कागदी रुमाल

Submitted by vandana.kembhavi on 21 January, 2013 - 23:05

सावकाश चालत ते आजी अन आजोबा कॅफे मध्ये शिरले. आजोबांनी दोघांसाठी कॉफी अन केकची ऑर्डर दिली अन ते दोघे खुर्चीवर बसले. हातातील काठ्या हळू एका बाजूला ठेवून ते आपापल्या जागी स्थिरावले. आजोबांनी आजीकडे पाहिले, त्यांना ती खूप थकल्यासारखी वाटली," का ग थकलीस म्हातारे?" आजीचे डोळे मंदसे हसले, " अरे, हल्ली घरकाम करून थकून जाते रे" त्याच्या "म्हातारे" या संबोधनाकडे दुर्लक्ष करीत आजी म्हणाली, "आणि तुही थकलेला दिसतो आहेसच की" "हो ग, म्हणूनच मी तुला आज इथे घेऊन आलो आहे, थोडस बोलूया, पुढच्या गोष्टी ठरवूया" असं म्हणून आजोबांनी खिशातून पेन काढलं आणि टेबलवरचा कागदी रुमाल उचलला..आजीचे डोळे चमकले, तिला कळले कि काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, ६० वर्षाच्या त्यांच्या संसारात त्या दोघांनी कागदी रुमालावर आखून रेखून आयुष्यातले खूप महत्वाचे निर्णय घेतले होते...आजी ने कॅफेच्या दाराकडे पाहिले, तिला त्या दारातून तरुणपणीची ती दोघं उत्साहाने आत शिरताना दिसली...आणि येउन त्यांच्या शेजारच्या टेबलवर बसली..

त्याने तिचे हात हातात घेतले अन तिच्या डोळ्यात पाहून तिला लग्नाची मागणी घातली, तिचे डोळे लाजेने खाली झुकले आणि तिने मान डोलावली, तिच्या होकाराने त्याचा चेहेरा आनंदाने भरून गेला आणि तोच आनंद तिच्या चेहेऱ्यावर परावर्तित झाला...आजी खुदकन हसली, काहीतरी लिहिणाऱ्या आजोबांनी वर मान करून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, अन आजीने काही नाही या अर्थी मान हलवली, आजोबा पुन्हा काहीतरी आकडेमोड करू लागले... आणि आजी पुन्हा शेजारच्या टेबलकडे वळली.....त्याने समोरचा कागदी रुमाल उचलला आणि पेनने त्यावर काही हिशोब केला, प्रेमाच्या गोष्टी न बोलता तो कागदावर हिशोब का लिहित बसला हेच तिला कळेना, ती खूप स्वप्नाळू मुलगी होती, प्रेमात पडणे ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती, आपल्या स्वप्नातला राजकुमार आपल्याला मिळाला याचा तिला अतिशय आनंद झाला होता...पण हा राजकुमार तर हिशोब लिहित होता.. .त्याचा हिशोब करून झाल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले आणि त्यांच्या भविष्याच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी किती पैसे लागतील आणि त्याची तरतूद कशी करायची या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित समजावून दिल्या..ती त्याच्याकडे बघतच राहिली...पहिला विचार आला कि "हा किती व्यवहारी आहे"....याचा अर्थ आपण दोघेही परस्परांहून किती भिन्न आहोत....त्याने तिच्या मनातले ओळखून पुन्हा तिचे हात हातात घेतले आणि सांगितले," स्वप्न पूर्ण करायला व्यवहार लागतोच ग, आपण भिन्न नाही तर एकमेकांना पूरक होऊन संसार करू, आणि मी तुला न तू मला खूप सुखी करू" त्याच्या आश्वासक शब्दांनी अन डोळ्यातील प्रामाणिक भावाने तिला हाच आपला सखा याची खात्री पटली...

