गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी

Submitted by हरिहर on 20 January, 2013 - 05:10

आज रविवार दि. 20/1/13 रोजीची दै.लोकसत्ता मधील लोकरंग पुरवणी वाचली. त्यामधील पृष्ठ क्र.3 वरील श्री. गिरीश कुबेर लिखित "गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी....' हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख वाचण्यात आला. सदर लेखाचा गोषवारा असा -
1) 2005 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 40हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी मंजूर केली. आता एवढे पैसे खर्च करायचे म्हटल्यावर जगाला बर्ड फ्लूची लागण झाली. सुरुवात झाली क्युबापासून नंतर मॅक्सिको व पुढे तिसऱ्या जगातील देशांना (अमेरिकेच्या दृष्टीने थर्ड क्लास देशांना) त्याची लागण झाली. त्यावरील औषध होते "टॅमी फ्ल्यू'' जे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड संचालक असलेल्या "जिलाद लाइफ सायन्सेस' या कंपनीने बसवलेले होते. नंतर बहुअब्जाधीश झालेल्या रम्सफेल्ड यांनी ती कंपनी "रोश' या कंपनीला विकून टाकली व स्वतः नामानिराळे झाले. अमेरिकन कंपन्यांनी हा आजार पसरविला असा आरोप क्यूबाने केला. स्वाईन फ्लू देखील त्यांनीच पसरवला होते असाही 30 वर्षापूर्वी त्यांच्यावर आरोप झालेला होता.
2)स्वाईन फ्ल्यू विषयी लेखकाने स्वानुभव कथन केलेला आहे - 2009 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये स्वाईन फ्ल्यूने हाहाकार उडवलेला होता तेव्हा लंडनमध्ये राहणाऱ्या लेखकाच्या सहकारी महिला पत्रकारास स्वाईन फ्ल्यूची लागण झाली. तिने तेथील डॉक्टरांना ताबडतोब तिला टॅमी फ्ल्यू चालू करा असा लकडा लावला. पण तेथील डॉक्टरांनी आठ दिवस सक्तीची विश्रांती, भरपूर कोमट जलसेवन, ताप आला तरच पॅरॅसिटामोल अशी उपचार पद्धती सांगितली आणि आठ दिवसानंतर पाहू असे सांगितले. आठ दिवसांनंतर स्वाइन फ्ल्यू गायब झाला. (मुख्य म्हणजे आयुष्यभरासाठी स्वाइन फ्लू सदृश आजारासाठी प्रतिरोध निर्माण झाला.) पण त्याच वेळी इकडे आपल्या मायबाप महाराष्ट्रसरकारने "रोश' कंपनीकडे टॅमी फ्ल्यूच्या लाखो गोळ्यांची ऑर्डर दिलेली होती.
3)1932 साली चीन-जपान युद्धात जपानने त्यावेळच्या कमकुवत चीनवर विमान हल्ला केला. लोकांना वाटले बॉंब पडतील म्हणून लोक घाबरून लपून बसले. पण विमानातून ज्वारीसारख्या दाण्यांचा मारा झाला. दोन दिवसातच त्याचा परिणाम दिसून आला. पहिल्यांदा परिसरातल्या कोंबड्या मेल्या नंतर उंदीर आणि बघता बघता संपूर्ण परिसरातील लोक प्लेगने उंदरासारखे पटाटा मरू लागले. कालांतराने विमानातून ग्लॅंडर्स चे जंतू पसरले गेले ज्यामध्ये लोकांचे केवळ पायच सडून जाऊ लागले. हिटलरला लाजवणाऱ्या या क्रूरकांडाचे जनक होते जपानचे शास्त्रज्ञ डॉ. शिरो इशी. पुढे न्युरेंबर्ग खटल्यात डॉ. इशी यांचा उल्लेखदेखील झाला नाही. का तर त्यांना अमेरिकेने आश्रय दिला व ते व त्याचे सहकारी तेथील औषध कंपन्यांसाठी काम करू लागले.
4) 1942 साली अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेने जैविक अस्त्रे निर्मितीचा आग्रह धरला. रुझवेल्ट तितके आग्रही नव्हते. तथापि पर्ल हर्बर नंतर रुझवेल्ट यांचे मतपरिवर्तन केले गेले. त्यात अग्रभागी होते जॉर्ज मर्क ज्यांनी पुढे वॉशिंग्टनजवळ अस्त्रनिर्मितीचा कारखाना उभा केला. ("मर्क' नावाची फार मोठी औषध कंपनी आहे.) याच ठिकाणी संशोधनात कार्यरत असणाऱ्या डॉ. फ्रॅंक ओल्सन यांचा गूढ मृत्यू झाला. सकृत्‌दर्शनी सरकारी पातळीवर तो सकृत्‌दर्शनी नैसर्गिक दाखवण्यात आला तथापि त्यांच्या मुलाने मुद्दा लावून धरल्यानंतर दफनोत्तर पुनश्च शवविश्चेदन करण्यात आले. तेव्हा नशेखोरांचे आवडते रसायन "लायसर्जिक ऍसिड डायमिथाईल अमाईड' अर्थात "एल्‌. एस्‌. डी' मुळे तो मृत्यू झाला हे निष्पन्न झाले. त्या वेळीदेखील डोनाल्ड रम्सफेल्ड, डिक चेनी व जॉर्ज बुश (सि.) या तिघांनी फेरतपासणीला विरोध केलेला होता.
आता लेखाचा शेवटचा मुद्दा - 4) मा.सुप्रीम कोर्टने सरकारच्या असे लक्षात आणून दिलेले आहे की अनेक औषध कंपन्या भारतातील जनतेचा गिनीपिग म्हणून उपयोग करून घेत आहेत. गेल्या काही वर्षात किमान 80 जणांचा गूढ मृत्यू झालेला आहे व दीडशे लोक जायबंदी झालेले आहेत ज्या आपण कशामुळे विकलांग झालो याचे कारण माहीत नाही.
आणि लेखाचे शेवटचे वाक्य आहे - आपल्याला आपल्या गिनीपिग्जतेची जाणीव व्हावी यासाठी !..............

