चारचौघी - ६

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2013 - 03:05

टेकडीवर गेलेल्या तिघींच्या गप्पा इतका वेळ चालू राहिल्या की सुरक्षारक्षकांनी अक्षरशः त्यांना हाकलले तेव्हा त्या खाली उतरल्या. त्या रूमवर आल्या तेव्हा चक्क आठ वाजलेले होते. सिम आणि निली कोठे जाऊन आल्या असतील हे त्यांना वाटलेही नव्हते. सिम अजूनही ताप आल्यासारखे वाटत असल्यामुळे झोपलेली आहे आणि निली तिच्याजवळ बसून राहिलेली आहे हेच दृष्य त्यांना दिसले. पण परत आल्यानंतर सिम आणि निलीच्या अनेक गोष्टी ठरलेल्या होत्या. एक म्हणजे निलीने मीरा भाटियांना फोन करून प्रकाराची कल्पना दिल्यानंतर मीरा भाटियांनी झालेल्या घटनेमध्ये कायदा किती पळवाटा काढेल आणि सर्व काही कसे फोल ठरेल हे निक्षून सांगून पटवून दिलेले होते. मीरा भाटियांनी पैसे घेतलेले असतील याची सुतरामही कल्पना नसल्याने निली कन्व्हिन्स्ड झालेली होती की या प्रकरणाबाबत पोलिसांकडे जाण्यात काही अर्थच उरलेला नाही. सिम तर आधीपासूनच ते म्हणत होती. त्यामुळे त्यांचा पहिला निर्णय झाला तो म्हणजे झाल्या प्रकाराची अजिबात वाच्यता करायची नाही. अगदी रूममधील उरलेल्या दोघींना आणि पियालाही हे समजू द्यायचे नाही. दुसरे म्हणजे मिळालेली करिअरची संधी सिमने स्वीकारायची आणि करिअर गाजवून सोडण्याचा प्रयत्न करायचा, ज्यायोगे निदान त्या क्षेत्रात असे स्थान तरी मिळेल की पुढेमागे अपराध्यांचा काही सूड घेता आला तर घेता येईल. निदान पैसे आणि ख्याती मुबलक मिळाली तरी मनावरचे सावट काहीसे कमी होईल. तिसरे म्हणजे अश्या कोणत्याही परिस्थितीत बेसावधपणे पाय टाकायचा नाही ज्यात पुन्हा असा काही प्रकार घडू शकेल. चौथे म्हणजे जवळ निदान काहीतरी बाळगायचे जे ऐन वेळी विरोधाला उपयोगी पडेल. मग भले ते वापरता आले नाही तरी चालेल, पण जवळ असायला हवे.

निलीच्या कल्पनेपेक्षाही सिम खूपच सावरलेली होती. गोळ्या घेऊन ती आता झोपून गेलेली होती. अंग थोडे गरम लागत होते. या तिघी आल्यानंतर निलीने त्यांना आवाज फार होऊ देऊ नका असे खुणेने सुचवले. पण त्यांच्या ज्या गप्पा झालेल्या होत्या त्यानंतर त्यांना आवाज करावासा वाटतही नव्हता.

असे काय झाले होते तिघींमध्ये? अश्या कोणत्या गप्पा झाल्या होत्या?

एकोणीस वर्षीय पियाने गप्पांना अतिशय वेगळा रंग दिला होता. तिचे दीप अंकल, म्हणजे जो चे बॉस भसीन यांची कहाणी तिने दोघींना ऐकवली होती.

दहा वर्षांपूर्वी भसीनचे लग्न झाले आणि यथावकाश त्याला दोन मुलेही झाली. एक मुलगा, एक मुलगी. दोघेही आता शाळेत व बालवाडीत जात होते. भसीनची घरचीही बर्‍यापैकी श्रीमंती होती आणि या कंपनीत उच्चपदस्थ असल्याने भरभराट झालेली होती. वास्तविक पाहता हेवा वाटावा अशी परिस्थिती होती, पण या संसाराला जणू नजर लागलेली होती. भसीनच्या मिसेसला चार वर्षापूर्वी पॅरलिसिसचा अ‍ॅटॅक आला होता आणि तेव्हापासून ती अंथरुणाला खिळलेली होती. दोन्ही मुलांचे करण्यासाठी भसीनने शेवटी एक आया घरी ठेवलेली होती. असे असूनही भसीन त्या ताणाचा परिणाम कंपनीच्या कामावर होऊ देत नव्हता. पण त्याचे ते उच्च पद, तो महाकाय पगार आणि दोन गोंडस मुलांचा संसार हे सगळे पत्नीच्या आजारपणाच्या दु:खद कोंदणामध्ये बसवले गेलेले होते. भसीनचे प्रत्येक स्मितहास्य आसवांना ओलांडून येत होते. मनाने अतिशय सुस्वभावी असलेल्या भसीनला कौटुंबिक आघाडीवर अतिशय मन हेलावणार्‍या संकटाचा सामना करत जगावे लागत होते. रोज उठून मुले विचारत होती की ममा आमच्याशी कधी बोलणार? रोज त्यांना समजावून सांगावे लागत होते की ती आजारी असल्याने डॉक्टर तिला बरे करतील तेव्हा ती बोलेल. निर्विकार चेहर्‍याने घरात पडून राहिलेल्या मिसेस भसीनला आपली मुले जवळपास येऊन अंगाला बिलगली तरी काही करता येत नव्हते. साधे जवळही घेता येत नव्हते. उपचार चालू असले तरी परिणाम दिसत नव्हता. गेले काही दिवसांपासून आया दुपारची काही कामानिमित्त तिच्या घरी जाऊन येत असल्याने मुलांना जेवू घालायला भसीन ऑफीसमधून दोन तास जावून येत होता. त्याचा परफॉर्मन्स सुपर असल्याने कंपनीला त्याच्या शेड्यूलशी घेणेदेणे नव्हते. आपल्या पीअर्स आणि सबऑर्डिनेट्सना पॉझिटिव्हली मोटिव्हेट करणारा भसीन स्वतः किती खोल नकारात्मकतेच्या डोहात बुडालेला आहे याची जो ला प्रथमच कल्पना आली. आजवर सतत टोचून बोलणारा आणि चुका काढणारा बॉस म्हणून त्याला मनातच शिव्या देणारी जो आता त्याची कहाणी ऐकून द्रवली होती. आता डॉक्टर म्हणत होते की भसीनची मिसेस यातून सुटलेलीच बरी कारण ती पूर्वीसारखी होणे शक्य दिसत नव्हते. कोणत्याही परिस्थितीत असली तरी निदान जिवंत म्हणून डोळ्यासमोर तरी असलेली पत्नी कदाचित आता दिसेनाशीच या कल्पनेमुळे भसीन मनातच खचलेला होता. त्याच्या चेहर्‍यावर गेले काही दिवस दिसत असलेला ताण कश्यामुळे असावा याचा उलगडा आता जो ला होत होता. भसीन आणि त्याच्या मुलांवर कोसळत असलेले संकट समजल्यानंतर जो ने निर्धार केला होता की तिच्या कामापुरते तरी भसीनला नाव ठेवायला जागा ठेवायची नाही. उलट जमल्यास त्याला अधिकाधिक मदत होईल असेच वागायचे.

