किल्ले "निमगीरी"

Submitted by Yo.Rocks on 27 January, 2013 - 21:52

भाग १ : "हडसर" सविस्तर..

एकाच दिवसात असे दोन गड चढून उतरण्याची माझी पहिलीच वेळ.. वळणावळणाचा रस्त्यावरुन एकेक गाव मागे टाकत ज्यात पेठेची वाडी हे गाव पण आले) आम्ही निमगीरीजवळ पोहोचलो... रस्ता विचारत शेवटी पायथ्याला असणार्‍या "खांडीचीवाडी" या गावात पोहोचलो.. मूळ डांबरी रस्त्याला फाटा देत एका कच्च्या रस्ता अगदी सरळ निमगिरीच्या दिशेने जातो.. आम्ही वाडीत आलो नि लक्षात आले की हाच रस्ता पुढे पकडला तर अगदी गणेशखिंडीनंतर लागणार्‍या मुख्य रस्त्याला जाउन मिळणार !!

असो.. भर उनात सुमारे दिडच्या सुमारास आम्ही निमगीरी कडे कूच केले.. प्रथमदर्शनी हा किल्ला पण 'हडसर' सारखा दोन डोंगरांची जोडीच वाटते... चढाईला स्रुरवात करताना आम्ही त्या वाडीतील दोन लहानग्यांना रस्ता दाखवायच्या निमित्ताने सोबतीला घेतले.. पाठीवर उन घेउन चालायला सुरवात केली.. 'निमगीरी' चा तो काळा चकचकीत पहाड नि तेसुद्धा भरउनात चढायचे यागोष्टीमुळे आमच्या सौ. चे मनोधैर्य खचलेच.. पण जाउ सावकाशीने म्हणत चालते केले.. शिवाय आम्ही उजवीकडच्या पहाडावरच जाणार होतो.. डावीकडच्या डोंगरावर विशेष काही बघण्यासारखे नाही असे गावकर्‍यांकडून क़ळले होते...

प्रचि १:

सुरवातीची वाट ही झाडांच्या जंगलातून जात असल्याने सावलीची सोबत मिळत होती.. पण एकदा घळ चढायला घेतली की उनात चढताना घामटा निघणार होता... पण सुदैवाने आकाशात ढग जमले आणि उनसावलीचा दिलासा मिळाला.. चढताना आमच्यामागोमाग आलेले अजुन एक छोटे उत्साद आपणहून आमच्यात सामिल होउन चक्क गाईड करू लागला ! विशेषत आमच्या सौ. ना.. 'ताई आस्ते आस्ते.. घाई करु नका.. पोचलो आता' इति इति

जवळपास घळीच्या जवळ पोहोचलो तर उजवीकडे कोरलेल्या पायर्‍या दिसल्या.. वेळीच त्या छोटया उत्सादाने त्या पायर्‍या मध्ये तुटलेल्या आहेत.. मातीचा घसारा आहे इत्यादी सूचना दिल्या.. पाउलवाट आणि ही पायर्‍यांची वाट पुढे एकत्र येतात असे कळले... नि मग त्या वाटेने जाण्यास आमच्यातील रो.मा आणि अस्मादिक तयार झालो.. दोनतीन पायर्‍यानंतर चार-पाच पायर्‍या गायबच आहेत.. पुढे मातीचा घसार्‍याजवळ मात्र थोडे जपून चढावे लागले.. आमची चढाई सुरु असताना खालून मोठयाने कल्लोळ करत अगदी वानरांच्या गतीने लहान मुलांचा ग्रुप येताना दिसला.. दिसला काय दहा पंधरा मिनीटांत पोहोचला.. नि त्यांनी पण चक्क पायर्‍यांचीच वाट धरली.. बरं चढताना पण 'काळजी गेली खडडयात' या अ‍ॅटीटयूडने बेशीस्तपणे चढत होते.. फारसे नसेल पण १०-१२ वयाची पोर होती.. एकाला त्यांच्या शिक्षकाबद्दल विचारले तर येताहेत मागून म्हणत पुढे उडया मारत गेला !! मागच्याच महिन्यात सुधागडला भेटलेला अगदी शिस्तीतला ग्रुप आणि हा अगदी विरुद्ध उद्धट धाटणीचा ग्रुप.. दोन्ही पुण्याचे.. या ग्रुपचे नाव कळले 'ज्ञान प्रबोधनी' !

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४: खालून लहान मुले चढताना

या कल्लोळात आमच्या सौ. घळीवर येउन पोहोचल्या पण मानसिक धैर्य खचल्यामुळे वरती यायला तयार नव्हत्या.. शेवटी छोटया उत्सादाने 'ताई, ताई' करत आणलेच वरती.. Lol घळीतून येणारी वाट आणि पायर्‍यांची वाट जिथे एकत्र येते तिथून शेजारच्या डोंगरावरील पायर्‍या छान दिसतात.. बाजूचा परिसर पण देखणाच..