मध्येच एका मुलीने त्यांच्या टेबलवर कॉफी न केक आणून ठेवले, आजीची तंद्री भंग झाली, त्या मुलीला धन्यवाद देऊन आजीने लक्ष आपल्या टेबलकडे वळवले...गोड अन मऊसुत केकचा तुकडा तोंडात टाकून आजीने आजोबांकडे पाहिले, त्यांनी हिशोबाचा कागदी रुमाल बाजूला करून केकचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली होती पण ते त्यांच्या विचारात व्यग्र होते...आजीने पुन्हा शेजारच्या टेबलवर पाहिले, यावेळी तिला तेथे लग्न झालेली ती अन तो दिसले...ती रागारागाने त्याला घरातल्या काही तक्रारी सांगत होती आणि तो पुन्हा कागदी रुमालावर लिहित बसला होता...ती चिडली..त्याचे आपल्याकडे लक्ष नाही हे जाणवून बिथरली...पण त्याने शांतपणे तिला आपले घर घेण्याच्या योजनेचा आराखडा समजवायला सुरुवात केली...ती रागाने दुसरीकडे पाहू लागली तसे त्याने तिचे हात हातात घेतले अन तिच्या डोळ्यात पहात तिला म्हणाला," घर तिथे कुरबुरी असणारच ग, तू फार मनाला लावून घेऊ नकोस, आपल आताच घर लहान आहे, अडचणीच आहे, आपण थोड मोठ घर घेऊ अन सगळे आपल्या घरात राहायला जाऊ" तिने त्याच्याकडे पाहिले, हा उपाय तिला मनापासून पटला, मग पुढचा वेळ कागदी रुमालावरची आकडेमोड समजून घेत दोघे तिथेच बसले...आजीच्या चेहेऱ्यावर समाधान पसरले, आजोबांनी आजीकडे पाहिले, तिचा हसरा चेहेरा पाहून त्यांना ती भूतकाळात गेल्याचे लक्षात आले पण त्यांनी तिला तिथेच राहू द्यायचे ठरवले आणि भविष्य आखायच्या विचाराकडे ते वळले....आजोबांनी आपल्याकडे पाहिले अन त्यांना आपण कुठे आहोत हे कळले हे आजीला देखील कळले, तिने प्रेमाने त्यांच्या कडे पाहिले अन म्हटले," एक भूतकाळात अन एक भविष्यकाळात, अजब जोडी आहे न?" आजोबा हसले अन म्हणाले," अग, भूतकाळ आनंदी ठेवतो आणि भविष्यकाळ व्यग्र ठेवतो म्हणूनच आपला वर्तमानकाळ चांगला जातो आहे" हसून दोघे आपापल्या काळात अलगद प्रवेशले...

आजी पुन्हा शेजारच्या टेबलवर डोकावली...आता तिथे एक छोटुकली परी सुद्धा होती, आणि ते दोघे परीराणी ला सुखी ठेवण्याच्या योजना कागदी रुमालावर आखण्यात मग्न होते, त्यानंतर एक राजकुमार देखिल आला आणि पुन्हा कागदी रुमाल भविष्यातील योजनांनी भरून गेला....आजीला आठवले कि सगळ काही आखल्याप्रमाणे झालच अस नाही पण त्या कागदी रुमालाची अन त्यावरील योजनांची त्या दोघांना इतकी सवय होऊन गेली होती..तिचं स्वप्न पाहण कधीही बंद झाल नव्हत आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्या साठी योजना आखण्यात त्याचा सगळा वेळ कारणी लागत होता त्यामुळे एकंदर त्यांचा संसार सुखाचा झाला होता...संसारात इतरांना येतात तश्या अनंत अडचणी त्यांना देखील आल्या पण प्रत्येक वेळी अडचणींवर मात करतानाच त्याच वेळी एक धेय्य ठरवून त्या धेय्याकडे ते एकत्र चालत राहिले..मुलं मोठी झाली, त्यांची शिक्षण झाली, लग्न झाली अन ते आपापल्या घरी गेले आणि ह्या दोघांच आयुष्य वेगळ्या रस्त्याने सुरु झालं...ती तिचा वेळ जमेल तेवढा सामाजिक कार्याला देऊ लागली अन तो तरुण पिढीला त्याच्या ज्ञानाचा फायदा करून देऊ लागला, त्याच वेळी कागदी रुमालाने त्यांच्या जगभर भ्रमंतीच्या योजना पाहिल्या...तृप्त समाधानी आयुष्य जागून ते आता अंताच्या प्रवासाला निघाले होते...वयाने ८३ गाठली होती, आता घर आवरणे, झाडलोट करणे,इत्यादी कामे करायला त्रास होऊ लागला होता, कागदी रुमालाने हि वेळ आली कि "रिटायरमेंट व्हिलेज" ला जायची योजना आखलेलीच होती त्यामुळे आज आजोबा काय बोलणार आहेत हे आजीला माहित होते..