भसीनचे दु:ख ऐकून मग जया आणो जो नेही त्यांच्या त्यांच्या अनुभवातील अश्याच काही करुण कहाण्या एकमेकींना ऐकवल्या. गप्पा संपेचनात. कुणाच्या नात्यात कोणाला अचानक अपघात झालेला होता तर कोणाच्या शेजारपाजारच्यांमध्ये अचानक कर्ता पुरुष निधन पावलेला होता. कोणाचा पॅरलिसीस बरा झालेला होता तर कोणाचे साधे दुखणे जीवावर बेतलेले होते. कोणी मुले अनाथ झालेली होती तर कोणी विधवा नोकरीसाठी भटकत बसलेली होती.

साडे आठ वाजता सगळ्याजणी जेवायला खाली गेल्या तेव्हाही सिम उठली नाही. येताना निलीने तिच्यासाठी फक्त एक कप गरम दूध तेवढे आणले आणि ते तिने घेतले.

रूममध्ये आता एक ऐवजी दोन बलात्कारिता होत्या. एकीबद्दल सगळ्यांना कल्पना होती, पण दुसरीच्या बाबतीत आजच काय झालेले आहे हे ऐकले असते तर बेशुद्ध व्हायची वेळ आली असती त्यांच्यावर.

पत्तेही खेळायचा मूड नव्हता. नेहमी किलबिलणारी प्रियंका उदासवाणेपणाने रूममध्ये निघून गेली होती. जाताना उरलासुरला उत्साह आणि चैतन्यही घेऊन गेलेली होती. त्यामुळे रूम अधिकच भकास वाटू लागली होती.

अंधारात जेमतेम दिसणार्‍या आढ्याकडे पाहात चारचौघी आडव्या झाल्या तेव्हा प्रत्येकीच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते. उद्या सोमवार असल्याने लवकर झोप लागायलाच हवी होती.

निली विचार करत होती की स्त्रीचे आयुष्य किती परावलंबी आहे, किती असुरक्षित आहे. सिमच्या बाबतीत धडधडीत अमानवी अन्याय झालेला असूनही केवळ कायदा अनेक पळवाटांनी बनलेला असल्याने काहीही करण्यात अर्थ राहिलेला नाही. मग पुनर्वसनाची नाटके तरी कशाला हवी आहेत. आज सिमच्या आयुष्यात जे झाले ते कोणाच्याही आयुष्यात कधीही होऊ शकते. मग कोणकोणत्या परिस्थितीत स्त्रीने किती जपून राहायला हवे याला काही मर्यादाच राहणार नाही. प्रत्येक पावलाला जर हे संकट गिळंकृत करायला आ वासून उभे असेल तर हवा कशाला हा स्त्री जन्म? सिमच्या सावरण्यामागे तिची सामर्थ्यवान मनःशक्ती आहे की कर्मठ जैन घराण्याची भीती आणि कायद्यावर न उरलेला विश्वास आहे हेही ठरवता येत नव्हते. कदाचित कोणालाच काहीच कळू न देणे हे सिमसाठी अत्यावश्यक असावे. त्याशिवाय का तिने ती ऑफर स्वीकारली? ती ऑफर स्वीकारली आहे खरी, पण तिला पुन्हा त्या पाचजणांची तोंडे तरी पाहावीशी वाटत असतील का? आणि वारिया दस्तूरकडे जा असा मेसेज कोणी पाठवला असावा? त्या व्यक्तीचा तर शोधही घ्यावासा वाटत नाही आहे. सिम ती असाईनमेन्ट खरंच करेल का? केली तर तिच्या बाबतीत तेच सगळे पुन्हा घडू शकेल याची तिला कल्पना असेलच की? मग तिने हा निर्णय कसा काय घेतला? ती नेमकी सावरलेली आहे की तिने सगळे सकारात्मक विचार सोडून शरणागती पत्करलेली आहे? तिला केंद्रात यायलाही सांगता यायचे नाही कारण तिचे फील्ड इतके वेगळे आहे की त्यात आये दिन अश्या घटना घडतही असतील. केंद्रातल्या मुलींचे नमुने पाहून तिला घेरीच येईल. असलेला आत्मविश्वासही संपेल. ती स्वतःहून ताठ उभी राहात आहे तेच तिला करू द्यावे.