प्रचि ५:

इथून मग हडसरसारख्या पाषाणात कोरलेल्या सात-आठ मोठया पायर्‍या लागतात नि थेट आपण वरती येतो.. इथे देखील तसे बघण्यासारखे काही विशेष नाही.. एक छोटे छप्परवजा देउळ, पाण्याच्या टाक्या (पिण्यास अयोग्य) आहेत.. नि एका कडेला अस्वच्छ गुहा आहे ज्यात खोली पण आहे.. पावसात म्हणे गुरांना इथेच आणतात.. रात्री गुराखी मग इकडेच झोपतो.. या गुहेच्या समोरुन सिंदोळा आणि त्याच्या पलिकडे हरिश्चंद्रगडाची डोंगररांग मस्त दिसते... खरेतर निमगीरीवरुन सभोवतालचा सगळाच परिसर छान नजरेस पडतो..

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९: हरिश्चंद्रगडाकडे तोंड करुन उभा आमचा मावळा..

फिरताना त्या ज्ञान प्रबोधनीचा त्या पोरांचा दादा/ कोवळा गुरु मला विचारु लागला की वरती येण्यास ती पायर्‍यांची एकच वाट आहे का..?? त्यांच्यात मोठा माणूस कोणी दिसलाच नाही.. खरंच धन्य होता हा ग्रुप.. 'मुख्य माणूस मागे.. पोरं पुढे.. बरं जो पुढ होता तो पण कोवळाच.. अगदी पोरगाच त्याला साधी मिशी पण फुटली नव्हती.. फाजिल आत्मविश्वास मात्र दिसत होता.. 'बाकीच्यांना बघायचे नाही.. आपण जातोय त्या वाटेने येउंदेत धडपडत' असे काहितरी चित्र होते ! अश्याठिकाणी पाठवणार्‍या पालकांना या परिस्थितीची थोडीतरी जाणीव असेल का.. की ती पोर पोरं मिळून एकत्र आली होती ?

आमच्यासोबत आलेल्या लहानग्यांसोबत खादाडी करुन आम्ही लवकरच गड उतरायला घेतला.. तो छोटा उत्साद तर अगदी एका पारंगत गाईडप्रमाणे बोलत होता.. त्या तिघांमध्ये ह्याची हुशारी दिसून येत होती.. . त्याच्याशी गप्पा करताना मजा येत होती.. त्याला ऐकू मात्र कमी येते..

प्रचि १०:

उतरायला घेतले नि पुन्हा तो ज्ञान प्रबोधनीचा ग्रुप अक्षरक्षः धावत गड उतरायला लागले.. पुढे धावणारे सगळे सशे होते.. तर कासवलोक्स मागे होते.. हे सशे बेफामपणे उतरत होते.. जिथून मिळेल तिथून उतरायला बघत होते.. मग दगडांचा धिगारा खालच्यांवर कोसळेल वा स्वतः पडून हात वा तंगडं मोडायच असे काहीएक त्यांना वाटत नव्हते वा सांगणारे नव्हते.. एकेठिकाणी एक जण धडपडला.. त्याला चांगलेच सुनावले.. पण उत्तर उद्धटच मिळाले..

चारच्या सुमारास आम्ही खाली पोहोचलो.. लहानग्या सोबत्यांना चिकीची पाकीटे आणि खाऊसाठी पैसे देउन खुष केले...फोटो वगैरे घेतला.. नि गाडीत बसलो.. तो उत्साद मात्र पुन्हा आला.. मोबाईल नंबर लिहून मागितला.. पुन्हा या.. सांभाळून जा असे अगदी मोठ्या माणसाप्रमाणे सल्ले दिले.. ! त्याल कोणी शिकवले असेल नसेल.. पण त्याने जे काही गुण आत्मसात केलेय ते कौतुकास्पद होते.. त्याला फोटो पाठवण्यासाठी त्याचा पत्ता लिहून घेतला.. सचिन साबळे त्याचे नाव.. 'ह्याने जर प्रगती केली.. शिकला वा नेता बनला तर इथे नक्कीच डांबरी रस्त्ता होईल' असे काहितरी पुटपुटत इंद्राने त्या मातीच्या कच्च्या रस्त्यातून मढगावाच्या दिशेने गाडी हाकली.. Proud

प्रचि ११: आमचे सोबती !

रस्ता अगदी डिंगडाँग आहे.. पण मस्त शॉर्टकट आहे.. थेट आता गणेश खिंडीला जाउन मिळणार होतो.. ५०किमीचा फेरा वाचला होता.. इथून पाठमोरा दिसणारा निमगीरी मात्र वेगळाच दिसत होता.. मागच्याच वर्षी सर केलेला 'सिंदोळा' किल्ला तर अगदी दिमाखात उभा होता...

प्रचि १२:

पावसात या रस्त्याचे स्वरुप काय असेल हे विचार करवत नाही.. पण परिसराचे स्वर्गात रुपांतर नक्कीच झालेले दिसेल याची खात्री वाटत होती.. सो नेक्स्ट टाईम पावसात फेरी !

