मौन

Submitted by निशिकांत on 1 February, 2013 - 04:23

मौन माझ्या अंतरीचे बोलते माझ्यासवे
नेहमी पिंगा धरोनी खेळते माझ्यासवे

मौन आहे गीत माझे मौन माझा सूरही
मौन तारा अंतरीच्या छेडते माझ्यासवे

सांगण्या आनंद माझा कोण आहे आपुले?
मौन हाती हात धरुनी नाचते माझ्यासवे

खूप आले खूप गेले शेवटी मी एकटा
मौन करते साथ अंती चालते माझ्यासवे

वाढतो शब्दावरूनी शब्द हे आहे खरे
मौन उत्तर द्यावयाचे टाळते माझ्यासवे

काय मी केली कमाई? सांजवेळी प्रश्न हा
मौन, उरले काय हाती, मोजते माझ्यासवे

मौनव्रत घेऊन बसलो ईश्वराला प्रार्थण्या
श्रीहरी स्वप्नात झाले बोलते माझ्यासवे

प्रश्नचिन्हांचीच आहे मालिका जगणे जगी
मौन सार्‍या उत्तरांना शोधते माझ्यासवे

केवढे "निशिकांत" आहे वेड मौनाचे तुला?
मौन ना लढता झगडता नांदते माझ्यासवे

निशिकांत देशपांडे मो.क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..................

.............

........
आधी मौनाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण जमले नाही म्हणून मग शब्दानेच म्हणतो - मस्तच जमलीये Wink Happy

वाह सर!

भक्तीपूर्ण मौन वाटले.. तुमची मौनावर, मौनाची तुमच्यावर श्रद्धा जणू... मौन सखा, तोच सोयरा!

काय मी केली कमाई? सांजवेळी प्रश्न हा
मौन, उरले काय हाती, मोजते माझ्यासवे>> वाह, कितीतरी सुरेख...

सांगण्या आनंद माझा कोण आहे आपुले?
मौन हाती हात धरुनी नाचते माझ्यासवे

खूप आले खूप गेले शेवटी मी एकटा
मौन करते साथ अंती चालते माझ्यासवे <<< व्वा ! >>>

आवडली गझल..

खूप आले खूप गेले शेवटी मी एकटा
मौन करते साथ अंती चालते माझ्यासवे

प्रश्नचिन्हांचीच आहे मालिका जगणे जगी
मौन सार्‍या उत्तरांना शोधते माझ्यासवे<<<

शेर आवडले. गझलही.

धन्यवाद