सठीयाय गयी सजनवा हमार

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तसे मला चित्रपट खूप आवडतात. त्यामूळेच का होईन आयुष्यात एकदा तरी एखादी लव स्टोरी का काय म्हणतात ना तस घडावी असे वाटते.

म्हणजे अश्याच एका रोमँटीक सकाळी जाग यावी ती सुर्यकीरणे का काय ते आंगावर पडून, मस्त आळोखे पिळोखे देत जाग व्हाव. अंगभर गोड लहरी पसराव्यात अंगभर आन्हिक आटपून उंडरायला बाहेर पडाव. रस्त्यावर चीट पाखरू नसाव (चीट नसल तरी चालेल पाखरू मात्र असाव) समोर च्या रस्त्यावरून माझी गुलबकावली एका हाताने गवताच्या काड्या चघळत व दुसर्‍या हाताने केसाची शेपटी घोळवत येत असावी. मध्येच वाटेत तिने एखाद सुंदर फूल तोडाव नाहीतर एखाद्या मांजराची मिशी ओढत याव. कुण्या एका म्हातार्‍याला किंवा म्हातारीला रस्ता ओलांडून द्यावा. आणि अचानक माझी आणिक माझ्या गुलबकावलीची नजरा नजर व्हावी आणि प्रेम फुलाव , बहराव इत्यादी इत्यादी (तुम्ही काय ते समजून घ्यालच)

पण चित्रपटातल्या गोष्टी चित्रपटात असतात.

प्रत्यक्षात मी आमच्या एका खोलीतल्या घराच्या पोटमाळ्यावर झोपतो. त्यामूळे अगदी दुपार पर्यंत मला सुर्य दर्शन होत नाही. पण सुर्या आणि किरण ही माझी दोन भाचर अंगावर कोसळतात त्यामुळे सुर्यकिरण आंगावर न पडता प्रत्यक्ष सुर्यच आंगावर येऊन कोसळतोय का काय अश्या अनूभूतीत मला जाग येते. भाचरांना झटकून आळोखे पिळोखे दिल्यावर एक हात भिंतीवर आणि दुसरा हात छतावर आपटतो त्यामूळे गोड लहरी न पसरता विद्युत लहरी पसरतात अगदी कोपरा पासून ढोपरा पर्यंत. मग ताँड घासून, बदाबदा पाणी ओतून गदागदा आंग घासून, मी यशवंतराव झिंगुर्डे उंडरायला बाहेर पडतो. माझ नाव यशवंतराव असल तरी माझ कुठचही प्रतिष्ठान नाही , अगदी साधी प्रतिष्ठाही नाही. स्वतःला यशवंतराव म्हणणारा मी एकटाच. दुरचे मित्र मला यशवंत्या म्हणतात. जवळचे मित्र मला यश्या म्हणतात आणि घरचे मला यश्या गाढवा म्हणतात, आणि गाढव माझा अनूल्लेख करतात.

तशी मला संगीताची आवड आहे. मागे मी 'अभिमन्यूज गिटार' ह्या क्लास मध्ये गिटार शिकण्यास गेलो होतो. अभिमन्यूसरांनी मला गिटार कशी धरावी ते सांगून आणि सहा तारांतला फरक समजावून आणिक नोटेशंस समजावून मला वाजविण्यास दिली. माझा कॉन्फिडंस तसा वाढलेला. मी अति-उत्साहात म्हणालो यादोकी बारात मधल 'चुरा लिया है तुमने जो दिल तो' वाजवणार.तो म्हणाला वाजव. मी दोन मिनीट शांतता पाळली तस तो त्या झनक झनक पायल बाजे मधल्या संध्या सारख म्हणाला 'रुक क्यु गये बजावो ना' मी लगेच महिपालाच्या भुमिकेत शिरलो आणि त्याला विचारल 'चु' कुठून वाजवायचा. तसा तो पहिला स्तब्ध झाला, मग शांत झाला मग हतबुद्ध झाला आणिक मग त्याने माझी बारात अभिमन्यू क्लासेस च्या बाहेर काढली.

