प्रारब्ध (गोष्ट)

Submitted by पारिजाता on 6 February, 2013 - 04:27

पहिल्यांदा गोष्ट लिहायचा प्रयत्न करत आहे. चांगली वाटत असेल तर पुढे लिहीन. Uhoh

सम्राटनं वाड्यात प्रवेश केला जवळजवळ दीड महिन्यानी.
नेहमीच्या सवयीप्रमाणं दिवाणखाना आणि अधल्यामधल्या सगळ्या खोल्या पार करत
मागचा चौक ओलांडून न्हाणीत शिरला. तांब्याचं घंघाळ नेहमीप्रमाणेच गरम पाण्यानं
भरून तयार होतं. शेजारी तांब्या. त्यानं भसाभस डोक्यावर पाणी ओतून घ्यायला सुरुवात केली.
तोवर नुसत्याच डोळ्यांनी टिपलेले बदल आता रजिस्टर व्हायला लागले.
गोदामावरून जाताना नवीन खतांची पोती आलेली दिसली आहेत.
अक्काआत्या नेहमीप्रमाणे सैपक घरात. दोन स्वैपाकिणी असूनही तिचा हात आणि नजर फ़िरत असतेच सगळ्या गोष्टींवर. आणि अप्रतीम चव हाताला. केवळ तिला कष्ट नकोत म्हणून सम्राट तिला बोलायचा नाही.
पण अक्काआत्या ते ओळखून बहुतेकदा त्याच्या आवडीचे पदार्थ स्वत: करायचीच.
ऐकू आलं असेल की नाही माहीत नाही. आणि आपण आंघोळ झाल्याशिवाय कुणाला भेटत नाही त्यामुळं माहीत असून पण ती
काही बाहेर येऊन थांबत नाही. त्यातनं मानायला आत्या असली तरी आईवडील गेल्यावर आलेली कुणीतरी
लांबची नातेवाईक बाइ, एवढंच. नातं सांगून समजलं नव्हतं. गोरीपान, काठपदराच्या साडीचा डोक्यावरून पदर, खणाची चोळी, हातात लाल बांगड्या, कुंकवाच्या जागी फिकट गोंदलेलं अशी ती मागच्या चौकात उभी असलेली त्याला आठवली. तिनं अगदी खानदानी अदबीनं आसरा हवा आहे
हे सुचवलं होतं. पडेल ते काम करेन, सांभाळेन म्हणाली. सम्राटनं पण फार विचार केला नाही.
सई गेल्यावर शर्वरीला सांभाळायला घरात बर्‍याच मावशा ठेवता येत असल्या तरी मोठं मायेचं
घरात कुणी असावं असं त्याला पण वाटत होतं. आणि आक्काआत्या जशी या घरातून सासरी जावून पुन्हा
दुर्दैवानं माहेरी येणार्‍या बाईसारखी इथं सामावून गेली होती. आता सम्राटला ज्याच्यावर विश्वास
टाकता येईल असं ते एकच माणूस उरलं होतं सई गेल्यापासून. सई.. त्यानं पुन्हा एक मोठ्ठा तांब्या
डोक्यावर ओतून ते विचार मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला.
बरं आणि सोप्यात आज शर्वरीजवळ कुणीतरी नवीन बाई बसलेली दिसली. लांबून तिच्यात काहीतरी ओळखिचं वाटलं . शेतावर किंवा वाड्यात पुर्वी काम करणारी कुणीतरी बाई असावी.
शर्वरी कशी राहिली असेल मी नसताना? त्याला नेहमीप्रमाणे थोडा काळ टिकणारं अपराधीपण जाणवलं.
शर्वरीशी बोललं की ते जातं. आनंदी पोरगी आहे माझी. अगदी आईच्याविरुद्ध.
हे वाक्य आल्यबरोबर सम्राटनं स्वत:लाच गप्प केलं. काय चूक ना सईची तरी? ती बिचारी तिच्या
प्रारब्धाची गुलाम.
दर वेळी जगातून कुठूनही कितीही ऐश करून आलं तरी वाड्यात आलं की हे सगळे विचार
येतातच.
पंचाला डोकं पुसत सम्राट बाहेर आला. "बाबा "
शर्वरीनं सोप्यातूनच हाक मारली. ती नवी बाई तिचं डोकं विन्चरत होती. घनदाट केस पोरीचे.
नऊच वर्षांची पण किती समजूतदार. सम्राटचा चेहरा बघून ठरवायची किती लगटायचं ते.
तो खुषीत दिसला की पळत येऊन मिठी मारायची. पण चिंतेत, किंवा थकलेला किंवा रागवलेला दिसला की त्याला वेळ द्यायची. तो सोप्यात येताच अक्काआत्याने चहाचा कप पुढं केला. सम्राटनी हातात कप घेतला आणि
घोट घेणार इतक्यात त्याला त्या बाईचा चेहरा दिसला.
त्याला एक जोरदार धक्का बसला. शुद्धच हरपल्यासारखं झालं. खळ्ळ्ळ.. कप निसटला हातातून. अक्काआत्या आणि शर्वरी पहातच राहिल्या. ती मात्र एक शब्दही न बोलता घाबरून घाईनं स्वैपाकघरात निघून गेली.
**********************************************************************************************

