ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण
२०१२ च्या उपक्रमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेखः http://diwali.upakram.org/node/191
ओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण
'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरता कसरती वापरायला हव्या (अर्थात शाब्दिक). शब्दखेळच नव्हे तर आवश्यकता भासल्यास (आणि ती आहेच) शब्दच्छलही योजावा.
शब्दखेळांचे अनेक प्रकार आहेत. हायकू अतिशय सुंदर असतात, लिमरीक्ससुद्धा अफलातून असतात. पण त्या पूर्णार्थाने कसरती नाहीत. शब्दखेळांचा सर्वोच्च मान शब्दकोड्यांना, अॅनाग्राम्सना आणि पॅलिण्ड्रोम्सना जावा. पॅलिण्ड्रोम्सना मराठीत 'विलोमपद' असा शब्द आहे. विलोमपदे तशी खूपच सोपी. एखादा शब्द किंवा वाक्य उलट-सुलट करुनही तसेच रहात असेल तर तो/ते विलोमपद. विलोम म्हणजे खरेतर उलट-दिशेने जाणारा. विलोम प्रमाणेच संस्कृतोद्भव पण उलट-सुलट सारखा या अर्थी जास्त सुयोग्य पण जऽरा भारदास्त असा शब्द आहे 'प्रतिलोम-अनुलोम-सम'. आपण 'विलोमपद'च वापरुया. इंग्रजीत अनेक प्रसिद्ध विलोमपदे आहेत. नेपोलियनला (शेवटी एकदाचे) पकडून एल्बा नामक बेटावर धाडल्यावर तो म्हणाला होता म्हणे: 'Able was I ere I saw Elba'. किंवा प्रशांत आणि अटलांटीक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्या संबंधीचे उद्गार घ्या: 'A man, a plan, a canal - Panama'. अनेक निरर्थक विलोमपदे सुद्धा आहेत उदा. 'Pull up if I pull up' - यातील तिन्ही भाग विलोमपदे आहेत. दोनदा आलेले 'pull up' आणि 'if I'. जर एखादे वाक्य (किंवा शब्द) उलटा करुन दूसरे वेगळे वाक्य बनवलेत, तर त्याला semordnilap म्हणतात (palindromes च्या उलट). आपण त्याला 'मलोवी' म्हणु या (संस्कृतोद्भव 'अर्धप्रतिलोम' आहेच, पण तो ही थोडा लांबलचक). उदा. 'no time to nod' चा मलोवी आहे 'do not emit on'. गम्मत म्हणजे 'sides reversed is' हे एक विलोमपद आहे. ते दोन मलोवींबरोबर वापरून मोठी विलोमपदे बनवता येतात, जसे की 'No time to nod sides reversed is do not emit on'.
लहानपणापासून त्यांच्याशी मैत्री असली तरी इतक्यात माझा विलोमपदांशी संबंध आला तो एका जपानी पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरामुळे. Yoko Ogawa च्या 'The Housekeeper and the Professor' मध्ये दोन विलोमपदांचा उल्लेख आहे: 'I prefer pi' आणि 'A nut for a jar of Tuna'. कोणीतरी विचारेपर्यंत हे लक्षातच नाही आले की मूळ पुस्तकात बहुदा जपानी विलोमपदे असणार. मग जपानी विलोमपदांची थोडी शोधाशोध झाली. आधी माहीत असलेल्या मराठी उदाहरणांची उजळणी झाली. 'रामाला भाला मारा', 'चिमा काय कामाची', 'ती होडी जाडी होती', 'तो कवी डालडा विकतो' वगैरे. शेवटच्या वाक्यात 'डालडा' ऐवजी 'जहाज' किंवा 'चहाच' वापरुन थोडी वेगळी विलोमपदे बनतात. इंटरनेटवर शोधाशोध करुनही खूप मराठी विलोमपदे काही सापडली नाहीत.