सिम झोपलेली नव्हती. कण्हतही नव्हती. ती विचार करत होती. काय झाले, कसे झाले सगळे? केवळ काही तासांपूर्वी आपण किती व्यवस्थित होतो? काय अवस्था केली त्या नराधमांनी आपली. त्यांना काय शिक्षा देता येईल? देता येईल की नाही देता येणार? कसा सूड घ्यायचा? आपल्या शरीरात तर नव्हतीच, पण आता मनातील ताकदही संपल्यासारखी झालेली आहे. हारल्यासारखे वाटत आहे. असे वाटत आहे की आपल्यातून आपणच वजा झालेलो आहोत. असे वाटत आहे की आजवर हे सगळे जग आपल्यामधील केवळ लावण्य पाहात होते. शरीर पाहात होते. आतला माणूस कोणीच कधीच पाहिलेला नव्हता. असे वाटत आहे की आपली आयडेंटिटी म्हणजे आपली मापे, आपले कर्व्ह्ज आणि आपला रंग! आपल्याला विचार नाहीत, ध्येय नाही. शक्य होईल तितके लांडग्यांपासून लांब पळायचे आणि पळणे अशक्य झाले किंवा दम लागून थांबावे लागले की शरीर लांडग्यांच्या हाती सोपवून मुकाट अत्याचार सोसायचे. ज्या सौंदर्याच्या बळावर आपण फॅशन फील्डमध्ये आपला ठसा उमटवणार होतो ते सौंदर्य निव्वळ लचके तोडण्याच्याच लायकीचे आहे हे सिद्ध झाले. तेही केव्हा, तर करिअरच्या ऐन सुरुवातीलाच. संपूर्ण करिअरवर, त्यामध्ये आपण आता करणार असलेल्या प्रयत्नांवर आता हे अभद्र सावट कायमचे राहणार. स्वतःचे शरीर स्वतःला नकोसे होणे, मग ते कितीही सुंदर आणि मेन्टेन्ड असले तरी, ही भावना किती मरणासमान वाटत आहे. नरकासमान वाटत आहे. नरक आहे माझे शरीर. आज हे चौघे पाचजण एका बंद बंगल्यात मला भोगून गेले. उद्या कोणी रस्त्यावर मला अडवून भोगेल. परवा कोणी या रूमवर येऊन थैमान घालेल. नीलाक्षीने त्या वयात ते सगळे कसे सहन केले असेल? आणि चार वर्षे? आपल्याला चार तासही ते सहन होत नव्हते. हे वर्चस्व मी का सहन करायचे? मी हे सहन करणार नाही. मी संधीची वाट पाहीन. एकेकाला खिंडीत गाठेन. अशी जबर शिक्षा देईन की पुन्हा स्त्रीकडे तसे पाहता येणार नाही. पण त्यासाठीच मला करिअर करायला हवे. आता घरचे विचारच सोडायला हवेत. आपले ब्रा आणि पँटीवरचे फोटो कॅलेंडरवर झळकलेले पाहून भैय्या आपल्याला एकच मेसेज करतील. परत गावात पाय ठेवलास तर तुला जिवंत जाळू, असा! घराशी संबंध तसाही संपणारच आहे. तो आपण आधीच स्वतःहून संपवू. पाहिजे कशाला घर असल्या मुलीला? ज्या मुलीचे दोन मोठे भाऊ आणि दोन लहान बहिणी तिच्या संकटात तिच्या बाजूने ठामपणे उभे राहायला सज्ज असूनही ती त्यांच्यासोबत राहिली नाही आणि पाशवी जगाच्या पाशवी कृत्याला बळी पडली, तिला घर हवेच कशाला? जिला माँ परोपरीने सांगत होती की कॉलेज संपले की परत ये, तुला राठींच्या घरून मागणी आलेली आहे, लग्न करून पैशात लोळ, त्या मुलीने स्वतःचे शरीर अनेकांकडून विटाळून घेण्याचे कृत्य केले, का तर कपडे काढून दिलेले फोटो जगभर गाजावेत म्हणून. तिला हवी कशाला माँ? एकटी निली पुरेशी आहे आपल्याला. तिला समजत आहे आपली मनस्थिती. केव्हाही वाटले की तिच्या कुशीत बिलगून झोपून जायचे. आपल्या हनुमाननगरच्या सीमेवरून पाकिस्तानची खेडी लांबवर दिसायची. ती दाखवून भैय्या म्हणायचे, सिमेलिया, त्या सीमेपलीकडे तुझा जन्म झाला असता तर तुला आयुष्यात कसलेही स्वातंत्र्य मिळाले नसते. अभिमान बाळग की सीमेच्या या बाजूला तुझा जन्म झाला आणि एक दिलखुलास आणि स्त्रीचा सन्मान करणारी संस्कृती तुला मिळाली. भैय्या, आज तुमच्या त्या संस्कृतीने सिमेलियाला वेश्या बनवलेले आहे. माझ्याकडे विशुद्धपणे पाहून निव्वळ त्या पाच नराधमांना शिक्षा करण्याचा उदारपणा आहे तुमच्या मनात? तुमच्या या संस्कृतीत? की मलाही मारणारच आहात? मलाही मारणारच असलात तर सीमेच्या या काय आणि त्या काय, कोणत्याच बाजूला माझा जन्मच व्हायला नको होता असे मला वाटले तर नवल काय भैय्या? आपण जगण्याचा हा मार्ग का स्वीकारला? का ऐकले नाही घरच्यांचे? कितीही वाद झाले, अगदी आपल्याला मारहाण करण्यापर्यंत मजल गेली तरी आपण विरोध मोडून काढत इकडे का परतलो? काय हवे होते? सौंदर्याचे बाजारीकरण? पैसा? प्रसिद्धी? जी आपल्या सुंदर शरीरामुळे आपल्याला मिळणार होती? हे शरीर सुंदर असण्यात आपले कंट्रिब्युशन काय आहे? ही दैवी देणगी आहे. जी आज ओरबाडली गेली. पुढेही अनेकदा कदाचित ओरबाडली जाईल. देण्यात येत असलेल्या करिअरच्या प्रत्येक सुसंधीसाठी या शरीराची मागणी केली जाईल आणि आपल्या अंगवळणी पडल्यामुळे आपण आपला नैवेद्य दाखवून ती संधी घेतही जाऊ. पण आपल्या लहान बहिणींचे लग्न कसे होईल? पत्नी पतीबरोबर स्कूटरवर बसून गावातील रस्त्यावरून गेली तरी चर्चेला ऊत येणारी कर्मठ संस्कृती आहे आपल्या गावात. तिथे एका जगासमोर नग्न झालेल्या चांगल्या घरच्या मुलीच्या दोन लहान बहिणींचे लग्न कसे होणार? पण मी काळजी करून आता काय होणार आहे? आपण इकडेच करिअर करण्याचा आपला निर्णय कळवला तेव्हाच दोन नंबरच्या सरीकाला स्थळे पाहायला सुरुवात केलेली आहे. आज उद्याच तिचे ठरेलही. आपल्याला बोलावणारही नाहीत. सारीका डोळ्यात पाणी आणून आपली वाट पाहील. पण आपल्याला जाता येणारही नाही आणि आपले काळे तोंड घेऊन जावेसे वाटणारही नाही. सिमेलिया जैन, एक ए ग्रेडची कॉल गर्ल! मोठमोठे इंडस्ट्रियालिस्ट्स, फॅशन गुरूज आणि आमदार खासदारांनाच प्राप्त होईल अशी कॉलगर्ल! वा, काय पण इमेज होईल आपली. आपले फोटो होस्टेलवर चोरून बघत मुले मास्टरबेट करतील. जेथे जाऊ तेथे आपली ओळख एक शरीर म्हणून केली जाईल. मला हे हवे होते की काय हवे होते? आणि हे सगळे आज का प्रकर्षाने जाणवते आहे? केवळ आज रेप झाला म्हणून? रेप तर प्रत्येकच क्षणी होतच होता की? स्वतःचे फोटो दुसर्‍याला स्वतःहून दाखवणे हा आपणच आपल्यावरच केलेला रेपच आहे ना? मेजरमेंट्स लिहिणे, चालून दाखवणे, वखवखलेल्या पुरुषांमध्ये सतत वावरणे, हे सगळे रेपच होते की? आज फक्त त्या गोष्टीला मूर्त स्वरूप मिळाले. इतकेच. उद्याचा दिवस निराळा असेल. काहीतरी वेगळे घडेल. पण या चौघापाचजणांना मी केव्हा ना केव्हा ठेचणार हे नक्की. फक्त त्या नालायकांनी माझे त्या अवस्थेतले फोटो काढलेले नसोत म्हणजे मिळवली. यापुढे जैन हे आडनाव लावायचेच नाही.

