मेन्यू कार्ड

Submitted by बेफ़िकीर on 11 February, 2013 - 04:40

मेन्यू कार्ड ही आयुष्यातील एक इर्रिटेटिंग निर्जीव वस्तू आहे. मेन्यू कार्डाच्या जाडीचे हॉटेलच्या दर्जाशी व्यस्त प्रमाण असल्याचे आता नक्की झालेले आहे. भूक लागणे, खायला मिळेल अशी जागा मिळणे, ती स्वच्छ व विश्वासार्ह असणे आणि जे मागवले आहे ते लवकर समोर येणे यापलीकडे खरे तर हॉटेलकडून बहुतेकांच्या हल्ली अपेक्षा नसतात. पण आधी मेन्यू कार्ड गिर्‍हाइकाच्यासमोर नम्रपणे, बेदरकारपणे किंवा तुच्छपणे सरकवले जाते. नम्रपणे सरकवले गेल्यास खिशाला चाट पडणार हे नक्की. बेदरकारपणे आपटले गेल्यास 'हे वाचून काय करणार आहात, जे इथे मिळते त्यातलेच काहीतरी घ्यावे लागणार' ही वृत्ती असते. तुच्छपणे समोर फेकण्यात 'मोठे मेन्यू कार्ड वाचतायत, चाळीसच्या वर बिल जाणार नाही यांचे' ही भावना असते.

हॉटेल कसेही असो, मेन्यू कार्ड मात्र सजवले जाते. मुखपृष्ठावर हॉटेलच्या नावाला साजेसे चित्र असते. म्हणजे नाव आमंत्रण असेल, तर दोन कमनीय बांध्याच्या अप्सरा हातात फुलांच्या माळा घेऊन वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत उभ्या असतात. आतमध्ये एवढे पदार्थ सामावूनही त्या जाड होत नाहीत हे एक नवलच. हॉटेलचे नाव मिर्चमसाला असले तर हळद, धन्याजिर्‍याची पूड, तिखट, मीठ, मसाला, मिरच्या अश्या प्रत्येकाची एक एक वाटी असलेले एक सुंदर सोनेरी ताट चित्रात दाखवतात. प्रत्यक्षात पदार्थ करण्यासाठी तयार मसाले वापरले जात असले तरी आम्ही आमचे स्वतःचे मसाले वाटतो हा दावा करायलाच पाहिजे.

मेन्यू कार्ड बनवण्यासाठी अतिशय जाड असा पुठ्ठा वापरायला कोणी आणि कधी सुरुवात केली याचा पत्ता लागत नाही. आपल्या हॉटेलमधील मेन्यू कार्डे गहाळ होतील अशी त्या इसमाला भीती होती की काय कोण जाणे! काहीतरी भारदस्त वाचल्याचे समाधाना 'कश्टमरला' मिळावे हाही हेतू असावा. गिर्‍हाइकाने या हॉटेलला इतर हॉटेलसारखे न मानून येथे जरा जपून वागावे या हेतूनेही काही वेळा मेन्यू कार्डांवर बराचसा खर्च केला जातो. फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन या तत्वानुसार मेन्यू कार्डे अतिशय सुबक, तपशीलवार रचलेली असतात. एखादे खंडकाव्य हातात धरावे तसे ते कार्ड धरावे लागते. फरक इतकाच की खंडकाव्य तिसर्‍या पानापर्यंतही वाचवत नाही, मेन्यू कार्ड अनेकदा पूर्ण वाचले किंवा चाळले जाते.

'कुछ ठंडी शुरुआत' अशी सुरुवात करून ग्राहकाला हुडहुडी भरेल हे तेथेच नक्की केले जाते. जेवायला जाणारे थंडीच सुरुवात करतात हे कशावरून गृहीत धरले जाते याचा कोणालाही आजवर पत्ता लागलेला नाही. या गार आरंभामध्ये ताक, सोलकढी, कोकम सरबत, रूह अफजा, लिंबू सरबत, जलजीरा व साधे पाणी यांचा समावेश होतो. ताकात पुन्हा प्रकार असतात. मसाला ताक, प्लेन ताक, नुसते मीठ घातलेले ताक वगैरे! त्यानुसार पाच रुपये इकडे तिकडे होतात. कित्येक गिर्‍हाइके तर मेन्यू कार्डने दाखवलेला जेवणाचा मार्गच योग्य असल्याचे मानून त्याबरहुकूम चालताना दिसतात. आधी ताक वगैरे मागवले तरच हॉटेलच्या व्यवस्थापनाबद्दल आदर व्यक्त होईल असे वाटून काही जण ठंडी शुरुवात करतातही. काहींसाठी तीच सुरुवात आणि तोच शेवटही असू शकतो. पण तोच शेवट असला तरी ते मेन्यू कार्ड पूर्ण वाचतात.

त्यानंतर सूपचा क्रम येतो. गार सुरुवातीमधून निर्माण झालेला थंडावा जेमतेम पाच मिनिटेही टिकू द्यायचा नसेल तर मुळात गार सुरुवात करावीच का हा प्रश्न विचारण्याचे धाडस गिर्‍हाईकात सहसा नसते. सूपला 'शोरबा' असे संबोधून थोडे रहस्यमय वातावरण निर्माण करण्याचा व कुतुहल वाढवण्याचाही एक निंद्य प्रयत्न करणारे काही महाभाग आहेत. या 'शोरबा' शब्दामुळे आल्यापासून अव्याहत शोर करत असलेली द्वाड मुले स्वतःच्या बा कडे आशेने पाहू लागतात की बुवा हे शोरबा जे काय आहे ते मिळू शकेल का! याचे कारण 'शोरबा' म्हणजे काय ते समजलेलेच नसते. पण प्रश्न असा येतो की ते त्यांच्या वडिलांनाही समजलेले नसते. मग आई व वडील यांच्यात कुजबुजत चर्चा होते आणि शोरबा वगैरे टाळून सरळ सूप मागवावे या निष्कर्षापर्यंत दोघे येतात. तोवर त्यांची झालेली पंचाईत पाहात कॅप्टन नावाचा गिर्‍हाईकापेक्षा कितीतरी भरजरी कपडे घातलेला गृहस्थ खोट्या विनयाने उभा असतो व त्याच्या तश्या उभ्या राहण्याचे प्रेशर जेमतेम सदरा घातलेल्या माणसाच्या मनावर वाढू लागते.

