मोस्ट ईलिजिबल बॅचलर.....

Submitted by जयू कर्णिक on 31 January, 2013 - 11:50

मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार.
‘हॅलो…’
आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही. बरं एकही मैत्रीण असं करायला धजावणार नाही, कारण अगदी दाक्षिणात्य मित्र-मैत्रिणींना मराठीत ‘त’ आणि ‘थ’ हे वेगळे असतात हे सांगून झालेलं, तर अन्यभाषिक लोकांच्या जीभेला ‘ळ’ आणि ‘ण’ म्हणायचं वळण नसलं तरी मराठी माण्सानं इंग्रजीत बोलताना ‘माळी’ चं ‘मिस्टर माली’ करणं म्हणजे माझ्या लेखी अक्षम्य गुन्हा आहे हेही माझ्या सहकारी मित्रांना चांगलंच ठाऊक होतं.
‘या, जयंत कर्णिक स्पीकिंग’
‘प्लीज स्पीक हिअर’, तिने गूढ कायम ठेवलं.
‘हॅलो…’ आवाजात विलक्षण मार्दव होतं. तरी मला काही तो ओळखू आला नाही.
‘हॅलो, गुड मॉर्निंग’, मधे एक छोटा पॉझ, ‘रतन टाटा हिअर’, मी ताडकन उडालोच. मग वाटलं हे आमच्या अल्बर्टचं, ऑपरेटर रेवती – सॉरी रेवथीच्या मदतीनं केलेलं कारस्थान असावं. मी संभाषण चालू ठेवून अंदाज घेण्याचं ठरवलं.
‘हॅलो, हॅलो…..आर यू देअर?’ माझ्या गोंधळण्याचा पलीकडील व्यक्तीला अंदाज आला असावा. आता मात्र हा आवाज अल्बर्टनी काढलेला वाटला नाही. तरीपण खुद्द रतन टाटा आपल्याला फोन करतील अशी कोणतीच पुण्याई मी माझ्या टेल्कोच्या कारकीर्दीत केलेली नव्हती. नाही म्हणायला माझी अन् त्यांची एक ओझरती भेट झाली होती, पण त्या गोष्टीला आता पुरतं एक तप लोटलं होतं.
‘यस् सर’, न जाणो खरंच रतन टाटा असतील तर, आपण बॅकफूटवर जाऊन संरक्षणात्मक पवित्रा घेतलेला बरा, असा मी विचार केला. अन् तो निर्णय फारच योग्य ठरला कारण पुढचे सर्व चेंडू, ब्लॉक होलमध्ये, यॉर्कर लेंथचेच असणार होते. पलीकडे खुद्द रतन टाटाच होते.
‘व्हेअर आर यू?’
‘मी माझ्या नेटिव्ह प्लेसला, यवतमाळला’, खरं तर हे सर्व त्यांना चांगलंच ठाऊक असणार. कारण हे लोक पूर्ण तयारीशिवाय तोंडातून ‘ब्र’ सुद्धा काडत नाहीत. त्या एका तपापूर्वीच्या भेटीचा मला चांगलाच अनुभव होता. त्यांच्या केबिनमध्ये शिरण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती. त्यांच्या पहिल्या वाक्याला मला ते लक्षात आलं होतं हे त्यावेळेस बरंच झालं, कारण त्यापुढचं वाक्य न् वाक्य कसलं अक्षर न् अक्षर मी अतिशय तोलून मापून बोललो होतो. त्याचा मला फायदाच झाला. एरव्ही अघळ-पघळ बोलणाऱ्या मला तो एक चांगलाच पाठ होता. पण तो तेव्हढ्यापुरताच. पुढे आम्ही सुधरलो नाही ते नाहीच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण आता तसं करून चालणार नव्हतं. माझी औपचारिक चौकशी, म्हणजे संभाषणात मोकळेपणा आणण्याचा तो एक प्रयत्न असावा.
‘आय मीन व्हॉट आर यू डूईंग?’, अशा मोठमोठ्या व्यक्तींचं अजून एक असतं. त्यांनी काय विचारलं यापेक्षा त्यांना काय विचारायचं आहे हे तुम्ही ओळखायचं असतं. मला हे लक्षात यायला हवं होतं पण हल्ली सवय नसल्यामुळे रिफ्लेक्सेस जरा कमी झालेत.
‘काही नाही, थोडं फार लिखाण, अनुवाद, फोटोग्राफी वगैरे…’
(ह्यापुढचं सर्व संभाषण अनुवाद करून मराठीतच देतो. कारण मराठी भाषेची अशी तोहीन करणं काही बरोबर नाही.)
