ll स्वत:सारखं ll

Submitted by कमलाकर देसले on 4 February, 2013 - 10:42

ll स्वत:सारखं ll

मुलांना मी त्यांच्या वाढदिवसाला छानशी पुस्तके भेट देतो. त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर मनातल्या चार ओळी लिहितो. लहान मुलगा ज्ञानू रंग , रेषांशी खेळायचा. त्याला त्याच्या एका वाढदिवसाला थोर चित्रकार शिवाजी तुपे यांचे ' स्केच करता करता ' हे पुस्तक भेट दिले आणि त्यावर लिहिले ' प्रिय ज्ञानू , मिठामुळे जेवणाला चव येते नि कलेमुळे जीवनाला चव येते. ' आज तो कलेची साधना भक्तिभावाने करतो आहे. मोठ्या तुषारला असेच एकदा ' खरेखुरे आयडॉल ' हे पुस्तक भेट दिले. त्या पुस्तकावर लिहिले , ' प्रिय तुषू , तुला हे पुस्तक याकरता भेट देत नाही , की तू या पुस्तकातील कुणा आयडॉलसारखा व्हावा. नाही. हे पुस्तक तुला यासाठी देतो आहे , की तू तुझ्यासारखा हो. कारण या पुस्तकातील कुणीही दुसऱ्या कुणासारखा झालेला नाही , तूही स्वत:सारखा हो. '
बागेतला गुलाब ' गुलाब ' च होतो. जाई ' जाई ' च. अशोकाच्या उंचीशी कुणाची स्पर्धा नसते. झाडे झाडांना हिणवत नाही. निसर्ग ' होण्यात ' कमी ठेवत नाही. निसर्गात कुणीच दुसऱ्यासारखं होत नाही. माणसांच्या जगात मात्र मुलांना कुणासारखं तरी करण्याच्या नादात मुलं ना धड कुणासारखी होतात ना स्वत:सारखी राहतात. कुठेतरी वाचलं आहे , की ' का ?' हा एकच प्रश्न विचारी मुलाला पडला तर तो विचारवंत होईल. आध्यात्मिक प्रकृतीच्या मुलाला पडला तर तो साधक होईल , ज्ञानी होईल. जिज्ञासूला ' का ?' हा प्रश्न पडला तर तो शास्त्रज्ञ होईल. तत्त्वज्ञ होईल. प्रतिभावंताला पडला तर तो कलावंत होईल , कवी होईल. भाविकाला पडला तर भक्त होईल. याचा अर्थ हाच की प्रत्येक मूल शास्त्रज्ञ , कलावंत , तत्त्वज्ञ , विचारवंत , भक्त होण्याच्या शक्यता घेऊनच जन्माला येते ; आणि एक सर्वांत मोठी शक्यता सर्वांमध्ये सारखीच असते , ती म्हणजे संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे ' नर का... नारायण ' होण्याची.

प्रत्येक मूल हे स्वतंत्र असते. त्याचा स्वाभाविक विकास होऊ दिला तर मूल थकत नाही. उलट त्याच्या शक्तीचा आणि शक्यतांचा विकासच होतो. जे पालक आपल्या मुलांना आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीचं साधन समजतात , ते पालक मुलांचं ' वस्तू ' त रूपांतर करतात. मग मुलांची यंत्रे होतात. यंत्रे सृजनशील नसतात. यंत्रे नक्कल करतात , निर्मिती नाही. यंत्रांना प्रतिभा नसते. आपल्या मुलांची यंत्रे होऊ नयेत , याची काळजी पालकांनी वेळीच घ्यायला हवी. शैक्षणिक मानसशास्त्राशी परिचित असे काही सुजाण पालक मुलांपुढे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करतात. आता आपल्या या देशाला डॉक्टर , इंजिनीअरच नाही तर कुशल कामगार , शेतकरी , तंत्रज्ञ , शिक्षक , सफाई कामगार , चांगले राजकीय नेतृत्व , चांगले व्यावसायिक , कम्प्युटरतज्ज्ञ , शास्त्रज्ञ , विचारवंत अशा सर्वांची गरज आहे. आणि या सर्वांमध्ये हा देश ' माझा ' वाटणाऱ्या माणसांची अधिक गरज आहे. किमान तो माणूस तर प्रत्येक मुलात आहेच. त्यांना ' स्वत:सारखं ' होऊ द्यायला हवं मात्र.

कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users