आपल्याच केसांना येणारा मादक गंध हुंगत जया विचार करत होती. आज घेतलेल्या ब्यूटी ट्रीटमेन्ट्समुळे मी अधिक चांगली दिसत असेन. उद्या राहुलला मी आवडेन की नाही? उद्या तो कुठे घेऊन जाईल आपल्याला? गावातल्या टेकडीवर? की पिक्चरला? की जेवायला? तो होस्टेलवर सोडायला येईल तेव्हा त्याची या तिघींशी ओळख करून द्यायची की नाही? या तिघी नाक मुरडतील एखादवेळेस मनातल्या मनात. आपण साध्यासुध्या आणि आपला भावी नवराही सामान्यच दिसायला. त्यात त्याचा ड्रेसिंग सेन्सही जरा विचित्रच आहे. त्याला सांगायला पाहिजे की पोपटी वगैरे पँट घालत जाऊ नकोस. त्याचे सगळेच शर्ट्स पांढरे कसे काय? धड कधी दाढी केलेलीही नसते. निदान होणार्‍या बायकोला भेटायला जाताना तरी जरा अधिक बरे दिसावे असे त्याला का वाटत नसेल? मुंबईत करायच्या घराची चर्चा होईल उद्या. नवीन स्वप्ने, नवीन वळणे, नवे आयुष्य! त्यात आपले स्थान बरोबरीचे असेल. निर्णयांना महत्व असेल आपल्या. आवडीनिवडी विचारल्या जातील, विचारात घेतल्या जातील. घर सजवता येईल हवे तसे. मग गरीबी असली तरी चालेल. निदान राजाराणीचा संसार असेल. सासू सासरे आणि दीर नसतील तेथे. जबाबदारी कमी असेल. नोकरीहून पटकन घरी येण्याचे एक चांगले कारण असेल. नवर्‍याला खाऊपिऊ घालून सुखाने राहताना बघायची इच्छा असेल. लटका राग असेल, रुसवे, अबोले असतील. हासणे असेल. थोडी दु:खेही असतील लोणच्याइतकी. आपल्या कपाळावर आणि गळ्यात सौभाग्याची चिन्हे असतील. कदाचित... वर्ष दोन वर्षात बाळाची चाहुल लागू शकेल. संसाराला अर्थ प्राप्त होईल. पैसे अधिक मिळवावे लागतील राहुलला मग. त्याहीवेळी नीलाक्षी पुनर्वसन केंद्रातच असेल. जो एकटीच नोकरी करत राहिलेली असेल. सिम अशीच फॅशनेबल राहून स्ट्रगल करत असेल. मी मात्र स्त्रीच्या जन्माचा खरा अर्थ समजल्यामुळे ताठ मानेने जगत असेन. अजिबात माहीत नसलेल्या व्यक्तीसोबत संसाराला सुरुवात करणे हा खरे तर जुगारच, पण तो खेळूनच तर सगळे चांगले संसार झालेले असतात ना!

जो पडल्या पडल्या भसीनचा विचार करत होती. एकुणच विचार करत होती खरे तर. लग्न करून तरी नक्की काय होते? मुलेबाळे होतात, त्यांचे संगोपन, शिक्षण यात सगळा वेळ घालवायचा, एनर्जी घालवायची, सगळा फोकस त्यावर. आपणच निर्माण केलेल्या संसारातून हळूहळू आपणच वजा होत राहायचे.