'ये शोरबा क्या होता है' असे विचारण्याचे धाडस अनेकांमध्ये नसते. पण त्यांची अडचण टळावी म्हणून खाली जे तपशील दिलेले असतात तो व्यवस्थापनाने दाखवलेला कनवाळूपणा! टोमॅटो, टोमॅटॉ क्रीम, व्हेज क्लीअर, व्हेज हॉट अ‍ॅन्ड सोर, स्वीट कॉर्न वगैरे नावे जरा परिचयाची असतात. त्यामुळे हे सूपच असण्याची शक्यता वाटू लागते व ते ऑर्डर करताना 'आज आपण शोरबा घेणार आहोत' हे समाधानही मिळते. या सूप नावाच्या सदरात चीन देशाने एल ओ सी क्रॉस करून युगे लोटलेली आहेत. व्हेज चाऊ मेन, ताऊ व्हेन, टंगफंग, रंगढंग असल्या नावाची सुपे खास मुलांना आकर्षित करण्यासाठी असावीत. यांच्यात नेमका फरक काय हे कोणीही सांगू शकत नाही. ही नावे व त्याद्वारे मिळणारा पदार्थ हा 'ऑथेंटिक' आहे असे वाटावे म्हणून विनापरवाना भारतात आल्यावर सापडलेला आणि लगेच सुटलेला एखादा नेपाळी नुसताच वावरायला हॉटेलात ठेवलेला असतो. तो हरिवंशराय बच्चनांपेक्षा दर्जेदार हिंदी कसा बोलतो हा प्रश्न गिर्‍हाइकाला कधीही पडत नाही. चीन हा एक देश असून तेथे एक मोठी भिंत आहे यापलीकडे त्या नेपाळ्याला चीनची काहीही माहिती नसते. पण त्याच्या पिचपिच्या डोळ्यांच्या सामर्थ्यावर अनेक प्रकारची सुपे वर्षानुवर्षे खपत असतात. सूपचे अडतीस प्रकार उपलब्ध आहेत हे पाहून तोंडात बोटे घालणारे शेवटी येऊन जाऊन टू बाय थ्री स्वीट कॉर्न किंवा टू बाय फोर टोमॅटॉ सूपच मागवतात. उगाच कोण वाट्याला जाणार त्या भलत्यासलत्या नावांच्या? व्हेज क्लीअर सूप या शब्दसमुहातील क्लीअर हा शब्द मला समजलेला नाही. एखादे व्हेज गिछमिड सूपही असते की काय असे मला उगीचच वाटते.

ठंडी शुरुआत न करता 'शोरबा' मागवल्यानंतर कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री साधारण बिल किती होईल याचा ठोकताळा मनातल्या मनात काढून ठेवतात. कॅप्टन नावाचा अतीउच्चभ्रू समाजातील एक घटक काही घटिका लांब गेल्यामुळे मिळालेला रिलीफ मेन्यू कार्डचा इतर भाग वाचणे, पंखे कोणत्या दिशेला केलेले आहेत ते बघणे, इतर गिर्‍हाईके कितपत आर्थिक तयारीची आहेत ते बघणे, मुलांना गप्प करण्याचा प्रयत्न करून पाहण्याचे समाधान मिळवणे आणि बायकोने अतिशय दुर्मीळ अश्या बारीक आवाजात 'फार काही सांगू नका हां, जात नाही' हे केलेले विधान ऐकणे यात जातात. 'फार काही सांगू नका, जात नाही' हे विधान दोन भिन्न भावना निर्माण करते. एक तर ते हॉटेलला आल्याचा मूळ आनंदच हिरावून घेते. पण त्याचवेळी दुसरी भावना म्हणजे 'हिला असे वाटले की आपण बरेच काही ऑर्डर करू' अशी भावना सुखावूनही जाते.

मेन्यू कार्डात पुढे 'स्टार्टर्स' असतात व त्यांचे दर पाहून ते 'एन्डर्स' वाटू लागतात.

'स्टार्टर्स म्हणजे काय' ते 'स्टार्टर्समध्ये काय घ्यायचे' येथपासून ते 'स्टार्टर्समध्येच पोट भरते' येथपर्यंतचा प्रवास मराठी मनाने यशस्वीपणे केलेला आहे.

हे जे स्टार्टर्स असतात त्यांचे जेवणातील ते स्थान कशावरून ठरले हे काही केल्या समजत नाही. मसाला पापड हा एक पदार्थ ऐंशीच्या दशकात रुळला. स्टार्टर म्हणून तो पदार्थ एकवेळ मान्य होईलही, पण चिकन अंगारा शोले, पनीर अमृतसरी बास्केट असले पदार्थ स्टार्टर म्हणून कसे काय खाणार याला कोणाकडेही उत्तर नाही. असाच 'स्प्रिंग रोल' हा एक पदार्थ रुळलेला आहे. वास्तविक चार स्प्रिंग रोल खाल्ल्यानंतर सरळ हाफ राईस दाल मारके खाल्ला तरी पुरू शकतो. पण मेन्यू कार्डने स्टार्टर म्हणून लिहिलेल्या पदार्थानंतरच्या मेन कोर्सकडे ढुंकून न बघणे हा आपणच केलला आपलाच अपमान आहे अशी भावना गिर्‍हाईकाला मेन कोर्स ऑर्डर करण्यास भाग पाडत असावी.

