चारचौघी - १२

Submitted by बेफ़िकीर on 8 February, 2013 - 03:45

तीन दिवसांच्या मनस्तापानंतर आज दहा वाजता क्रोसीन घेऊन झोपलेल्या सोहनी मॅडमना रात्री पावणे बाराला खाडकन जाग आली ती शेजारीच पडलेल्या काचेच्या तुकड्यांमुळे! अंगातले त्राण गेल्यासारख्या त्या पडून राहून काही क्षण बघतच राहिल्या फुटलेल्या खिडकीच्या काचेकडे! मिस्टर दचकून उठले आणि खिडकीपाशी गेले तर कुंपणाच्या बाहेर एक मुलगी अद्वातद्वा शिव्या देत सोहनी बाईंचा उद्धार करत होती. ती मुलगी प्यायलेली असावी असे वाटत होते. सोहनी बाई आणि त्यांचा खालच्या मजल्यावर झोपलेला मुलगाही दचकून आता आपापल्या खिडकीपाशी आले.

सोहनी बाई मिस्टरांना म्हणाल्या.

"सिमेलिया आहे ती, पोलिसांना फोन करा"

तोवर आजूबाजूच्या बंगल्यात जाग आली होती आणि हळूहळू माणसे खिडक्यांमधून आणि नंतर रस्त्यावर येऊ लागली होती. सिमेलियाच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.

"हरामखोर साले! एकटी मुलगी पाहून हाकलून देतात. होस्टेल काढतायत मोठं! मी फोटो देईन नाहीतर नाचेन तमाश्यात! संबंध काय? मला पोसताय काय आयुष्यभर? ऊठ! ऊठ ए भवाने"

त्या बंगल्यांच्या लेनमध्ये आजवर असा प्रकार झालेला नव्हता. पापभीरू आणि श्रीमंतांची वस्ती होती ती! सिमेलियाला आवरण्याचे बळ कुणाच्यात निर्माण होत नव्हते. जो जवळ येईल त्याच्यावर ती हातातला दगड उगारत होती. खूप लांबवर लावलेल्या गाडीत रफी आणि ओम हसू दाबत होते. शेवटी पब्लिकनेच गलका वाढवला. पब्लिकच्या प्रेशरसमोर हार मान्य केल्यासारखी सिमेलिया रस्त्यावरच बसून गुडघ्यात डोके खुपसून हमसून हमसून रडू लागली. आता एक तरुण मुलगी मध्यरात्री रस्त्यावर रडतीय म्हंटल्यावर स्त्री दाक्षिण्य दाखवावे, तिला हाकलावे की चूप बसावे हेच लोकांना कळेना! तोवर सोहनी बाई खाली आल्या आणि कडाडल्या.

"आत्ता पोलिस येतायत. आता तू गेलीसच गजाआड! तुला अद्दल घडायलाच हवी. या वस्तीत येऊन तू तमाशे करतेस? लाजलज्जा नाही? घरी माहीत आहे का तुझ्या तू काय काय प्रकार केलेस ते?"

सिमेलियाने रडता रडता अचानक उठून रुद्रावतार धारण करून सोहनीबाईंचीच मानगूट पकडली. त्यांना मुळासकट गदागदा हालवत त्वेषाने म्हणाली..

"मला धंदेवाली म्हणतेस? तुझं खानदान दलाल आहे"

पब्लिक आता मधे पडण्याचा विचार सोडून नुसतेच हबकून बघत होते. सोहनी बाईंचे मिस्टर आणि मुलगा मधे पडले आणि सिमेलियाला दूर करू लागले तशी सिमेलिया किंचाळली.

"अंगाला हात लावला तर विनयभंगाचा दावा ठोकेन भडव्यांनो"