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीयांचे गिनीपिग, सरकार झोपेत!

बलाढ्य कंपन्यांच्या अवैध औषध चाचण्यांवर सुप्रीम कोर्ट संतप्त

बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी औषधांच्या अवैध चाचण्यांनी भारतात हा : हाकार माजवला असून , या कंपन्यांचे रॅकेट तोडण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे . या औषध कंपन्या भारतीयांना ' गिनीपिग ' बनवत असताना सरकार मात्र गाढ झोपेत आहे , अशा कडक शब्दांत सुप्रीम कोर्टाने गुरुवारी आपला संताप व्यक्त केला . यापुढे अशा औषध चाचण्या केंद्रीय आरोग्य सचिवांच्या देखरेखीखालीच घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले .

अशा औषधांच्या चाचण्यांसाठी भारतातील सरकारी हॉस्पिटल्समधील गरीब पेशंट्सचा वापर होत असल्याचा आरोप करणारी याचिका ' स्वास्थ्य अधिकार मंच ' संस्थेने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती . त्यावर , कोर्टाच्या आदेशावरून केंद्र सरकारने गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर केले . मात्र , न्या . आर . एम . लोढा आणि न्या . ए . आर . दवे यांच्या पीठाने ते फेटाळले . अशा चाचण्या रोखण्यासाठी असलेल्या नियमांची जंत्री प्रतिज्ञापत्रात देण्यात आली होती . त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली .

' लहान मुलांचा गिनीपिगसारखा वापर होतो हे पाहणे त्रासदायक आहे . नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे ,' असे सांगत , संसदीय समितीने माहिती उघड करूनही औषध कंपन्यांच्या विरोधात पाऊल उचलले गेले नाही ', असे कोर्टाने सरकारला सुनावले .

वृत्तसंस्था , नवी दिल्ली
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17879909.cms

मायबोलीवरील एक डॉक्टर इब्लिस हे योग्य त्या व्यासपीठावरून लढा देत आहेत. त्याची माहिती मिळाली तर थोडाफार प्रकाश पडेल.
-गा.पै.