काळीज सोलणारा सारा प्रसंग होता!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 January, 2013 - 11:17

गझल
काळीज सोलणारा सारा प्रसंग होता!
बेरंग माणसांचा तो एक रंग होता!!

पाहून लोक गेले, ना पाहिल्याप्रमाणे......
मदतीस एक माझ्या आला अपंग होता!

नाही कधीच केली, कुरबूर पावलांनी;
रस्ता जरी कितीही अमुचा भणंग होता!

हा रोमरोम झाला बघण्यास त्यास डोळा;
साक्षात, वाटले की, तो पांडुरंग होता!

नाही ढळू दिली मी शांती कधी मनाची!
आला तसाच गेला, क्षण जो तरंग होता!!

त्याच्यामुळेच झाली ओळख ख-या नभाची;
गगनास बिलगणारा तोही विहंग होता!

शेरांवरीच माझ्या पडले तुटून सारे!
एकेक शेर माझा म्हणजे तवंग होता!!

ते सूर बासरीचे, की, नादब्रह्म होते?
श्रोता हरेक अगदी त्याच्यात दंग होता!

रुद्रावतार त्याचा, फूत्कार काय त्याचा!
पोशाख माणसाचा, पण तो भुजंग होता!!

ना लागला कुणाच्या हातास तो कधीही....
गगनात उंच इतक्या कटला पतंग होता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना लागला कुणाच्या हातास तो कधीही....
गगनात उंच इतक्या कटला पतंग होता!
>>>
कटल्या की कटला?
कटल्या हा मराठी शब्द आहे का?

पाहून लोक गेले, ना पाहिल्याप्रमाणे......
मदतीस एक माझ्या आला अपंग होता

भावना सच्च्या वाटल्या.
कटककरांचा एक शेर आठवला.
काही ओळी फार आवडल्या. उदा.
नाही ढळू दिली मी शांती कधी मनाची

दोन शंका आहेतः

नाही कधीच केली, कुरबूर पावलांनी;
रस्ता जरी कितीही अमुचा भणंग होता

भणंग चा इथे कोणता अर्थ अपेक्षित आहे तुम्हाला ?

त्याच्यामुळेच झाली ओळख ख-या नभाची;
गगनास बिलगणारा तोही विहंग होता

इथे तोही तील ही नक्की काय साधतो?

समीर

हा रोमरोम झाला बघण्यास त्यास डोळा;
साक्षात वाटले की, तो पांडुरंग होता!

ह्या शेरासाठी लवून वंदन , त्रिवार मुजरा व अनेकानेक धन्स
____/\____ ____/\____ ____/\____

(साक्षात वाटले की ,>>>>या ऐवजी आपणास काही वेगळे करता आले असते तर अधिक आवड॑ले असते ..वै. म. !! कृ. गै. न.)

बाकी अनेक ओळी काही शेर खूप छानय्त पण मलाही काही प्रश्न आहेत जे टाळतो उगाच नाहक चर्चा कशाला

भणंगचा इथे कोणता अर्थ अपेक्षित आहे तुम्हाला ?<<<<<<<

भणंग म्हणजे अनाथ/भयाण/ओसाड

त्याच्यामुळेच झाली ओळख ख-या नभाची;
गगनास बिलगणारा तोही विहंग होता

इथे तोही तील ही नक्की काय साधतो?
<<<<<<<<,

तोही म्हणजे माझ्यासारखा तोही विहंग होता ज्याने माझ्यासारख्या (नवजात) विहंगास आकाशाची (ख-याखु-या)ओळख करून दिली, आकाशात विहरायचे कसे, आकाशास बिलगायचे कसे हे शिकविले, जणू काही त्याने माझी माझ्याशी ओळख करून दिली, तो वयाने (वडील) असल्याने!

धन्यवाद समीर!

भणंग म्हणजे अनाथ/भयाण/ओसाड

कवी सतीश,

तुमच्या मराठीच्या शिक्षकांना आमचा शिरसाष्टांग नमस्कार सांगावात. भणंगचा अर्थ आहे कफल्लक, कंगाल झालेला. भडंग म्हणजे चुरमुर्‍यांचा एक प्रकार असतो. भुजंग हा एक नाग असतो. भणंग म्हणजे अनाथ, भयाण व ओसाड हे तद्दन चुकीचे अर्थ तुम्ही ज्या तडफेने आणि आत्मविश्वासाने ठोकून देत आहात ते पाहून वैफल्य येत आहे.

गंभीर नामक समीक्षक,
तुमच्या मराठीच्या शिक्षकांना आमचा शिरसाष्टांग नमस्कार सांगावात. भणंगचा अर्थ आहे कफल्लक, कंगाल झालेला. भडंग म्हणजे चुरमुर्‍यांचा एक प्रकार असतो. भुजंग हा एक नाग असतो. भणंग म्हणजे अनाथ, भयाण व ओसाड हे तद्दन चुकीचे अर्थ तुम्ही ज्या तडफेने आणि आत्मविश्वासाने ठोकून देत आहात ते पाहून वैफल्य येत आहे.<<<<<<<<<<<<<<

आपल्यासारखे विद्यार्थी आमच्या मराठीच्या शिक्षकांना मिळाले नाहीत, त्यामुळे स्वर्गातही ते धन्य होतील!
मराठीत एका शब्दाला अनेक अर्थ असतात! मी म्हणतो तोच अर्थ बरोबर असे म्हटले की, संपलेच की हो सगळे!
अर्थांच्या विविध छटा असतात शब्दांच्या. शायर योग्य ती छटा त्याच्या कलात्मक वापराने अभिव्यक्त करत असतो.
असो! या सर्व गोष्टींपासून आपण गंभीर अंतर दूर आहात!

आम्ही कुठलीही तडफ वा फाजील आत्मविश्वास वा अभिनिवेशाने वा काल्पनिक बोलत नाही वा आपल्या भाषेत ठोकूनही देत नाही!

हा प्राध्यापक बिनसंदर्भाचा कधीच काहीही बरळत नाही!

भणंग शब्दाचा अर्थ आपण म्हणता तो बरोबर व आम्ही लिहिलेला अर्थही बरोबर!

हा घ्या संदर्भ..................आपण माना वा ना माना................हे मुद्रित आहे

अभिनव मराठी-मराठी शब्दकोश..........विद्यावाचस्पती द. ह. अग्निहोत्री.....खंड ४था, पान क्रमांक९८.

ते म्हणतात.........

भणंग म्हणजे.......
अतिशय गरजू
अनाथ
भयाण
ओसाड
भणंग भिकार/ भणंग भिकारी............म्हणजे
भिका-यांचा समुदाय.
उपजीविकेचे साधन नसलेला भिकारी

टीप: द.ह. अग्निहोत्री हे एक विदर्भातील व्यासंगी आहेत. मराठी शब्दांच्या उच्वारशास्त्रात ते विद्यावाचस्पती आहेत!

थांबतो!
........प्रा.सतीश देवपूरकर