‘पण तू इतक्या लवकर सेवानिवृत्ती घेतली हे काही बरं केलं नाहीस’
‘म्हणजे, मी समजलो नाही.’
‘सेवानिवृत्तीची योजना तुझ्यासारख्या चाळीशीतल्या लोकांसाठी नव्हतीच मुळी’
‘खरं आहे सर, पण तो निर्णय सर्वस्वी माझा होता, मला कोणी जबरदस्ती केली नाही.’
‘पण तू माझ्यासारखं बाहत्तराव्या वर्षी किंवा कुणी सांगावं पुढे मागे पंचाहत्तराव्या वर्षी पण निवृत्त झाला असतास’
‘ते कसं काय?’
‘टाटा ग्रूपचं अध्यक्ष होऊन.’ हे मात्र अति झालं. मला पुन्हा एकदा अल्बर्ट पिंटोची शंका येऊन आता त्याचा घुस्सा पण यायला लागला होता.
‘अरे, पुन्हा कुठे हरवलास? मी खरंच रतन टाटा बोलतोय. विश्वास बसत नसेल तर एक काम कर. स्काईप वर ये. मी वेब कॅम लावतो. तू ही लाव. ओ. के.’, पलीकडून फोन कटही झाला. मी विचार केला कुणीतरी आपली खेचतंय असं दिसतंय तर हरकत नाही आपणही जरा मजा घ्यावी. गंमत म्हणून चॅटिगलाही बसलो. मनात आलं, आजकाल हॅकर्सचीही कमी नाही, किंवा डमी अकाउंट उघडणंही काही अवघड नाही.
चॅटिंग सुरुही झालं. ते आधीच तिथे हजर होते. वेबकॅम सुरू झाल्यावर मात्र मी चपापलो. समोर खरंच रतन टाटा दिसत होते. केबिन ही त्यांचीच होती. मागच्या भिंतीवर लावलेलं जे. आर. डीं. चं तैलचित्र आणि इतर अनेक गोष्टी अगदी बहुतेक सर्व तशाच होत्या.
त्यांचंही माझ्या घराचं निरीक्षण चालू असावं. ते बोलले, ‘जयंत, तुझं घर खूप जुनं, पण छान दिसतंय.’ ह्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य, जवळीक साधण्यासाठी एकेरी संबोधणं आणि दुसऱ्याच्या राहणीचा आदर करणं.
‘हो, ऐंशी वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बांधलेलं आहे.’ संवाद पुन्हा चालू झाला, माझं चाचपडणंही.
‘तुला आठवतंय, मागे काही वर्षांपूर्वीसुद्धा माझ्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्या वेळेस तू बॉंबे हाऊसला होतास. तेंव्हा गंमतीने तू तुझ्या शेजारच्या चैत्रालीला काय सांगत होता – आय अ‍ॅम दी मोस्ट एलिजीबल बॅचलर इन धीस कंपनी अ‍ॅझ सक्सेसर....आणि ते तित्रून जातांना नेमके माझ्या कानावर पडलं होतं.’ हसत हसत ते म्हणाले. मला आता परत ते रतन टाटा असल्याची पुसटशी शक्यता वाटू लागली. कारण हा प्रसंग तंतोतंत खरा होता. मी हे वाक्य बोलायला आणि रतन टाटा माझ्या टेबलावर टिचकी मारून पुढे अलेक्झांडरच्या केबिनकडे गेले होते हे चैत्रालीने मला त्या वेळेस सांगितलं होतं, माझी पाठ असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नव्हतं आणि माझी त्यावेळेस चांगलीच तंतरली होती हे मला चांगलंच आठवतं. हे मला, चैत्रालीला आणि ऐकू आलं असेल तर खुद्द रतन टाटांनाच माहित असणार होतं. ह्याचा अर्थ त्यांनी ते नुसतंच ऐकलं नव्हतें तर लक्षातही ठेवलं होतं. मला पुन्हा एकदा घाम फुटला.
‘सर, रिअली व्हेरी सॉरी, ते सहजच गंमतीने बोललो होतो.’
‘पण मला आज त्यात तथ्य वाटतंय’
‘सर, काहीतरीच काय, मी साधा डी.एम.ई., अतिसामान्य माणूस आणि कुठे अध्यक्षपद…’
‘कां बी. कॉम्. अ‍ॅडव्हांसड् बॅंकिंगचं काय?’
‘सर, ते तर मी पास क्लासमध्ये पास झालो होतो.’
‘पण त्याच क्वॉलिफिकेशनवर तू मटेरिअल्समध्ये सिलेक्ट झाला होता ना?’