हराभरा कबाब, पोटॅटो चीप्स, पोटॅटो चीप्स ब्राऊन फ्राईड, पोटॅटो चीप्स रेड फ्राईड, चीज चेरी पायनॅपल, प्लेन चीज, व्हेज मांचुरिअन ड्राय, गोबी मांचुरिअन ड्राय, व्हेज स्प्रिंग रोल्स, चिकन स्प्रिंग रोल्स, एग स्प्रिंग रोल्स, समुद्र स्पेशल स्प्रिंग रोल्स!

चीज चेरी पायनॅपल हे काँबिनेशन शोधून काढणारा माणूस 'कचर्‍यातून कलानिर्मीती' असे काहीतरी कोर्सेस चालवत असावा. ही डिश समोर येते तेव्हा आजूबाजूला बर्फ का लावून आणतात काही समजत नाही. हीसुद्धा एक अशी डिश आहे की जिचा दर किती असावा याबाबत काहीही थंबरूल म्हणून नाही. दहा पिसेस असले तरी पंचाहत्तर रुपयांना असू शकते आणि पाच पिसेस असले तरी एकशे पंचवीस रुपयांना! मसाला पापड वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत वाट्टेल त्या दराला मिळू शकतो. काही वेळा तर वाटते की पन्नास रुपये नुसतेच देऊन टाकावेत. याचे कारण ते देऊन तो मसाला पापड खायचा आणि 'व्हॅल्यू फॉर मनी' नाही म्हणून त्रासायचे यापेक्षा निदान दान दिल्याचे समाधान तरी मिळेल!

पण मुलांच्या हल्ल्याला पहिल्या फेरीतच गारद करायचे असले तर हे स्टार्टर्स फार उपयोगी पडतात. सरळ दोन तीन स्टार्टर्स मागवावेत म्हणजे पुढे काही मागूच शकत नाही मुले. पण मग आपल्यालाही तेथेच थांबावे लागते.

दोन प्रतीपक्षांमध्ये तहाच्या वाटाघाटी होत असताना एक एक पत्ता उघडला जातो तसे हॉटेलचे व्यवस्थापन मुलांना ऐकू जाईल अश्या आवाजात बापाला विविध स्टार्टर्सची नावे ऐकवून त्यातील काही हवे का असे विचारते. भारतातील काश्मीरी जनतेलाच जर पाकिस्तानात जायचे असेल तर भारत सरकारला विचारतो कोण अश्या प्रकारचा दृढ भाव स्टार्टर्स हवेत का विचारणार्‍याच्या चेहर्‍यावर असतो. या प्रश्नावर मुलांनी किंचाळून व्यक्त केलेल्या भावना, खिशातील पैसे, बायकोच्या चेहर्‍यावरील सूचक हावभाव, इतर गिर्‍हाईकांसमोर टिकवायची शान व समोरचा कॅप्टन टाकत असलेला प्रभाव या मिश्रणातून निघालेले उत्तर दिले जाते. हे सगळे होते एका मेन्यू कार्डामुळे! पण हा तर पहिला आणि भ्याड हल्ला असतो. निर्भीड हल्ले पुढे सुरू होतात.

स्टार्टर्सनंतर मेन कोर्स (व्हेज) सुरू होतो. यामध्ये पंचाहत्तरपेक्षा कमी संख्येने 'आयटम्स' असल्यास हॉटेल 'क' दर्जाचे मानले जात असावे. पुन्हा 'मेन कोर्स - व्हेज' असेच सगळीकडे लिहितील असेही नाही. उगीच डोक्याला ताप म्हणून 'आमच्या बागेतून', 'हमारे गार्डनसे फ्रेश', 'फ्रेश फ्रॉम द फार्म', 'कुछ हराभरा' अशी नांवे देतात.

हे सदर अत्यंत मनस्तापदायक सदर ठरते. सगळे जग फिरून आल्यानंतर रत्नागिरीतील आपल्या गल्लीतील वाटाण्याची उसळ आणि पाव बरा वाटावा तशी माणसाची अवस्था होते. या सदरात एक शब्द सातत्याने लक्ष वेधून घेतो. तो शब्द म्हणजे 'स्पेशल'! समजा 'मटर पनीर' रुपये ११०.०० असे लिहिलेले असले तर त्या खाली 'स्पेशल मटर पनीर' रुपये एकशे पंचवीसला असते. स्पेशल म्हणजे काय याचे उत्तर ठराविक असते. 'थोडा ड्रायफ्रूट वगैरे आता है उसमे'! हे 'थोडा ड्रायफ्रूट' म्हणजे चार पाच हिरव्या लाल टूटी फ्रूटी आणि दिड काजूचे काप असतात. ते बघून डोके फिरते, पण करणार काय? ते काढून परत देऊन टाकून पंधरा रुपये कमी करून घेता येत नाहीत, कारण त्यावर हॉटेलवाले म्हणणार, 'अब ये कोई खायेगा नही ना?'! आता कश्यातही ड्राय फ्रूट घातले की पंधरा रुपये एक्स्ट्रॉ लावणे याला काही अर्थ आहे का? हा स्पेशल शब्द स्पेशली डोके उठवतो. त्यात आणखी एक प्रकार असतो. हॉटेलचे नांव समजा निसर्ग असले तर सर्वात शेवटी एक 'निसर्ग स्पेशल व्हेज' असे काहीसे असते. त्याचा रेट थेट पन्नास टक्क्यांनी जास्त असतो इतर भाज्यांपेक्षा! त्यात काय मिळते विचारल्यावर 'तीन कलरमे सब्जी आता है, अलग अलग टेस्ट है, तीन लोगके लिये काफी है, चार लोग को नही पुरा पडेगा' असे उत्तर मिळते आणि आपण नेमके चौघेच असल्याचा आपल्याला पश्चात्ताप होतो. बायकोच्या चेहर्‍यावरही क्षणभर 'तरी मी दुसर्‍या वेळी नको म्हणत होते, पण तुम्ही आणि सासूबाई ऐकाल तर ना' असे भाव येऊन जातात.