वयात आल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि एखादा जॉब मिळाल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय जसा सहजाणे घेतला जातो तसाच आपण लग्न न क्रण्याचा निर्णयही सहजपणे का घेतला? आपल्याला काय करायचे आहे? खरंच लग्न करायचे आहे का? की उगाच टाळतोय आपण लग्नाची वेळ? लग्न केलेल्यांचे काय झालेले दिसत आहे? काही संसार खूप छान, तर काही ठीकठाक चाललेले आहेत. काही बरबादही झालेले आहेत. कारणे काहीही असोत. पण एका व्यक्तीवर आपण आपल्याला लादून स्वतःचे स्वातंत्र्य मर्यादीत का करावे? मग काय करावे? तारुण्य ओसरल्यानंतर लग्न केले तर त्याला स्वार्थ असे संबोधले जाईल. जाईनात का? कोण स्वार्थी नसते? लोक काय म्हणतात याचा विचार का करायचा? आपली गरज काय आहे हेच ओळखता येत नाही आहे. हे जसे चाललेले आहे तसे चाललेले आहे आपले. त्याला न काही दिशा न काही ध्येय. येऊन जाऊन करिअरमध्ये पुढे जायचे हा एक गोल आहे समोर, इतकेच. आपल्याला पुरुषच नकोसा होतो आहे का? असे म्हणतात की पोटाची भूक असते तशीच पोटाखालीही असते. आपल्याला ती भूक नाही आहे का? सर्वांगाला प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी चिकटणारी वखवख आपल्यातून पुरुषाच्या सहवासाची ओढच काढून घेत नसेल ना? कधीच कोणीच का आवडले नाही आपल्याला? आवडणे वेगळेच, निदान लग्न करताना जसे पूर्णपणे नवीन माणसासोबत जगायचे असते तेही आपल्याला करावेसे वाटले नाही. घरूनही काही फार आग्रह झाला नाही. जे करायचे ते कर म्हणाले घरचे. फक्त तू सक्षम बन म्हणाले. अवलंबून राहू नकोस म्हणाले. मी अवलंबून नाही आहे का कोणावरच? की तो एक भासच आहे? या तिघींवर मी काही प्रमाणात अवलंबून आहेच की? निदान नुसत्या कंपनीसाठी तरी? भसीनवर अवलंबून आहे मी जॉबसाठी. निदान हा जॉब करत आहे तोवर तरी. भसीन! भसीनच्या आयुष्यात इतके दुर्दैवी प्रकार असतील हे आपल्याला माहीतही नव्हते. भसीन माणूसच मोठा आहे मनाने. दु:ख सांगणार नाही. चष्मा पुसण्याच्या निमित्ताने अनेकदा डोळे पुसतो बहुतेक तो. ऑफीसमध्येच! आपल्याला कधीच काही समजले नव्हते त्याच्याबद्दल. भसीनसारखा पुरुष आपला नवरा झाला तर? काय होईल आपल्या संसारात? दोन मुलांना जन्म देऊन आपण उच्च राहणीमानात जगत राहू. सगळ्या कंपनीच्या कस्टमर्सच्या क्लेम्सनी डोके फिरवून घेण्याऐवजी फक्त भसीनला आणि मुलांना आनंदात ठेवले की झाले. सोपे असेल बहुधा ते. भसीनही चांगल्या स्वभावाचा आहे. आपल्या मनातल्या पुरुषाबद्दलच्या अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरूप येऊन त्याला दीपक भसीन असे नांव का मिळत आहे? आपण वेड्यासारखा विचार करत आहोत. भसीनला आपल्या मनातले आत्ताचे विचार समजले तरी तो उखडेल. बायकोवर किती प्रेम आहे त्याचे. ते जिवंत प्रेत रोज बघत राहणे आणि मुलांना समजावत राहणे यात तो खचत चाललेला असेल. मुले हाताशी येईपर्यंत तरी बिचार्‍याचे काही खरे नाही. पुन्हा जॉब तर व्यवस्थित करायलाच हवा नाही तर घर चालणार कसे? भसीनला खूप मदत करायला हवी. मग ऑफीसमध्ये रोज थांबावे लागले तरी चालेल. सरळ एक रिक्षावाला ठरवून ठेवू चांगला. हे क्लेम्सचे इंटरनल आणि एक्स्टर्नल ऑडिट होईपर्यंत भसीनला आपल्याकडून कोणताही त्रास होता कामा नये. एकही चूक होता कामा नये कामात आपल्या. एकदा ऑडिट्स झाली की भसीनला आणि पियाला कोठेतरी जेवायला घेऊन जाऊ आपणच. जरा त्यालाही थोडे वेगळे वाटेल. आपल्याबद्दल त्याच्या मनात असे यायला हवे की या मुलीवर जबाबदारी टाकली की ती पूर्ण होणारच. आज डोळेही मिटत नाही आहेत. उद्या दुपारी भसीन मुलांना जेवू घालायला घरी जाईल तेव्हा त्याच्याबरोबर जावे का त्याच्या घरी? त्याला थोडी मदत केली की त्यालाही बरे वाटेल बहुधा. पण नको, आपणहून पुढाकार घेणे चांगले दिसणार नाही. भसीनचे विचार आपल्या मनाला व्यापून राहणे चांगले नाही. आपल्याला तो त्या पद्धतीने आवडत नाही आहे. फक्त डिसेंट वर्तन आहे हे आपल्याला कबूल आहे. पण म्हणून त्याच्या पर्सनल मॅटर्समध्ये आपणहून पडणे योग्य नाही. रिलेशन विथ हिम शूड बी प्रोफेशनल, अनलेस ही एक्स्पेक्ट्स सम हेल्प फ्रॉम मी इन हिज पर्सनल मॅटर्स. पण आजवर आपल्याला कोणी प्रपोज कसे केले नाही? आपण दिसायला शंभरात एक आहोत. कमावत्या आहोत. चांगल्या घरच्या आहोत. एखादा विवाह प्रस्ताव कसा काय आला नाही आपल्यासमोर? सगळ्या नजरा अश्या बरबटलेल्याच का राहिल्या? आपल्या वर्तनात एवढीसुद्धा हलगर्जी नसतानाही आपल्याकडे लोकांचे बघणे सदैव गढूळलेलेच का राहिले? खड्यात गेले जग आणि लोक. झोप जो, झोपून टाक. तीन दिवसांनी तुला बत्तीस पूर्ण होणार आहेत. त्यानंतर विचारच विचार करायचे आहेत. आत्ता तर झोप.