उरलासुरला धीर संपला दोघांचा! हे असले प्रकार त्यांच्या बापजन्मात कधी झालेले नव्हते. एका होस्टेलची प्रमुख या प्रतिमेवर सोहनी बाईंनी आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या मुलाने व मिस्टरांनी त्या वस्तीत बरीच अब्रू कमावलेली होती. ती क्षणाक्षणाला धुळीला मिळत होती. सिमेलियाला त्या लोकांच्या पार्श्वभागात काहीही दम नसल्याचे पाहून हसूच यायला लागले होते. तिने आणखीन एक दगड उचलला आणि दिला भिरकावून एका खिडकीकडे! पण नेम चुकला आणि तो एका लँपशेडवर पडला. खळ्ळ्ळ! दिड हजाराची एक लँपशेड आपले भग्नावशेष घेऊन हिरवळीत विसावली. सोहनी बाई सहाव्या मजल्याच्या स्लॅबवर अडकलेल्या मांजराच्या पिल्लासारख्या अंग चोरून आणि डोळे विस्फारून थिजून उभ्या राहिलेल्या होत्या. हा प्रकार जेमतेम आठ दहा मिनिटे चालला. पोलिस व्हॅन आली. तीन महिला पोलिसांना सिम आवरेना! आता पब्लिकला जोर चढला. असल्या समाजकंटकांना सोडू नका वगैरे उपदेश पोलिसांना दिले जाऊ लागले. तर समर तावरे या सब इन्स्पेक्टरने पब्लिकलाच हग्या दम भरला आणि घरी जायला सांगितले. मिस्टर सोहनी आणि त्यांचा मुलगा व्हॅनमागून आपल्या गाडीतून चौकीवर गेले. सगळ्यात मागून रफी आणि ओम चौकीपाशी जाऊन चौकीपासून लांब अंतरावर थांबले.

सेजल बात्रा नावाच्या महिला अधिकार्‍याने सिमच्या खाडकन कानाखाली आवाज काढला. आता सिम रडू लागली. तेवढ्यात चौकीतला फोन घणघणला. समर तावरेने उचलला. पलीकडून कोणीतरी अभूतपूर्व घाबरलेल्या आवाजात उद्गारले.

"आग लागली साहेब आग! तीन जण मेले. एलाईटच्या मागच्या ग्राऊंडमध्ये!"

सिमेलियाला आत टाकून जिवाच्या आकांताने समर तावरेची टीम एलाईटकडे सुसाट निघाली.

=========================

गोसावी डोक्याला हात लावून बसला होता. रात्रभर जागेच राहावे लागले होते. आहुजा जळजळीत नजरेने गोसावीकडे आणि तावरेकडे पाहात होता. तावरेचा स्टाफ दोघांना वाट्टेल ते बोलत होता. गोसावी प्रत्येक प्रश्नावर 'माझ्या वकीलांना भेटा' इतकेच म्हणत होता. आरोप काय हेच समजत नव्हते. कोणीतरी म्हणाले बेकायदा पेट्रोलचा साठा! तसेच पूर्वपरवानगी न घेता ज्वलनशील पदार्थांचा जाहिरातीसाठी वापर! कोणीतरी म्हणाले खून झाले. कोणी अपघात म्हणत होते. समर तावरे युद्धात मुंडी कापली जाऊनही तलवार चालवणार्‍या मुरारबाजीसारखा थैमान घालत होता. मेले कोण होते हेच समजत नव्हते आधी बराच वेळ. पहाटे चारला समजले की कोण मेले. पाच वाजता वारिया दस्तूर चौकीवर आली तेव्हा गोसावीचा वकील तावरेला 'आरोप ठेवा नाहीतर दोघांना सोडा' म्हणत होता. वारिया दस्तूर समुद्राबाहेरच्या वाळूत चुकून पडलेल्या माश्यासारखी तडफडत होती. रफी आणि ओमलाही आत घेण्यात आले होते. सिमेलियावर प्रश्नांचा भडिमार चालला होता. गोविंद पिटला जात होता. सगळ्यांचे उत्तर एकच होते. व्यवस्थित परवानगी घेऊन आखलेल्या जाहिरात निर्मीतीच्या कार्यक्रमानंतर उरलेल्या लोकांनी बेधुंदपणे पार्टी केल्यामुळे आग लागलेली असणार, कारण तेव्हा आम्ही कोणीही तिथे नव्हतो.

