अनुभूती -१

Submitted by प्रज्ञा९ on 3 February, 2013 - 12:35

गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्‍या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला. नेहमीच्या भटकंतीपेक्षा वेगळं, आणि मनातून शांतता मिळेल असं काहीतरी हवं होतं..

आम्हाला दोघांनाही घळीत जायला खूप आवडतं. लहान असताना तिथे संस्कारवर्गाला गेले होते मी. नवराही आवडीने तिथे २-३ वेळा गेला होताच. आपण एखादी गोष्ट नुसती ठरवली म्हणजे होत नाही, त्यासाठी आपल्या हातात नसलेले अनेक फॅक्टर्स त्या वेळी आपल्या बाजूने असावे लागतात, विशेषतः प्रवासात. याचा फार उत्तम अनुभव आम्हाला आला. पहाटे निघालो, आणि भोर फाट्याला वळलो. आम्ही कापूरहोळच्या उजव्या बाजूने, मांढरदेवीवरून वरंध्यातून आलो. मग समजलं की अजून एक 'अ‍ॅक्चुअल' (!) भोर फाटा आहे..पण हा रस्ता खूप खूप सुरेख होता. म्हणजे सिनिक होता. खड्डे वगैरे होते, आणि नॅनो असल्यामुळे जास्त जाणवलेही, पण आजूबाजूला नुसती हिरव्या रंगाची उधळण होती!

रस्त्याला अजिबात रहदारी नाही! अख्खा रस्ता आमचाच.. आणि दुतर्फा झाडी, डोंगर आणि भाटघर धरणामुळे उदंड पाणी असलेली नदी.. हा प्रवास मी कधीही विसरणार नाही!
मी फार कर्मकांड-उपास वगैरे अजिबात करत नाही, पण देवावर कुठेतरी खूप मनापासून श्रद्धा आहे आणि तो सतत आपल्या कल्याणाचं काहीतरी करत असतो यावर विश्वास आहे..त्यामुळे हा प्रवास सुरू झाला तेव्हा मनात आलेली प्रसन्नतेची लहर या पुढच्या आठवड्यातही पुरून आहे! विचार करा, खूप दिवसांनी दोघंच जाताय, आजूबाजूला असा सुंदर भोवताल, पहाटेची प्रसन्न वेळ, निवांत रस्ता, आणि तुम्ही पूर्ण वेळ एकमेकांसाठीच द्यायला उत्सुक आहात आणि त्या ओढीने गप्पा मारताय....

टिपिकल आऊटिंगपेक्षा हा अनुभव खूप सुखद वाटत होता. एकीकडे आमची एकमेकांना सोबत, पण एकीकडे स्वत:च्या विचारातही हरवून जायची मुभा.. आणि शब्दांत न सांगता येणारी प्रसन्नता माझ्या मोडक्यातोडक्या भाषेतूनही समजून घेतोय असा माझा जोडीदार... काहीतरी गवसल्यासारखं वाटत होतं. मी 'जगतेय' असं वाटत होतं! रोजचं रूटीन म्हणजे खरोखरीचं रहाटगाडगं झालंय हे जाणवलं नि पुढचे २ दिवस त्यातून बाहेर आलोय या विचाराने मी प्रचंड सुखावले!

सकाळी १०:१५ ला घळीत पोहोचलो. तिथे रहायची सोय होईल का याची चौकशीही निघताना केली नव्हती. वर्स्ट केस, परत ४ तास प्रवास करून घरी येऊ असाही प्लान ठरवून झाला होता. पण ईश्वरेच्छा बलीयसि! एक तरूण जोडपं, केवळ घळीत वेळ घालवून शांततेत साधना करायला आलंय यावर तिथल्या व्यवस्थापकांचा अगोदर विश्वास बसेना. "जागा मिळेल, पण करणार काय तुम्ही दिवसभर? आत्ता काही शिबिर वगैरेही नाही.." असं त्यांनी आमच्याच काळजीपोटी विचारलं. कारण घळीची इमारत आणि वोडाफोनची रेंज सोडली तर आजूबाजूला नुसते हिरवेगर्द डोंगर आणि शांतताच होती! आणि तिथे रहायला खोली वगैरे फक्त साधकांनाच मिळते शक्यतो. पण आम्ही त्यांना निश्चिंत केलं. खोली मिळली, आणि परत २ किलोमीटर बाहेर येऊन एका दुकानावरून घरी फोन केला. त्यानंतर २४ तास आम्ही बाहेरच्या जगाच्या काहीही संपर्कात नव्हतो! ११ वाजता खोलीवर आलो, जरा फ्रेश झालो नि सामान आवरलं. १२ ला घंटा झाली आणि खिचडीचा महाप्रसाद घेऊन परत खोलीवर आलो. विश्रांती घेतली. मग ३:३० नंतर घळीत जाऊन बसलो. एक मात्र झालं, की त्या वेळीच आम्हाला स्तोत्रं वगैरे म्हणून ध्यान करायची इच्छा होती, पण पर्यटकांमुळे तिथे गर्दीतच ३ तास बसून काढले. नंतर खाली हॉटेलमधे जाऊन थोडं खाल्लं. ६:३० च्या सायंप्रार्थनेला आलो. पावणेआठपर्यंत प्रार्थना झाली आणि पुन्हा आमटीभाताचा प्रसाद घेऊन आलो. येताना २ पुस्तकं खरेदी केली. जेवल्यावर खाली आणि मग घळीबाहेर निवांत फेर्‍या मारल्या.....