==========================

नीलाक्षी केंद्रत पोचली तेव्हा धावाधाव चाललेली होती. एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. प्रकरण दाबण्याकडे मीरा भाटियांचा कल होता. नीलाक्षीला काहीच समजत नव्हते. एक बलात्कारिता आयुष्याला कंटाळून जीवन संपवायला निघालेली होती. समुपदेशन आणि मानसिक आधार या आघाड्यांवर केंद्राचा स्टाफ अयशस्वी ठरल्याचे ते निदर्शकच होते जणू. पण नीलाक्षीचे म्हणणे होते की निव्वळ य दोन गोष्टींनीच पुनर्वसन होणार नाही. रोजगार मिळवून देणे, हाती पैसा येऊ देणे हे आवश्यक आहे. काल नवीन आलेली मुलगी मात्र अजूनही अबोलपणे नुसती शून्यात बघत होती. पण झालेल्या प्रकारामुळे काही इतर मुली व महिला घाबरून रडू लागलेल्या होत्या. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ येत होते. नीलाक्षीला ही दररोजची नवनवी दुर्दैवी आव्हाने नकोनकोशी झालेली होती. आयुष्य यापेक्षा खूप सुंदर असू शकते याची तिला जाणीव होत होती. या सगळ्या मुली आणि आपण यांच्या नशिबी आयुष्यातील कठोर व भीषण वास्तवच का यावे या प्रश्नाने मन भंडावले होते तिचे. सटासट फोन करून ती अधिकार्‍यांना झाल्या प्रकाराची माहिती पुरवत होती. केंद्राच्या डॉक्टर सुलेखा त्या मुलीवर उपचार करत होत्या. प्रत्यक्षात तिला इजा काहीच झालेली नव्हती आणि तिचा प्रयत्न फसलेलाही होता. पण आता नव्याच आघाडीवर स्टाफला लढावे लागणार होते. एकीने प्रयत्न केल्यावर दुसरीला तसे वाटू लागणे अशक्य नव्हते. मुलीला आत्महत्या करावीशी वाटणे आणि करायचा प्रयत्न करता येणे हे दोन्ही केंद्राचे पराभव म्हणूनच बघितले गेले असते. नीलाक्षीला ते नको होतेच, पण प्रामुख्याने मुलींना जीवनात रस वाटू लागावा यासाठी लढायचे होते. शरीराने केंद्रात असलेली नीलाक्षी मनाने स्त्रीजगताच्या भीषण वास्तवाबाबत अंतर्मुख होऊन नकळत विचार करू लागली होती. हे कसे संपणार, कधी संपणार हे तिला कळत नव्हते. हाती शस्त्रच घ्यायची वेळ स्त्रीवर येणार आहे असे एरवी नाजूक विचार करणारे तिचे मन तिला यावेळी निक्षून सांगत होते. कायद्यात पळवाटा होत्या. बलात्कारितेकडे बघणार्‍या नजरा अपमानीत करणार्‍या होत्या. भाजून निघत होती एक स्त्री. बाकी काहीच नाही. हा अन्याय, हे दु:खाचे डोंगर आणि ही असहाय्यता रोजच जवळून बघून आपले मनही निर्ढावत आहे की काय असे नीलाक्षीला भासू लागले होते. आज दुपारी होणार्‍या अधिकार्‍यांच्या मीटिंगमध्ये ती मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार्‍या बाबींसाठी ठामपणे स्पीच देणार होती. मागे हटणार नव्हती. आत्महत्येचा प्रयत्न फसलेली मुलगी आक्रोशून मला मरूद्यात असे म्हणत होती. त्याचा परिणाम इतर मुलींवर होत होता. त्याही रडू लागलेल्या होत्या.

भर दुपारच्या उन्हात ऑफीसमधून बाहेर पडलेली जो कुलश्रेष्ठ भसीनच्या शेजारी त्याच्या शेव्हरलेटमध्ये बसली आणि एसीमुळे तिला जरा बरे वाटले. सकाळी अकरा वाजता भसीन किंचित फ्री असताना जो ने सरळ त्याला सांगितले होते की पियाने भसीनच्याघरची परिस्थिती तिला सांगितलेली असून तिला एकदा भसीनच्या मुलांना आणि पत्नीला बघायला यायचे आहे. भसीनला यात आपत्ती नव्हती, पण त्याने तिला फक्त क्लेम्सचे स्टेटस विचारले. त्यावर रोज रात्री उशिरापर्यंत थांबून तीन दिवसांत सगळे क्लीअर करते असे जो म्हणाली होती. त्यामुळे दिड वाजता भसीन तिला घेऊन आपल्या घरी चाललेला होता. एरवी काही ना काही बोलत असणारा भसीन त्याची पार्श्वभूमी जो ला समजल्यापासून जो समोर जरा अबोलच झालेला होता. त्याला ते आवडलेले नाही की काय असेही जो ला वाटले होते, पण ज्या अर्थी तो तिला घरी घेऊन जायला तयार झाला होता त्या अर्थी त्याला कदाचित बरेही वाटले असावे असेही जो ला वाटले. शेवटी तासनतास दिवसेंदिवस एकत्र काम करणार्‍यांमधील व्यावसायीक नात्याला कोठेतरी माणूसकीची किनार लाभतेच हे जो ला मान्य होते. त्याच बेसिसवर तिने भसीनला मी तुमच्या घरी येऊ का त्यांना भेटायला असे विचारले होते.