परवाच बर्कलीहून परततांना निद्रादेवीला अंतर देण्याकरता इतर खेळांबरोबर मराठी विलोमपदे बनविण्याचा खेळ आरंभला. अदिती-शिशीर, अनु आणि मी. तेंव्हा स्फुरलेली काही निरर्थक आणि काही बरी (पण सगळीच छोटी) विलोमपदे: 'पकड कप', 'डक पकड', 'डाक पकडा', 'मला सलाम', 'करता तो तारक', 'लिची नी चिली', 'ती होडी रडी होती', 'ती होळी काळी होती', 'नवरा वन', 'रुह नेहरु', 'गांधी धींगा' इ. यातील शेवटचे चालेल की नाही याची खात्री नाही - ते स्व-विरोधी आहे म्हणून नाही तर अनुस्वाराच्या स्थानामुळे. अनुस्वाराप्रमाणेच जोडाक्षरांची गत: 'सध्याचा ध्यास' किंवा 'रक्ष ते क्षर' (क्ष = क् + ष) विलोमपदे आहेत की नाहीत? अजूनच चिरफाड करायची झाली तर ह्रस्व आणि दीर्घ इकार/उकारांमधेही फारकत करता येईल. इंग्रजीत हा प्रश्न येत नाही आणि चित्रलिपी असलेल्या भाषांमधेही येणार नाही. हे किरकोळ मुद्दे बाजूला ठेवून सगळ्यांनी मिळून या यादीत भर घातली तर बहार येईल. कुठे प्रकाशित काही स्त्रोत असतील तर त्यांचीही मदत होईल. इंग्रजीइतके मराठीमधील विलोमपदे शोधण्याकरता python किंवा perl सारख्या scripting languages वापरणे मात्र अजून तितके सोपे नाही. त्याही दृष्टीने प्रयत्न झाल्यास ते अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. छंदांकरता वापरतात तेच किंवा तसेच नियम वापरून प्रत्येल घटकाकरता समान आकाराचे चिन्हांकन बनवावे लागेल. त्याबद्दल खोलात शिरल्यास तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
नवी विलोमपदे बनवतांना गरज भासल्यास नवे शब्दही निर्माण करा. नियम धाब्यावर बसवून शब्दांचे धबधबे निर्माण करा. नवे शब्द बनविण्यात कमीपणा नाही. भाषा त्याकरताच असते. पण नियम न तोडताही भाषेचे वैभव वाढवता येते. लवचिकतेबद्दल बोलायचे झाल्यास संस्कृतला हाड नाही. कालीदासाचे 'यथा बाधती बाधते' प्रसिद्ध आहे. 'शितं बाधती' या एका आगंतुकाच्या वक्तव्यातील 'बाधती' हा चुकीचा शब्दप्रयोग जास्त बोचतो अशी त्याची टिका आहे. शिकागो विद्यापिठाची इंडॉलॉजिस्ट Wendy Doniger म्हणते की संस्कृतमधील प्रत्येक शब्द स्वत:च्याच विरुद्धार्थी असतो, कोणत्यातरी देवाचे नाव असते आणि कामशास्त्रातील एक अंगस्थीती असते. तसेच जरी नसले तरी केवळ २००० धातुंपासुन जे विश्व निर्माण करता येते त्याला तोड नाही. सहाव्या शतकातील भारवीची नक्कल करुन शब्दसंभारात त्यालाही मागे टाकणारा आठव्या शतकातील माघ इतका यशस्वी ठरला की त्याच्या 'शिशुपालवध' नामक काव्यात संस्कृतमधील प्रत्येक शब्द आहे अशी वदंता आहे. दण्डिन शब्दलालित्याकरता प्रसिद्ध होता, तर कालिदास उपम्याकरता, oops, उपमांकरता. . पण असे म्हंटले जाते की शब्दांच्या कसरतीत माघ भारवीसहीत त्या दोघांनाही वरचढ होता.
जणू काही भारवीवर कुरघोडी करण्याकरताच माघाने त्याचे हे एकमेव प्रसिद्ध प्रकाशन केले. 'तावत भा भारवे: भाति यावत माघस्य नोदय:।' म्हणजे 'भारवीचे प्रकाशणे केवळ तोपर्यंत जोपर्यंत माघाचा उदय झाला नव्हता' (अर्थातच संस्कृतमध्ये आवश्यक असते त्याप्रमाणे याला दुसराही अर्थ आहे: सूर्याचे चमकणे तोपर्यंतच जोपर्यंत माघ महिना येत नाही). भारवीचे 'किराटार्जुनीय' शिवाबद्दल आहे तर माघाचे 'शिशुपालवध' कृष्णाबद्दल. कृष्णाला शिशुपालाचा वधही करायचा असतो आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञालापण हजर रहायचे असते. तो शिशुपालाला तिथेच निमंत्रित करवून सुदर्शन चक्राने त्याचा काटा काढतो, अशी ही तशी साधी गोष्ट आहे. पण ती गोष्ट सांगणे हा माघाचा मुख्य उद्देश नव्हताच मुळी. अनोख्या शब्दरचना वापरत निसर्गाच्या, प्रवासाच्या, बायकांच्या कपड्यांच्या, रात्रीच्या, पहाटेच्या, जलक्रीडेच्या वगैरे वर्णनात अनेक प्रकरणे जातात. शेवटच्या युद्धामधील गुंतागुंतीच्या सैन्यरचनेप्रमाणेच एकोणिसाव्या प्रकरणातील ओळी आहेत.