बरेच कच्चे दुवे होते. सिमेलियाच्या तोंडाला दारूचा वास येत होता. त्या पार्टीत सिम किती वाजेपर्यंत समाविष्ट होती हा संशयाचा भाग होता. मृत्यूची जी वेळ अंदाजाने सांगितली जात होती तेव्हा सिमेलिया सोहनी बाईंच्या घराच्या काचा फोडण्यात गर्क होती. खून करण्यासाठी काही मोटिव्हच नव्हता. सगळे काही व्यवस्थित असताना उगाचच कोणी कुणाला का मारेल? त्यातही एक मुलगी तिघा पुरुषांना? तेही जाळून? आणि तिला काहीही झालेले नाही? असे कसे? तेवढ्यात टीप लागली. होस्टेलवर झालेल्या दुसर्‍या एका मीटिंगमध्ये एका पोलिस टीमने सिमेलियाला 'तुझा रेप झाला होता का' याची चौकशी केलेली होती हे समजले. 'रेप' हा मोटिव्ह नक्कीच होता. मेघना आणि काल पार्टीला नसलेले समीर यांचे जाबजबाब महत्वाचे ठरू शकले असते. पण मेघना जर म्हणत होती की रेप झाला होता तर ती ते इतक्या काळानंतर का म्हणत होती हा प्रश्नच होता. तिने तडक आशिषच्या बंगल्यातून तेव्हाच चौकीवर जायला हवे होते. समीरने जर मान्य केले की हो रेप झाला व मीही केला, तरी देव, आशिष आणि गोयल यांनीही तो केला हे स्टेटमेंट फक्त समीरच्या साक्षीवरच खरे ठरू शकले असते. समीरच्या साक्षीच्या तर वकिलांनी चिंधड्याच केल्या असत्या कोर्टात! मुख्य म्हणजे देव, आशिष आणि गोयल मेल्यानंतर उगाचच स्वतःवर रेपचा आळ लादून घ्यायला समीर मूर्ख नव्हताच. सोहनी मॅडमच्या घरासमोर तमाशा करण्याचे सिमेलियाला पुरेसे कारण होते कारण त्याच दिवशी सकाळी तिची होस्टेलवरून गच्छंती झालेली होती. गुन्ह्याच्या जागी जाहिरातीसाठी वापरल्या गेलेल्या साहित्याचे काही अवशेष, काही पेट्रोलचे कॅन्स, पार्टीत वापरले गेलेल्या साहित्याचे काही अवशेष असे बरेच काही मिळालेले होते. त्याशिवाय तेथे आणखीन एक गोष्ट समर तावरेला मिळाली होती. ती म्हणजे 'पै'! पै तिथे आधीच पोचलेला असला तरी पोलिसांची टीम पोचल्यानंतर त्यांच्यासमोर आल्यासारखा वावरत होता. तो आधीच तिथे आलेला होता हे समजले असते तर मागचा पुढचा विचार न करता समर तावरेने त्याला पहिला आत घेतला असता. डोळ्यासमोर कुठूनसा पै उगवल्यामुळे काही बोलताही येईना! या पै ला सगळ्या टिपा लागतात कुठून हे तावरेला समजेना! टाईम एलिमेंटचा विचार केला तर गोसावी आणि आहुजा आहुजाच्या स्विटवर किती वाजता पोचले हे हॉटेलचा मॅनेजर शपथेवर सांगत होता आणि ती वेळ आग लागण्याच्या आधीची होती. गोविंद मार खाऊन सांगत होता की तो अकरा वाजून दहा मिनिटांनी गेस्ट हाऊसच्या लँडलाईनवरून यू पी मधील आपल्या गावातील आपल्या कुटुंबाशी बोलत होता. त्या फोनचे रेकॉर्ड सकाळी अकरा वाजेपर्यंत मिळालेच असते. रफी आणि ओम म्हणत होते पावणे बाराला आम्ही गाडी सोहनी मॅडमच्या घरासमोर उभी केली. मृत्यूची वेळ सव्वा अकरा ते सव्वा बारा यातील काहीतरी असावी असे दिसत होते. प्रत्येकाचा सेल फोन तपासला तर सिमला मिस्ड कॉल अ‍ॅलर्ट्स आलेले होते आहुजा आणि गोसावीचे! याचा अर्थ गोसावी आणि आहुजा इनोसन्ट असणार हे उघड होते. तसेच मिस्ड कॉल अ‍ॅलर्ट्स रफी आणि ओमलाही आलेले होते. याचा अर्थ सिम, रफी आणि ओम या तिघांचे सेल फोन्स काही काळ एकाच वेळी बंद होते. ते का बंद होते? देव, आशिष आणि गोयल यांच्या सेलफोन्सचा आगीत पार कुटाणा झालेला होता. त्यामुळे त्यांची रेकॉर्ड्स उद्यापर्यंत मिळणारच नव्हती. वारिया दस्तूर कोणत्या इंटरेस्टने येथे उगवलेली आहे हे समर तावरे आणि सेजल बात्राच नव्हे तर खुद्द वारिया दस्तूरलाही समजेनासे झालेले होते. माणसाला 'मी इथे आत्ता का आहे' हा प्रश्न पडतो तेव्हा निघताही येत नाही आणि थांबताही येत नाही तसे वारिया दस्तूरचे झालेले होते. एलाईटचे सिक्युरिटी गार्ड्स या सार्वजनिक मैदानाकडे, इतक्या लांब फिरकलेले नव्हते आणि ती त्यांची जबाबदारीही नव्हती. तेथे काहीतरी चाललेले आहे याची कुणकुण गावकर्‍यांना कशी काय लागली नाही हा प्रश्न समर तावरेला