"अक्काआत्या. ही कोण? इथे कधी आली? काय करते?" शान्तपणे एकेक शब्द उच्चारत सम्राट म्हणाला.
"ती सगुणा. " नाव तेच होतं. सम्राटचा पांढरा फटक चेहरा पाहून अक्काआत्या घाईने पुढं बोलायला लागली.
"ही आली मागच्या आठवड्यात आणि म्हणाली की काम पहिजे. म्हणाली तिची आई पूर्वी वाड्यावर काम
करायची. तुम्ही नव्हतात. आणि.. ती नीता गेल्यापासून आपल्याला पण एक बाई पाहिजे होती. तुम्हीच म्हणाला होतात बघून ठेवा"
"वाड्याव रहाते का काय" तो बोलला. पण स्वत:शीच बोलल्यासारखा.
हल्ली खरंतर सम्राट या गोष्टीत लक्ष घालत नव्हता. अक्काआत्याच पहायची सगळं. पण आता
त्याचं असं वागणं पाहून बिचारीला सुचेना. तिला एकदम वाटून गेलं सम्राट विचार करत असेल की स्वत:ही एक
दिवस दारात येऊन उभी राहीली. आता दुसरी आली तर तिला पण घेतली ठेवून. नको असं नको व्हायला.
"हो म्हन्जे तिच्याकडं आसराच नाही ना. फ़ार अवतारात होती आली तेंव्हा. मारल्यासारखा चेहरा दिसत
होता. म्हणाली रहायला मिळत असेल तर थांबते नाहीतर दुसरीकडे बघते काम मिळतंय का ते. एक
दिवसाची पण सोय नव्हती" सम्राटला गलबलून आलं. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघून अक्काआत्याला
समजेना की चुकलंय का ठीक म्हणावं आपण केलं ते. काय झालं एवढं? मग ती पुढं बोलली.
" आणि तसं मी तिला सांगितलं होतं की सम्राट बापू आले की बघू. तोवर रहा आपली."
सम्राट अजून गप्प होता. अक्काआत्या बोलत असताना तो मधेच कधीतरी सोप्यात बसून गेला होता. त्याला
दमलेलं, थकलेलं पाहिलं असलं तरी हे असं कधीच पाहिलं नव्हतं तिनी. अजून एक गोष्ट जाणवली अक्काआत्याला. इतके दिवस अपण इथं रहातोय पण सम्राटशी आपलं इतकं बोलणं कधीच
झालं नव्हतं.
अगदी आपण नवीन आलो तेंव्हाही. काही फ़ार सांगावं बोलावं लागलं नाही. आपल्याला घराण्याचे
रितीरिवाज माहीत होते. कोरड्या पडलेल्या जमिनीसारखं झालं होतं घर बाईविना. संथ, शांतपणे पाटाच्या पाण्यासारखी ती आली आणि घरानं तिची माया अधाशासारखी शोषून घेतली. तिचं मोठेपण
सगळ्यांनी मानलं. नातेवाईक, गावातले, राजकारणातले लोक ,घरगडी, शेतातले मजूर
सगळ्यांनी तिचं घरातलं स्थान बळकट केलं. तिनंही आलं गेलं, पाहूणे सगळं व्यवस्थित
करायला सुरूवात केली.
सम्राट तिच्यापेक्शा इतका लहान. अक्काआत्याला मुलगा असता तर सम्राटपेक्षा पाचेक वर्षांनीच लहान
असता तो. तरी तो तिला अगं जागं म्हणे. ती मात्र सम्राट ला रिवाजाप्रमाणे कर्ता पुरूष म्हणून अहो
सम्राट बापू म्हणे. हे बाहेरच्यांना सुरूवातीला मजेशीर वाटायचे पण मग वयाने लहान असला
तरी सम्राटच्या कर्तुत्वाचा आदर म्हणून ते "अहो बापू" आणि खरोखरीची आत्या नसली तरी तिच्या मायेची,
कर्त्या बाईपणाची जाणीव म्हणून "अगं आत्या" हे नंतर योग्य वाटायचे. ते एकमेकांशी फ़ार बोलत नसत.
" संध्याकाळी सरपंच येणारेत." स्वयपाकघरात पणी प्यायला आला की सम्राट सांगायचा.
यावर बरं एवढंच बोलायची ती. पण संध्याकाळी सगळा सरंजाम तयार असायचा.
किंवा त्याला जेवायला वाढता वाढता अक्काआत्या कानावर घालायची, " सुनिताचे सासरे येणारेत उद्या
तेरवीहून. चार दिवस रहातील म्हणालेत. "
सम्राटला कधी चहा बरोबर हे पाठवा असं सांगावं लागळं नाही. की अक्कात्याला कधी जरा जास्त
वेळ घरी थांब हे म्हणावं लागलं नाही.
त्यामुळं आज अक्काआत्या भांबावली. अपल्याला किती का माया वाटो शेवटी नातं लांबचंच. उगच अपल्याकडून
आगळीक नको.
"तुम्हाला आवडलं नसेल तर जायला सांगते तिला" ती चाचरत म्हणाली.
"नाही. नाही. तसं काहीच नाही गं अक्काआत्या. असू दे तुला चांगली वाटत असेल कामाला तर. राहू देत."
म्हणत सम्राट उठला. तोपर्यंत सगुणा दुसरा चहा घेऊन स्वयपाकघराच्या दारात उभी होती.
अक्काआत्यानी खुणावलं तरी बाहेर आली नाही. अक्काआत्याच मग जाऊन घेऊन आली ट्रे.
सम्राट उठून बाहेर दिवाणखान्यात निघाला. पोचेपर्यंत युग लोटलं असेल. ही आज इतक्या वर्षांनी इथं?
"सगुणा.. काय झालं गं हे? " त्याला जोरात ओरडून विचारावं वाटलं पण ते शोभलं नसतं.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

