राज्य एखादे बळीचे

Submitted by सुशांत खुरसाले on 8 February, 2013 - 12:14

खेळणे नव्हते कधी ,आकाश माझ्या ओंजळीचे
तारकांचे दीप जेथे , भक्त होते काजळीचे

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे !

का कधी तोडीन राणी, पाश प्रीतीचे तुझ्या मी
हाय ते तर बंध होते ,मखमलीच्या साखळीचे !

संकटांच्या दंशमाला, दैव आणी फाटकेसे
नाचुनी त्यांच्या उरावर, श्वास घेतो मोकळीचे !

लोकशाहीचीच स्वप्ने ,पाहती का देश सारे?
का कुणी आणीत नाही ,राज्य एखादे बळीचे..?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे ! >>> हा सर्वात छान वाटला.

शेवटच्या शेरात एक वेगळाच विचार मांडलाय हे विशेष वाटलं.

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे !

का कधी तोडीन राणी, पाश प्रीतीचे तुझ्या मी
हाय ते तर बंध होते ,मखमलीच्या साखळीचे !...

हे दोन शेर सर्वाधिक आवडले.

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे !
.
लोकशाहीचीच स्वप्ने ,पाहती का देश सारे?
का कुणी आणीत नाही ,राज्य एखादे बळीचे..?

चांगले शेर. Happy

(एखादे बळीचे राज्य आपोआप येणार नाही. त्यासाठी आहुतीची तयारी ठेवावी लागेल. Happy )

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे !

संकटांच्या दंशमाला, दैव आणी फाटकेसे
नाचुनी त्यांच्या उरावर, श्वास घेतो मोकळीचे !

लोकशाहीचीच स्वप्ने ,पाहती का देश सारे?
का कुणी आणीत नाही ,राज्य एखादे बळीचे..?<<<

छान शेर!

सफाईबाबत फारच चिकित्सा चाललेली दिसत आहे. Happy

एक म्हणजे मतल्यात अलामत भंगलेली आहे किंवा अलामत प्रस्थापितच झालेली नाही आहे. दुसरे म्हणजे 'दैव आणी फाटकेसे' असे करावे लागू नये (आणि चे आणी) यासाठी काही प्रयत्न करता येतीलही.

बाभळीच्या शेरात स्वल्पविरामांच्या जागा चुकलेल्या आहेत.

(निव्वळ सफाईची चर्चा निघाली म्हणून लिहीत आहे, कृ गै न)

सर्व प्रतिसाद दात्यांचे मनापासून आभार!

बेफिकीरजी, बाभळीच्या शेरात
स्पर्शुनी गेंलीस तू, की फूल होते बाभळीचे
. असे खरेतर हवे होते. पण यति सांभाळण्यासाठी '......तू की,.......' असे करावे लागले.

'आणी ' सारख्या काही तडजोडी नाइलाजाने कराव्या लागल्या. त्याबद्दल क्षमस्व.!
बाकी आमच्यासारख्या नवशिक्यांना एखादी सवलत नको का..? (क्रु. गै. न.)

बाकी आमच्यासारख्या नवशिक्यांना एखादी सवलत नको का..? >>> हो हो माझाही अगदी हाच मुद्दा आहे !!!!!!!

खुरसाले आगे बढो हम तुम्हारे साथ है ।

संकटांच्या दंशमाला, दैव आणी फाटकेसे
नाचुनी त्यांच्या उरावर, श्वास घेतो मोकळीचे !

हे विशेष आवडले. बेफिकीर यांनी म्हटल्याप्रमाणे 'आणी' आणि 'मोकळीचे' हे शब्द किंचित खटकले. पण 'दंशमाला' एवढा आवडला की खपून गेले.