हतबुद्ध करत होता. फोटो कसले, कोणाचे आणि का काढले ही माहिती गोसावीच्या वकीलाकडच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत होती. त्या फोटोतील एक पुरुष मॉडेलच मेलेला होता. त्या तिघांनीच तेथे पार्टीला थांबण्याचे काही प्रयोजनही नव्हते. तसेच, बाकीच्यांनी 'न थांबण्याचेही' काही प्रयोजन नव्हते. बरोब्बर पाहिजे त्याच माणसांना थांबवले गेले हे कोणाकडून आणि कसे काय झाले असेल हे समजत नव्हते. आहुजा तर म्हणत होता की तोही नाचला थोडा वेळ आणि निघताना सिम त्याच्याशी काहीही बोलली नाही. कारण त्याने जर सांगितले असते की सिम त्याच्याकडे येणार म्हणत होती तर त्याच्या अब्रूचा प्रश्न होता. पण मग तो आणि गोसावी तिला कॉल्स का करत होते याचे उत्तर दोघे असे देत होते की त्या एकांतात त्यांच्या मॉडेलने अजिबात थांबू नये हे एन्शुअर करण्यासाठी आणि पुढच्या असाईनमेन्टची चर्चा करण्यासाठी तिला इकडे बोलावण्यासाठी! हेही न पटण्यासारखे नव्हतेच! समर तावरेसमोर प्रश्नचिन्ह हे होते की आग लागली की लावली? आग लागण्यासाठी आवश्यक ते सर्व तेथे होते. पेट्रोल, एकांत, काडेपेटी, दारूचा अंमल, आगीत जळून मरण्यासाठी माणसे, आगीत जाळून मारण्यासाठी माणसे! फक्त एकच मिसिंग लिंक होती! 'मोटिव्ह'! अफाट ब्राईट करिअर समोर असताना सिमेलियाला खुनाचा मोटिव्ह काय असणार हा प्रश्न तावरेला छळत होता. रफी, ओम आणि गोविंद या नावांकडे त्याने सूज्ञपणे दुर्लक्ष केलेले होते कारण त्यांचा या तिघांच्या मरण्याशी किंवा जगण्याशी काडीचा संबंध नव्हता. गोसावी आणि आहुजाकडे मोटिव्हही नव्हता आणि ते तेथे त्यावेळी नव्हतेही! सर्व काही फिरून शेवटी सिमेलियाकडेच येत होते कारण दोन दिवसांपूर्वी मेघनाने फोडलेली बातमी, की सिमचा रेप झालेला होता. सिमची आत्ता मेडिकल करण्यात अर्थ उरलेला नव्हता. त्यातच पै ने बातमी छापली होती की सिम प्रेमासाठी आसूसलेली आहे. होस्टेलच्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेला पोलिस स्टाफ तावरेला शपथेवर सांगत होता की सिमेलिया म्हणाली होती की चार कोवळी मुले तिचा काय रेप करणार? मुळात मेघनाचे स्टेटमेन्ट हा मोटिव्ह म्हंटला तरी सिमची रेप झाला अशी काही तक्रारच नव्हती. मुख्य म्हणजे आता 'रेप झाला' हे टेक्निकली सिद्धच करता येणार नव्हते. निव्वळ मेघना आणि समीरच्या साक्षीवर ते अवलंबून ठेवणे तावरेला धोकादायक वाटत होते. एवढे करून जर रेप झाला हे सिद्ध झाले तर पब्लिकची सहानुभुती उलट सिमच्याच बाजूला वळणार होती. सिमने केले तेच उत्तम केले ही भावना निर्माण होऊन तिचे फॅन्स आणखीन पटींनी वाढून ते पोलिस स्टेशनसमोर येऊन उभे राहणार होते. एक चोवीस वर्षाची मुलगी पाच दिवसांपूर्वीचा रेप आणि चार दिवसांपूर्वी सुरू झालेला गदारोळ डोक्यातून काढून टाकून काल रात्री तिघांना जाळून मारून दहाव्या मिनिटाला सोहनी बाईंच्या घराच्या काचा फोडेल यावर कोर्टाचाही विश्वास बसला नसता. आणि या सगळ्या गोंधळात वर आणखीन पै उपटलेला होता. तो तिथे का होता, काय करणार होता हे तावरेच्या बुद्धीपलीकडचेच होते. त्यातच तावरे चमकला. आधी चमकला आणि मग हादरला. आपल्याकडून काय मिस होत होते हे त्याच्या लक्षात आले. सिमेलियाच्या सेलफोनवर डाएल्ड कॉल्समद्ये रात्री नेमक्या त्याच वेळी पै ला कसा काय फोन गेलेला होता ही गोष्टच आपण मिस केली हे तावरेच्या लक्षात आले. सिमच्या फोनमुळेच पै घटनास्थळी आलेला असणार हे तावरेच्या लक्षात आले. याचा अर्थ झालेली घटना सिमला ज्ञात असणार. सिमच्या सीरीनने दिलेल्या नियुक्ती पत्रातच तिला लीगल कव्हरेज दिले गेले असल्याने गोसावीचाच वकील सिमलाही चौकीत कव्हर करत होता. पण त्याच्या धमकावण्याला फाट्यावर मारून सेजल बात्राला बरोबर घेऊन समर तावरे दैत्यासारखा सिमेलियासमोर उभा राहिला आणि तिचाच सेलफोन तिच्याच चेहर्‍यापुढे नाचवत संतापाने म्हणाला..

