काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?

Submitted by सतीश देवपूरकर on 21 January, 2013 - 12:31

गझल
काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?
हे पुन्हा पाऊल माझे अडखळाया लागले!

हा तुझा आभास नुसता, की, तुझी चाहूल ही.....
पाखरू माझ्या मनाचे भिरभिराया लागले!

स्वाभिमानी खूप होते, काय त्यांचे जाहले?
ते पहा....जाते जिण्याचे घरघराया लागले!

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले!

साधले त्याने अखेरी, त्यास जे साधायचे;
हे अताशा रक्त माझे सळसळाया लागले!

तू दिली मज दिव्य दृष्टी आणि सृष्टी बदलली....
जागजागी दिव्य देखावे दिसाया लागले!

कंदिलांनो! दु:ख हे तुमच्याच वाट्याला नव्हे;
सूर्य सुद्धा कैक आता काजळाया लागले!

वाढत्या जेव्हा वयाचे पावसाळे पाहिले.....
कोण परके, आपले ते मज कळाया लागले!

तू कुठे आहेस ते आजन्म नाही समजले;
प्राण जातानाच उत्तर सापडाया लागले!

आमच्या गझलेत आहे काय कटुता एवढी?
वाचण्या आधीच त्यांना मळमळाया लागले!

गाउनी मी पेश केला एक मतला काय तो;
तोच काहींच्या घशाला खवखवाया लागले!

गंध उतरू लागला गझलेत माझ्या, तो तुझा;
दूर माझ्यापासुनी शायर पळाया लागले!

चूडही लावायची, पडली चितेला ना गरज!
प्रेतवत माझे जिणे आधी जळाया लागले!!

काय थोडीफार पुण्याई कमवली जीवनी....
आज वार्धक्यात त्याचे फळ मिळाया लागले!

पैलतीराने कधीचे धाडले बोलावणे!
जीवना! चलतो अता! मन तळमळाया लागले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले

मस्त शेर आहे.
क्रांतीचे गीत डोळ्यांपुढे आले.

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले!<<< अतिशय सुंदर शेर

पैलतीराने कधीचे धाडले बोलावणे!
जीवना! चलतो अता! मन तळमळाया लागले!!<<< अतिशय बोलका शेर

<<तू कुठे आहेस ते आजन्म नाही समजले;
प्राण जातानाच उत्तर सापडाया लागले!>>

म्हणजे जी/जो कोण "तू" आहे ह्या शेरात, तो पण नरकात आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

>> स्वाभिमानी खूप होते, काय त्यांचे जाहले?
ते पहा....जाते जिण्याचे घरघराया लागले!
हा चांगला वाटला. बाकी प्रत्येकात काहीतरी कमी आहे किंवा गंडले आहे असे वाटते आहे.

हा चांगला वाटला.बाकी प्रत्येकात काहीतरी कमी आहे किंवा गंडले आहे असे वाटते आहे.>>>>>>

या शेरात देखील मला तसे वाटते आहे . जिण्याचे जाते घरघरणे व स्वाभिमानाचा मला काही संबंध लागला नाही
असेलच तर तो खूप दूरवरचा असेल व आता आहे तश्या या शेरातून अजिबातच जणवत नाही आहे हे ही नक्की
वरील व खालच्या ओळीत काळ हा फॅक्टरही एक नाही आहे यामुळे दोनही ओळी एकजीव एकरूप सोडाच निव्वळ असंबंध वाटू शकतात
या शेराचा गद्य अर्थ देखील नेमका स्पष्ट लावता येत नाही आहे जो लागतोय तो फारसा हृद्य व काव्यात्मक वाअत नाही आहे
शयराने यात अव्यक्त शब्द कोणते राखलेत याचातर अंदाजाही येत नाही आहे
असो

वैभव, अं.. मला स्वाभिमानी लोकही शेवटी आयुष्याच्या चक्कीत भरडले गेले असा बर्‍यापैकी अर्थ लागला.
मला वाटतं, वाचकाला शेराच्या शेवटच्या शब्दाशी पोचता पोचताच एका experience शी पोचल्यासारखं वाटल्याचा feel मिळणं हे शेराचं success अस्तं. बाकी technicalities नंतरचा भाग. चुकीच्या grammar वर मात करून सुधा तो शेर तुम्हाला 'त्या' तिथे पोचवत असेल तर सब माफ है Happy
म्हन्जे हा शेर काही अगदी successful आहे वगैरे बोलण्याइतकं मला गझलेतलं काहीच कळत नाही. पण मला भिडला एवढंच. (बाकीची माझी बडबड खरंतर माझी समजूत बरोबर आहे का हे तुमच्याकडून तपासण्यसाठीच Happy )
आणि तो काळ फॅक्टर. येस, तुम्ही म्हणता तसा तिथेही घोळ आहेच.