'मेन कोर्स' हे शब्द वाचून 'वूमेन कोर्स नाही का' असाही एक प्रश्न मध्यंतरी कानावर पडला होता. विचारणारा बावळट पुरुष तेवढाच क्षणभर हरखला होता की बायकांसाठी येथे काही नाही हे बायकोला आता सांगता येईल.

या मेन्स कोर्समधील स्पेशल या शब्दापेक्षाही, किंबहुना एकंदरच मेन्यू कार्डातील सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे एकच बेसिक पदार्थ घेऊन त्याला विविध गावांची नावे देणे! हे करताना फाळणीला साठहून अधिक वर्षे झाल्याचेही विस्मरण होत असावे.

व्हेज लाहोरी, पेशावरी, अफगाणी, हिमालयन, पहाडी, पतियाळा, बन्जारा, सुरती, अवधी, अमृतसरी, राजधानी, काकिनाडा, कारवारी, मँगलोरी, इन्दौरी, हैदराबादी, मद्रासी, बाँबे स्पेशल! असे व्हेजचेच पंचवीस प्रकार असतात. यातील कोणतेही नांव निवडून प्रश्न विचारून पाहा.

"व्हेज काकिनाडामे क्या आता है?"

उत्तर ठरलेले:

"मिक्स व्हेज आता है, थिक ग्रेव्ही मे"

हे उत्तर देताना कॅप्टनच्या चेहर्‍यावरचा जो आत्मविश्वास असतो तो पाहून त्या यादीतील इतर कोणत्याही गावचे व्हेज म्हणजे काय असेल असे विचारायची हिम्मत होत नाही. तरी हिम्मत केलीच तर पुढच्या भाजीचे वर्णन 'उसमे पनीरभी आता है' असे केले जाते. 'म्हणजे काकिनाडात पनीर नसणार' असे गृहीत धरून आपण सहज काकिनाडा मागवावे तर त्यात पनीर प्रामुख्याने निघते.

संगमनेर ते सिन्नर सारख्या रुक्ष रस्त्यावर व्हेज हिमालयन कोण खाणार? पण ते मेन्यू कार्डावर झळकणारच!

त्यात पुन्हा एक गोची असते. हे सर्व पदार्थ म्हणे 'जैन' स्टाईलमध्येही मिळू शकतात. जैन स्टाईल म्हणजे कांदा, लसूण, टोमॅटो यांना डच्चू! खाली एक टीपही असते. 'जैन स्टाईल - १० रुपये एक्स्ट्रॉ'! रॉ मटेरिअल कमी करूनही भाव वाढवण्याची वृत्ती जैनांमध्ये येण्यामागे ही मेन्यू कार्डे असणार असे ठामपणे वाटायला वाव आहे. मध्यंतरी एकाने हॉटेलबाहेर 'जैन चिकन थाळी मिळेल' अशीही पाटी लावली होती. बहुधा कोंबडी जैन धर्माची असावी.

तळेगाव, वडगाव, नांदेड, भोर, शिरवळ, दौंड, वालचंदनगर, पाटस, वरवंड अश्या अनेक गावांमधून 'आमच्या गावच्या नावची पण एक भाजी मिळावी' असे आंदोलन उभारण्यात येणार आहे म्हणे!

बन्जारापेक्षा लाहोरी महाग असण्याचे कारण लाहोरीत सुका मेवा असतो आणि लाहोरीपेक्षा अफगाणी महाग असण्याचे कारण त्यात अंडे फेटून घालतात म्हणे! व्हेज अफगाणीत काय फेटून घालतात कोण जाणे! त्याहीपेक्षा अंडा-अफगाणी या डिशमध्ये काय फेटून घालत असतील कल्पना करता येत नाही.

मेन्यू कार्डातील हा भौगोलीक आढाव्याचा भाग संपवून आपण चिकन, मटन याकडे वळतो. अर्थात, मांसाहारी असलोच तर!

हा भाग 'करुणरसातून विनोद' या तत्वावर आधारीत असतो. मेलेल्या सजीवाचे तळतळाट यातील प्रत्येक पदार्थाला असतात. ते मूक अश्रू न ऐकताच आपले डोळे यादीवरून गरगरा फिरू लागतात. व्हेजमध्ये ज्या स्पेशालिटीकडे अनवधानाने डोळेझाक झालेली असते ती स्पेशालिटी येथील प्रमुख स्पेशालिटी असते. ती म्हणजे 'कोल्हापूरी'! वास्तविक कोल्हापूरचे ओरिजिनल मटन किंवा चिकन कधीही अती तिखट नसते, पण कोल्हापूरी नावाखाली जे इतरत्र मिळते ते तिखट ओतून मिळते. या कोल्हापूरी पदार्थांना मूळ पदार्थांपेक्षा मग दहा रुपये जास्त लावलेले असतात. आता गंमत म्हणजे 'एग - अफगाण करी - कोल्हापूरी' या पदार्थाला काही अर्थ असेल का? पण माणूस ते वाचत जातो. कुठे अफगाणिस्तान आणि कुठे कोल्हापूर! समाधानाची बाब म्हणजे मांसाहारात महाराष्ट्रातील मालवण, कोल्हापूर व नागपूर या तीन प्रदेशांना बर्‍यापैकी प्रातिनिधित्व मिळते. खाद्यसंस्कृतीने मुंबईकेंद्रीत स्वार्थी राजकीय संस्कृतीवर उगवलेला एक प्रकारचा सूडच हा!

मुर्ग माखनी आणि बटर चिकन असे दोन प्रकार एकाखाली एक असतात. दोघांचे दरही भिन्न असतात. मुर्गमाखनी वीस रुपयांनी महाग असते. का विचारले तर उत्तर मिळते:

"वो इंडियन स्टाईलमे आता है"

"मग बटर चिकन कोणत्या स्टाईलमध्ये येते?"