त्या प्रकरणातील एका परिच्छेदाची प्रत्येक ओळ एकेका वर्णाच्या विविध रुपांनी बनली आहे (१९.३), तर अनेक परिच्छेदांमधे दोनच वर्ण वापरले आहेत (१९.६६, १९.८४, १९.८६, १९.९४, १९.९८, १९.१०२, १९.१०४, १९.१०६, १९.१०८). कळस म्हणजे काही ठिकाणी चारी ओळी एकाच वर्णाने युक्त आहेत (१९.११४). या शब्दखेळांबरोबरच इतरही अनेक शब्दचित्रे माघाने उभी केली आहेत. उदा. मुरजबन्ध (१९.२९) आणि गोमूत्रिकाबन्ध (१९.४६). या प्रकरणात विलोमपदांचा समावेश नसता तरच नवल. काही ठिकाणी प्रत्येक ओळ एक विलोमपद आहे (१९.४४), तर काही ठिकाणी चारही ओळी मिळून एक विलोमपद (१९.८८). एका ठिकाणी तर चक्क लागोपाठचे दोन मलोवी गट मिळून एक विलोमपद बनते (१९.४०). येवढेच नाही तर एका ठिकाणी वरून खाली किंवा उजवीकडून खालून वर वाचत गेलो तरी त्याच ओळी बनतात (१९.२७). या शेवटच्या प्रकाराला सर्वतोभद्र म्हंटले आहे - सर्व बाजूंनी सुंदर. सर्वतोभद्र हा प्रकार या आधीही आढळला आहे, पण (भारवीचा प्रयोग वगळता) छोट्या प्रमाणात उदा. पहिल्या शतकात माऊंट वेसुवियसमुळे उध्वस्त झालेल्या हर्क्युलानम मधे २५ अक्षरांची अशी एक रचना दिसून येते.
लोकांनी बॅण्ड्सच्या, पुस्तकांच्या, चित्रपटांच्या नावांकरता विलोमपदे योजली आहेत (उदा. 'वाजवा रे वाजवा'). एक-दोन पूर्ण पुस्तकेच विलोमपदे आहेत. सान डिअॅगोच्या एका रस्त्यावरील एक पब्लिक आर्ट सांगीतिक विलोमपद आहे. पण गुंतागुंतीची आणि त्याच वेळी सर्वात सुंदर रचना माघाचीच. माघाच्या अनेक कसरती भारवीनेही केल्या होत्या. आधीच कोणी तसे केले असतांना पुन्हा त्याच कसरती करणे आणि त्यात जास्त कुशलतेने भर टाकणे यात माघाची बरोबरी करणे कठीण. शिशुपालवधाचा एक प्रसिद्ध टीकाकार मल्लीनाथ म्हणूनच म्हणतो: 'माघे मेघे गतम वय:।' 'माघ (म्हणजे माघाचे शिशुपालवध) आणि मेघ (म्हणजे कालिदासाचे मेघदूत) समजावून घेतांना आयुष्य गेलं'. दूसऱ्या प्रकारे याच ओळीचा अर्थ होतो: 'माघ माहिन्यात ढगात (मेघे) एक पक्षि (वय:) गेला'. (या टीकाकारावरूनच मराठीतील मल्लीनाथी हा शब्दप्रयोग उद्भवला आहे. त्याच्या स्वत:च्या रचना फार थोड्या आहेत, टीका मात्र अप्रतीम आहेत).
तर अशा लवचीक भाषेचा वारसा असताना मराठीला काय फिकीर? लेखणी बाणापेक्षा श्रेष्ठ आहे. वाट कशाची पाहताय? उचला लेखणी, लावा जिभेला. सुटू द्या मदनाचा; आय मीन, मराठीचा बाण. रती, लागला तीर. अमराठी लोकांना रावण बनवलेत तर मात्र तुमच्यासारखे अनुत्क्रांत तुम्हीच. नव रावन. रन वानर. जर तुम्ही पुढील तत्त्व अंगीकाराल तर मराठीचा बाण सुसाटत राहील: मराठीमध्ये ओता ओध्येमठी राम.