"तू पै ला नेमका त्याच वेळी फोन केलास तो कशासाठी केला होतास?"

खरे तर सिमेलियाचे अवसानच गळालेले होते. पण कशीबशी ती म्हणाली.

"आजच्या अ‍ॅडचे कव्हरेज घ्यायला तो का पोचला नाही वेळेवर हे विचारायला.."

"अच्छा! ओके! मग काय म्हणाला पै?"

निमिषार्धात सिमने विचार केला. पै घटनास्थळी धावलेला असणार.

"तो म्हणाला विसरलो होतो, ताबडतोब निघतो"

"अरे वा? सगळे काम संपल्यावर तुला पै ची आठवण झाली आणि मग पै ला तुझ्या जाहिरातिची! नाही का? मग तू म्हणालीच असशील की आता सगळे संपलेले आहे तर जाण्यात अर्थ नाही, जाऊ नकोस"

"नाही. मी म्हणाले तू येत असशील तर मी पुन्हा तिथे येऊन एक फोटो देते"

"आणि हे सगळे करताना अचानक तुला सोहनीबाईंचाही राग आला आणि तू तिकडे वळलीस.. नाही का?"

खरे तर सिमेलिया रडवेली झालेली होती. तावरे पुढे म्हणाला.

"पोरी, तुझ्याएवढी माझी मुलगी आहे मुलगी! तू कपडे काढून फोटो देणार, पै ने त्याला प्रसिद्धी द्यावी म्हणून तू त्याला बोलावणार, तेही गोसावीच्या परवानगीशिवाय, गोसावीने गुप्तता बाळगूनही तू मात्र पै ला तुझ्या अधिकारात बोलावणार, तो वेळेवर येणार नाही, मग तुला सावकाश आठवणार की जाहिरातीला कव्हरेज द्यायला पै आलाच नव्हता, मग तू त्याला विचारणार की का आला नाहीस बाबा, मग तो म्हणणार मी आता निघतो, तेव्हा काम संपलेले असूनही तू ते त्याला सांगणार नाहीस, तो तिकडे जायला निघणार तेव्हाच नेमका तुझा सोहनी बाईंवरचा राग उफाळून येणार. यडी समजते काय मला?"

तावरेची गर्जना चौकीच्या भिंतींना हादरवत होती.

सिमेलिया अडकलेली होती. करिअर एन्ड होणार होते. गोसावीचा बापही तिला सोडवू शकणार नव्हता. आणि याची जाणीव सिमेलियाला झालेली होती. इतका वेळ घळघळून रडणारी सिमेलिया तावरेच्या डोळ्यात डोळे घालून भकास चेहर्‍याने शांतपणे म्हणाली...

"माझ्याएवढी तुमची मुलगी आहे? तिचा सामुहिक बलात्कार झाल्यावर आणि तिने त्यांचा सूड घेतल्यावर तिलाच जास्तीतजास्त अडकवाल का तुम्ही?"

सेजल बात्राच्या पंज्याची पाचही बोटे सिमच्या नाजूक गालांवर उमटलेली होती. पण मान हालणे याशिवाय सिमच्या तोंडातून हुंदकाही बाहेर पडलेला नव्हता. रोहन भैय्या, देव, आशिष, गोयल, गोसावी, आहुजा, तावरे या सगळ्या सगळ्यांसाठी तिच्या मनात आत्ता फक्त एकच विशेषण येत होते.

'पुरुष'!

फक्त पुरुष होते सगळे!