असो पाल्हाळ खुप झाल तर मी असाच एकदा भटकायला बाहेर पडलो. थोड्यावेळ उंडरल्यावर समोर बघतो तर काय. माझी स्वप्नातली गुल्बकावली प्रत्यक्ष्यात समोर उभी होती. ती कुठेतरी शुन्यात बघत होती. थोडया जवळ जाऊन बघीतल तर ती शुन्यात बघत नसून माझ्याकडेच बघत होती. माझ्याकडे बघून ती मंदशी हसली. मी ही मंद हसलो. दोघांचे ' हसले आधी कुणी तू का मी , तू का मी ' आळवून झाल्यावर ती माझ्या जवल आली आणि म्हणाली तू अमूक अमूक कॉलेजात शिकतोस का. तर म्हणलो हो. (वास्तविक त्या कॉलेज मध्ये मी शिकत नव्हतो पण कॉलेजा बाहेरील पानपट्टीवर मी कुचाळक्या करीत उभा असायचो.) ती म्हणाली मी पण त्याच कॉलेजातली.

मी प्रिती साबणे मला सगळे पी एस म्हणतात. तसा मी म्हणालो मी यशवंत झिंगुर्डे मला सगळे वाय झेड (मी जीभ चावली)आम्ही स्वतःचे हात स्वतःत गुंतवून भटकायला बाहेर पडलो. तसा समोरन एक कुत्रा जोरजोरात भुंकत आमच्या आंगावर आला. गुलबकावली किंचाळली. मी लगेच माझ्या तोंडातली किंचाळी दाबून ठेवली. मला कुत्र्यांची फार भिती वाटते हो. थोडावेल आमच्यावर भुंकून तो कुत्रा आमच्या वाटेतन दूर झाला आणि क्षमाशील दृष्टीने आमच्या कडे बघू लागला. मग शेपटी हलवू लागला. कदाचित ह्या वर्षी अधिक भाद्रपद लागल्यामुळे खुशीत असवा. शक्य असत तर त्याने शीळ वाजवून मला डोळा मारला असता.

आम्ही भटकत भटकत रुपम चित्रपट गृहाकडे आलो. आपण चित्रपट बघायचा का गुलबकावली विचारती झाली. मी खिश्यातल्या पैशांचा अंदाज घेतला आणि हो म्हणालो. समोर एका स्क्रीन वर बॅटन बॅटन मॅन असा काहीसा मारधाडीचा ईंग्रजी चित्रपट लागलेला. पण त्यातले सर्व कलाकार भारतीय होते. मी गुल्बकावलीला सांगितल मला ईंग्रजी चित्रपट आवडत नाहीत. तशी ती खदा खदा हसायला लागली आणि म्हणाली ईंग्रजी कुठाय हिंदी चित्रपट आहे जुना गाजलेला ' बातो बातो मे' मी ओशाळा का काय तो झालो.

दुसर्‍या स्क्रीनवर कुठलासा मैथीली का भोजपूरी चित्रपट लागलेला. चित्रपटाच नाव होत ' सठीयाय गयी सजनवा हमार' मला नावाची मोठी गम्मत वाटली. व्याकरणाच अगदी शिक्रण झालेल होत.सजनवा जर पुरुष असेल तर गयी कस काय गया असायला पाहीजे ना. सगळीच गम्मत.

चित्रपटाच पोष्टर सुद्धा गमतीदार होत . पोस्टर वर जवळ जवळ प्रत्येक पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल होत. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर खुनशी भाव होते. ज्या पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल नव्हत ती चित्रपटाची हीरवीन होती. आणि ती कसर तीने लाल भडक लीपस्टीक फासून भरून काढली होती.