आजीने अभिमानाने आजोबांकडे पाहिले, तिच्या डोळ्यातील अभिमान आजोबाना मनोमनी सुखावून गेला...त्यांनी कागदी रुमाल तिच्या समोर ठेवला आणि घर विकून येणारे , बचत केलेले, पैसे, त्यातून मुल- नातवंड यांना काय द्यायचे, व्हिलेज मध्ये घ्यायच्या घराचे पैसे, महिन्याला लागणारे पैसे, असं सगळ व्यवस्थित लिहिलं होत, आजीने त्यावर नजर फिरवली, तिला हे सगळ माहित होत, कुठे काही राहील का हे तिने पाहिलं आणि मग कागदी रुमालावरची ती शेवटची योजना देखील मान्यता पावली...दोघांनी समाधानाने एकमेकांकडे पाहिले...आजोबांनी आजीचे हात हात घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहून ते बोलू लागले," आजची आपलीही एकत्रित केलेली "कागदी रुमालावरची" शेवटची योजना, आता आपण आपल्या समवयस्क लोकांमध्ये जाउन राहू, आजवर एकमेकांच्या साथीने आपण खूप चांगला प्रवास केला, या पुढे काय होणार आपल्याला माहित नाही, पुढचा प्रवास एकट्याने करायचा आहे, एकत्र आहोत तोपर्यंत आनंदाने जगूच पण दोघांपैकी जो मागे राहील त्याने आपले उर्वरित आयुष्य आनंदानेच जगायचे, भविष्याची चिंता करायची नाही, भूतकाळातल्या आठवणींच्या शिदोरीवर वर्तमान आनंदात व्यतीत करायचा....आता आपल्याला अजून योजना आखायची जरूर उरलेली नाही.." आजीने समजून मान डोलावली आणि हळूहळू काठीचा आधार घेऊन ते घराच्या दिशेने चालू लागले...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप आवडली, शेवटी डोळे ओलावले.

हेच सत्य एकदा सासुने ऐकवले होते. ते हि अगदी सहज स्वरात. खुप घालमेल झाली ते ऐकताना, पण त्यांनी खुप प्रॅक्टीकली या वयात ( ७०+) आता एक कोणी मागे राहणारच आणि त्याची तयारी - मानसिक दोघांची आहे असे सांगीतले.

वंदना, खूप सुंदर जमलीये कथा. विषय फारसा वेगळा नाही पण मांडणी? अप्रतिम. कागदी रुमालाची कल्पनाच सुंदर आहे. आज्जींना कॅफेमधे बाजूच्याच टेबलवर त्यांचं स्वतःचं आयुष्यं दिसत रहाणं...
जियो!

धन्यवाद! @ दाद, तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघत होते Happy आपण भेटू शकलो नाही त्याचं वाईट वाटलं, पुन्हा सिडनीला आले तर जरुर भेटू. Happy