------------------------
तळटीपा:
मल्लिनाथाची शिशुपालवधावरील टिका (सर्ग १९): https://sites.google.com/site/moxabov/home/books
इंग्रजी विकीपिडीयामधील काही पाने:
Palindromes: http://en.wikipedia.org/wiki/Palindrome
शिशुपालवध: http://en.wikipedia.org/wiki/Shishupala_Vadha
माघ: http://en.wikipedia.org/wiki/Magha_(poet)
भारवी: http://en.wikipedia.org/wiki/Bharavi
मल्लिनाथ: http://en.wikipedia.org/wiki/Mallin%C4%81tha
कालिदासाचे मेघदूत: http://en.wikipedia.org/wiki/Meghad%C5%ABta
दण्डिनचे काव्यादर्श: http://en.wikipedia.org/wiki/Kavyadarsha
इथे जास्त पॅलिण्ड्रॉम्स हवेत: http://en.wiktionary.org/wiki/Appendix:Palindromic_phrases#Marathi
शिशुपालवधाच्या सर्ग १९ मधील विलोमपदे:
१९.४०:
नानाजाववजानाना सा जनौघघनौजसा ।
परानिहाऽहानिराप तान्वियाततयाऽन्विता ।।
१९.४४:
वारणागगभीरा सा साराऽभीगगणारवा ।
कारितारिवधा सेना नासेधा वरितारिका ।।
१९.८८:
तं श्रिया घनयाऽनस्तरुचा सारतया तया ।
यातया तरसा चारुस्तनयाऽनघया श्रितम् ।।
१९.२७:
स का र ना ना र का स
का य सा द द सा य का ।
र सा ह वा वा ह सा र
ना द वा द द वा द ना ।।
वाहवा !
वाहवा !
मला मराठीतला एकंच सर्वतोभद्र
मला मराठीतला एकंच सर्वतोभद्र (शब्दांचा, वाक्याचा नव्हे) आठवतोय :
गु रु जि
रु मा ल
जि ल बी
बाकी, 'तो कवि ... विकतो' या विलोमपदी वाक्याच्या मध्यास वापरता येणारे शब्द : मलम, रुपेरी पेरु
सध्यातरी एव्हढंच आठवतंय!
-गा.पै.
वा ह वा !
वा ह वा !
नाही म्हणायला एक गुजराती
नाही म्हणायला एक गुजराती विलोमवाक्य आठवलं :
લીમડી ગામે ગાડી મલી
लीमडी गामे गाडी मली
अर्थ : लीमडी गावात गाडी मिळाली.
-गा.पै.
गामा रुपेरी पेरु मागा....
गामा रुपेरी पेरु मागा....:)
रमा हाच कडक चहा मार! जाम मजा!
रमा हाच कडक चहा मार!
जाम मजा!
धन्यवाद हर्पेन! गामाचा विलोम
धन्यवाद हर्पेन! गामाचा विलोम दाखवल्याबद्दल!
aschig यांचेही शतश: आभार.
-गा.पै.
मस्त.
मस्त.
ती सिता रबर तासिती
ती सिता रबर तासिती
सर्वतोभद्र, विलोमपदे हे
सर्वतोभद्र, विलोमपदे हे शब्दसुध्दा किती दिवसांनी ऐकले. धन्यवाद aschig!
विलोमपदे बनवण मेरे बस की बात
विलोमपदे बनवण मेरे बस की बात नही .. पण हा लेख वाचून फारच मजा आली
माझं फेवरेटः "भाऊ तळ्यात उभा
माझं फेवरेटः "भाऊ तळ्यात उभा " यावरून लहानपणी आमच्या भावाला फार पिडायचो आम्ही
शूम्पी +१
शूम्पी +१
सुन्दर उजळणी. धन्यवाद.
सुन्दर उजळणी. धन्यवाद.
तो खा खा खातो
तो खा खा खातो
भारी!! सगळीचे विलोमपदे मस्त
भारी!!
सगळीचे विलोमपदे मस्त
तो खा खा खातो>>>
तो खा खा खातो>>>
चिमा काय कामाची!
चिमा काय कामाची!
सुंदर लेख. वेळेअभावी अजुन
सुंदर लेख. वेळेअभावी अजुन पुर्ण वाचला नाही, तळटीपाही पाहिल्या नाहीत पण परत परत वाचण्यासारखा लेख आहे हे नक्कीच.
धन्यवाद, लोकहो.
धन्यवाद, लोकहो.
मस्त आहे हे
मस्त आहे हे
सही. आवडला लेख.
सही. आवडला लेख.
लेख आवडला.
लेख आवडला.
नविन वाचकांसाठी वर काढत आहे
नविन वाचकांसाठी वर काढत आहे
सही. सांगीतिक विलोमपदे!!!
सही.
सांगीतिक विलोमपदे!!! भारी कन्सेप्ट वाटतोय. शोधतो आणखी.
हर्पेन तुला वर काढल्याबद्दल धन्यवाद.