"वो तो रेग्युलर बटर चिकन है"

आता रेग्युलर बटर चिकन इरेग्युलर झाले की मुर्गमाखनी होते आणि त्या प्रक्रियेत त्याची किंमत वीस रुपयांनी वाढते हा सिक्वेन्स ग्राहकाला नेमका डोळ्यासमोर आणताच येत नाही. त्यामुळे बटर चिकनच मागवले जाते. असेच होते मुर्गमसल्लम आणि चिकन मसालाचे! दोघेही एकाखाली एक असतात आणि किंमतीत फरक असतो. उत्तर तेच! 'चिकन मसाला मतलब रेग्युलर अपना चिकन मसाला'! या चिकनच्या सदराला उगाचच 'हमारे तंदूरसे' किंवा 'कुकुचकू' असे काहीतरी नांव दिलेले असते. अत्यंत गावरान हॉटेलमध्येही गावरान चिकन वेगळे दाखवून तीस रुपये जास्त का आकारतात काही समजत नाही.

म्हणे गावरान कोंबडी अधिक चांगली लागते! मग अभयारण्यात एखादी कोंबडी वाढवली तर तिच्या पोषणामाअगे मानवी प्रयत्न व नैसर्गीक सभोवताल असे दोन्ही प्रभावी घटक असणार ना? मग कोणीतरी 'कोंबडी अभयारण्य मसाला' अशी डिश का काढू नये?

गावरान चिकन व चुलीवरच्या भाकरी! हे काही ठिकाणी यु एस पी असते. गावरान कोंबडी चविष्ट असते हे मान्य, पण ब्रॉयलर कोंबडी लठ्ठ असते हेही मान्य व्हायला काय हरकत आहे? त्यातही लिंगाधारीत दुजाभाव आहेच. कोंबडा वीस रुपये अधिक दराने विकला जातो.

मला नेहमी एक प्रश्न पडतो. आठवीही न शिकलेला आणि स्वच्छतेचे किमान नियमही माहीत नसलेला एक आचारी भारतातील पंचवीस वेगवेगळ्या गावांच्या नावातील वैविध्ये ओळखून पदार्थांची चव ढोबळपणे तरी कशी बदलत असेल आणि सूक्ष्मपणे तरी कशी?

मांसाहारात हैदराबाद या शहराला वेगळेच महत्व प्राप्त होते. या शहराच्या नावावर बिर्याणीतून सामान्य बिर्याणीपेक्षा दहा रुपये अधिक मिळवता येतात. पळून पळून दम लागलेल्या बोकडाला मारून बिर्याणी केली की 'दम बिर्याणी' म्हणतात की काय इतकी दम बिर्याणी आणि साधी बिर्याणी समान लागते.

आता असे झालेले आहे की तीच तीच नावे वाचून पब्लिक कंटाळलेले असणार याचा अंदाज घेऊन एका थाळी सिस्टीमवाल्याने आपला मेन्यू असा लिहिलेला होता.

चिकन ताट, मटन ताट, मच्छी ताट!

जरा 'ताट' वगैरे म्हंटले की घरगुती फील येतो म्हणून बहुधा! तर त्याच्यावर कडी म्हणून समोरच्याने आणखीन वेगळे लिहिले.

कोंबडी ताट, बोकड ताट, मच्छी ताट!

ते वाचून एक जेवणाची थाळी देत असावेत व समोर एक जिवंत बोकड बांधून ठेवत असावेत असे काल्पनिक दृष्य डोळ्यासमोर आले. आता याहीवर कडी म्हणून तिसर्‍याने:

कोंबडी जेवण, बोकड जेवण, मच्छी जेवण

अशी पाटी लिहिली. कोंबडं आणि आपण एका ताटात जेवणार की काय असे मनाला चाटून गेले.

प्रथम चिकनच्या डिशेस, मग मटनच्या, नंतर अंड्याच्या आणि शेवटी सी - फूड च्या असा सहसा क्रम असतो. पण जे हॉटेलच सामुद्री अन्नावर गुजराण करते तेथे मेन्यू कार्डावर भला मोठा खेकडा दाखवलेला असतो. मला अनेक वर्षे 'डोंगर पोखरून उंदीर काढणे' या म्हणीचा अर्थ समजत नव्हता. पहिल्यांदा खेकडा खाल्ला तेव्हा नीट समजला. त्यानंतर आजतागायत खेकडा खायची वेळ दोन वेळाच आली आहे, पण ती वेळ खेकड्यावर न येता माझ्यावर आली आहे असे म्हणावे लागेल.

मेन कोर्स झाला की आपण हुश्श करणार तोच पुढच्या पानावर विदेश वारी सुरू होते. प्रथम चीन या देशाला बदनाम करण्यात धन्यता मानली जाते. ताऊ मेन, यांग टू असले 'नुकतेच बोलायला शिकलेल्या बाळाच्या तोंडातून यावेत तसे' अर्थहीन उच्चार असलेले पदार्थ अत्यंत जळजळीत असतात. यात काहीही कशाबरोबरही खाता येते ही एक जमेची बाब आहे. राईस करीबरोबर, करी नूडल्सबरोबर, नूडल्स ब्रेडबरोबर आणि ब्रेड राईसबरोबर!हे खायला आपणही कुणाबरोबरही जाऊ शकतो. कारण एकाच डिशची क्वाँटिटी तिघांना पुरेलशी असल्याने परवडते. 'तमा बाळगणे' हा वाक्प्रचार चीनमध्ये कोणालाही माहीत नसावा. याचे कारण हे सर्व पदार्थ एकाच भल्या मोठ्या तापलेल्या तव्यावर एका पाठोपाठ एक असे सर्रास ग्राहकासमोर बनवले जातात. नुकतेच कोंबडीचे अंत्यसंस्कार केलेल्या तव्यावर त्याच मिनिटाला व्हेज फ्राईड राईस येऊन पडतो. ठाण ठाण असा आवाज करत आणि हे पदार्थ हवेत उडवत पुन्हा तव्यावर टाकले जातात. आचारी नेपाळी असतो. त्याच्या चेहर्‍यावर सर्वस्व लुटले गेलेल्या सिंध्याचे भाव असतात. वाट्टेल त्या रंगाचा कांदा आणि कोबी तव्यावर भिरकावत तो वरून पातेल्याने भात ओततो.