सर्व जाणकार/अर्धजाणकार/अजाणकारांचे आभार

कोण गंडवतो कुणाला? काय सांगू?
आपल्या कुवतीस, प्रज्ञेला विचारा!

गद्य लिहिता, वाचताही येत नाही,
खुडबुडावे का गझलक्षेत्रात त्याने?

वेड घेवोनीच जातो पेडगावी...
पामराला या कसे जागे करावे?

वेड घेवोनीच जातो पेडगावी...
पामराला या कसे जागे करावे?

ज्याने झोपेचे सोंग घेतलेले आहे त्याला जागे कसे करायचे हा प्रश्न असतो, जो वेड पांघरून पेडगावला जातो तो जागाच असतो, त्याला जागे करावे लागत नाही. दोन पूर्णपणे वेगळ्या म्हणी एका इन्स्टंट शेरात घुसडून व कोंबून बसवण्याची ही घाई मार्च महिन्यापासून महागात पडणार आहे कारण कवी तिलकधारी येत आहेत.

वेड घेवून पेडगावला जाणारा माणूस हा झोपेचे सोंग घेतलेल्या माणसासारखाच असतो!
वाक्प्रचारांचा अभ्यास कमी पडतोय आपला!
दोघांनाही जागृत करण्याची आवश्यकता असते!
दोन ओळींत अजून कोणते नाते हवे?
शेर आपोआप ज्यांच्या ओठंवर येतात त्यांना आता काय घुसडू, वगैरे विचार करायला लागत नाही!
घिसाडघाई तर मुळीच नाही!

स्वानुभवाशिवाय हे नुसते सांगून कसे कळणार म्हणा!

यायचा आहे तिलकधारी म्हणे तो....
भाट झाले सज्ज सारे स्वागताला!

कोण देऊ लागला गंभीर धमक्या?
वल्गनांना कोण असल्या मोजतो रे?

खाद्य खावे चौकश्या नसत्या कशाला?
हे कसे केले, कधी केले निरर्थक!

जाहला कोणी उताविळ भेटण्याला
ये तिलकधारी, नको अफवाच नुसत्या!

हे तरी पाहू..... करामत काय तू करतोस अन्
मायबोलीवर तुझे माझे किती जमते तरी

ऐकले भरपूर, आता खुद्द पाहू!
कोण मी अन् कोण तू तेही तपासू!!

प्रा.सतीश देवपूरकर

हाय
आप भी कत्ले आम हो गये
When in Rome, do as Romans do..

यह बदनाम बस्ती है, गुंगे बहरों कि चलती है
सब नंगे खडे है यहांपर, कि शर्म रम से भी सस्ती है

वाह वाह !!
शायर (किरण)

सांगायचं म्हणजे लाज वगैरे सोडून प्रोफेसर २, ३, ४ सीरीज सुरू करा. निर्लज्जांच्या वस्तीत लाजून चालणार नाही.

किरणजी एक नोंदवू का मी

तुम्ही देवसरांच्या या जुन्या आयडीच्या रचना एक एक करत बाहेर काढताय खरे पण त्याच् वेळी तिकडे त्यांचा हल्लीचा नवा आयडी गझलप्रेमी यावर संयोजकांनी कारवाई केल्याचे दिसते आहे

म्हणजे कावळा बसायला अन फांदी तुटायला .......असे तर नसेल ना झाले Sad

सहजच शंका म्हणून विचारले कृपया वाईट वाटून घेवू नये ही नम्र विनंती

~वैवकु

अंदर की बात आपको ही पता होगी वैवकु Lol

मी बिचारा भोळाभाळा. हे कनेक्शन काय माहीत मला ?
कि मी या गझला वर काढला म्हणून कारवाई झाली हे सुचवायचंय ?;)
जो भी है, ठीक ही है
अपना तो नेक्स्ट आयडी फिक्स है

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले!

कंदिलांनो! दु:ख हे तुमच्याच वाट्याला नव्हे;
सूर्य सुद्धा कैक आता काजळाया लागले!>>>
खूपच भारी!