कुठेतरी सोहनी बाईंचे म्हणणे योग्य वाटू लागले होते. अब्रू जपायला हवी होती. कसोशीने! पण झालेला बलात्कार? त्यापासून स्वतःचा बचाव कसा करणार होतो आपण?

अतिशय हळूहळू सिमेलिया जैनच्या चेहर्‍यावरील भकास भाव लोप पावले आणि त्यांच्या जागी अवतरले एक निग्रही स्मितहास्य! त्या स्मितहास्याचा अर्थ हा होता की माझा रेप झाला आणि नपुंसक आणि भ्रष्ट कायद्याची वाट न बघता मी त्या बलात्कार्‍यांना यमसदनी धाडले. याच्यासमोर माझे करिअर, आयुष्य हे सगळेच शून्य आहे. मी उत्तम काम केलेले आहे, त्यामुळे मला कसलाही पश्चात्ताप वाटत नाही.

पश्चात्ताप तावरे आणि त्याच्या यंत्रणेलाच होणार होता. पण त्या आधी तावरे सिमसाठी आठवड्याच्या न्यायालयीन कोठडीचा तरी प्रयत्न करणारच होता.

=================================================

पंधरा दिवस!

पंधरा दिवस तसेच गेले. चौकशीचे थैमान सर्वत्र पोचले. निली, जो, प्रियंका, पै, सोहनी मॅडम, समीर, मेघना यांची खोदून खोदून चौकशी झाली. रेप झाला हे जवळपास सिद्धच झालेले होते. मोटिव्ह क्लीअर होता. गोसावी आणि आहुजा निर्दोष सुटत होते. मोठ्या मनाने आणि स्वतःच्या अधिकारात तावरेने नीलाक्षी, जो आणि प्रियंकापर्यंत कायदा पोचू दिला नव्हता. या तिघींना रेप झालेला माहीत असूनही त्यांनी पुढे होऊन तक्रार का केली नाही याचे कारण सिमच्या बदनामीची भीती आणि एकुणच बलात्कार्‍यांची वाटलेली भीती असे आहे असे आरोपपत्रात म्हंटले गेले होते.

मुलवानी होस्टेलच्या त्या खोलीत खिन्नतेने परमावधी गाठलेली होती. जया सासरी गेलेली. सिम अडकलेली. सिमसाठी तिचे भाऊबंद कणभरही मदत करायला तयार नाहीत. या तिघी आणि पै असहाय्य ठरलेले. गोसावीला आता सिममध्ये काडीचाही इंटरेस्ट नसलेला!

मात्र या खिन्नतेतही जो साठी काही सुखद क्षण वारंवार येत होते. या पंधरा दिवसांत ती एकुण चार वेळा भसीनच्या घरी जाऊन आलेली होती. भसीन तिल कमालीचा आवडू लागलेला होता. त्याची मुलेसुद्धा! आजूबाजूचे आपल्याला तेथे पाहून काय म्हणत असतील हा विचारही आता जो च्या मनाला शिवत नव्हता. ती स्वतःहून जात नव्हती. भसीनने सुचवले किंवा रिक्वेस्ट केली तर मात्र किंचित आढेवेढे घेऊन शेवटी हो म्हणत होती. जगण्याची एक वेगळीच मजा तिला आता यायला लागली होती. मनाच्या तळाशी बोचणी होती. भसीनची मिसेस जिवंत आणि तेथेच असूनही आपण भसीनबरोबर झोपतो हा विचार पोखरतही होता. पण मिळत असलेला एकांत, सहवास यांची नशा और होती. कामातुराणां न भयं न लज्जा म्हणतात तसे होऊ लागले होते. मुलांचा लळाही लागत होता. भसीन ऑफीसमध्ये प्रोफेशनल वागत होता. पण झापणे 'निल' झालेले होते. चुका माफ होत होत्या. लहानसहान सवलती न विचारताच पदरात पडत होत्या. लेटमार्क्सना अर्थ उरलेला नव्हता. कंपनीचा कन्व्हेयन्स अनेकदा दिमतीला मिळत होता. प्रियंकापेक्षा जो आणि भसीन हेच दोघे अधिक जवळ आलेले होते. भसीनच्या घरी मुले झोपल्यानंतर भसीन एखाद्या जनावरासारखा तुटून पडत नव्हता. जो चा पूर्ण आदर राखून, तिला खुलवत खुलवत त्या बिंदूपाशी नेत होता. एका परिपक्व पुरुषाचा सहवास किती हवाहवासा असतो याचे प्रत्यंतर जो ला आता वारंवार येऊ लागले होते. भसीनच्या स्पर्शात लालसा आणि घिसाडघाई नव्हती. ओल्या मातीपासून मन लावून घोटीव शिल्प तयार करावे तसा तो जो ला उत्कटबिंदूपर्यंत नेत होता. त्या संबंधांचा जर काही परिणाम ऑफीसच्या कामावर होतच असेल तर तो चांगलाच होत होता. भसीन जो ला ऑफीसमध्ये 'तू मला अ‍ॅव्हेलेबल होतेस' हे दाखवून देऊन तिची किंमत कमी करणार्‍यातील पुरुष नव्हता. ऑफीसमध्ये तर तो अतिशय हळुवारपणे तिच्याशी वागत होता. आणि जो ला त्याच्यातील नेमका हाच व्यावसायिकतेचा पण हळुवारपणाचा गुण आवडत होता. ते सिक्रेट पूर्ण सिक्रेट ठेवण्याची भसीनची वृत्ती तिला अतिशय गोड वाटत होती. आणि काल रात्री तर भसीन तिला म्हणाला होता की येत्या दोन वर्षात दोन प्रमोशन्स करून आपण आपल्यातील पोस्ट्सचे अंतर खूप कमी करूयात, जेणेकरून अनेक ठिकाणी ट्रॅव्हल करता येईल. जो हरखली होती. तिला असेही वाटत होते की ही आपल्या सहवासाची किंमत तर नसेल? पण भसीनच्या डोळ्यात काहीतरी विकत घेतल्याचे भाव नव्हते, स्वप्नेच दिसत होती. त्या स्वप्नांमध्ये तो आणि जो कोणत्यातरी लांबच्या गावातील महागड्या हॉटेलमध्ये एकत्र राहात होते. फिरत होते. मजा करत होते.

