खेड्याकडे चला असा मंत्र महात्मा गांधीजींनी दिला. त्यामागची कारणमीमांसा माहीत नाही. स्वयंपूर्ण खेडी हे महात्माजींचं स्वप्न होतं. भारतास कृषीप्रधान देश म्हटलं जातं. साधारण वीसेक वर्षांपूर्वी ८० टक्के जनता कृषीवर आधारीत ग्रामीण भागात रहात असे. आज यातल्या मोठ्या भागाचे एकतर नागरीकरण झाले आहेकिंवा नवी पिढी शहराकडे धाव घेत आहे. ग्रामसंस्कृती म्हणून जे काही आहे त्यात काही चांगल्या गोष्टी नक्कीच असतील. पण अशा काही गोष्टी आहेत कि ज्यामुळे एकतर खेड्याचे गावपण नष्ट व्हायला हवे किंवा खेडीच हळू हळू कालौघात नष्ट व्हायला हवी असं वाटतंय. गाव करील ते साव करील का या म्हणीचा काय अर्थ असेल ते असो, आज या म्हणीचा प्रत्यय सर्वशक्तीमान सरकारे गावकीपुढे झुकताना दिसताहेत.
उत्तर भारतात खाप पंचायतींचे आदेश, ऑनर किलिंग आणि अनेक अतर्क्य व कायद्याला आव्हान देणा-या घटना घडूनही कुणाला अटक होत नाही. जातीवर आधारीत घट्ट व्यवशा ही शहरापेक्षा गावात जास्त ठळक आहे. आणि शहरातला चतुर्थ श्रेणीचा कर्मचारीही गावाकडे गेल्यावर आपला जातीय अभिमान कुरवाळताना दिसून येतो. यातून काय घडतंय हे आपण पाहतोच आहोत.
याशिवाय स्थानिक राजकारणातून निर्माण होनारी सत्ताधीश घराणी ही त्या त्या भागातली संस्थानिक बनताना दिसतात. त्यांना कायद्याचं भय नाही. ग्रामीण जनतेत ना अवेअरनेस दिसून येतो, ना तिथे कुठली यंत्रणा सक्षम असल्याचं दिसतं. कधी कधी शासन उदासीन असतं तर कधी ग्रामीण नेतृत्व यंत्रणा येऊ देण्यास उदासीन असतं. सामना या सिनेमात असा एक संस्थानिक अचूक उभा केला गेलाय. या संस्थानिकांनी आधी स्वतःच्या तुंबड्या भरल्यात, मग कार्यकर्त्यांच्या, मग जातीच्या.
शिक्षणाचं प्रमाण हल्ली बरं आहे. त्याचबरोबर गळतीचं प्रमाणही मोठं आहे. मध्यंतरी बोगस शाळांच्या प्रकरणातून ग्रामीण भागातलं वास्तव समोर आलय. याशिवाय काही भागात कुपोषण, काही भागात आत्महत्या अशा समस्या ग्रामीण भागातच दिसून येतात. ग्रामीण जनतेला आपल्या न्याय्य हक्कांसाठी स्थानिक संस्थानिकांना जाब विचारण्याची सोय ग्रामसंस्कृतीत नाही.
देशाची प्रगती व्हायची असेल तर अनेक कुप्रथा बंद व्हाव्या लागतील ज्यासाठी गावकी मजबूत करण्याऐवजी नागरीकरणावरच भर दिला गेला पाहीजे असं वाटू लागलंय.
ही मतं वैयक्तिक आहेत. ती वेडगळ असू शकतील, संपूर्ण चुकीची असू शकतील किंवा अंशतः बरोबर असतील. जाणत्या लोकांकडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेत. जे काही म्हणायचं होतं ते म्हणून झाल्याने वाचनमात्र राहण्याची परवानगी असावी.
(No subject)
अत्यंत मुर्ख लेख
अत्यंत मुर्ख लेख
लेख आवडला.
लेख आवडला.
फारच वेगळा मुद्दा ! पण हे असे
फारच वेगळा मुद्दा ! पण हे असे घडणार कसे ? कारण तुम्ही म्हणता तसा खेडे किंवा गाव यामधे शहरीकरण करायचे म्हणजे काय याची व्याख्या कशी ठरविणार ? आधुनिक सुखसोयी म्हणाल तर अनेक ठिकाणी त्या आलेल्या आहेत.