"काय भयानक शांतता आणि अंधार आहे! जाशील का इथून पलिकडच्या दोंगरावर जायला सांगितलं तर!"- अहो.

"खरं सांगू? आधी भिती वाटली, पण आता खूप खूप सुरक्षित वाटतंय! कुठेतरी जाणवतंय की आपण देवाच्या ठिकाणी, त्याच्या क्षेत्री आहोत आणि दुसरं म्हणजे तू आहेस ना बरोबर! मग इथला एखादा माहितगार जर असेल आणि आपण दोघं असू तर नक्की आवडेल जायला! असं धाडस कधीतरी करायला नक्की आवडेल...: -मी
नवरा शांत.

आणि मला एकदम युरेका झालं! कारण ती पौर्णिमेची रात्र होती...भोवती शुभ्र चांदणं का आहे याचा उलगडा झाला... हे म्हणजे आंधळा मागतो एक असं झालं! एरवी घरी असताना खिडकीतूनही पूर्ण चंद्र बघायची मारामार... आणि इथे, नीरव शांततेत अशा चांदण्यात आम्ही मस्त फिरत होतो!

इथे असताना सतत गोनीदांचं 'दास डोंगरी रहातो' पुस्तक आठवत होतं. समर्थांनी हीच घळ का निवडली असेल... मग त्या वेळी इथे कसं असेल... आत्ता धबधबा नसतो कारण पाणी नाही, पण पावसाळ्यात जेव्हा पाण्याला जराही खळ नसते तेव्हा त्या किर्र शांततेत धबधब्याच्या आवाजात, भर जंगलात ३०० वर्षांपूर्वी ते कसे राहिले असतील... शंभर प्रश्न मनात आले!

आणि अजूनही एक मजेदार प्रश्न आमच्याबद्द्लही आला... असं वातावरण जर दुसर्‍या एखाद्या गावी, जे देवक्षेत्र नसेल, अशा ठिकाणी असतं तर आम्हाला नक्की काय वाटलं असतं.... आणि खूप हसू आलं! देवधर्म वगैरे लहान असताना प्रायोरिटि होता, आता तो निव्वळ एक कन्विनिअन्स झालाय ही जाणीव खूप तीव्रपणे झाली. आयुष्य बदलतं तशा या गोष्टीही बदलतात, त्यामुळे अपराधी नाही वाटलं हेही खरंच!

पण इथे जरी शब्दांत मांडायला घेतलं तरी ते सगळं फक्त अनुभवायच्याच योग्यतेचं होतं. भगव्द्गीतेत शेवटी अर्जुनाची अवस्था, साक्षात श्रीकृष्णाकडून ज्ञान मिळाल्यानंतर "हृष्यामि च मुहुर्मुहु:" अशी झाली होती. पुन्हःपुन्हा आनंदाची लहर येणं.... आमचं तसंच झालं होतं.. तिथे जाऊन तिथल्या शांततेत काही काळासाठी का असेना, आम्ही हरवलो होतो.

मनात आनंद कोंदून जात होता. त्याच आनंदात रात्रीची उपासना केली, आणि प्रसाद घेऊन, खोलीत येऊन पुस्तकं वाचत बसलो. पुस्तकात जे मिळालं तेही त्या आनंदाला साजेसं होतं... कुठेच अपवाद होत नव्ह्ता... त्यामुळे कमालीची निर्वेध झोप लागली. पहाटे ४:३० ला उठले तेव्हा कधी नाही इतकी फ्रेश आहे असं वाटलं. आवरून काकड्याला गेलो आणि मग सगळा आनंद मनात भरून घेऊन तिथल्या व्यवस्थापकांचे पुन्हा आभार मानून परत निघालो. नकळतच हात जोडून"रामराया, पुन्हा पुन्हा असे योग येत राहोत..." असं मनोमन म्हटलं आणि त्या अतीव शांत, तृप्त क्षणी डोळे ओलावले...

अनुभूती २

वाटेत जाताना घेतलेले फोटो. सगळे चालत्या गाडीतून न उतरता घेतलेत, कारण रस्ता पूर्ण वळणांचा होता, थांबणं सेफ नाही वाटलं खूपदा.

shiv1.JPGshiv2.JPGshiv3.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं मदत समितीला हाक घातलिये. काही कारणामुळे पूर्ण नाही झालंय लिहून. Sad
मधेच अर्जंट काम आलं नि राहून गेलंय.

मला वाटले लेखाचे नावच "अनुभूती -१ (अपूर्ण, अर्धवट प्रकाशित)" आहे.
आणि त्यातील कोणतीतरी अनुभुती ही अपुर्ण आणि अर्धवट आहे. Wink

आता पुर्ण टाकल्यावरच वाचेन, तवसर इथे क्लेम लाऊन दुसरं वाचायला पळतो.

पूर्ण केलाय पहिला लेख. काही कारणामुळे लिंक तुटली लिहिताना, पण जास्तीत जास्त लिंक लागेल असा लिहियचा प्रयत्न केलाय उरलेला लेख लिहिताना....

दुसरा भाग लिहितेच लवकरात लवकर. शिवाय याचे फोटोही टाकता आले तर टाकते. नेट चा प्रॉब्लेम येतोय जरा, त्यामुळे असं तुकड्यातुकड्यांत टाकतेय.

अनुभूती २

आणि त्या अतीव शांत, तृप्त क्षणी डोळे ओलावले... >>>>> अतिशय सुंदर अनुभव आणि सुर्रेख लेखन ... Happy