जो राहून राहून विचार करत होती की या नात्याला काही नांव असावे का? मित्रमैत्रीण म्हणावे की अजून काही? की काही गरजच नाही नावाची? आपण सुरक्षित आहोत की नाही आहोत, या नात्यात आपण वापरल्या तर जात नाही आहोत ना असे अनेक प्रश्न तिला वारंवार पडत होते. हे नाते आयुष्याच्या अंतापर्यंत चालेलच अशी तिची भाबडी अपेक्षा नव्हतीही. पण जो वर चालेल तोवर ते दोघांच्या मर्जीने चालावे असे तिला वाटत होते. तिला नाव, सुरक्षितता, पैसे यातील काहीही नको होते. तिला भसीन हवा होता. भसीनने तिच्यावर निखळ प्रेम असल्याचे मान्य करणे हवे होते. पुढे त्याची बायको वारली तर जो ला मिसेस भसीनच व्हायचे होते असे काही नाही. पण कीप नक्कीच व्हायचे नव्हते. आणि भसीन तर तिला डोक्यावर घेऊनच वावरत होता. त्यामुळे जो आधीच स्वर्गीय सुखात दिवस घालवत होती. आज तिने ठरवले होते, की आज प्रथमच आपणहून भसीनला सुचवायचे की आज आपण भेटूयात! मस्त आवरून ती ऑफीसला पोचली. साडे दहाला भसीन आला की साडे अकरा बारा वाजता तो आपल्याला आत बोलावेल हे तिला माहीत होते. पण ती तेव्हा काहीच बोलणार नव्हती. अडीचच्या सुमारास तो घरी जाऊन परत येईल तेव्हा त्याला संध्याकाळचे सुचवणार होती. कसे सुचवायचे हे शब्द ठरवलेले असले तरी ते स्वतःशीच उचारताना जो मनातच लाजत होती. निलीला किंवा कोणालाच 'हल्ली ही काही वेळा रात्री कुठे जाऊन येते' असा संशय येऊ नये आणि होस्टेलवर सारख्या परवानग्या मागाव्या लागू नयेत म्हणून जो अनेकदा ऑफीसमधून परस्परच भसीनकडे जाऊन येत होती. आजही ती तेच करणार होती.

भसीन येईपर्यंत समोरचे क्लेम्स तिने चाळले. काही कॉल्स केले. भोसले रोडलाईन्सचे दोन मोठे क्लेम्स प्रोसेस करायला घेतले. पावणे अकरा वाजले होते. अजून भसीनचा पत्ता नव्हता. अचानक अकराला तिला टेक्स्ट मेसेज आला. नाव पाहिले तर 'दीपक भसीन'! कुतुहलाने तिने घाईघाईने टेक्स्ट उघडला.