चीन या देशाची छी थू झाली की थायलंडची धिंड काढतात. 'थाई करी' या नावाखाली जे मिळेल ते 'थाई करी' असते हे मान्य करण्यावाचून पर्याय नसतो. थायलंडमध्ये जर अशी करी मिळत असेल तर तेथे फिरायला जाणारे निव्वळ स्वैराचारासाठी जात असणार हे नक्की! थाई पदार्थांना का कोणास ठाऊक पण अजूनही थोडे वलय आहे. त्यामुळे किंचित चढा भावही मिळतो. 'आम्ही थाई फूड खाल्ले' या विधानाला बहुधा समाजात वजन असावे.

थायलंडनंतर इटली हा देश जाहीर नागवला जातो. पिझ्झाचे बेचाळीस प्रकार मेन्यू कार्डावर दिसतात. पास्टा, स्पॅगिटी आणि आणखीन काय काय! अजिबात सुंदर नसलेल्या नटीला मेक अप मुळे भाव चढतो तसे टोमॅटो केचअप मुळे यातील प्रत्येक पदार्थ बरा लागतो.

वर्ल्ड टूर झाल्यावर कोणालातरी पाव भाजीची आठवण येते आणि मेन्यू कार्डाचे आणखीन एक पान भरते. यात एक 'खडा' नावाची पावभाजी असते जी मी आजवर कधीही मागीतलेली नाही. आधी हा खडा मराठी आहे की हिंदी हेच माहीत नाही. हिंदीच निघाला तर पाव आणि भाजी काही स्वतःहून खडे होणार नाहीत हे नक्की, म्हणजे माणूसच खडा होणार! आता जरा कुठे येऊन टेकलोय तर पुन्हा खडा होऊन काय म्हणून पाव भाजी खाऊन वर पाच रुपये एक्स्ट्रॉ द्यायचे?

शेवटी एकदाची गाडी 'साथ साथ' वर येते. त्यात पुन्हा मसाला पापडाला उगीचच एक एक्स्ट्रॉ जागा मिळते. हे खाद्यसंस्कृतीतील आरक्षण मानले जावे. या शिवाय रोटी, पराठा, नान, मिसी रोटी, खस्ता रोटी, मक्के दी रोटी, कुलचा, तवा रोटी असले अनेक पदार्थ आपापला भाव दाखवत शुकशुक करत असतात. तेथपर्यंत वाचून पोचल्यावर दम लागलेला असल्यामुळे माणूस सहसा रोटीच मागवतो. मग खस्ता रोटी म्हणजे नेमकी कशी असेल अशी एक भावना उगाचच हुरहूर लावून लोप पावते. या साथ साथ मध्येच दही, रायता इत्यादी असतात. हे पदार्थ असे असतात की घेतले तर खिशाला चाट पडते आणि नाही घेतले तर आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले असे वाटावे.

मेन्यू कार्डाचा अंत जवळ आलेला असतो. पण माणसाचा अंत मागेच कधीतरी झालेला असतो. त्यामुळे एक प्रेतवत नजर डेझर्ट्सवरून फिरते. 'आईसक्रीम इथे नको, बाहेर खाऊ' अशी एक कोणीतरी दिलेली सूचना उगीचच खुलवून जाते. याची दोन कारणे असतात. एक तर आईसक्रीम आहे हे नक्की आहे आणि दुसरे म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी खाणे होणार असल्याने नुसत्या आईसक्रीमचे बिल कदाचित दुसराच कोणीतरी देईल ही एक वेडी आशाही असते.

यानंतर काही हळुवार, मन पिसासारखे हलके करणार्‍या सूचना असतात.

१. एकदा दिलेली ऑर्डर कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाही.

२. एका थाळीत दोघांनी जेवू नये, अन्यथा तीस रुपये एक्स्ट्रॉ पडतील.

३. ऑर्डर दिल्यानंतर ती सर्व्ह करायला कमीतकमी पंचवीस मिनिटे लागतील. (वास्तविक पाहता पंचविसाव्या मिनिटाला माणूस बिल मागून बडिशोप चघळत असतो).

४. दही, चटणी, लोणचे एक्स्ट्रॉ हवे असल्यास एक्स्ट्रॉ चार्ज पडेल.

५. ग्लास किंवा काचसामान फुटल्यास त्याचे बिल पडेल.

६. स्टाफशी हुज्जत घालू नये.

७. आम्ही कशालाही जबाबदार नाही.

८. आम्ही पार्टी व केटरिंगच्या ऑर्डर्स स्वीकारतो.

ही पकाऊ मेन्यू कार्डे एकदाची संपतात. पण या पकाऊपणातूनही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात.