बरे हा बदल करायचा तर कोणी करायचा ? कारण जे या सर्वाचा घटक आहेत त्यांची मानसिकताच नाहीये बदलायची किंवा असलीच तर तुम्ही वर जे अनेक मुद्दे लिहिले आहेत तशा प्रकारचे बदल फक्त होत आहेत.
समाजात कुठेही कोणतीही गोष्ट बदलली जावी असे वाटत असेल तर तिथे प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलली गेली तरच ते घडेल अन्यथा अजिबात नाही.
एकांगी वाटला
एकांगी वाटला लेख.
चांगल्या-वाइट गोष्टी दोन्हीकडे पाहायला मिळतात.
ग्रामसंस्कृतीची गरज आहे का
ग्रामसंस्कृतीची गरज आहे का ?
येणारा काळ या प्रश्नाचे उत्तर देईलच. थोडे दिवस थांबा. संपूर्ण महाराष्ट्रात जमिनी विकण्याचा धंदा चालू आहे. शेतीतून जी काही संस्कृती उभी राहिली होती, ती मोठ्या शहरांच्या आसपास औषधालाही शिल्लक नाही.
मला मूळात 'शहरी सस्कृती' अन
मला मूळात 'शहरी सस्कृती' अन ग्रामसंस्कृती यातील फरक समजावून सान्गा बघू!
की आपल अस आहे? कामाच्या गरजेपोटी अन सोईपोटी गुढग्यापर्यन्त खेचून घेऊन काष्टा खोचुन साडी नेसली (/अथवा धोरत नेसले), चिखलाधुरळ्यात काम केले, तर ती कामाच्या गरजेपोटी असल्याने ती 'ग्रामसंस्कृती, अन तीच काष्ट्याची साडी/धोतर गुडघ्यापर्यन्त कचकचून नेसून 'ट्रेडीशनल डे' ला प्रेक्षकांकडे पाठमोरे होऊन ढुंगण हलवत स्टेजवर नाचले की होते का शहरी संस्कृती?
नै, मला आपल नेमक काय ते समजावूनच सान्गा बर!
अजूनतरी आमच्याकडे पोरी
अजूनतरी आमच्याकडे पोरी बॉयफ्रेंड पाळून नाहीत.. या संस्कृतीची गरज आहे किंवा नाही तुम्हीच ठरवा..
शिर्षक अगदीच मोघम वाटले.!!
लिंबु / शाम त्यांना गावात
लिंबु / शाम त्यांना गावात असलेल्या जातीपातीच्या पगड्याबद्दल म्हणायचय बहुतेक.
अजूनतरी आमच्याकडे पोरी
अजूनतरी आमच्याकडे पोरी बॉयफ्रेंड पाळून नाहीत.. >> बॉयफ्रेंड पाळतात? कुठे बरे?? मग त्या बॉयफ्रेंडची जी गर्लफ्रेंड असते तिला काय म्हणतात?
अगदीच राहवलं नाही. अजिबातच
अगदीच राहवलं नाही. अजिबातच समजून न घेता प्रतिक्रिया देणे ही मायबोलीची खासियत होत चालली आहे का ?
अजूनतरी आमच्याकडे पोरी बॉयफ्रेंड पाळून नाहीत.. >>> अच्छा , म्हणजे ऑनर किलिंग उगाचच होतात तर ! या संस्कृतीची गरज आहे किंवा नाही तुम्हीच ठरवा.. >> आता इतके ज्ञानकण वाटल्यावर कुणी ठरवायचं हे ?
गझल / कविता आणि चर्चा यात थोडा तरी फरक असतो का ? शीर्षक मोघम वाटतंय ही कसली कमेण्ट ? लेखात काही दोष असतील ते दाखवले असते आणि काही दिशा दिली असती तर जास्त चांगलं झालं असतं.
शिर्षक अगदीच मोघम वाटले.!! >>
लिंबूटिंबू - किमान एकदा सर्व शब्द वाचले असावेत असं समजून चाललो तरी हा प्रश्न तुम्हाला का पडावा हे समजलेलं नाही. तुम्हाला काही मत द्यायचे असेल तर खरंच द्या, किमान लेख मूर्खपणाचा आहे असं म्हटलं तरी स्वागत करता येईल. पण वाचलाय कि नाही इतपत शंका येईल अशा प्रतिक्रिया देऊन आपला आणि इतरांचा वेळ का वाया घालवावा ?