‘सर, मला वाटतं मी बॅचलर होतो, मी मुंबईत राहायला जागा मागणार नाही हे एच. आर.च्या दृष्टीने माझं सगळ्यात जास्त क्वॉलिफिकेशन होतं.’
‘देअर यू आर!’
‘? ? ? ? ? ‘ माझ्या कपाळाच्या आठ्यांमधून डोकावणारे प्रश्नचिन्ह त्यांना स्पष्टपणे दिसत असावं.
‘बॅचलर असणं तर सगळ्यात मोठं क्वॉलिफिकेशन आहे.’
‘ते कसं काय?’
‘ हे मी तुला सांगायला हवं? आत्ता तूच तर म्हणाला तसं! ते तर तुझं अ‍ॅसेट आहे. त्याचं असं आहे, बॅचलर लोकांना प्रापंचिक व्याप नसतात. ह्याचा अर्थ ते कुटुंबवत्सल नसतात असा मुळीच नाही. माझ्या मते ते उलट जास्त प्रेमळपणे ही जबाबदारी पार पाडू शकतात. कारण त्यांची कुटुंबाची कल्पनाच मुळी व्यापक असते. तो फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित विचार करतच नाही. कंपनी, सर्व उद्योगसमूह, राज्य, देश, संपूर्ण जगच त्याचं कुटुंब होतं. एकटे असल्यामुळे काहीसे भावनाप्रधान असले तेरी महत्वाचे निर्णय घेतांना ते पुरेसे व्यावहारिक राहू शकतात. पंतप्रधान, राष्ट्रपती कुठलंही पद ते भूषवू देत, त्यांचा विश्वव्यापक दृष्टिकोन त्त्यांना सर्वसमावेशक, परिपक्व व योग्य तो निर्णय घ्यायला मदतच करतो.’
माझ्या दृष्टीने हे सर्व अकल्पित होतं. ह्या सर्व विचारांमध्ये तथ्य होतंच, पण ते माझ्या मते वैयक्तिक पातळीवर ठीक आहे, पण रतन टाटांसारखी व्यक्ती असं म्हणते म्हणल्यावर मी जरा अचंबित झालो. माझा संभ्रम त्यांनी वाचला असावा.
‘काय झालं? कुठे हरवलास?’ त्यांनी मला पुन्हा संभाषणात ओढलं.
‘कुठे काय? काही नाही!’ काही तरी उत्तर द्यायला हवे म्हणून मी बोललो.
‘हे सर्व मी तुला का सांगतोय असं तुला वाटत असेल नाही?’, हे खरंच होतं तरी मी गप्पच होतो.
‘तुला आठवतं, आपली पहिली भेट?’, खरं तर मी ती भेट विसरणं कसं शक्य होतं?
‘थिंक कस्टमर ट्रेनिंग प्रोग्राम विषयी तू तुझं धाडसी मत नोंदवलं होतंस आणि त्यामुळेच आपली भेट झाली होती. थिंक कस्टमर, इंटर ह्युमन रिलेशनशिप, ती जशी व्यक्तीसापेक्ष तसेच डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, डिव्हीजन टू डिव्हीजन ते प्रोग्राम्स कसे वेगवेगळ्या पद्धतीने, विविध विचारांची सांगड घालून करायला हवेत असं बरंच काही तू अहमहमिकेनं बोलला होतास आणि तसे बदल मी एच. आर.ला अंमलात आणायलाही सांगितले होते, ते मला पक्कं आठवतंय. तुझ्यातील स्पार्क तेव्हांच दिसला होता. तू दिलेली दोन्ही ग्रीटींग्ज, महाराष्ट्रभूषण मिळालं तेव्हांचं तर खासच होतं, ती अजूनही माझ्या संग्रही आहेत.’ ते हे सर्व मला का सांगत होते हे मला थोडं कळेनासं झालं.
‘तर आज माझ्यानंतर टाटा उद्योगसमूहाचा सर्वेसर्वा कोण हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. माझा उत्तराधिकारी टाटा कुटुंबातीलच हवा असं काही माझं मत नव्हतं. तो चांगला, कार्यक्षम, टाटा समूहाची धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेण्याइतपत समर्थ असावा असे मला वाटत होते. अमेरिकेत साठ टक्के कंपन्यात उत्तराधिकारी आधीच ठरवलेला असतो. कुटुंबातील व्यक्तींसाठी आग्रही राहण्यापेक्षा अधिक व्यावसायिकतेनं त्याची निवड व्हावी असे मला वाटत होतं.’
