आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 January, 2013 - 11:23

गझल
आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!
इतक्यात नावपत्ता मृत्यू मला विचारी!!

दु:खांमुळेच झालो सोशीक एवढा की,
मी सोसले सुखाचे आघात ते जिव्हारी!

आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू....
नाही मलाच आली घेता कधी भरारी!

होते सुरू अचानक ये-जा तुझ्या स्मृतींची;
जेव्हा मला खुशाली माझीच मी विचारी!

आयुष्य सर्व गेले, शोधीत फक्त जागा....
मरणा! उभाच आहे घेवून मी पथारी!

मथळ्यांवरून येतो अंदाज बातम्यांचा;
वाचायच्याच आधी येते किती शिसारी!

चढवा भले कितीही श्रीमंत साज त्यांना;
कळतेच खानदानी आहेत ते भिकारी!

सोडून चोर संन्याश्यालाच होय फाशी!
अन् राजरोस होती दुर्जन पहा फरारी!!

प्रेमात काय पडलो, जगण्यात रंग भरला!
आयुष्य तेच आहे, न्यारी परी खुमारी!!

मी तोच कालचा, पण, खुर्ची नवीन आहे!
टाळायचे मला, ते येतात आज दारी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होते सुरू अचानक ये-जा तुझ्या स्मृतींची;
जेव्हा मला खुशाली माझीच मी विचारी!

आयुष्य सर्व गेले, शोधीत फक्त जागा....
मरणा! उभाच आहे घेवून मी पथारी!

मथळ्यांवरून येतो अंदाज बातम्यांचा;
वाचायच्याच आधी येते किती शिसारी!<<<

आवडले.

'सन्याश्याने' यतीभंग केलाय

वाहवा एकूण एक सारेच्या सारे शेर अप्रतिम (कोणी काहीही म्हणो) !
महत्वाचे मुद्दे अगदी सोप्या शब्दात सांगितलेत,
वेगळ्या विवेचनाची कोणास गरज भासेलसे वाटत नाही.

धन्यवाद भूषणराव!
सन्याश्याच्या शेरात यतीभंग झाला आहे<<<<<<<त्रिवार कबूल!
भूषणराव, खूप हातपाय मारूनही होणारा यतिभंग जाणवत असूनही वृत्तात टाळता आला नाही!
आपल्याला काही सुचते का पहाल का? (खयाल शक्यतोवर तोच ठेवून)
..........प्रा.सतीश देवपूरकर

संपूर्ण गझल आवडली
भरारी ,विचारी ,शिसारी ,सर्वाधिक आवडले

तुमची गझल वाचताना .....अशी सवय नसल्याने फक्त... यतिभंग जरासा खटकतो इतकेच बाकी तसा काही फरक पडत नाही (माझे वैयक्तिक मत)

आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!
इतक्यात नावपत्ता मृत्यू मला विचारी!!

प्रेमात काय पडलो, जगण्यात रंग भरला!
आयुष्य तेच आहे, न्यारी परी खुमारी!! << खास !

होते सुरू अचानक ये-जा तुझ्या स्मृतींची;
जेव्हा मला खुशाली माझीच मी विचारी! >>> व्वा सुंदर शेर

मथळ्यांवरून येतो अंदाज बातम्यांचा;
वाचायच्याच आधी येते किती शिसारी! >>> हा पण आवडला

आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू....
नाही मलाच आली घेता कधी भरारी! >>> मज च्या जागी अन् चालेल असे वाटले

नेहमीप्रमाणेच सफाईदार गझल