धन्यवाद.
असो.... एक मत म्हणून तुमची
असो....
एक मत म्हणून तुमची या संदर्भातील विचार मांडणी योग्य आणि घटनेने प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येतीलच आहे असे मी म्हटलेच पाहिजे. तथापि त्या विचारांशी मी इथे काहीशी असहमती दर्शविली तर तो भागही मतस्वातंत्र्यापैकीच एक आहे असे तुम्ही मानावे.
सुरुवातीलाच हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की 'ग्रामसंस्कृती राहण्याची नीतांत आवश्यकता आहे....'. शहर आणि ग्रामीण भाग हा काही आशिया खंडातच सापडणारा जीवनशैलीचा भाग नसून सार्या जगभर ही दुहेरी [जी एकेरीच असते] संस्कृती आपापल्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदताना दिसत आहेच. शहरीकरणाचे दुष्परिणाम हे केवळ आर्थिक बाबीमुळे फोफावत नसून आपली शहरे म्हणजे पाश्चिमात्य देशातील अक्राळविक्राळ वाढणार्या शहरांचे प्रोटोटाईप होऊ घातलेले आहेत. तसे पाहिले तर....आपल्या महाराष्ट्रापुरताच विचार करायचा झाल्यास....आज सरकारी श्वेतपत्रिकेनुसार ४२ टक्क्यांहून जास्त लोकसंख्या 'शहरी' बनलीच आहे....(गुजराथमध्ये हाच आकडा ६७% झाला आहे). २०२५ पर्यंत हे प्रमाण ७० ट्क्क्याच्यापुढेही जाईल यात शंका नाही. ग्रामीण ग्रामीण म्हणतो तो भाग तरी आज शहरीकरणापासून किती दूर आहे ? महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात रस्त्यांची जाळे झाली आहेत, रेल्वेने जोडू जाऊ लागली आहेत, दुचाकी तर राहू देत पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामाणे भागात तर चार चाकी वाहनेही गर्दीतून रस्ते काढताना दिसतील. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळाबरोबरीनेच ब्यूटी पार्लर्स उघडली जात आहेत... वीज टेलिव्हिजन यानी आघाडी घेतली आहेच, शिवाय नळाचे पाणी आणि गॅस, शिवाय फ्रीझसारख्या वस्तूही दिमाखाने कार्यरत असल्याचे दिसून येईल....म्हणजेच कागदोपत्री जरी हा गावे 'ग्रामीण' नावाची झालर लावत असली तरी त्यांचे हळूहळू पण निश्चित असे शहरीकरण होत चालले आहेच.
आमच्याकडील खेड्यांतील मुलींचे ड्रेस तुम्ही कधी पाहिले तर तुम्हाला वाटेल की आपण कुठे पंजाबात आलोय की काय ! झाडून सार्या मुली...ज्या कॉलेज शिक्षण घेतात...आणि अशांची संख्याही लक्षणीय आहे....सलवार-कुडता-खमीस हाच पेहराव वापरतात....शालेय ड्रेस कोडही तसाच झाला आहे... दुपट्टा खांद्यावर लपेटून घेऊन जाणारी आता कुणी बायजाबाई नसून बॉबी झाल्याचे दिसते जी टू व्हीलरही दिमाखात गावातून चालविताना दिसत्ये.... ग्रामीण भागातील पुरुष मंडळींनाही यात काही वावगे वाटत असल्याचे दिसत नाहे... आणि ते योग्यही आहे.
