आठवणीतली माणसे २ ' पार्वतीकाकू'

Submitted by उमेश वैद्य on 11 February, 2013 - 03:08

मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आलेला. शाळेतल्या वयाची मुले वाड्या मागच्या मोकळ्या जागेत खेळत होती. कार्लेकरने चेंडू फटकावला तो वाड्याच्या मागच्या अंगणात टप्पा खाऊन कुठेतरी
दिसेनासा झाला. चेंडू शोधत शोधत मुले वाड्याच्या मागच्या भागात आली. चेंडू बाहेर पडलेला नव्हता. कदाचित पडवीत गेला असेल मुलांना वाटले. पडवी बंद होती पुढच्या बाजूला गज लावलेले होते.
आत अंधार होता. मिचमिच्या डोळयांनी मुले आत चेंडू दिसतो का ते पाहू लागली.

काय असेल रे इथे? ए कोण रहातं आणि ती चूल कोण पेटवत असेल. मुलांची हलक्या आवाजातली चर्चा.

अरे हे तर विनायक भोळेचं घर. कांतूने माहिती पुरवली. भोळ्यांचा विनायक या मुलांच्याच वयाचा. पण फारसा फारसा कधी मिसळत नसे मुलांच्यात. त्यांच्या गड्याबरोबर नेहमी शेतावर जाइ खेळायला. विनायक आत दिसतो का हे मुले पाहू लागली.
विनाsssssयक सुहासनं हाक मारली. आत आवाज घुमला. मुलांना गंमत वाटली मग प्रत्येकजण वेगवेगळ्या आवाजात हाक मारू लागला. विनाsssssयक, विनाsssssयक, विनाsssssयक
पडवीच्या गजांना चिकटून मुले आत विनायक दिसतो का ते पहात होती. तेवढ्यात आतल्या बाजूला अंधारात काहीतरी हालचाल झाली गजांखाली असलेल्या भिंतीच्या सांद्रीतून एक गोलाकार डोक वर आलं. या अनपेक्षित हालचालीनं मुलं घाबरली. हातात धरलेले पडवीचे गज सोडून मुलांनी खाली उड्या मारल्या
भूतss भूतss मुले ओरडू लागली.

आपण काय पाहिलं ते मुलांना नीट समजलं नाही. प्रत्येकजण आपल्याला काय दिसलं ते दुसऱ्याला सांगू लागला. लांबूनच ऊंच उडी मारून पडवीच्या दिशेने मुले पहात असताना पडवीच्या आतील बाजूने एक मानवी आकृती उभी राहिली. आपल्या दोन्ही हातांनी गज धरून ती मुलांकडे पाहून त्यांना बोलावू लागली. ती एक स्त्री होती. लाल तांबड्या पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. तोच पुन्हा अंगभर लपेटलेला.

“काय रे बाळांनो?? “ घोगऱ्या आवाजात ती व्यक्ती म्हणत होती.

पातळातून दोन गोरे सुरकुतलेले दंड, चोळी विना. हातात बांगड्या नाहीत की कानातले. पदर डोक्यावरून घट्ट ओढून घेउन दोन्ही कानामागे खोचलेला. चेहेऱ्यावर मात्र हास्य. निरागस. एखाद्या बालीकेसारखं. पुढचे दात पडलेले.
अशी व्यक्ती आम्ही मुलांनी कधीच पाहिली नव्हती. ती स्त्री आम्हा मुलांना खुणेने बोलावत होती.
“ या रे बाळांनो. काय शोधताय तुम्ही? असे घाबरू नका या! या!”.
मी आजी आहे तुमची, पार्वती आजी.
ईतर आज्यांपेक्षा ही काही वेगळीच दिसत होती.
मुलं एकमेकांकडे बघुन खुसुखुसू हसू लागली.

आजी आमचा चेंडू आलाय का इथं? सुहासनं धीर करून पार्वती आजीला विचारलं.

“या इथं पडलाय का पहा”. आजी म्हणाली. मुलांचा धीर चेपला. आजीनं दाखविलेल्या ठिकाणी चेंडू पडलेला होता.

काही दिवसापूर्वी दूरदर्शन वरच्या मराठी मालिकेत अशा विकेशा स्त्री ची व्यक्तिरेखा पाहिली आणि पार्वतीकाकू माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली. आजच्या काळात अशा स्त्रिया समाजात अभावानेच सापडतील पण माझ्या पिढीतल्या कित्येकांना अशा स्त्रियांचं नकळत्या वयात ओझरतं का होईना, दर्शन झालेलं आहे. म्हणूनच आमच्या स्मृती पटलावर अशा स्त्रियांचं वास्तव्य अजूनही आहे.

