घुंगराची लेक भाग 1

Submitted by कथकली on 9 February, 2013 - 08:42

धिं धिं धिं धिं. घिन क धा. घिन क धा. घिन क धा.... ढोलकीचा ठेका चालू होता. रेश्मा आणि मयुरी ठेक्यावर नाचत होत्या. तेवढ्यात 'आजा रे ssss तू ही रे ssss तेरे बिना मे कैसे जिऊं" रेश्माचा मोबाईल पुन्हा वाजला. नाच थांबला. ढोलकीची लय तुटली.
'एक मिनीट गं आक्का.'
अग ये रेश्मे काय चाललया काय तुजं? नाचाया उबी राहिलीस का बोलाया ग? अशानं कुटं नाच हुतूया काय्? फेकून द्ये तो मोबाईल".
"या आज कालच्या मुलींच हे असच असतया बगा मास्तर, म्हनत्यात ना, कोनाला कशाचं अन बोडकी ला केसाचं.” चंदाक्का रेश्मावर ओरडली.” आमच्या येळंला हे असं नव्हतं. पाच पाच तास बोर्डाबर नाचाया लागायचं. अक्कांनी पान जमवल. कमरेच्या चंचीतला थोडासा तंबाखू तोंडात घातला. त्यांचं मन भुतकाळात रेंगाळायला लागलं. रेश्माच्या जागी त्यांना त्या स्वतःच दिसू लागल्या. बोर्डावर बेभान नाचणारी चंदा सांगवीकर. रेशमी भरजरीच्या साड्या नेसून दागदगिने घालून पायात किलो किलोंची घुंगरं बांधून नाचणारी, अदा करणारी चंदा. आई अन आजी पण नाचणा-या. चंदा चालायला लागली ती पावलं ठेक्यातच पडायला लागली आपोआप्. बोर्डावर अशी खोटी श्रीमंती मिरवायची अन बि-हाडी अठराविश्वे दारिद्र्य. परिस्थितीने चंदाला खूप शिकवलं इतकच नव्हे तर आयुष्याच्या बोर्डावर उभं रहाण्याचं बळही दिलं. यातूनच घडत गेली चंदाबाई सांगवीकर. जितकं सोसलं, सहन केलं तितकं मिळालंही. पण ते आता. या असल्या उतारवयात. तरीही त्या बद्दल तिचं काही म्हणणं नव्हतं की तक्रार नव्हती. जेंव्हा चौदा-पंधरा वर्षाची नुकतीच पदर आलेली चंदा पहिल्यांदा आपल्या आई शेवंता बरोबर नाचायला उभी राहिली तेव्हाही आयुष्य म्हणजे हे असच असतं अशी तिची भाबडी कल्पना. पण तिच्यात जी जिद्द होती त्या जिद्दीच्या बळावर हे उभं आयुष्य तिनं एकटीनं तोलून धरलं. तिला आठवलं नहाण आल्यावर एका सकाळी आई आजीनं तिच्या कडून घुंगरांची पुजा करून घेतली. संध्याकाळी ते चाळ तिच्या पायात बांधून तिला सांगितलं होतं,
"चंदे ह्या घुंगरांशी ईमान राखशील तर काय बी कमी पडणार न्हाई.” माजा आशीर्वाद हाय तुला तिची आजी गोजरबाई म्हणाली होती. आईला नाचताना आजीच्या मांडीवर बसून इवलीशी चंदा बघायची तेव्हा आजी म्हणायची " बग तू बी अशी नाचशील. लै नाव् करशील. अगं ही कलेची सेवा करायची हेच आपल्यासारख्यांच काम असतया.” आजीच्या भावाचा तमाशाचा फड होता. गावोगाव फिरायचं, जत्रांमधुन तमाशाचे