सांगायचा मुद्दा असा की, ह्या क्रांतीला कारणीभूत काय असेल तर आपल्या ग्रामीण भागात 'लोकशाही व्यवस्थेतून दारोदारी झिरपलेल्या सहकार चळवळीचा घोष आणि त्याच्या यशस्वीततेमधून मध्यस्थाला न घेता घरी आलेली पैशाची गंगा... जी खर्या अर्थाने कष्टाचीच आहे. तुम्ही लेखात लिहिलेले "....स्थानिक राजकारणातून निर्माण होनारी सत्ताधीश घराणी ही त्या त्या भागातली संस्थानिक बनताना दिसतात....." हे काही प्रमाणात सत्य असले तरी आज सर्वसामान्य घरात जन्माला आलेला एखादा आनंदा वा बजरंगा या संस्थानिकाच्या धमक्यांना आता भीक घालत नाहीत...[हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे....] हे संस्थानिकही आपला दम कुठपर्यंत चालू शकतो हे ओळखत असल्याने पुढच्या पाच वर्षासाठी जर आपल्याला मुंबईचे तिकिट पाहिजे असल्यास ग्रामीण भागातील मतदाराला.. जो आता खरंच सुशिक्षित झाल्य आहे...कसे सांभाळून घ्यायचे हे बरोबर ओळखत असल्याने उत्तर भारतात दिसून येत असलेल्या खाप पंचायतीसम कारभार आपल्या ग्रामीण भागात कधीच तग धरणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.
शिक्षणाच्याबाबतीत आपण जी आघाडी घेतली आहे ती आजुबाजूच्या कित्येक राज्यांनी आदर्शवत मानली आहे. गळतीचे प्रमाण आहे ? जरूर आहे, पण याचा अर्थ तो काळजी करण्यासारखा नाही. रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, वाढतही आहेत, त्यामुळे मधूनच शिक्षण सोडले जाते हे जितके खरे, तितके हेही खरे की जि.प. आणि उच्च शिक्षण विभाग असल्या गळती थांबविण्यासाठी सरकारी पातळीवर जे प्रयोग करीत आहेत ते नि:संशय अभिनंदनीय आहेत. बिलिव्ह मी.
देशाची प्रगती केवळ शहरामध्ये शंभर-शंभर मजली इमारती उभ्या राहिल्या, मॉल्सच्या रांगाच्या रांगा ठाकल्या....मल्टीप्लेक्स नाक्यानाक्यावर आले... बिग बझार शेजारीशेजारी धंदा करू लागले... दिसेल तिथे मॅकडोनाल्ड्स सेन्टर्स दिसू लागली....म्हणजेच झाली असे मानण्यात अर्थ नाही. तुलनेसाठी ग्रामीण भाग नजरेसमोर सदोदित राहिलाच पाहिजे....जिथे अशा मोठ्याला अॅडव्हेन्चर्सची गरज नसून गरज आहे ती शेती आणि सहकार विषयी होऊ घातलेल्या क्रांतीची.... अन् ते होईल ते लोकशाहीच्या माध्यमातूनच..... ती ताकद आपल्या मतात आहे हे शहरी मतदारापेक्षा ग्रामीण मतदाराने अचूक ओळखले आहे. शहरी मतदार मतदान करणे हे आपले कधीच 'कर्तव्य' आहे असे मानत नाही....तो जरूर मतदान करीत असेल, पण दाबले बटन आणि संपले आपले कार्य अशी त्याची भावना असते. त्याच्याविरुद्ध ग्रामीण मतदार झाला आहे. तो मतदान करेलच पण त्याला अपेक्षित असे निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून गावात कार्य होत नसल्याचे दिसत असल्यास संघटितरित्या तो त्या प्रतिनिधीला जाब विचारताना तुम्हाआम्हाला दिसेल. कारण त्याला 'मतदान' या अस्त्राची ताकद समजली आहे आणि त्याच जोरावर ते राज्याच्या शक्तीमान मंत्रीमंडळाला आपल्या धाकात ठेवू शकत असल्याने "ग्रामसंस्कृती" टिकून राहिलीच पाहिजे.
अशोक पाटील
@ असो, वर धागा लिहून तुम्ही
@ असो,
वर धागा लिहून तुम्ही वाचनमात्र रहाण्याचे जाहीर केले होते म्हणून मौन प्रतिसाद दिला होता. (मनातच ठेवला होता. चर्चाप्रस्तावकाशी चर्चा करता येत नसेल तर त्या चर्चेस अर्थ नाही.) यापुढे तुम्ही चर्चेत सहभागी व्हाल असे समजून पुढे लिहितो आहे. थोडे विस्कळीत विचार आहेत, पण मुद्दाम सगळे एकत्र टंकतो आहे जेणेकरून चर्चा पुढे सरकावी.
