वसंतागमन

Submitted by Manasi R. Mulay on 4 February, 2013 - 12:00

आसपासची माणसं, परिस्थिती प्रतिकूल असणं कधीकधी फार शकुनाचं..सभोवताली सामान्यांचा वावर असला म्हणजेच असामान्यत्व फुलायला संधी मिळते.

वाईट विचारांची माणसं समोर आली की एवढ्या वेळ म्यानात तलवार बाळगणाऱ्या विवेकी योद्ध्याचे हात नकळत सळसळतात. बदकांसोबत राहिलेला दु:खी राजहंस.. ते दु:खं सुद्धा शकुनाचं.. अंधारातल्या काजव्यासारखं.. एरवी रोज उगवणाऱ्या सूर्याचा कंटाळा यावा पण दर अमावस्येला पौर्णिमेनं हुरहूर लावावी तसं.. क्षणभंगुर पण चिरकालाचा आनंद देणारं..

कधी कधी वाटतं खरंच आनंद मिळतो का? कारण वेगळेपणाची जाणीव बऱ्याचदा नैराश्याच्या गर्तेची वाट धरते.. पण स्वतःचा वेगळेपणा ओळखून शार्क महासागरातून उसळी मारतो. पाण्याबाहेर डोकावण्याची भीती त्याला कधी नाही वाटत..

आजूबाजूला खूप चिखल झाला की कमळाने सहज उगवावं, झाडाला खूप काटे असले तरी कळीने सहज उमलून जावं जणू त्या काटेरीपणाला झाकण्यासाठीच.. काटे बोचतील म्हणून फुलानं फुलायची भीती बाळगली तर बहर कसा येणार? आणि शेळ्यांच्या कळपात राहतोय म्हणून मृगेन्द्राने गर्जना करायचं सोडून दिलं तर राजा व्हायचं कोणी?

याउलट काळ्या कावळ्यासोबत एका झाडावर राहून सुद्धा वेळ आल्यावर सारा आसमंत मंत्रमुग्ध करून टाकणारं ते कोकीलकूजन शकुनाचं.. स्वत्त्वाची जाणीव करून देणारं.. मनाच्या मंदिराची घंटा वाजवून त्यातल्या सुप्त देवतेला जागवणारं.. आजूबाजूच्या नीरवतेवर अधिराज्य करत उठलेला तो एक अद्भूत अंतर्नाद, युगानयुगे उंच आकाशात कोरला जावा अन कानोकानी त्याचा प्रतिध्वनी उमटत राहावा असं वाटणं सुद्धा शकुनाचं..

आणि म्हणूनच परिस्थिती प्रतिकूल असणं कधीकधी नाही तर नेहमीच शकुनाचं.. शिशिरामध्ये पानगळ होणारच फक्त त्यानंतर वसंत फुलवण्याची जिद्द असायला हवी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users