भसीनचे घर म्हणजे श्रीमंतीचे पण स्त्रीचा पुरेसा वावर नसल्याने पसार्‍याचेही उदाहरण होते. जो ने पंधराच मिनिटात परिस्थिती न्याहाळली. आया जेवणाचे सगळे करून गेलेली होती. भसीन ते गरम करत होता. मुले यायला अजून अर्धा तास असावा. जो भसीनच्या बायकोला बघत उभी राहिली. त्या शरीरावर आणि चेहर्‍यावर भावनांचा लवलेष नव्हता. जो ने मिसेस भसीनचा बेड जरा नीट केला. आजूबाजूच्या वस्तू आणि हॉलही जरा नीट लावायला सुरुवात केली. तेवढ्यात भसीन किचनमध्ये आपल्यासाठी चहा ठेवतोय म्हंटल्यावर ती किचनमध्ये धावली आणि भसीनला बाहेर जाऊन बसा म्हणाली. भसीननेही तिचे ऐकले आणि तो बायकोपाशी जाऊन बसला. थोड्याचे वेळात किलबिलत दोन्ही मुले आली. नवीन आंटी बघून थोडी बावचळली. पण जो ने हसून त्यांना स्वतःची ओळख करून दिली. आईच्या प्रेमाला वंचित असलेल्या त्या मुलांनी जो ला आपल्यातली म्हणून स्वीकारलेही पटकन. जो ला अतिशय आनंद झाला. भसीनही लांबून जो चा झालेला स्वीकार पाहून थोडा आनंदी झाला आणि हेही जो ने निरखले. आपण केवळ एक कर्मचारी नसून एक स्त्री म्हणून मायेचे प्रतीकही आहोत ही जाणीव फार खोलवर सुखावून गेली जो ला! मुलांची जेवणे होईतोवर तिने भसीनचेही पान घेतले. भसीनने तिलाही जेवायला बसायला सांगितले पण तिने आपला टिफीन खाल्ला. मुले आता ट्यूशनला निघालेली होती. मुले निघून गेल्यानंतर घराला पुन्हा औदासीन्याची कळा आली. भसीन जरा वेळ पत्नीपाशी बसला आणि उठून जो ला ऑफीसला जाऊ म्हणाला. अर्ध्या तासाने आया येणार होती. तिच्याकडे किल्लीही होती लॅचची. मुले आता एकदम तीन तासांनी येणार होती. त्यांच्यासाठी दुसरी लहान गाडी आणि ड्रायव्हरही होता. त्यामुळे त्यांची काळजी नसायची.

भसीनबरोबर ऑफीसला परतताना जो चे मन अनेकविध विचारांनी भरलेले होते. आज आपल्याला एका घरात एक घरची स्त्री अशी ओळखही प्राप्त झाली याचा अतीव आनंद भसीनच्या घरच्या दुर्दैवी परिस्थितीमुळे झाकला जात होता. आपण कधी लग्न केलेच तर अश्या गरजू घरात करावे असेही तिला वाटू लागले होते. लहानश्या निरागस मुलांसाठी स्वतःच्याच शरीरातून मायेचे पाझर फुटण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव होता. तो वारंवार घेता यावा अशी इच्छा प्रबळ होऊ लागली होती. सारखे येथे येणे चांगले दिसणार नाही याची कल्पना नव्हती. पण 'पद्मजा कुलश्रेष्ठ' या नावापुढे निव्वळ क्लेम्स प्रोसेसिंगचे टायटल जे आजवर होते त्याच्यापुढे आता 'एक आईसारखी स्री' असेही अदृष्य टायटल तिला दिसू लागले होते. हे प्रमोशन जगातल्या कोणत्याही राईजपेक्षा आपल्याला महत्वाचे का वाटत आहे हे तिच्या लक्षात येत नव्हते. आपली कोणालातरी आधारासाठी गरज असणे ही भावना स्त्रीमध्ये किती चमत्कार घडवून आणू शकते हे जो प्रथमच अनुभवत होती. कदाचित लग्न न करण्याचा आपला निर्णय चुकीचाही असू शकेल असे अगदी पहिल्यांदाच तिला वाटले होते मनापासून! भसीनला एकंदर जो आल्यामुळे आनंदच झालेला दिसत होता. ऑफीसला पोचले तेव्हा ऑफीसमध्ये जायच्या आधी गाडीतच जो कडे बघत भसीन म्हणाला...

"जो, तू आलीस याचा मुलांनाही खूप आनंद झालेला दिसत होता... मलाही खूप बरे वाटले... जो.. तू केव्हाही माझ्या घरी येत जा... यू आर ऑलवेज वेलकम"

आजवर ऑकेजनली ज्याच्याशी फक्त हॅन्डशेक केलेला होता त्या भसीनचे डावे मनगट जो ने स्वतःच्या हाताने दाबले आणि 'मी हा आधार तुमच्या कुटुंबाला केव्हाही देईन' ही भावना त्या स्पर्शातून कळवली व मान डोलावली. तिला भास झाला की बहुधा भसीनच्या डोळ्यात पाणी तरळून गेले की काय! तसे खरंच असले तर आपल्यालाही रडू येईल असे भय वाटून ती गाडीचे दार उघडून पटकन बाहेर उतरली. संध्याकाळ होईपर्यंत तिला भसीनच्या दोन्ही मुलांचे चेहरे, दुर्दैवी पत्नीची निर्विकार मूर्ती आणि भसीनच्या निकट बसल्याने त्याच्या पुरुषी गंधाची आणि भावनेच्या ओलाव्यासाठी तहानलेल्या मनाची आठवण येत राहिली. रात्री उशिरापर्यंत थांबून तिने बरेचसे क्लेम्स हातावेगळे केले आणि घड्याळात पाहिले तर नऊ वाजलेले होते. भसीनने जातानाच ऑफीसची कार आणि ड्रायव्हर तिच्यासाठी अ‍ॅरेंज करून ठेवलेले होते त्यामुळे कसलीच चिंता नव्हती. कारमध्ये बसून होस्टेलवर जाताना किती सुखद वाटत होते. आणि आजवर लपून बसलेल्या पुरुषासंदर्भातल्या कल्पनेला भसीनचे स्वरूप मिळू लागले होते. भसीनचा गरम हाताचा स्पर्श मिळू लागला होता. भसीनचा गोल्ड फ्लेकमिश्रीत गंध मिळू लागला होता. पण कोणत्यातरी क्षणी तिच्या मनातील विचारांच्या रम्यतेला तडा गेला. मागे बसलेली असल्यामुळे तिचे लक्ष चुकून ड्रायव्हरसमोरच्या आरश्यात गेले तेव्हा ड्रायव्हरचे दोन डोळे आपल्यावर रोखले जात आहेत हे तिच्या लक्षात आले आणि सगळाच रसभंग झाला. रम्य विचारांमधून वखवखलेल्या जगात ती धाडकन फेकली गेली आणि तातडीने अशी सरकून बसली की ड्रायव्हरला ती आता दिसणार नाही. पण आरश्यातून एक दोनदा पाहणे या पलीकडे या ड्रायव्हरची कसलीही हिम्मत होणार नाही हे तिला ठाऊक होते. तिला त्याचा अतिशय राग आलेला असूनही अजून काही दिवस तोच आपल्याला होस्टेलवर सोडणार आहे हे जाणवून तिने राग दाबून टाकला. उतरताना वीसची नोटही त्याच्या हातात ठेवली टीप म्हणून. त्यनेही ती घेऊन तिल सलम केला तशी थोडीशी रिलीव्ह्ड होत ती होस्टेलमध्ये प्रवेशती झाली.