मेन्यू कार्डातील मुद्राराक्षसाचे विनोद तर फारच चीड आणणारे असतात. 'फ्रेश लेमन सोडा' चे 'प्रेस लेमन सोडा' लिहिलेले असते. काही भारी हाटिलातल्या मेन्यू कार्डांवर नावापुढे दर द्यायच्या आधी कंसात त्या पदार्थातून त्या हॉटेलला काय अभिप्रेत आहे याचे सुतोवाच केलेले असते. टेंडर पिसेस ऑफ चिकन मॅरिनेटेड अ‍ॅन्ड कूक्ड इन रिच कोकोनट ग्रेव्ही वगैरे! असे कंसात पदार्थाचे वर्णन देणार्‍या हॉटेल्सचे दर जास्त असतात, ते का ते समजत नाही. म्हणजे जास्त दर लावला आहे म्हणून एक्स्प्लनेशन देत आहेत की एक्स्प्लनेशन देत आहेत म्हणून दर जास्त लावत आहेत हे कळत नाही. काही क दर्जाच्या हॉटेल्समध्ये एक साधा कागद मेन्यू कार्ड म्हणून समोर येतो तो मला फार आवडतो. त्यावर नखरा नसतो. पदार्थाचे नांव वाचून अंदाज येतो आणि ऑर्डर सहज ठरवता येते. अगदीच टपरीवजा हॉटेलमध्ये तर सरळ भिंतीवर एक फलकच लावून टाकतात नाहीतर वेटर्सना तोंडपाठ झालेला मेन्यू तरी असतो. हायवे वरील ढाब्यांच्या दोनदोनशे मीटर्सपासून जाहिराती असतात. गावरान कोंबडी मिळेल. खास चुलीवरचे मटन व भाकरी मिळेल.

एकंदरीत, पदार्थाबाबत काहीतरी आकर्षण निर्माण करण्याचे काम करता करता ही मेन्यू कार्डे डोके पिकवतात हेही खरेच!

आता जर अशीच मेन्यू कार्डे विविध पशूपक्ष्यांनी काढायची ठरवली तर?

मांजर -

बीळ उंदीर कच्चा
खिडकी चिमणी कच्ची
दूध पोळी ताटली
खास भिंतीवरची पाल मिळेल

पारवा -

मारवाडी दाणे पहाटेचे
पेन्शनर दाणे विथ कोवळे ऊन
माणूसकी दाणे इन कबूतरखाना

मगर -

एस्केपिंग गवा फ्रॉम वॉटर
फ्रेश डीअर ऑन द बँक

बिबट्या -

माणूस भीमाशंकरी कच्चा
खास मध्यरात्रीचा गस्तीवरचा कुत्रा
कोंबडी निरर्थक फडफड
पिकलेला म्हातारा निर्विरोध

एकुण काय? वैतागवाडी असलेल्या या मेन्यू कार्डांवरून आपण नजर फिरवतोच. कितीही वैतागलो तरी! आणि शेवटी ठरलेलीच ऑर्डर देतो आणि ठरलेलीच उत्तरेही मिळतात. आपण पनीर बटर मसाला म्हणायला गेलो की मसाला मधील शेवटचा 'ला' तोंडातून बाहेर पडायच्या आत वेटरचे 'वो स्वीट आयेग' आपल्याला ऐकू आलेले असते. त्यामुळे काही जण म्हणे हल्ली 'स्वीट आयेगा ये मालूम है लेकिन पनीर बटर मसाला' अशी लांबलचक ऑर्डर देतात!

मृत्यूच्या मेन्यू कार्डवर आपले नांव लागेपर्यंत ही मेन्यू कार्डे आपल्याला वाचत राहावीच लागणार.

===========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा Lol
बेफी, स्टार्टर्स किंवा मेन कोर्स, रोटीच्या प्रकारासाठी दिलेली हेडींग्ज माझ्या जाम डोक्यात जातात.
सिधे खेत से... वगैरे, ते तुमचं कुठ ठंडी शुरुवात त्याचाच भाऊ.

Lol बेफी भारी लिहिलय.
स्पेशल आणि अजिबात सुंदर नसलेल्या नटीला मेक अप मुळे भाव चढतो तसे टोमॅटो केचअप मुळे यातील प्रत्येक पदार्थ बरा लागतो. बद्दल तर अगदी अगदी.

मस्त लिहिलय !
कोल्हापुरी जेवणाच्या केलेल्या वाताहातीबद्द्लही अनुमोदन
कोल्हापुरी म्हणजे तिखट नव्हे तर मसालेदार हेच लोकाना कळत नाही Sad
आणी ती चव चटणीमुळे येते (बुक्का नव्हे) हेही

मस्त! लेख आवडला.
मला मात्र मेन्यूकार्ड वाचायला आवडते. Happy

चवदार खायचं तर नुसत्या खडू फळा मेन्यूकार्डवाल्या हाटिलात जायचं नी उगाच गप्पा मारत तास दिडतास खात बसायचं असेल तर अश्या जाडजाड मेन्यूकार्डवाल्या रेस्तराँत जायचं असं माझं साधारण वर्गीकरण आहे.

मेन्यूकार्डातला मांसाहारी भाग वाचताना माझ्या मनात नेहमी नरभक्षक राक्षसांचे मेन्यूकार्ड तरळून जाते.
Happy

निरीक्षण अफाट. हसू मात्र फार आले नाही Happy

कोल्हापूरीबद्दल सहमत. कोल्हापूरव्यतिरीक्त इतर शहरांतील लोकांचा कोल्हापूर म्हणजे अति तिखट असा एक गैरसमज रूढ झालेला आहे तो ह्यामुळेच!

Lol

अजुन एक निरिक्षण
टेक अवे मेन्यु आणि हाटेलातले मेन्यु मधले रेट्स वेगळे असतात.
टेक अवे मेन्यु मध्ये १०% डिस्काऊंट दिले असते / फ्री होम डिलीव्हरी लिहलेले असते, पण त्या मध्ये रेट्स वाढवलेले असतात.

एक किस्सा आठवला.
कॉलेजची परिक्षा संपल्यावर आम्ही सगळे होस्टेलाईट्स एकत्र पावभाजी खायला गेलो होतो जंगली महाराज रस्त्यावरच्या एका हॉटेलात. आमच्याबरोबर (सहसा हॉटेलात न खाणारा) एक सिनीयर पण आला.
आम्ही सगळ्यांनी साधी पावभाजी मागवली पण सिनीयरने उत्साहात कडाई पाभा मागवली. सगळ्यांच्या डिश आल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव फोटोजेनिक झाले होते कारण पाभा तिच होती जी आमच्या डिशमधे होती फक्त तांब्याच्या लहानश्या घंघाळात सर्व्ह केली होती (आणी बिलात १०-१५ रु जास्त लावले होते.)

