चारचौघी - ५

Submitted by बेफ़िकीर on 16 January, 2013 - 02:14

दर रविवारी संध्याकाळी होस्टेलमागच्या लहान टेकडीवर फिरायला जायचा कार्यक्रम असायचा. होस्टेलवरील इतरही काही ग्रूप्स तेथे जायचे. जवळपास तीस चाळीस महिला, मुली असे फिरायला जात असल्याने काही सिक्युरिटी गार्ड्सही मागून सोबत म्हणून जायचे. आजही चार वाजता टेकडीवर जायचे हे न बोलताच ठरलेले होते. जो ला रविवारी दुपारी झोप घ्यायचा मोह आवरावा लागायचा कारण मग रात्री झोप लागायची नाही आणि सोमवार वैतागात जायचा. पण जया, निली आणि सिम मजेत घोरायच्या दुपारीही. पण आज सिम आलीच मुळी सव्वा तीन वाजता. तेव्हा या तिघीही जाग्याच होत्या त्यात पियाही तेथेच बसलेली होती. 'मसाला' शब्दाच्या वापराचा कंटाळा आल्याने आता रमी खेळत बसल्या होत्या चौघी.

सिमने दारात पाऊल टाकले आणि चौघी तिच्याकडे बघतच राहिल्या. सिमचे असे दर्शन दुर्मीळच होते. ती ज्या व्यवसायात होती त्यात प्रत्येक क्षणी शक्य तितके चांगले दिसण्याला अतिशय महत्व होते. पण आत्ता? आत्ता केस काहीसे विस्कटलेले होते. चेहर्‍याचा रंग उडालेला होता. डोळे वर होत नव्हते. कपडे चुरगाळलेले होते. थकल्यासारखी जाणवत होती.

"भलतीच जोरात झालेली दिसतीय बर्थ डे पार्टी"

जयाने एक पत्ता उचलत हातातील पानांमध्ये लक्ष घालत कमेंट पास केली. कसेनुसे हासत आणि पर्स फेकत सिम बेडवर कोसळली. आता जो ने तिला विचारले.

"काय गं? काय झालं?"

सिमचे डोळे भरून येत होते. असह्य वेदनांनी ताप आल्यासारखे वाटत होते. तिने सेल फोनही बंद करून टाकलेला होता. 'काही नाही, जरा पडते' असे कसेबसे म्हणत तिने ग्रूपकडे पाठ फिरवली. जो, जया आणि प्रियंका या तिघीही रमी खेळण्यात गढून गेल्या. मात्र नीलाक्षी? निलीच्या अनुभवी नजरेला काहीतरी जाणवलेले होते. समोर जे दिसत आहे ते स्त्रीचे रूप आपण कित्येकदा पाहिलेले आहे हे तिच्या लक्षात येत होते. सिमला चेहराही वर करावासा वाटत नाही आहे, नजरेत नजरही मिसळावीशी वाटत नाही आहे हे निलीच्या चाणाक्ष नजरेला समजलेले होते. टक लावून ती काही क्षण सिमकडे बघत राहिली. सहसा ही अवस्था काहीतरी भयंकर घडून गेल्यानंतर आलेली असते आणि अश्या परिस्थितीतील मुलगी काही वेळ एकटी, अबोल व माणसांपासून दूर राहू इच्छित असते हे निलीला माहीत होते. तिला हेही माहीत होते की आत्ता आपल्यापैकी कोणी नुसता सिमच्या पाठीवरून हात जरी फिरवला तरी बहुतेक सिम मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागेल. सिमच्या चेहर्‍यावरील, देहबोलीतील आणि पेहरावाची सर्व चिन्हे हेच सुचवत होती की सिमच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडून गेलेले आहे.

पंख्याखाली बसूनही निलीच्या कपाळावर घाम आला भीतीने! हातांना सूक्ष्म कंप सुटला. आपल्या मनात जे आहे ते खोटे ठरो अशी ती मनातच प्रार्थना करू लागली. एक डोळा कायम सिमवरच ठेवून ती लक्ष नसूनही रमी कंटिन्यू करू लागली. या बाकीच्या तिघी आधीसारख्याच किलबिलत हासत होत्या. सिमला जरा बरे नसावे किंवा पार्टीमध्ये नाचून ती दमली असावी असे गृहीत धरून त्या सिमचा अवतार विसरूनही गेलेल्या होत्या. पण निलीच्या मनातून आता सिमचा विचार जात नव्हता. यथावकाश रमीमधील स्वारस्य संपल्यावर आणि चार वाजत आल्यावर सगळ्याजणी उठल्या. निली जो ला म्हणाली.