'अक्काआत्या' हे सोडले तर कथेतील नांवे छान आहेत. सम्राट, शर्वरी, सई वगैरे! नावांमुळे अनेकदा उगीचच कंटाळा येतो. काही कथालेखक उगाच १९७० सालची नांवे कथेत घेताना दिसतात. दिलीपराव, मंगलाबाई वगैरे!

कथा थोडी रंगवावीत असे सुचवावेसे वाटत आहे. भुईचक्र गरगर फिरावे तशी वाक्ये एकामागोमाग एक आली आहेत. वाचकाला थोडी उसंत, स्वतःच्या दृष्टिकोनातून चित्रात रंग भरण्याचा आनंद वगैरे मिळो.

उत्सुकता निर्माण करणारा शेवट आहे. (मला तर वाटले भूत वगैरे असेल की काय पुढे!)

पुढील भाग वाचायची इच्छा आहे.

धन्यवाद व चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

थँक्स आबासाहेब, बेफिकीर, रिया.
पुभाप्र म्हणजे पुढील भाग ??
बेफिकीर, तुमची सूचना अगदी बरोबर. मला वाचताना स्पिड जास्त आहे हे कळत होते. पण कसे बदलावे कळले नाही. मला सांगाल का एखादी जागा जिथे असं वाटतंय? आणि तिथे काय करता येईल?
रिया हो गं Sad मला तर वाटलं होतं की मी किती मस्त खूप चुका नीट करुन पोस्ट केलं आहे पण अजून आहेच राहिलेलं

पुभाप्र म्हणजे पुढील भागाच्या प्रतीक्षेत! रसिक वाचक प्रियांका 'पुभाप्र' असा अभिप्राय गटग, गझल, कविता, निसर्गाच्या गप्पा, युक्ती सुचवा व दु:खद घटना अश्या सर्व सदरांवर देतात.

कवी बेफिकीर हे कवी आहेत. त्यांच्या लेखक म्हणून असलेल्या येथील लौकीकावर जाऊ नयेत अशी मैत्रीपूर्ण सूचना!

कळावे

गंभीर समीक्षक

कवी बेफिकीर हे कवी आहेत. त्यांच्या लेखक म्हणून असलेल्या येथील लौकीकावर जाऊ नयेत अशी मैत्रीपूर्ण सूचना! >>> इथे माबो वर सगळे बरेचसे लोकं इतरांवर वैयक्तिक कॉमेण्ट्स का करतात नक्की? आणि बेफिंबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते, आणि अनेकांच्या मते अतिशय उत्तम, उत्कट आणि मनाचा तळ गाठणारं असं ते लिहितात! I would vouch for that!

पारिजाता, मस्तं लिहिताय, पण शक्य असेल तर भाग थोडे मोठे टाकाल का?

पारिजाता, मला आवडली कथा.
भानुप्रिया, गं स. बेफिकीरांवर टिका करणे हा जन्मजात अधिकार मानतात. Happy
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.

Happy

पहिल्यांदा गोष्ट लिहायचा प्रयत्न करत आहे. चांगली वाटत असेल तर पुढे लिहीन.
>>>>>>>>>>
लिहिण्यावरून वाटतच आहे की फर्स्ट ट्राय, पण स्टोरी मध्ये दम असेल तर कथा आवडणार वाचकांना.
लिहाल तसे लिखाणशैली आणखी चांगली होईलच मात्र कथेत नावीन्य जपा.

येऊद्या बिनधास्त, अंड्या वाचतोय. Happy

भानुप्रिया, गं स. बेफिकीरांवर टिका करणे हा जन्मजात अधिकार मानतात. स्मित
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. >>> ओकी डोकी साती!

फारच सुंदर सुरुवात. पटापटा पुढे लिहा.

आणि अक्काआत्या हे नाव मला विशेष आवडले ते बेफिकीर यांनी म्हटलेल्या मुद्द्यामुळेच. त्या नावातूनच एक जरासं जुनकट आणि पोक्त व्यक्तिमत्व उभं रहातं असं वाटलं.

खूप आभार.
भानुप्रिया मोठा भाग लिहून झाला की मगच टाकते. का गोष्ट पूर्ण करूनच टाकू? (अगदीच बेकार नाही हे समजल्यामुळे Happy )