असतोस रुसल्या सारखा

Submitted by निशिकांत on 28 January, 2013 - 23:31

आरशाला मी न दिसलो
केंव्हाच हसल्या सारखा
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

प्राक्तनी का चकोराच्या
वाट बघणे फक्त असते?
जे हवे ते उंच गगनी
मृगजळासम दूर दिसते?
चंद्र त्याला या जगी का
असतोय नसल्या सारखा?
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

सावलीलाही, उन्हाच्या
भोगतो आहे झळांना
आड हसर्‍या चेहर्‍याच्या
लपवितो दुखर्‍या कळांना
खोल जखमा, दावतो मी
खुशहाल असल्या सारखा
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

प्रेम केले, मी फुलांच्या
भोवती रेंगाळतो
चुंबताना पाकळ्यांना
अंतरी गंधाळतो
मी जगाला का दिसावा
काट्यात फसल्या सारखा?
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

संकटे घोंघावण्याचा
आज माझा काळ आहे
यत्न करुनी घातलेली
मी यशाची माळ आहे
वाटतो का गौरवाचा
इतिहास पुसल्या सारखा?
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा निशी सर! मस्त फील आहे कवितेचा... जरा उदास पण तरीही वाचताना पकड न सुटणारे काव्य..
मजा आली

सावलीलाही, उन्हाच्या
भोगतो आहे झळांना
आड हसर्‍या चेहर्‍याच्या
लपवितो दुखर्‍या कळांना
खोल जखमा, दावतो मी
खुशहाल असल्या सारखा
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?>> खासच आवडलं हे कडवं!!!

जीवना माझ्यावरी>> असे कराल का, टायपो झालाय बहुधा सगळीकडे!