खेळ करायचे. ठिकठिकाणच्या जत्रांना हजे-या लावायच्या, त्या उत्पन्नातून एवढ्या मोठ्या कुटुंबाची गुजराण व्हायची. घरात मुलगी जन्माला आली की शकुन मानायचे समाजात. ज्या कुटुंबात मुली जास्त त्याना समाजात मान असायचा. बायकांनी नाचायचं आणि पुरूषांनी फडाची व्यवस्था बघायची. सुपा-या घ्यायच्या, एवढा मोठा कुटुंब-कबिला घेऊन सुरक्षित प्रवास करायचे असंच पिढ्यान पिढ्या चालू होतं. तिची आई आजी देखील हेच करत आल्या होत्या अन तिनंही तेच केलं होतं आयुष्यभर. तिला आठवलं सांगवीच्या जत्रेत फडाचा मुक्काम होता. त्या मुक्कामातच सांगवीकर पाटलांनी तिला मागणी घातली. पाटील तिच्या आईला म्हणाले बगा बाई. हिला देतासा तर नवीन स्वतःचा फड काढायला पैसे देतो. तिने तमाशात नाचायलाही माजी काय हरकत नाही. शेवंताबाईंनी व्यवहारी निर्णय घेतला. सांगवीकरांच ऐकून त्या आपल्या मामाच्या फडातून बाहेर पड्ल्या. पिळवणूक तरी थांबली. चंदाला, आणखी तिघी चौघींना साथीला घेउन त्यानी आपला स्वतःची पार्टी तयार केली. गावोगाव खेळ करित गेल्या. अडल्या नडल्याला सांगवीकर होतेच. या काळात कलाकार चंदा घडत गेली. जरासं आर्थिक स्थैर्य आलं ते याच काळात. चंदाबाईच्या मुलीचा, प्रेमाचा जन्मही याच काळातला. आता त्यांच्यानंतर प्रेमाच तर नाचत होती बोर्डावर. आणि तिच्या नंतर रेश्मा. चंदा आणि तारा सांगवीकर यांचा तमाशा फड आकाराला आला होता. तारा ही पण शेवंताबाईची मुलगीच होती. सख्खी नव्हे तर मानलेली. मानलेलीही नव्हे तर देवानं दिलेली. तो दिवसही अगदी लख्ख आठवतो. पार्टी निपाणीच्या मुक्कामी होती. तशी दरवर्षी ती तिथे ती येई. चांगलं उत्पन्न मिळत असे. गोजरबाई अन शेवंता बोर्डावर मुख्य नाचणा-या. सोबतीला दोन नाचे, ढोलकीवाला वस्ताद, तिघी झिलकरणी. असा पंधरा वीस जणांचा संच. गावाबाहेर मोकळ्या माळावर तात्पुरतं थेटर बांधलेलं. त्याच्या मागच्या बाजूला रहाण्यासाठी राहुटी होती. बाया माणसं तिथं झोपत. बापे खेळ संपला की थेटरात. राहुटीच्या मागच्या बाजूला पोरेसोरे खेळायची. खेळाच्या वेळा सोडल्या तर काही हौसे, गवसे यांच्याशिवाय दिवसा कोणी फिरकत नसे तिकडे. सकाळच्या वेळेला, सकाळची कसली! दुपारचीच वेळ. तमाशावाल्यांची सकाळ म्हणजे दुपारच ती. रात्री खेळ संपवून पहाटे पहाटे मंडळी झोपलेली. अकरा वाजून गेले की बि-हाडाला हळू हळू जाग येई. चहापाणी होताच ऑर्गनवाले मास्तर येत गाणी बसवायला गाण्यांची प्रॅक्टिस घ्यायला. एरवी ते पार्टी बरोबर असतं पण सकाळी पालावर सरावाला.

