कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 January, 2013 - 22:08

गझल
कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!
हे समजण्या एवढे मजला कुठे व्यवधान होते?

गरजणा-या त्या विजांनाही अता माहीत झाले....
की, पुन्हा उमलून फुलण्याचे मला वरदान होते!

मी न गेलो सिद्ध करण्यास्तव कधी अस्तित्व माझे;
हे चराचर जाणते की, काय माझे स्थान होते!

मी तुला भासू दिले नाही कधी नजरेत माझ्या;
वेदनांचे माझिया हृदयामधे थैमान होते!

वाटले त्यांना जणू आकाश झाले मालकीचे!
खुद्द चंद्राशी जणू त्यांचे म्हणे संधान होते!!

वेंधळा मी, चालण्यामध्येच इतका गर्क झालो;
गाव माझे येवुनी गेले, कुठे मज भान होते?

उंदराला मांजराने साक्ष द्यावी त्याप्रमाणे.....
एक म्हटला छान की, सगळेच म्हणती छान होते!

जो मला भेटेल त्याला वाटले काळीज माझे....
मी कसे मागू परत, ते मी दिलेले दान होते!

कावळ्याने काय एका सूर धरला, तोच सा-या...
कावळ्यांना वाटले ते कोकिळेचे गान होते!

मानसन्मानांमधे झिंगायचा हा पिंड नाही!
माझियासाठी कशाचे मान अन् अपमान होते!!

हाक केव्हाही मला तू द्यायची होतीस मृत्यो!
मी सडा होतो, कुठे माझे असे सामान होते?

पाहिले मी ते मणी एकाच माळेतील होते!
मी कसा लागेन नादी? लोक ते नादान होते!!

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावळ्याने काय एका सूर धरला, तोच सा-या...
कावळ्यांना वाटले ते कोकिळेचे गान होते!

कावळे दादा हा शेर तुमच्यावरच आहे बरका .............मागे एकदा नाही का तुम्ही तीळ -बी ळ वाली गझल चौर्यकर्म असल्याचे दाखवून दिलेत व लगेच सर्व प्राध्यापक-द्वेष्ट्या लोकांनी काय गहजब माजवला होता अन काय तो कलहप्रेमीजनांचा घोळका जमला होता !!

आठवतय का काही ????................

Lol

भूषणराव!
अहो किती लिहिणार आहात प्रोफेसर?<<<<<<<<<<<

तेवणे होतो गुन्हा? मी होय हा केला गुन्हा!
एक मी कंदील होतो, काजळावे लागले!!

विजयराव!
जेवढ्या गझलांनी मागची ३० वर्षे गाजवली तेवढे...<<<<<<<<<<<,

कोमेजलो, उमललो, कोणास काय त्याचे?
मी रानफूल! माझ्या जवळून कोण गेले!

ही आहे आमची परिस्थिती! कसले आले गाजवणे अन् कसला आला गाजावाजा!

वेंधळा मी चालण्यामध्येच .>>>>>.............मलाही हाच शेर खूप आवड्ला होता , त्या कावळ्याच्या शेराने लक्ष वळवले
सांगायचेच विसरलो होतो ....हेच सांगायला अलो होतो
Happy

सतीशजी,

कोणाला काय म्हणायचे म्हणू दे... तुम्ही हलू नका. या गझलेवरून तुम्ही थोडे हलल्यासारखे वाटत आहात.

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

हा शेर आवडला.

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

चांगला आणि प्रामाणिक शेर वाटला.

सतीशजी:
मला वाटतं थोडं सबुरीने गझल पोस्ट केल्यातर वाचकांनाही उसंत मिळेल आणि गझलेलाही न्याय.
निर्णय तुमचाच.