अद्भुत (भाग 1 )

Submitted by Mandar Katre on 1 February, 2013 - 12:36

सकाळी सकाळी सिगारेटची पाकीटच्यावर पाकिटे संपवूनदेखील रोहन आज शांत होत नव्हता . तसा तो चेन स्मोकर नव्हता ,पण गेल्या काही दिवसात घडलेल्या विचित्र घटनांनी तो अतिशय विषण्ण अवस्थेत जगत होता . अगदी क्षुल्लकशा कारणावरून बॉसने नोकरीवरून काढले .... त्यामागे ऑफिसमधले गलिच्छ राजकारणच आहे ,हे त्याला काही केल्या प्रियाला पटवून देता येईना ... मग तीही भांडून,रुसून दूर गेली होती . पण तिचा रुसवा काढून मनधरणी करण्याचाही विचार रोहनच्या मनात आला नाही ,कारण आपल्यावर झालेला अन्याय त्याला खोलवर कुठेतरी खात होता..... आणि तोच विचार मनावर गारुड करून होता.

अशा विचाराच्या तंद्रीतच तो बारमध्ये गेला , आवडते ड्रिंक आणि मंद संगीत यांच्या साथीने त्याला थोडे बरे वाटले. आणि एकदम त्याला सगळ्या जगाचीच शिसारी आली ,आपल्या जगण्याची लाज वाटू लागली . लहानपणापासून कुठेतरी खोलवर दडून बसलेला मनाचा कोपरा मोकळा झाला. लहानपणी कसं कोण जाणे ,पण तो म्हणायचा ,बाबा ,मी आयुष्यात कधी पैशाच्या मागे लागणार नाही, पैसा हा फार वाईट असतो ,सगळी भांडणे,वैर पैशामुळेच तर होतात ना.................. आज इतक्या वर्षानी तोच विचार त्याच्या मनात आला . आणि त्याने ठरवले, बस्स आता काय व्हायचे ते होवो ............ आता थेट हिमालय गाठायचा ,आणि एखाद्या साधूबाबा कडून जीवनाचे खरे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे !

त्या विचारांच्या कैफातच तो बांद्रा स्टेशन ला आला .दुपारचे 12 वाजत आले होते आणि पाहिले तर जम्मू –तावी एक्स्प्रेस स्टेशन वर उभी होती . मागचा-पुढचा कसलाही विचार न करता त्याने जनरलचे तिकीट काढले ...आणि असह्य गर्दीतून कसाबसा ट्रेन मध्ये चढला.तुडुंब गर्दीत स्वत:चे अस्तित्व कोंबून त्याने प्रवासाला सुरुवात केली. निघताना न विसरता त्याने बारमधूनच 2 क्वार्टर घेतल्या होत्या .खिशात अडीच तीन हजार रुपये, एटीएम कार्ड आणि मोबाइल ............. बस्स इतकच...याखेरीज अन्य काहीही त्याच्याजवळ नव्हतं . पाणीवाल्या पोर्‍या कडून एक बाटली घेतली आणि महत्प्रयासाने त्याने वरच्या सीट वर स्वत:ला घुसवलं आणि जरा बसता आल्याबरोबर क्वार्टरचं झाकण उघडून प्यायला सुरुवात केली.

जाग आली ती शेजार्‍या ने गदागदा हलवून उठवलं तेव्हा ..... बाबू ...अपना वो बोतल कही छुपादो ... बरोडा आ गया है ,अभि चेकिंग होगा .................. तो शेजारचा नेपाळी पोरगा रोहनला सांगत होता , तशी लगेच रोहन घाईने खाली उतरला आणि थेट गेला टोयलेटमध्ये ,उरलेली सगळी संपवून टाकली,आणि बरोडा स्टेशन जाईपर्यंत बाहेरच नाही आला .......... बाहेर आला तेव्हा चांगलीच भूक लागली होती, मग अहमदाबाद स्टेशन वर ट्रेन थांबली तेव्हा बरेचसे पदार्थ पॅक करून आणले आणि सपाटून जेवला ..... आणि परत जी झोप लागली ती सकाळपर्यंत ........चुरु जंक्शन वर दुपारचे जेवण आले.नंतर हरयाणा आणि पंजाब ची हिरवीगार शेते पाहण्यात वेळ कसा गेला ते त्याला कळलही नाही. शेवटी जालंधर ला रात्रीचे जेवण घेवून झोपी गेला ,तो थेट जम्मू आल्यावरच उठला ...... रात्रीचे 2 वाजले होते. जाणार कुठे? मग स्टेशनवरच वेटिंग हॉल मध्ये 4 तास काढून सकाळी बाहेर पडला.................

(क्रमश : )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users