दुपारी एक वाजल्यापासून पाण्याचा घोटही न घेता सिम एका वस्तूप्रमाणे बसून राहिली होती. दोन मुली मिळून तिला अक्षरश: पेंट करत होत्या. तिच्या शरीरावरच्या खुणा पाहूनही त्यांच्या चेहर्‍यावरची रेषाही हाललेली नव्हती. शेवटी सहा वाजता सिम भला मोठा टॉवेल गुंडाळून त्या पायर्‍यांवर येऊन बसली ज्यांच्यावर तिचे फोटो घ्यायचे होते. आजूबाजूला अनेक जण होते. ते कोण होते, कोणाचा रोल काय होता यात सिमला आत्ता स्वारस्यच नव्हते. एका प्रौढ पुरुषाने येऊन तिच्या अंगावरील टॉवेल स्वतःच काढून घेतला. त्याच अवस्थेत अर्धा तास गेला. तिच्याकडे फारसे कोणाचे लक्षही होते अश्यातला भाग नव्हता. सर्व नजरा सरावलेल्या होत्या. खरे तर स्त्रीदेह पाहून विटलेल्या नजरा होत्या त्या. तरी कोणीतरी म्हणाले. 'शी विल रॉक'! अवस्था अशी होती की सिमला ते विधान आपल्यासाठी आहे हे माहीत असूनही किंचितही अभिमानास्पद वाटले नाही. सेशन सुरू झाले आणि सुचनाही सुरू झाल्या. पोझेस सुचवल्या जाऊ लागल्या. स्मितहास्याचेच सतरा प्रकार करवून घेण्यात आले. कालच्या प्रकारानंतर आलेल्या औदासीन्यात आजचे स्मितहास्य मिसळून एक विचित्रच मिश्रण तयार होते जे तिथल्या लोकांना आवडत असावे कारण त्यांच्याकडून दाद मिळत होती. टीचभर कपड्यांत आपण इतक्या जणांसमोर बसलेलो आहोत याचे जणू भानही सिमला उरलेले नव्हते. आपण एक कमोडिटी आहोत हे दुपारी एकपासूनच तिच्या मनात भिनलेले होते, भिनवण्यात आलेले होते. तसेही हे कधीतरी होणार हे तीही जाणून होतीच. पण घटनाक्रम इतका भयानक आणि वेगवान असेल असे तिच्या स्वप्नातही नव्हते. आत्ता या क्षणी तिला आणखीन एक रेप होत आहे यापलीकडे काही वाटतच नव्हते जणू. तिच्या अंगांगावर नजरा आणि कॅमेरा खिळलेला होता. हे सगळे किती वेळ चाललेले होते याकडेही तिचे दुर्लक्ष झाले. कधीतरी साडे नऊ दहाला तिला एका आलिशान कारमधून होस्टेलवर सोडण्यात आले. ती आणि जो साधारण पाचच मिनिटांच्या अंतराने रूमवर आल्या तेव्हा निलीने खुणेनेच सिमला सगळे व्यवस्थित आहे ना असे विचारले. त्यावर थकलेल्या सिमने होकारार्थी मान हालवली व ती सरळ झोपून गेली.

उद्या सकाळपासून पुढचे काही महिने एक तुफानी वादळ त्या होस्टेलला, त्या गावाला, नंतर महाराष्ट्राला आणि शेवटी राजस्थानला घोंघावत वेढणार होते. त्या वादळाचे नांव होते सिमेलिया जैन! त्या वादळात गोयल, आशिष, देव, समीर आणि वारिया दस्तूर हे सगळे जमीनदोस्त होणार होते. नेस्तनाबूत होणार होते. आत्ता ते वादळ रजई अंगावर घेऊन आतल्या आत आक्रंदत झोपी गेले होते. पण उद्या सायंकाळच्या न्यूज पेपरमध्ये त्या वादळाचा पहिला तडाखा गावाला बसणार होता. सिमेलिया जैन हे दोन शब्द आपल्या महान संस्कृतीची लक्तरे करत तिला वाकुल्या दाखवून हासणार होते.

तेवढ्यात, भसीनच्या मुलांच्या आठवणीत मन रमवत असलेल्या जो च्या सेलवर जयाचा टेक्स्ट आला.

'वीरकर गल्लीतील रूम नंबर सहामध्ये ये. राहुलच्या मित्राची रूम आहे ही. मित्र येथे नाही आहे आणि राहुल मला म्हणत आहे की आज रात्री येथेच राहा. प्लीज लवकर ये'

=======================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या वादळात गोयल, आशिष, देव, समीर आणि वारिया दस्तूर हे सगळे जमीनदोस्त होणार होते. नेस्तनाबूत होणार होते.

>> प्लीज असे होउ दे!