स्त्रीस श्रद्धांजली

Submitted by सांजसंध्या on 16 January, 2013 - 12:41

डिसेंबर मधे बलात्कार झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलीचं टाकून दिलेलं प्रेत मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली, पाठोपाठ लखनौजवळच्या गावात ट्रेनमधे सामूहिक बलात्कार करून विवाहितेला झाडाला फाशी दिल्याची बातमीही ! अशा दोन चार ओळीच्या अनेक बातम्या दिसू लागल्या.. या सर्व अंधारातल्या अभागिनींना या कवितेद्वारे श्रद्धांजली !!

नाविका, आले रे मी चुकून जन्माया
गुन्हेगार मी, धरती होऊनी, कळली ना माया ......||धृ||

कोण आपुले, परके कोणी
कुपी विषाची, कुठले पाणी
पारख चुकता पारध होते
जीव लागे भ्याया ...........................................|१|

निर्भया ती लढली होती
प्रत्येकीची वेदना होती
अंधाराला वाचा फुटते
थरथरते काया.. .............................................|२|

रान कळी एक पुन्हा खुडली
गावाबाहेर, भोळी इवली
आज ना जळते, बत्ती कोठे
ना होतो धावा..................................................|३|

आक्रोशाचा, भोग कुणाचा
जीव कुणाचा, न्याय कुणाचा
रोग म्हणू का, स्त्री जन्माचा
दोष ना तुज द्याया.............................................|४|

- संध्या

( कवितेतलं नाविका हे संबोधन पैलतीरास घेऊन जाणा-या "त्या"च्यासाठी वापरलेलं आहे. हे गा-हाणं त्याच्याकडे मांडलंय. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमस्व म्हणण्याची काहिच गरज नाहि. भावना सच्च्या असताना वृत्त, साहीत्यिक मूल्यं हे सगळे फारच कच्चे असते त्यापुढे.

आतल्या पानावर असतात या बातम्या आता. हळूहळू बंद होतील.. पण घटना घडायच्या बंद होतील का ?