***
तुम्ही विषय चांगला काढला आहात. परंतू ग्रामसंस्कृती म्हणजे नक्की काय, अन शहरीकरण म्हणजे नक्की काय याबद्दल तुमच्या मनात गोंधळ आहे असे दिसते.
ग्रामीण वि. शहरी असे जे चित्र तुमच्या मनात आहे, त्यात फक्त ग्रामीण भागांतील निगेटिव्ह गोष्टींचाच भाग तुम्ही धरुन लिहिले आहेत. गावगाड्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसल्याच नाहीत असे म्हणावे लागेल. अगदी खाप पंचायत म्हटले तरी यांनी घेतलेले चांगले निर्णयही असतातच की. संपूर्ण जातीत कुणीही २० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च लग्नात करू नये असा फतवा काढणार्या जात पंचायती देखिल आहेतच. किंवा गावाभोवती कुर्हाडबंदी, चराईबंदी करून संपूर्ण गावाचे जीवनमान उंचावणारी गावेही आहेत.
शहरी लाईफस्टाईल व या देशाची प्रचण्ड लोकसंख्या 'सस्टेन' होण्यासाठी ग्रामीण जीवन गरजेचे आहेच.
मोठी शहरे निर्माण झाली, किंबहुना 'लोकनियुक्त सरकारे' निर्माण केली, हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट एका परिने झाला, असे एक निरिक्षण मध्यंतरी वाचनात आले होते.
या 'सरकार' नामक प्रकरणामुळे 'गावगाडा' किंवा 'गाव करील' ते करायचे विसरून काहीही सामाजिक गरज उद्भवली, की त्यावर लोकली मार्ग काढावयाचे सोडून हे काम सरकारने करायला हवे ही मनोवृत्ती निर्माण झाली.
जसे: देवराया. जंगलतोड. वॉटर म्यानेजमेंट. हे पूर्वी गावपातळीवर म्यानेज होई.
उदा. वाढवायचे तर पाणी. यात पूर्वी उपलब्ध असलेल्या नदीतून पाटाचे पाणी काढून ते शेतीस वापरणे, याची अत्यंत एफिशियंट अन पर्फेक्ट वाटप होणारी गावपातळीवरील यंत्रणा उभी होती. एकही पंप न वापरता. वेगवेगळ्या भागांत वेगळ्या सिस्टीम्स होत्या, पण त्या सगळ्या वर्किंग होत्या. 'सरकार' प्रकरण आल्यानंतर पाण्याची पळवापळवी अन मारामार्या सुरू झाल्या. कालवे फोडणे, शहराकडे जाणार्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फोडून शेतीला पाणी चोरणे इ. सुरू झाले. कारण काय? तर 'आपले' पाणी 'आपण' वाटून घेऊ ही कन्सेप्ट बदलून 'सरकारी' पाणी, मग घे हिस्कवून ही मानसिकता रुजू लागली. मग लोकांनी गावपातळीवर तगवून धरलेले पर्यावरण मोडकळीस येऊ लागले, मग आहे तिथे जगणे मुश्किल झाले अन शहराकडे स्थलांतरे सुरू झालीत.
शहरी किंवा 'सरकार' बेस्ड 'ऑपरेटिंग सिस्टीम' तयार झाल्यानंतर तिचे इम्प्लिमेंटेशन देखिल प्रगत राष्ट्रांच्या धर्तीवर होणे अपेक्षित आहे. आपल्याकडे हे नीट होत नाही. समाजातला एक मोठा समूह सगळ्या पॉलिसीज बड्या शेतकर्यांसाठी राबवा म्हणतो. दुसरा समूह उद्योगांना सुविधा द्या म्हणतो. उरलेले तिसरेच काही 'मागतात' व काहीच नीट पॉलिसी राबविली/निर्मिली जात नाही.
गावपातळीवर याच गोष्टी तुलनेने सहज सोडविल्या जाऊ शकतात, कारण वेगवेगळ्या व्यक्तींचे वा कुटुंबांचे हितसंबंध जरी वेगळे असलेत, तरी छोटा आवाका असल्याने सहमती तयार करणे, कॉमन इंटरेस्ट्स ओळखणे/पटवून देणे हे सोपे जाते.