पार्वतीकाकू एक विधवा, विकेशा स्त्री होती. भोळ्यांच्या घरात सून म्हणून आली तेंव्हा दहा वर्षांची होती. कळण्याचं वय नव्हतं. ज्या पुरुषाशी लग्न झालेलं तो हिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा. काहीतरी झालं आणि पुढे अवघ्या अडीच तीन वर्षात तो गेला. घराण्याची प्रतिष्ठा, सुरक्षितता इत्यादी कारणं पुढे करत तिला विकेशा केलं गेलं आणि तेव्हापासून ही अंधारी पडवी तिच्या नशिबी आली. पार्वतीला माहेरचा आधार नव्हता. गरीबाघरची मुलगी म्हणून पत्करलेली.
एकच भाऊ. तो ही परिस्थितीने गांजून गेलेला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे हिची जबाबदारी कोण घेणार? तिचं जणू अस्तित्वच पुसलं गेलेलं. ती तिथं आहे हे जणू सगळेजण विसरलेच होते. ती अंधारी पडवी हेच तिचं विश्व. मुळातच वाड्याच्या त्या भागात कोणी येत-जात नसे. पडवीतून वाड्यात जाण्या येण्यासाठी जी दोन दारं होती ती सदा बंद. जेंव्हा वाड्यावर कधी कुळधर्म ,कुळाचार्, श्राद्ध असे तेंव्हाच एखादं दार किललिलत उघडे. तिच्यासाठी जेवणाच ताट ठेउन बंद होई. एरवी तीच आपला भात रांधून घेई एका वेळेपुरता.

हे आयुष्य वाट्याला आलं तेंव्हा त्यातली गंभीरता कळण्याचंही तिचं वय नव्हतं. त्याला विरोध तरी ती काय करणार? पुढे वयात आली 'अशा' जगण्याचे चटके जाणवायला लागले. वाड्यावर काम करणाऱ्या मोलकरणी आपली कामं झाली की कधी मधी डोकावत. त्याच तिच्या मैत्रिणी. वाड्यावर काय चाललयं ते हळू आवाजात तिला सांगत. कधी आजारपणात् औषधं आणून देत. अंग रगडून देत त्यांचा तिला आधार वाटे. ती मात्र कधीच बाहेर पडत नसे. या मोलकरणींकडूनच तिची हकिकत गावाला कळायची ती अशी हस्ते परहस्ते. अगदीच कुणीतरी याच बायकांबरोबर पार्वतीकाकू साठी एखादा जिन्नस कोणाच्या नकळत पाठवत. त्या तो पदराआडून तिला नेऊन देत.

चेंडूच्या निमित्तानं माझ्या भावविश्वात अचानक पार्वतीकाकू आली आणि ठाण मांडून राहिली. आम्ही मुलं खेळताखेळता पडवीच्या दिशेनं जात असू. कधी मुद्दाम चेंडू त्या दिशेने मारायचो. गजातून आत वाकून पार्वतीकाकू काय करते ते बघायचो. काकूही आमची वाट बघते असं वाटायचं , आम्हाला आत बोलवायची. छोट्या मातीच्या मडक्यातून दही पोहे कालवून द्यायची. आम्ही ते खायचो. तिच्याशी गप्पा मारायचो. पार्वतीकाकू बद्द्ल लोक फारसं बोलत नाहीत हे आम्हाला कळलं होतं. आम्ही मुलं आपापसात तिच्याबद्दल बोलत असू पण तो विषय आपापल्या घरी कधी काढत नसू. तिच्या आणि आमच्या स्नेहात घरच्या कुणा वडील मंडळींचा अडसर येईल याची जाणीव आम्हा मुलांना त्या वेळीही होती. काही असलं तरी हा स्नेह आम्हा मुलांना तरी आवडायचा.

पुढे काळानुरूप माझं विश्व बदलत गेलं. जाणिवा जसजशा विकसित होत गेल्या तसं पार्वतीकाकूच आयुष्य मला स्पष्ट होत गेलं. ह्ळुह्ळु आमची शिक्षणं झाली. कॉलेजात गेल्यावर आमच्या कक्षा आणखी रुंदावल्या. पण काकूंच्या पडवीत निरागसपणे जाण्याचं आमचं स्वातंत्र्य आमच्या वाढलेल्या वयानं आमच्यापासून हिरावून घेतलेलं होतं. पुढच्या काळात अनेकानेक नात्यात मी गुरफटत गेलो. साहचर्याच्या बंधनात बांधल्या गेल्यानंतर पार्वतीकाकूच्या घुसमटीचे अनेकानेक कंगोरे कल्पनेने सापडत गेले. समजत गेले. मी तिला शेवटचं पाहिलं ते शहरासाठी गाव सोडताना. अगदी निघताना मला तिची आठवण झाली. आणि सगळ्या रिती, संकेत क्षणभर बाजूला ठेऊन मी त्या पडवीत डोकावलो. अगदी थकलेली, क्षीण झालेली पार्वतीकाकू एका तरटावर पडली होती. मला पहाताच उठून बसली. मी नमस्कार केला. तेच निरागस हसू अजूनही तसच होतं पण दात मात्र नव्हते.

त्या काळच्या समाजव्यवस्थेतील एक उणीव या पलीकडे पार्वतीकाकूचं स्पष्टीकरण माझ्याकडे आजही नाही. त्या गोष्टीलाही आता बरीच वर्षे लोटली. पुढे काकू गेल्याचेही समजले. काकूच्या हसण्यातल्या त्या निरागसपणाचं गुपित अजूनही मला कळलेलं नाही. कदाचित तिच्या विश्वाच्या मर्यादितपणामुळं ते हसू तसचं टिकून राहिलं होतं. पण अजूनही दही पोहे समोर आले की ठसका लागतो आणि डोळ्याच्या कडा ओलावतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्वतीकाकूंची आठवण वाचणार्‍याच्याही मनाचा ठाव घेणारी, चटका लावणारी आहे. खरंच एखादी व्यक्ती आपल्या मनात कायमचं घर करून जाते. छान लिहिलंत !