्ला व मागे सातमाळा रांग..जवळया माथ्यावरून...

जवळया,,एका वेगळ्या कोनातून...

जवळयाच्या कातळकड्यात एका गुहेमध्ये पाण्याचे टाके खोदले असून त्याचा मार्ग मात्र मुख्य मार्गापासून उजवीकडे आहे.ती जागा मात्र भन्नाट आहे.

मी आणि आणि डॉ.सागर बोरकर ग्रुपाच्या सर्वात पुढे असल्याने जवळया सर्वात आधी आम्हीच उतरून पुन्हा खिंडीत आलो.या वेळी आमच्या बरोबर डॉ.अशोक पागरूट हे काका होते.मगाशी सांगितलेल्या झ-यात बाटल्या फुल्ल करून आम्ही तिवारी वस्तीपासून पुन्हा मुळणबारीकडे निघालो तेव्हा बाकीचे मेंबर लोक आमच्या थोडेसेच मागे होते.फायनली दुपारी अडीचच्या सुमारास सगळी वरात मुळणबारीत अवतरली आणि इथेच ट्रेकमधली एक अविस्मरणीय घटना घडली.आमच्या ग्रुपातील दिव्या नामक एका युवतीला अचानक उलट्यांचा प्रचंडच त्रास होऊ लागल्याने तिची पूर्ण एनर्जी ड्रेन झाली आणि तिची रवानगी पुन्हा मुंबईला करायची असं ठरलं.अर्थात अशा परिस्थितीत तिचं एकटीने जाणं योग्य नसल्याने जग्गूने तिच्याबरोबर मुंबईला परतावं असा सर्वानुमते विचार ठरला.त्यामुळे जग्गू आता आपल्याबरोबर पुढच्या ट्रेक मध्ये नाही हे ऐकताच सिंहगडावर तानाजी पडल्यानंतर मावळ्यांची जशी अवस्था झाली तसंच काहिसं वातावरण आमच्या ग्रुपात काही काळ तयार झालं. शेवटी जग्गूने दीपक वंजारी यांच्याकडे उपकर्णधारपद सोपवून व पुढचा सगळा प्रोग्रॅम आम्हाला नीट समजावून आमचा निरोप घेतला आणि आम्ही जेवणाच्या पुड्या सोडल्या.या खिंडीत एका साधूबाबांचे झोपडे असून त्यांच्या शेळीने मध्येच आमच्यातील एकाच्या ताटात तोंड घातल्याने संताप अनावर झालेल्या पागरूट काकांनी तिला हातातल्या वॉकिंग स्टीकचा असा काही तडाखा दिला कि त्या बिचारीच्या चेहे-यावर " मी यापुढे तुमच्याच काय पण स्वत:च्या ताटातही अशी बेकायदेशीर घुसखोरी करणार नाही " असे भाव उमटले!!! भोजनोत्तर जरा आराम करून जग्गू ने suppose to be उचलायचे ओझे आमच्यामध्ये वाटून आम्ही मार्कंडयाची चढण चढू लागलो.पण दुष्काळात तेरावा महिना वगैरे म्हणतात तशी आमची अवस्था झाली.आधीच रवळ्या - जवळयाच्या त्रासदायक रिटर्न जर्नी ने अर्धा जीव घेतलेला होता.त्यात डोक्यावर ऊन.त्यात भर म्हणून जेवताना पागरूट काकांनी अमूलची चविष्ट बासुंदी मोठ्या आग्रहाने खिलवली होती आणि नंतर पुन्हा हा मार्कंडयाचा खडा चढ !!! देवा !!!! पण खरं सांगतो...मार्कंडयाच्या चढाने शब्दश: तोंडाला फेस आणला.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रवळ्या - जवळयाला जाताना आम्ही सगळ सामान गाडीत ठेऊन आरामात चढलो होतो.इथे ती भानगड नव्हती !!! स्वत:च्या sacks अधिक जगदीशने दिलेले थोडेफार आवश्यक सामान यांचा भार सांभाळत पाऊण तासात धापा टाकत मार्कंडयाच्या भग्न दरवाज्यातून त्याच्या मुख्य पठारावर पोचलो तेव्हा ५ वाजले होते.सनसेट व्हायला तसा वेळ असला तरी अजून किमान २० मिनिटांच अंतर कापायचं होतं.शेवटी मी आणि पागरूट काकांनी जवळपास धावतच मार्कंडयाच्या महाविस्तीर्ण पठारावरच्या रंगनाथ बाबांच्या आश्रमात ओझी उतरवली (खरंतर फेकली !!!) आणि लागलीच मार्कंडयाच्या बालेकिल्ल्याची खड्या नाळेतली चढण चढण्यास सुरुवात केली.पण पहिल्या ५ मिनिटातच मागचा चढ बरा होता असं म्हणायची वेळ आली.सुमारे ७० अंश कोनातली ती चढण छातीचा भाता प्रत्येक सेकंदाला वर नेत होती.पण मार्कंडयाच्या शिखरावरून तो मनोहारी सूर्यास्त पाहण्याची अशी काही धुंदी आम्हाला चढली होती कि पायात येणा-या cramps कडे निव्वळ दुर्लक्ष करून केवळ २० मिनिटात आम्ही मार्कंडयाचा माथा गाठला.मार्कंडयाच्या बालेकिल्ल्यावर पाण्याची टाकी,कमंडलू तीर्थ नावाचं एक टाकं,जुजबी तटबंदी आणि सर्वोच्च शिखरावर सेम कळसुबाईवर आहे तसेच केशरी रंगाचे छोटे मंदिर आहे.यातली मार्कंडेय ऋषीची मूर्ती समोर सप्तशृंगी देवीच्या दिशेने तोंड करून आहे.इथे संध्याकाळी केवळ बसून राहण्याचा अनुभव काय वर्णावा !!!!! सह्याद्रीतल्या त्या आभाळाला टेकलेल्या शिखराला भिडणारा तो सायंकाळचा थंडगार वारा अंगावर घ्यावा आणि इतक्या वेळाची तंगडतोड क्षणार्धात विसरावी !!!! त्या तेजोनिधिने आकाशावर मांडलेला तो सोनेरी - गुलाबी रंगछटांचा खेळ लाजवाब !!!! सुमारे तासभर तो दृश्य मनात साठवून आम्ही त्या संधीप्रकाशातच मार्कंडयाचा बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.बाकीचा ग्रुप तोपर्यंत आश्रमात येउन स्थिरस्थावर झाला होता.त्यामुळे वरती मी,सागर,सर्वेश,पागरूट काका व त्यांचे एक मित्र साटम काका इतकेच लोक होतो.वीसेक मिनिटात पायथा गाठल्यावर आता चहा हवाच असं म्हणत चहा फायनली ८.३० ला हातात आला.आता दिपकादि मंडळींवर रात्रीच्या खिचडीची जिम्मेदारी येउन पडल्याने आमच्यातीलच एका ताईंना हाताशी घेऊन खिचडी रटरटु लागली.(खरतर हाताशी घेऊन फक्त म्हणायला.सगळी खिचडी अतिशय स्वादिष्ट आणि अविस्मरणीय बनवण्याचा पूर्ण श्रेय त्यांनाच गेलं आहे).दिपकादि लोकांनी डोळे लाल होईपर्यंत सुमारे किलोभर कांदा कापलेला बघून इतरांच्या डोळ्यात खरंच पाणी आलं असावं !!! मार्कंडयावरच्या या अश्रामतील बाबांनी आपुलकीने आमची विचारपूस करत चूल उपलब्ध करून दिली आणि आमचे कष्ट वाचवले.अंगावर काटा आणणा-या थंडीत त्या खिचडीची अप्रतिम चव आणि नंतरचं इतिहास या विषयावर आमचं सुमारे रात्री दोन पर्यंत रंगलेलं कॅम्प फायर ही आमच्या थकावटपूर्ण दिवसाची ख -या अर्थाने झालेली एक सुंदर सांगता होती !!!