ज्या काही सुधारणा व्हायला हव्यात, त्या मी / आम्ही /आपण करायला हव्या, ही इच्छा अन त्याचे इम्प्लिमेंटेशन हे 'सेल्फ कण्टेण्ड' खेड्याचे मूळ व्यवच्छेदक लक्षण होते. आज 'सरकार'ने अमके करावे, 'सरकार'ने तमके करावे असा प्रकार सर्वत्र सुरू आहे. व याचे मूळ अन्प्लॅन्ड नागरिकरणात आहे असे मला वाटते.
मी सहसा महेश यांच्याशी सहमत नसतो, पण वर त्यांनी जे म्हटले आहे, ->
)
>>
"समाजात कुठेही कोणतीही गोष्ट बदलली जावी असे वाटत असेल तर तिथे प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलली गेली तरच ते घडेल अन्यथा अजिबात नाही."
<<
याच्याशी पूर्ण सहमत आहे. (ती मानसिकता बदलून कोणत्या दिशेला न्यावी याबाबत मात्र महेश यांचेशी तीव्र असहमती होईल
या वाक्याचा संदर्भ हा, की गावगाड्यातली पॉझिटिव्हिटी ही आपल्या देशाची मोठी स्ट्रेंग्थ ठरू शकते. व्यक्तींच्या, व समाजाच्या मानसिकतेचा, 'सोशल कॅरेक्टर'चा सकारात्म बदल ही मात्र गरज आहे. हे सामाजिक चारित्र्य उंचावले जाईल अशा बदलांची आपल्या देशाला गरज आहे.
***
पुन्हा एकदा,
चर्चा पुढे नेण्यासाठी चर्चाप्रस्तावकाने सहभाग देणे आवश्यक आहे. म्हणजे मग 'आजकाल मायबोलीवर अशी पद्धत पडते आहे काय'? असे म्हणावे लागणार नाही, असे सुचवितो.
शेवटी त्या शहराला भाजीपाला,
शेवटी त्या शहराला भाजीपाला, आणि गहूतांदूळ पुरवतोय तो 'ग्रामसंस्कृतीतच' रहातोय.
मॉल बांधून, आणि Tower मधे राहून गहू/तांदूळ पिकत नाही.
शहरी मंडळी आता टँकरचे पाणी पिताहेत.
अजून काही वर्षानी ऑक्सिजनचा शिलेंडर घेऊन फिरतील. आणि मग काही वर्षांनी सरकार वर्षातून किती ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला मिळतील , तेवढाच श्वास घ्यावा हे ठरवेल.
जागे होऊ तेव्हा १००% लोक शहरात हातावर हात धरून 'कुणी पाणी देता का हो, कुणी ऑक्सिजन देता का हो?' असं विचारत बसलेले असतील.
@ असो, माझा प्रतिसाद फक्त
@ असो, माझा प्रतिसाद फक्त शिर्षकाबद्दल होता. मी, लेख पहिल्या काही ओळी वाचून सोडला.
ग्रामसंस्कृतीची गरज आहे का ?>> या शिर्षकात तुम्ही सगळ्या ग्रामिण संस्कृतीवरच प्रश्न उपस्थित करत आहात असे स्पष्ट होते आहे. ज्याला मीआक्षेप घेतला. कुठल्याही संस्कृतीची गरज असण्याचा प्रश्न येतच नाही प्रश्न असतो ती जोपासण्याचा वा न जोपासण्याचा आणि हे व्यक्तिसापेक्ष आहे.
अशा ग्रामसंस्कृतीची गरज आहे का ?
असे जरी शिर्षक असते तरी ठिक झाले असते असे वाटते.
बाकी चर्चा तुम्हाला लखलाभ!
धन्यवाद!
असो, खेडे आणि शहरे अशी
असो, खेडे आणि शहरे अशी डायकॉटॉमिच फक्त अस्तित्वात आहे का? टाऊन हा कन्सेप्ट ऐकला आहे का आपण ? आपल्याकडील तालुक्याची ठिकाणे ही टाऊन प्रकारात मोडतात ,भारतातले सर्वात सुसह्य जीवन इथे जगता येते. त्यामुळे टाऊन प्लेस ही आजच्या जगात रहाण्यासाठी सर्वात सुसह्य जागा आहे.छोट्या आकाराची टुमदार नगरे उभारणे ही काळाची गरज आहे.