तो कच्चा रस्ता पुढे डांबरी रस्त्याला येउन मिळाला नि काही मिनिटांतच आम्ही आदल्या रात्री चुकलेल्या फाटयाच्या तोंडावर आलो.. ! दिव्याचा खांब नाही तर तो फाटा मध्यरात्री दिसेलच कसा.. तिथेच मग 'चहा-वडापाव' चा भरपेट कार्यक्रम पार पाडला नि गाडी माळशेज घाटात शिरली..

प्रचि १३:

पावसात एरवी ढगांच्या चादरीत गुंडाळलेले सह्याद्रीकडे आता मावळतीच्या सोनेरी उनात लखलखत होते.. अशावेळी ट्रेकरमंडळीच्या पंढरपुराकडे कोण नाही बघणार... जय हरिश्चंद्रगड _/\_ Happy

प्रचि १४:

घाटातून जाताना मावळतीच्या सुर्याचे दर्शन बहुरुपी होते.. कधी घाटमाथ्यावरून डोकावतोय.. कधी डोंगरकडयांवर रुळतोय तर कधी झाडांच्या दाटीमागे लपतोय.. ..

प्रचि १५: भैरवगडाच्या डाईक भिंतीच्या डोईवर रुळणारा मावळतीचा सूर्य

एकंदर आता परतीचा प्रवासही या माळशेज घाटामुळे सुखावह ठरला होता.. काल परवा पर्यंत मनात नसलेले गड आज करुन परतलो होतो.. वर्षाची सांगता अश्या मस्त मस्त ट्रेकमुळे झाल्याने अगोदरचा 'पुर्वनियोजीत ट्रेक' फसल्याचे दु:ख कधीच विरुन गेले होते..नि खरंच किल्ले बांधणीचे काही उत्कृष्ट नमुने बघायचे तर 'हडसर' 'निमगीरी' या आडवाटेवरील किल्ल्यांची वाट जरुर धरावी.. जागतिक आश्चर्य अजुन एकही पाहिले नाही पण सह्याद्री डोंगररांगेतील अशी आश्चर्य बघायला मिळणे हीच आमच्यासाठी नशिबवान आणि अभिमानास्पद बाब !

आता बघू पुन्हा कुठेतरी आडवाटेच्या शोधावर.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच सुंदर.
तुझ्याबरोबर आमचीही गड सफारी होऊन जाते प्रकाशचित्रांच्या माध्यमातून. Happy

व्वा, काय सुरेख वर्णन करतोस रे..... अगदी तुझ्याबरोबर तिथे वावरतोय असे वाटत होते....
सर्व प्र चि ही मस्तच ......

मस्तच रे. Happy
पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीची पोरं एकदा दुर्गा टेकडीवर पण भारीच कल्ला करताना दिसली होती.
कानात वारं शिरलेली वासरंच जणु... Happy

मस्त Happy

प्रकाश चित्रे आणि वर्णन (नेहेमीप्रमाणेच) एकदम मस्त!

रच्याकने - आम्हाला देखील राजगडावर ज्ञानप्रबोधिनीची ७वी तली मुले (सर्व वर्ग) भेटली होती. ती सर्व जण त्यांच्या दोन तीन दादांबरोबर आली होती. हे दादागण म्हणजे ज्ञानप्रबोधिनीतून बाहेर पडून दोन-तीन वर्ष झालेली मुलेच आणि हे सर्वजण रात्रीत गड चढून आले होते. त्या सर्व मुलांच्या घरच्यांना हे (म्हणजे इतका मोठा ग्रुप ह्या अशा दादाच्या भरोश्यावर जाणार आहे) माहीती असेल का? असा विचार आमच्याही मनात आला होता. मात्र मुले शिस्तबध्द / वेल्-बिहेव्ह्ड म्हणावीत अशी होती.

मस्त रे यो! तुका पयल्या वाढदिवसाचे शुभेच्छा!! Happy
मस्त प्रचि..अन मस्त लेख.. मलाही ज्ञान प्रबोधिनीची मुलं मागे एकदा हरिश्चंद्रवर कोकणकड्यावर भेटली होती. पण मला त्यांच्याशी गप्पा मारतांना खूप मॅच्युअर वाटलेली.. म्हणजे त्या परिसरातल्या भूगोलाचं ज्ञान, इतिहास, किल्ल्यांवर कांय करु नये, इतिहासाचा वारसा कसा जपावा वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.. तुला भेटलेली मुलं वासरंच असतील रे!.. पण काळजी घेणारं हवं बरोबर हे मात्र खरं!!
... आता सातमाळची वाट पहातोय.... Happy

यो.हा भाग ही मस्त.. Happy वर्णनाबरोबर फोटो पाहताना फारच मजा येते..
पयला वाढदिवस.. वॉव.. सो फास्ट.. काँग्रॅचुलेशन्स!!! Happy

मस्त रे .. भारी लिव्हलयस...
मुकादम .. सुकादम .. Happy

धन्यवाद Happy
हेम, वर्षूताई.. शुभेच्छांबद्दल धन्यवाद
वर्षूताई.. व्हेरी फास्ट Wink
हेम.. सातमाळा ल व क र च