आलिस भरभर

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 3 February, 2013 - 13:15

आलिस भरभर घाईत अपुल्या
आणि अचानक ; दारावरची
बेल वाजली
उतावीळ अन अधीर जराशी

“ काका बाबांनी पाठवले
हे- ते पुस्तक
तू सांगितले ; वळवित मागे
गालावरचीअवखळशी बट.

उत्साहाने सांगत होतीस
मोबाईलची रिंग वाजता
चिवचिव चिवचिव बोलत होतीस
खिदळत होतीस –

पाहत, ऐकत असता तुजला
आठवणींच्या पडद्या मधुनी
मी पाहतसे लाडकी मनु
अमेरिकेच्या धुक्याआड
हरवून गेलेली माझी सोनू

किती दिवसांचा पारा उडला
महिने गेले ; वर्ष उलटले –
दुरदेशीला उडून गेली
‘परी’ माझी ना अजून परतली

फोन रोज ये “ बाबा तुम्ही
आहात कसे ; आठवण येते !
येणार अता म्हणतच होते
परी यायचे राहून जाते .”

डोळ्यामध्ये पाणी माझ्या
वेळी अवेळी दाटून येते
हात तव शिरी फिरवायला
अंतरातुनी तगमग होते.

“काका येते “
“काका येते “ पुन्हा म्हणालीस
आणिक हसरी सकाळ झाली
येईल मनुही अशी अचानक
पुन्हा मनीची माया म्ह्टली

कितीक दिसांनी आज जराशी
झुळूक खेळली माझ्या दारी
कितीक दिसांनी माझ्या दरी
किरणांची पखरणशी झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users