(एका टुमदार टाऊनमध्ये राहणारा येऊकामी)
अशोकजी वाचतो आहे. माझं मत
अशोकजी
वाचतो आहे. माझं मत विस्कळीत आहे. इथे ग्रामसंस्कृती जी अपेक्षित आहे ती कुठली हे सुशांत यांनी ओळखले आहे. केवळ मॉल्स आणि मल्टीप्लेक्स म्हणजे शहरीकरण नव्हे. शहरांमधे असणारी मिश्र संस्कृती, खूप कमी भागात शिल्लक असणारी जातवार रचना यामुळे जातीच्या भिंती मोडून पडतात. शहरामधे चटकन बदल आत्मसात केले जातात. खुल्या विचारांचे स्वागत केले जाते. मुलींना स्वातंत्र्य शहरी भागातच आहे आणि दलित, शोषित, पीडित यांना निर्भयपणे जगण्याची संधीही शहरातच आहे.
खेड्यात बारा बलुतेदार व्यवस्था आहे तिलाच गावगाडा म्हटलं जातं. इंग्रज येण्यापूर्वी ही गावं अतिशयच आत्मकेंद्री असल्यानं त्यांचा विकास देखील होत नसे. गावातल्या गावातच सर्व विनिमय होत असल्याने विकासाच्या वाटाही अरुंद होत्या. त्यामुळेच देशावर कुणाचं राज्य आहे किंवा नाही याचा गावातल्या गावक-यांना फरक पडत नव्हता. या झापडबंद व्यवस्थेत उच्च नीच सारख्या गोष्टींना अतिशय महत्व होतं. इंग्रजांमुळे बदल झाले, ब-याच अनिष्ट गोष्टींना परकीय आणि तटस्थ राज्यकर्त्यांच्या राज्यात आळा बसला. तरीही स्त्री चं स्वातंत्र्य आणि गावगाडा मोठ्या प्रमाणात तसेच राहीले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारकांची मोठी परंपरा देशाला लाभली. पण स्वातंत्र्यानंतर समाजसुधारक दुरापास्त झाले. इंग्रज गेल्यानंतर हडप करण्याची स्पर्धा सुरू झाली. यात शेवटच्या माणसाला स्थान नाही. त्यांना असावं असं मानणा-यांची संख्याही झपाट्याने कमी होतेय.
देश म्हणजे देशातील माणसे. मोठ्या प्रमाणावर देशातील माणसं दबलेली राहत असतील तर ते मनुष्यबळ आपण वाया घालवतो आहोत. शहरामधे बदलांना फारसा विरोध होत नाही. हल्ली संघटीत विरोध होत असेल तर त्यामागे राजकारण असतं. तो भाग सोडून देऊ.
गावातलं हे गावगाड्याचं स्वरूप शहरीकरणाच्या रेट्याखाली बदलू शकेल का आणि बदलावं का हा मला पडलेला प्रश्न आहे. गाव उद्धव्स्त करावं असा त्याचा अर्थ नाही. युरोपातली गावं पहा. शेती तिथेही होतेच. पण आपल्यासारखी ग्रामीण संस्कृती तिथे दिसते का ? ही तांबट आळी, ही ब्राह्मण आळी, ही खालच्या जातीची वस्ती आणि ती गावकुसाबाहेरची वस्ती. या पद्धतीने माणसाचा विकास कुठे होतोय ? इंग्लंडमधल्या खेड्यात कुणीही म्हणणार नाही कि आमच्या पोरी बॉयफ्रेण्ड ठेवत नाहीत. कारण ही अभिमानाने सांगावी अशी गोष्टच नाही हे तिथल्या दुर्गम भागातल्या खेड्यातही मान्य आहे. मुलीचा लग्नाचा विषय तिनेच हाताळावा हे अगदी सहज आहे. माणसाल किंमत आहे. त्याच्या स्वातंत्र्याला किंमत आहे. एखाद्या विशिष्ट प्रांतात राहणा-यांचा विकास झाला म्हणून कुणाला राग येत नाही. माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार तिथे घडत नाहीत. अपवादात्मक असतीलही. पण अपवादाला नियम म्हणता येत नाही.