Lol

महान!:हहगलो:

खरयं पुण्याबाहेरच्या कुठल्याही हॉटेलमध्येच जाऊन आल्याचे फिल आलयं. एकाच चवीची ग्रेव्ही ते व्हेज नॉनव्हेजमध्ये वापरतात, आणी नावे मात्र लई भारी.:फिदी:

मेन्यू कार्डात पुढे 'स्टार्टर्स' असतात व त्यांचे दर पाहून ते 'एन्डर्स' वाटू लागतात.

Biggrin

निरीक्षणासाठी हॅट्स ऑफ...

सांगली परिसरातील ''आक्खा मसूर'' या स्पेशालिटीवर दोन शब्द खर्चले असतीलच असे उगाचच वाटून गेले होते.

मस्त लेखन, आवडलं. ( खुप अभ्यास केलेला दिसतोय.)
जे कोल्हापुरीबद्दल लिहिलेत ते मालवणीला पण तंतोतंत लागू आहे.
वरळी सी फेस ला पुर्वी फ्लोरा होतं, ते चायनीज जेवण विकणारे आद्य हॉटेल. तिथे भरपूर वाढप असायचे.
ऑर्डर करतानाच ते लोक सांगत असत, एवढे तूम्हाला संपणार नाही. ( गोष्ट २५ वर्षांपुर्वीची आहे.)

काही वेगळी हॉटेल्स म्हणून, दादरच्या प्रकाश आणि चेंबूरच्या सरोज ला भेट द्या. रोजचे २/४ खास पदार्थ बोर्ड्वर लिहिलेले असतात. ते छानच असतात.

नायजेरिया मधे गारी ( साबुदाण्याची उकड ) आणि काऊ टेल सूप ( हो, गायीच्या शेपटीचे सूप ), पेपे सूप ( लाल तिखटजाळ मिरच्यांचे सूप ) स्नेल्स ( मोठ्या गोगलगायी ) हे बाहेरच्या बोर्डवर लिहिलेले असते,

केनयात चहा ( अत्यावश्यक ), उगाली ( मक्याची उकड ) सुकुमा विकी ( लिटरली आठवडा ढकला, अर्थात एक पालेभाजी ) चिप्स हे कॉमन. तिथे फक्त भजी ( मारु भजी ) विकणारी पण दुकाने आहेत,

बेफिकीर,
जबरदस्त निरीक्षण, खुसखुशीत आणि नर्मविनोदी लिखाणाची शैली आवडली.
विषय ही हटके ( श्वर नव्हे) आहे .

चांगलं लिहिलय.
हाटिलात गेलं की ऑर्डर देवुन निवांतपणे मेनु कार्ड चाळणे मला आवडतं. Happy
त्यात मी सगळ्याचे रेट्स पण बघुन ठेवतो. अगदी दारवांचे पण. Happy

Biggrin जबरदस्त लिहिलंय. सह्हीच निरिक्षणं आणि मनातील भावविश्वं टिपलीयेत. Lol

खमंग आणि खुसखुशीत झालंय तुमचं मेन्युकार्ड. त्याची जरा रेसिपीही टाका बरं. Proud

वरळी सी फेस ला पुर्वी फ्लोरा होतं >>> दिनेशदा, हाय की अजून.

इब्लिसभाऊंकडून प्रेरणा घेऊन मी ही एक मेन्युकार्ड टाकतेय. हे अथिरापल्लीच्या (केरळ) एका रेस्टॉरंटातलं मेन्युकार्ड आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा :

मस्त... मस्त
प्रत्येक वाक्याला अगदी अगदी होत होतं. निरीक्षण मस्त आहे तुमचं.
शेवटचं वाक्य अनावश्यक किंवा वरील लेखाला सुसंगत असं नाही वाटलं.

बाकी लेख छानच.

<<ही नावे व त्याद्वारे मिळणारा पदार्थ हा 'ऑथेंटिक' आहे असे वाटावे म्हणून विनापरवाना भारतात आल्यावर सापडलेला आणि लगेच सुटलेला एखादा नेपाळी नुसताच वावरायला हॉटेलात ठेवलेला असतो. तो हरिवंशराय बच्चनांपेक्षा दर्जेदार हिंदी कसा बोलतो हा प्रश्न गिर्‍हाइकाला कधीही पडत नाही. चीन हा एक देश असून तेथे एक मोठी भिंत आहे यापलीकडे त्या नेपाळ्याला चीनची काहीही माहिती नसते. पण त्याच्या पिचपिच्या डोळ्यांच्या सामर्थ्यावर अनेक प्रकारची सुपे वर्षानुवर्षे >> + १००

मस्त लेख ! आवडला...

यात एक 'खडा' नावाची पावभाजी असते जी मी आजवर कधीही मागीतलेली नाही.
>>>>>>>>
काय हो, अंड्याला तर ती चिरडलेली दाबलेली पेपचलेली खिमाट पावभाजी खाण्यापेक्षा खडाच आवडते. Happy

बाकी लेख काय, आपला नेहमीसारखाच भन्नाट...
काही उपमा, वाक्ये अगदी बेफिकिर स्टाईल.. Happy

मृत्यूच्या मेन्यू कार्डवर आपले नांव लागेपर्यंत ही मेन्यू कार्डे आपल्याला वाचत राहावीच लागणार.
>>>>>>>>>>>>>

मृत्यूच्या मेन्यू कार्डवर आपले नांव ....... अंड्या

म्हणजे जर यमराज शाकाहारी निघाले तर अंड्या वाचला Lol

Pages