अनुनय

Submitted by अज्ञात on 24 January, 2013 - 23:46

असतात रंग ढंगहि वेडे
झरतात छटा रत रुधिराच्या
हृदयात बंदिशी अनोळखी
डोळ्यांकाठी रति भावुकशा

खल मदन उरी रण रिपुकांचे
ओठांवरती नित शब्द मुका
काया माया बहु काटेरी
ओढाळ मती अस्वस्थ सखा

चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परी आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा

सारेच कसे हे अवरोही
तळ नितळ सकळ ढवळे गात्री
आभाळ दूर दूरच सरके
मग श्वास फिरे नत माघारी

डोहात बंद अगणित रात्री
गंधर्व क्षणांच्या गंध कुपी
अस्पर्शधुंद हा ओलावा
अनुनय समिधांचा मापारी

........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परी आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा
व्वा..!

लय आणि शब्दकळा छानच.

शब्दांचा अर्थ लावावा तर कवितेचा अर्थ लागत नाही असे होते तुमच्या कविता वाचताना.
प्रत्येक कडव्यात वेगळा अनुभव असतो.

... तुर्तास शब्द रचना आवडली म्हणेन कविता कळाली की कळवेन.

...एक फुटकळ प्रश्न...

"सहज समजेल असे लिहले की त्याला कविता म्हणत नाहीत का तुमच्याकडे?"

..............शाम

व्याकुळता जाणवली. कदाचित कुणा प्रणयोत्सुक जीवाची तगमग असावी.

एक शंका : चंद्रास न कळते झिजलेले
झिजलेले का ? अर्थबोध होत नाही.
( इथे चंद्राकडे समुद्राच्या पाण्याचं झेपावणं ही प्रतिमा वापरली आहे का ? )

शाम,
"सहज समजेल असे लिहले की त्याला कविता म्हणत नाहीत का तुमच्याकडे?" Happy

माझी, "कवितेची" अशी कुठलीच व्याख्या नाही. ती, "तत्काळ जाणवलेली अथवा त्या क्षणी जगलेली" अवस्था असते जी स्वतःहून शब्दात व्यक्त होते. "सोपं अथवा कठीण" हे ज्याला सांगायचंय त्याच्यासाठी ठरवून लिहितांना शक्य असतं असं मला वाटतं. उदा.- प्रेमगीत, मंगलाष्टक, बालगीत, भोंडला, मंगळागौर, हळद, मेहंदी, सहलीची गाणी, शुभेच्छा, नट्यगीत, स्तुतीस्तोत्र, प्रशस्तीपत्र अथवा तत्सम. या माझ्या मानण्यावर मतभेद असू शकतात म्हणून मी सर्वांचा मतधिकार तटस्थपणे स्वीकारतो. असो. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. Happy

सहेलि,
कुणाला कोडी घालायला नव्हे तर मला पडलेले प्रश्न मांडायला आवडतात. Happy

विस्मया,
चंद्र आपल्याला कले कलेने झिजलेला दिसतो ह्याची त्याला कल्पना नसते करण त्याचे सवयीनुसार नित्य व्यवहार चालूच असतात. सागराच्या जलाशयाला झालेली संवेदना मात्र दृष्य प्रकटहोते. Happy

अ. अ. जोशी आणि जाई आपलेपण आभार Happy

हेवा वाटण्याजोगे शब्दवैभव दिसते तुमच्या कवितेत. अर्थ मात्र अजून समजलेला नाही. पुन्हा वाचून पाहतो.

बेफिकीर,
"हेवा वाटण्याजोगे शब्दवैभव दिसते तुमच्या कवितेत." असं आपण याआधीपण कौतुक केल्याचं लक्षात आहे परंतु, आपल्या "अर्थ मात्र अजून समजलेला नाही" ह्यावरचा उपाय मला सुचत नाहीये. खरा हा भावनांचा जीवघेणा खेळ आहे. साचलेले यथायोग्य शब्द त्याचं समर्थन करू पहात असावेत. आपले मनःपूर्वक आभार Happy

@विस्मया , मी अत्यंत गमंतीने तो प्रश्न विचारला होता ज्याचे तितकेच संयंत उत्तर अज्ञात यांनी वर दिलेच होते. मग आपल्या ज्ञानज्योती पाजळण्याचे कारण समजले नाही. असो त्याचेही स्वागत आहे.

तर आपले काही मुद्दे-

१)प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगवेगळी असू शकते.....>>> मुळात कविता हे अभिव्यक्तीचेच एक माध्यम आहे. सरळ, गूढ आदी भानगडी कवीच्या शब्द वैभवावर झालेल्या संस्काराचे द्योतक असतात. काव्य हे जाणीव पुर्वक निर्माण केले जाते तरीही भाव किंवा अनुभवांशी प्रामाणीक शब्दसंयोजनच काव्याला चैतन्य देत असते. नुसतेच शब्दबंबाळ कोणत्याही वर्गाच्या रसीकास नेहमीच न पटणारे असते.

एखाद्या स्त्रीने खूप सुंदर वस्त्रे घातली आणि त्यात तिचे स्व्तःचे सौंदर्य दिसून येत नसेल तर बघणारा केवळ.. तुझा पोषाख चांगला आहे म्ह्णेन मात्र तुला हा पोषाख शोभून दिसतो असे तेंव्हाच म्हणता येते जेंव्हा तीने योग्य वस्त्रांची निवड केलेली असते. असेच कवितेचे असते आशय अनुभूतीला साजेशी शब्दरचना नसेल तर कविता कोडे बनून रहाते किंवा हस्यास्पद ठरते.

२)एखादा कवी प्रतिमांचा वापर कसा करतो हे त्याचा काव्यप्रवास अभ्यासल्यावर कळून येतं>>> भात शिजला आहे की कच्चा हे कळायला तो चिवडावा लागत नाही हे आपणास ठाऊक असेलच.

३)पण कुणी कसं व्यक्त व्हावं हे त्याचं स्वातंत्र्य अबाधित रहावं, त्या अभिव्यक्तीचा आदर केला जावा>>> कवी प्रथम स्वतःसाठी लिहीत असतो त्यामुळे असे लिहू नये किंवा असेच लिहावे ही बंधने त्यावर असण्याचे किंवा लादण्याचे कारणच नाही. आणि आदराचे म्हणाल तर अज्ञात यांच्या रचना मी आवर्जून वाचल्याचे पुरावे त्यांच्या लेखन धाग्यात आपल्याला मिळतीलच.

वरील सर्व मते माझीही वैयक्तिकच आहेत...

धन्यवाद!