नाहीतर सुपरपॉवर बनूनही गावगाडा आणि कुप्रथा तशाच राहणार असतील, त्या दूर व्हाव्यात असं नुसतंच वाटत असेल पण त्या बद्दल काय करावं याची चर्चाही होत नसेल तर मार्गही दिसणार नाही. कदाचित या अर्ध्या कच्च्या विचारांमुळे चर्चा सुरू होऊन काहीतरी कुणाच्यातरी कल्पनेतून ठोस कल्पना समोर येऊ शकते असं वाटलं होतं. दिशा देण्यास, विचार देण्यास माझ्या मर्यादा स्वतःला ठाऊक असल्याने वाचनमात्र राहण्याची परवानगी मागितली होती. कदाचित चर्चा पुढे नेण्यास ही पोस्ट उपयोगी पडेल ही आशा.
( तुम्ही कोल्हापूर भागातले आहात याबद्दल अभिनंदन करतो. हा भाग सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. श्रेय अर्थातच शाहू महाराजांचं. देशातल्या इतर भागच्या मानाने इथे प्रगल्भ वातावरण आहे. पण हे सर्व देशात खरे आहे असं म्हणता येत नाही. मी पंजाब, हरियाणातल्या खेड्यातून फिरलेला आहे. तिथे पदरमोड करून पाच वर्षे काम केलेलं आहे. माझा विभाग झिरकपूर, रामगढ आणि चंदीगढच्या आसपासचा भाग होता. एकीकडे चंदीगढ सारखं प्रगत शहर आणि दुसरीकडे अंबाला आणि आजूबाजूच्या वस्त्यातून आर्थिकदृष्ट्या प्रगत पण सामाजिक दृष्ट्या मागास गावं एकीकडे हे अनुभवलेलं आहे. उत्तर प्रदेशात गाजियाबाद पासून थोड्या जवळच्या गावात असतानाच शेजारच्या गावात एक घटना घडली होती. जिच्यात मुलगा खालच्या जातीचा असल्याने दोघांची हत्या झाली होती. पुढे कुणीच काही बोलत नव्हतं. नंतर काय झालं हे कळालं नाही. गावात काय वातावरण असतं ते त्या वेळी जवळून पाहीलं. गंमत म्हणजे महाराष्ट्रातून गेलेला मनुष्य या जातवार व्यवस्थेत कुठे बसत नसल्याने त्याचा सामाजिक दर्जा हा वरचा असतो. तो दलित महाराष्ट्रात असला तरी पर प्रांतात दलित राहत नाही. महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश किंवा पर प्रांतामधून येणारे लोक हे तिथल्या गावगाड्यात कनिष्ठ असले तरी त्यांना चांगलीच वागणूक मिळते जी इथल्याच त्याच्यापेक्षाही चांगल्या शिकलेल्या, प्रगती केलेल्या कनिष्ठ जातीच्या माणसाला मिळत नाही.
हेच कॉस्मोपॉलिटन स्वरूप सर्वत्र झालं तर एकजिनसी नाही तर एक खुला समाज म्हणून आपला देश अधिक चांगली वाटचाल करू शकेल. अर्थातच असं स्वरूप म्हणजे गावगाड्यावर किंवा तिथल्या संस्कृतीवर हमलाच कि )
@ शाम लेख सोडून दिल्यावर
@ शाम
लेख सोडून दिल्यावर आक्षेप घेण्याचं कारण मला तरी दिसत नाही. चर्चाप्रस्तावाला साहीत्यिक किंवा समर्पक लेबल असावं असं मायबोलीवर तरी आढळलं नाही. असे प्रतिसाद येऊ नयेत म्हणून उत्तर दिलं नाहीतर दखल घ्यायचीही काहीच गरज नव्हती. अशा प्रकारच्या शेरेबाजीला उद्देशून हा शेवटचा प्रतिसाद.
मला असो यांचा हा प्रतिसादही
मला असो यांचा हा प्रतिसादही आवडला.
सातीजी धन्यवाद. थोडा
सातीजी धन्यवाद. थोडा आत्मविश्वास आला
असो यांच्याशी असहमत ! इब्लिस
असो यांच्याशी असहमत ! इब्लिस व अशोक पाटील यांच्याशी सहमत !