गोजरबाईंचा आवाज अती गोड. त्या नवीन नवीन लावण्या, गौळणी बसवायच्या. शेवंताकडून् गाऊन घ्यायच्या. मास्तर पेटी वाजवायचे. अशीच एक आठ नऊ वर्षाची मुलगी, काळीसावळी, पण धारदार नाकाची, पालाच्या कनाती आडून नेमकी या वेळेला डोकावे. कोण कुठली? असेल इथली गावरान. असच वाटायचं. बाईंनी सूर धरला की ही हळूहळू गुणगुणायची. हाकललं तरी जात नसे. रोज यायची. तालमीची वेळ झाली की कुठून तरी उगवायची. एकदा गोजरबाईंनी तिला आत बोलावलं. म्हणाल्या. “काय गं लईं आवड हाय गं तुला गान्याची? बर मग म्हण बगु गानं " मास्तराना खूण केली. सुर धरला आणि काय आश्चर्य, गोजरबाईंची गौळण त्या मुलीने सही सही म्हणायला सुरुवात केली. गोड मधाळ आवाज, नैसर्गिक सुरेल. पण कानडी हेल. आख्खा पाल स्तब्ध. गोजरबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. तिची अलाबला घेत त्या म्हणाल्या "कोण ग तू?” मग भीत भीत तिने तिची कहाणी सांगितली.
ती निपाणीचीच होती. बाप होता पण् गांजेकस. त्याला कधीच शुद्ध नसायची. आई नव्हती. बिचारी गावात भीक मागायची. अडनिडे वय येउ घातलेले. गोजरबाई म्हणाल्या,” येतीस काय ग आमच्या संगट? तुला लई झ्याक गानं शिकीवते. ही आमची चंदा नाचंल अन् तू गाशील.
पन नाव काय ग तुजं? गोजरबाईंनी विचारलं.
तिने मान खाली घातली. तिला नावच नव्हतं ठेवलं. जन्मानंतर आई गेलीच, बाप सदा न कदा नशेत बुडलेला. नावाशिवाय वाढत होती. त्या म्हणाल्या आसू दे. जशी माजी चंदा तशीच तू.
तुज नांव तारा.
लगेच हो म्हणाली. गाव सोडताना ताराला घेऊनच मंडळी पुढच्या मुक्कामी गेली. चंदा आणी तारा जणू सख्ख्या बहिणी असल्या सारख्याच झाल्या. ताराच्या कोवळ्या आवाजावर गोजरबाईंनी गाण्याचे संस्कार केले तर शेवंताबाईंनी नाचाचे. मग न भुतो न भविष्यति असे यश आले. चंदा-ताराची पार्टी म्हणून लोक चंदाची अदा बघायला येत आणि ताराची गाणी. यश मिळायला लागलं ते गोजरबाईंनी पाहिल मात्र पण त्या नंतर फार काळ राहिल्या नाहीत. शेवंताबाईंनी खरीखुरी मुलगी म्हणून ताराला सांभाळली आपल्या चंदाबरोबर.
एखादा चित्रपटातले प्रसंग डोळ्यापुढुन सरकावेत तसं सगळ चंदाक्कांच्या डोळ्यासमोरून सरकलं क्षणात. काळ किती किती बदलयाय या एवढ्याशा पोरी, प्रेमाची रेश्मा आणि ताराची मयुरी चांगल्या शिकल्या सवरल्या, ताठ मानेनं जगात वावरतात पण नाचाबद्दल प्रेम आहे दोघींच्या मनात. लोक त्यांना ते शेलीबिरटी काय म्हणतात. हे पाहून खुप आनंद होतो. त्यांचे डोळे पाणावले. त्या भानावर आल्या.
“चल ग ए बये रेश्मे झालं काय तुज वचा वचा बोलून्, तूच म्हनलीस नवं पुढच्या 'शो' त ह्ये बसाया हवं म्हनून्. मग उगा का टाइमपास कराया लागलीस आता"
सॉरी सॉरी अक्का. ओके ओके. ही बग आले.
पुन्हा तालीम सुरू झाली. धिं धिं धिं. धन क धा. धन क धा. धन क धा...

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरय... वेगळा विषय. सुरेख सुरुवात. लवकर येऊद्यात पुढले भाग. (सुरुवातीला खूप मोठ्ठा परिच्छेद झालाय. त्याचे अजून काही भाग केल्यास वाचायला "बरं" वाटेल)
(त्या नंदीनी सारखं लटकवून नको ठेवूस Happy )