"कम टू माय प्लेस. किड्स हॅव गॉन टू नाशिक फॉर टू डेज"

जो च्या हृदयातून एक कळ वर आली. जे आपण मागणार होतो ते आपोआपच मिळाले. कदाचित, आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि जर आपण होस्टेलवर व्यवस्थित थाप मारू शकलो तर कदाचित... आजची पूर्ण रात्रही..

लगेच हो म्हणावे का? की जरा वेळाने उत्तर द्यावे? जाऊदेत एक दहा मिनिटे! त्यालाही जरा तरसूदेत की?

पण सहाव्याच मिनिटाला त्याचा पुन्हा मेसेज...

"वेटिंग फॉर यूअर अ‍ॅन्सर"

जो मनातच खुदकन हासली. दोन दिवस रजेवर राहिलो तर कामाचा बोर्‍या वाजेल. पण सांभाळून घेणाराच आपल्याला बोलावतोय म्हंटल्यावर काय? तरी जरा भाव खात तिने रिप्लाय दिला.

"शॅल प्रोसेस सम इम्पॉर्टन्ट क्लेम्स अ‍ॅन्ड रीच बाय थ्री थर्टी?"

"सॉरी. वेटिंग टिल इलेव्हन थर्टी"

भसीन किती आतुर झालेला आहे हे पाहून जो प्रचंड सुखावली. अश्या मनस्थितीतल्या माणसाला जरासेही खेळवण्यात किती मजा असते हे तिला प्रथमच समजत होते. विजयी भावनेची कारंजी मनात उडत होती. पण खूप खोल कुठेतरी... किंचित खटकत होते... त्याचे जरासे तिला गृहीत धरणे! तेच आवडतही होते की काय कोण जाणे! पण तेच किंचित खटकतही होते.

तिने विचार केला. आता आज कशाला त्याला आपण म्हणायचे की मी तुम्हाला आज विचारणारच होते की आज भेटुयात का असे? आज त्याने विषय काढलेलाच आहे तर आपली वेळ राखून ठेवू पुढच्या वेळेसाठी! भसीनला टेक्स्टवर कन्फर्मेशन देऊन आणि रजेचा अर्ज त्याच्याच टेबलवर ठेवून आणि एक दोन सहकार्‍यांना जात आहे असे सांगून जो ऑफीसमधून बाहेर पडली.

भसीनची बेल वाजवताना तिचा हात थरथरत होता. एक पूर्ण दिवस, कदाचित एक पूर्ण रात्र आणि कदाचित पुन्हा एक पूर्ण दिवस! कसे वाटेल? काय काय होईल?

भसीनने दार उघडले. तिने आत पाऊल टाकल्यावर भसीनने मागे दार लावून टाकले. उत्साहाने आकंठ भरलेल्या जो ने भसीनकडे पाहिले. आणि भसीन तिच्यावर झेपावला.

आजचा भसीन वेगळा होता. काहीतरी वसूल करत असल्यासारखा झोंबत होता. त्याचा तो आवेग जो ला प्रेमाच्या भावनेचा जणू स्फोटच वाटला. अत्यानंदाने हासत हासत जो ने स्वतःला भसीनच्या स्वाधीन केले. हा असा बाविशीच्या तरुणासारखा वागू शकतो हे तिला नवीनच होते. हेही आवडतच होते. कारण यातही तिचाच विजय होता. 'आज काय झालंय काय' एवढंच विचारून ती अबोल झाली आणि फक्त त्याला अनुभवत राहिली. ती पूर्ण दुपार जेवण सोडले तर दोघांनी बेडवरच घालवली. संध्याकाळी पाच वाजता भसीन म्हणाला..

" रात्री फार तर साडे आठपर्यंत परत ये... होस्टेलवर सांगून ठेव रिलेटिव्हकडे राहणार आहे म्हणून... प्रियंकाला पत्ता लागू देऊ नकोस... समजले का?"

स्वप्नाळू डोळ्यांनी भसीनच्या डोळ्यात बघत मंद हासत जो म्हणाली...

"हं"

स्वर्गीय सुख मिळाले होते आणि मिळणारही होते. होस्टेलवर काय थाप मारायची ते तिचे केव्हाच ठरलेले होते.

भसीनला बाय करून ती होस्टेलच्या रूमवर पोचली आणि निलीने दार उघडताच आत पाहून दारातच थबकली.

आतल्या दृष्यावर विश्वास बसत नव्हता तिचा......

नीलाक्षी म्हणाली...

"सगळं सोडून आलीय ती परत... कायमची"

आतमध्ये जया बसलेली होती.

========================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्तच... सिमेलियाच planning आवडल.... plz आता wait करायला लावु नका.... पन नीलक्शि अनि पै च काय???