चित्रपटगृहाच्या तीकिट खिडकीवर एक त्या चित्रपटातूनच उचलून आणलेल्या पात्रासारखा एक मनुष्य बसला होता. तो नाक पुड्यात बोट घालून घालून टेलीफोन (डायल वाला) फिरवत होता आणि फावल्या वेळात (त्याच हाताने) तिकीट फाडत होता. आमचा नंबर आल्यावर तो उठून गेला. कदाचित त्याला इच्छीत टेलीफोन नंबर लागला असावा. जाऊन तो बुकींग फुल्ल ची पाटी घेऊन आला आणि खिडकी बंद केली. अरेच्या हे भोजपुरी चित्रपट बरे हाऊस फुल्ल होतात आमचे मराठी चित्रपट मात्र काही अपवाद वगळता व्यवसाय करत नाहीत. बातो बातो मे सांगायच तर ' बातो बातो मे' आधिच सुरू झालेला त्यामुळे त्याचे तिकीट मिळायचा प्रश्नच नव्हता.

आम्ही चित्रपटाच्या बाहेर एका चहाच्या टपरी वर आलो आणि मस्त पैकी चहा आणिक वर नान कटाई आणिक खारी खाल्ली आणिक सरळ बागेत जाऊन बसलो. बागेत शाळेतला एक मस्तवाल कार्टा तळहात हलवत शी शी अस काहीस म्हणत आला. मला वाटल ही बाग त्या साठीच वापरतात का काय. पण आमच्या जवळ येऊन तो ' शी शी शी शीला शीला की जवानी' आस काहीस ओरडून गेला आणिक माझी मात्र 'कोनशीला' झाली.

बागेत थोड्यावेळ गप्पा करून आम्ही दोघ निघालो ते परत भेटण्याचा वायदा करून. घरी परत आलो तर सुर्या आणि किरण माझी भाचर कुठल्याच्या चॅनेलवर गाण बघत होती आणि जोडीला नाचत होती गाण होत ' सठीयाय गयी सजनवा हमार, रेशम का कुर्ता ओर होठ लाल लाल'
*****************************************************
समाप्त

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद : विशाल आणिक प्रसाद

वैभव : असेल हो. नक्की माहीत नाही (कदाचित माझ्याच व्याक्रणाच शिक्रण झाल असेल)

थिएटर व भोजपुरीचा किस्सा जबरी. बाकी ठीक ठीक Happy

ज्या पात्राच्या नाका तोंडाला रक्त लागलेल नव्हत ती चित्रपटाची हीरवीन होती. आणि ती कसर तीने लाल भडक लीपस्टीक फासून भरून काढली होती.>>>
एक त्या चित्रपटातूनच उचलून आणलेल्या पात्रासारखा एक मनुष्य बसला होता. >> Lol

मस्त लिहिलयं.
माझी गुलबकावली एका हाताने गवताच्या काड्या चघळत व दुसर्‍या हाताने केसाची शेपटी घोळवत येत असावी. >>> आअधी वाटलं एखाद्या म्हशीविषयी लिहिताय का ? Proud
जवळचे मित्र मला यश्या म्हणतात आणि घरचे मला यश्या गाढवा म्हणतात, आणि गाढव माझा अनूल्लेख करतात. >>>> Lol

केदार मजा आली वाचायला.. मला पण श्री सारखंच वाटलेलं.. गवताची काडी चघळणारी एखादी म्हैस वाटली रे तुझी गुलबकावली Proud

केदार स्वप्न णीट पाहात जावं.. म्हशी गवत चघळतात.. गावच्या गोर्‍या ऊस चघळतात ना .. Wink हिंदी शिणुमात हेच दाखवतात..

<<घरचे मला यश्या गाढवा म्हणतात, आणि गाढव माझा अनूल्लेख करतात>> Lol Lol
मी यशवंत झिंगुर्डे मला सगळे वाय झेड (मी जीभ चावली)>>> Lol
समोर एका स्क्रीन वर बॅटन बॅटन मॅन >> Lol Lol
<<शी शीला शीला की जवानी' आस काहीस ओरडून गेला आणिक माझी मात्र 'कोनशीला' झाली. >> केदारा... अशक्य आहेस बाबा .. Lol Lol

आणि त्याला विचारल 'चु' कुठून वाजवायचा. तसा तो पहिला स्तब्ध झाला, मग शांत झाला मग हतबुद्ध झाला आणिक मग त्याने माझी बारात अभिमन्यू क्लासेस च्या बाहेर काढली. >> Rofl