क्रमश:

सफर सातमाळा रांगेची - दिवस दुसरा

मार्कंडयाच्या सर्वोच्च शिखरावरचं मार्कंडेय ऋषींच मंदिर

सप्तश्रुंगच्या साक्षीने झालेला एक अप्रतिम सूर्यास्त...कधीच न विसरता येण्यासारखा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय. Happy
फोटु खुपच छोटे दिसत आहेत. मोठे करणार का प्लीज?

लिहिताना पॅराग्राफ पाडले तर वाचताना बरं वाटतं.

@ Zakasrao..

This is my first post on Maayboli.I am totally unknown about formating.Kindly help me to improve the formatting and resizing images..

Sahyadrimitra

@ झकासराव

Picasa war maze user account naslyane direct Hard disk warun photo upload kele aahet.Pan Tyachi size kashi vadhvaychi te krupaya sanga.Ani ekda publish keleli post edit karaychi aasel tar kaay karaycha.

Sahyadrimitra

सह्याद्रीतल्या त्या आभाळाला टेकलेल्या शिखराला भिडणारा तो सायंकाळचा थंडगार वारा अंगावर घ्यावा आणि इतक्या वेळाची तंगडतोड क्षणार्धात विसरावी !!!! > अगदी अगदी... याची साठी केला होता अट्टाहास Happy

सुंदर लेखन... मायबोली वर स्वागत Happy
प्रचि साईज मोठी करण्यासाठी पिकासा लिंक दे आणि पोस्ट एडिट करण्यासाठी 'संपादन' वर टिचकी मार.

ओंकार.. मायबोलीवर स्वागत... तुझ्या 'सह्याद्रीमित्र' चे लेख अजुन येउंदेत... मस्त लेखन सुरु आहे तुझे.. किप इट अप !

मस्त लेख आहे.
मार्केंडेय मंदिर बघून ६ महिने पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथली नारळाचे शेंडे, एकावर एक रचलेली दगडे, लोकांनी (अंध)श्रद्धा म्हणून सोडलेल्या चपला ..सगळे आठवले. आणि आम्ही भर मे महिन्यात गेलो असल्याने बेक्कार उन होते. चढताना ३ ग्लुकॉन डी संपवल्याचे ही आठवले.
मार्केंडेय वरुन दिसणारा सप्तशृंगी चे आणि जाणारया वाटेचे फोटो दिसले नाहीत पण....जमल्यास ते पण टाका.
मस्त ..