खरंच ह्या विधानाची प्रचिती जरा डोळे उघडे ठेवले तर आपल्यालाही येऊ शकते. कारणं कुठलीही असोत, भारतात आपण आत्तापर्यंत हेच बघत आलोय की उद्योगसमूहात साधारण घराणेशाहीच असते. एल.अँड टी., रॅनबॅक्सी, ड्युपाँट सारखे काही मोजके अपवाद वगळता सगळीकडे तेच चाललंय. टाटांनी आपला उत्तराधिकारी शोधण्याचे काम वेळेत सुरु करून एक चांगला पायंडा पाडण्यातही ते अग्रेसर आहेत हे दाखवून दिलंय. ह्यातच त्यांच्या दूरदृष्टीची दाद द्यावीशी वाटते.
‘जयंतराव पुन्हा हरवलात की काय? पटताहेत का माझे विचार? अर्थात माझ्या मतांपेक्षा सूनावाला, कृष्णकुमार, भट्टाचार्य, शिरीन ह्या सर्वांनी योग्य तोच निर्णय घेतला आहे ह्याबद्दल मला पुरेपूर खात्री आहे. आय स्टिल थिंक, यू आर दि मोस्ट इलिजिबल बॅचलर.....पण तू वेगळाच मार्ग निवडलास. काही हरकत नाही.’ अचानक त्यांचा सूर हळवा झाला की काय असे मला वाटले. ‘माझी पन्नास वर्षांची कारकीर्द झाली हे खरंच वाटत नाही. २८ डिसेंबरला मी सायरस मिस्त्रीला अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. ‘बी युवरसेल्फ’ असा सोपा कानमंत्र मी त्यांना दिला. मी स्वत: जेंव्हा जे. आर. डीं. कडून सूत्र हाती घेतली तेंव्हा मी त्यांचे अनुकरण केले नाही. ते कधी करताही येत नाही. अर्थात त्यांचा आदर्श सदैव माझ्यासमोर होताच. काळ, वेळ, दोन्ही सारखे बदलत असतात. आपल्याला त्यानुरूप बदलायचं असतं. हां, आपल्या वागण्याची, प्रत्येक निर्णयाची सार्वजनिक चिकित्सा होत असते हे कायम लक्षात ठेवायला हवं. ह्या कसोटीवर शाश्वत गोष्टींनाच प्राधान्य देणं, ह्यावरच आपल्या निर्णयक्षमतेचा कस लागतो किंबहुना हेच निकष आपल्याला कठीण प्रसंगी तावून सुलाखून नेतात, असा साधा सल्ला मी सायरसना दिलाय. अरे हो जयंत, तू एक काम कर. जेंव्हा केंव्हा मुंबईला येशील तेंव्हा त्यांना एकदा भेट. तुझ्याविषयी, तुझ्या काही गुणांविषयी मी त्यांच्याजवळ खूप वेळा बोललो आहे. तेही तुला भेटायला उत्सुक आहेत.’
मला काही बोलायलाच सुचेना. माझा संभ्रम बघून ते म्हणाले, ‘काय झाले? तुला वाटतं तसं काही नाही. आठवड्यातून एक दोन वेळा मी सायरस बरोबर लंच घेणार. त्यांना लागेल ती मदत, मार्गदर्शन मी करणार आहे. हां, पण त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ मुळीच करणार नाही. माझी भूमिका कंपनीच्या एका भागधारकाप्रमाणे असेल. शेवटी डिव्हीडंड किती मिळतो ह्यात मलाही रस आहेच की...!!!’ ते हसत हसत म्हणाले.
‘अरे हो जयंत, माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला तू पाठवलेलं अप्रतिम ग्रीटींग कार्ड मला मिळाले. तुला हे सर्व कसं सुचतं ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. त्यासाठी मन:पूर्वक आभार. मीसुद्धा आता तुझ्यासारखा निवृत्त होतो आहे. निवृत्तीबद्दलचे तुझे भाष्य अतिशय सुरेख आणि प्रोत्साहित करणारे आहे. भेटत जा अधून मधून...!!!’
मी मनातल्या मनात म्हणालॊ, ‘कसंचं कसंचं...!!!’
...... गजर लावूनही न उठण्याबद्दल आई माझ्या नावानं शंख करत होती .......!!!!!!
0 0 0 0 0

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अस मलाही खूप वाटत .. सालं काहीही हातपाय न झाडता एखादे मोठे पद मिळावे.. पण नंतर जाणवते की ते मिळाले तरी टिकवण्यासाठी झाडावे लागणारच.. त्यापेक्षा नकोच ते...
आवडले .. Happy

मस्त Happy