"जो, मी टेकडीवर नाही येत"

"का गं?"

"अंहं... तुम्ही जाऊन या"

"पण तू ये ना? आणि सिम?"

"नाही, ती तर झोपलीच आहे, मीही जरा पडते"

"ओक्के.. चल जया... ए पिये तू येणारेस ना? का लोळत बसणारेस?"

"मी येणार" - पियाला टेकडीवर जावेसे वाटत होते.

कमी कमी होत असलेल्या उन्हात टेकडी चढून जाताना धाप लागायची. पण वर गेल्यानंतर तुफानी थंड आणि अनिर्बंध वार्‍यात उभे राहिले की शरीर पिसासारखे वाटू लागायचे. गावातल्या पोल्यूटेड हवेच्या तुलनेत तेथे फारच रिलॅक्सिंग वाटायचे. मग सूर्यास्त पाहात पाहात सगळ्यांनी खाली उतरायचे. वर खायच्या गोष्टी न्यायच्या नाहीत. फक्त पाणी न्यायचे. त्यात पुन्हा इतर ग्रूप्सही असायचे. नव्या ओळखी व्हायच्या. हसणे खेळणे आणि एकुण धिंगाणा करता यायचा. या टेकडीवर गावातले कोणी यायचे नाही. एक तर लेडिज होस्टेलच्या मागची टेकडी असल्याने एकुणच सुरक्षा व्यवस्था कडक होती आणि त्याची गावातल्या लोकांना सवय झालेली होती. दुसरे म्हणजे गावाच्या मधोमध एक चांगली दुसरी टेकडी होती आणि तिला तर पायर्‍याही होत्या. तीवर एक मंदिर होते आणि फेरीवाले काय काय विकतही असायचे. बहुतेक वर्दळ त्यामुळे तिकडेच असायची. शूज घालून तिघी बाहेर पडल्या. निली मुद्दाम तिघींबरोबर खाली गेली. मागच्या हॉलला असलेल्या दरवाजात उभी राहून निली काही मिनिटे टेकडीकडे जाणार्‍या या तिघींना निरखत राहिली. टेक्डीची चढण त्या चढू लागलेल्या दिसल्या तशी निली निश्चींत झाली. त्याचक्षणी धावत धावत ती रूममध्ये आली आणि अलगद जाऊन झोपलेल्या सिमच्या जवळ बसली. सिमच्या कपाळावर तिने अलगद हात ठेवला. सिम दचकली. दचकून तिने निलीकडे पाहिले. सिमच्या मनात आले की आपली अवस्था या अनुभवी मुलीने ओळखली आहे की काय? स्वतः बलात्काराच्या पाशवी सत्रात चार वर्षे काढून नंतरची आठ वर्षे अश्याच मुलींच्या आणि स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी व्यतीत करत असलेल्या निलीला आपली अवस्था समजलेली असेल की काय? दोघींची काही क्षण नजरानजर झाली. विदीर्ण नजरेने ते राजस्थानी गोरेपान सौंदर्य निलीच्या डोळ्यात आपली माँ दिसते का हे बघत होते. निलीने आपला उजवा हात सिमच्या खांद्यावर ठेवला आणि तिला थोडेसेच जवळ ओढल्यासारखे करत तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

"इज एव्हरीथिंग ओके?"

सुरक्षित वातावरण! कितीतरी वेळानंतर मिळालेले, जन्मसिद्ध हक असलेले सुरक्षित उबदार वातावरण! सिमच्या मनाचा बांध फुटला. निलीला काहीतरी नक्कीच जाणवलेले आहे हे तिच्या लक्षात आले, निलीच्या डोळ्यात डोळे मिसळताना तिच्या डोळ्यांमधून खळ्ळकन आसवांच्या सरी बाहेर पडल्या. आवेगाने निलीच्या कुशीत शिरून सिम कितीतरी वेळ गदगदत राहिली. तिचा तो आवेग, ती रडण्याची पद्धत, ते घट्ट मिठी मारून आधार शोधत असल्याप्रमाणे चिकटून बिलगून बसणे, नजर वर न करणे, या सर्वाशी नीलाक्षी व्यवस्थित परिचीत होती. 'सिम वॉज रेप्ड'! नीलाक्षीला बसल्या जागीच ते लक्षात आले. निलीच्या हातापायांना कंप सुटला. डोके बधीर झाल्यासारखे झाले. बलात्काराचा राक्षस या होस्टेलच्या रूममध्येही घुसलेला पाहून तिला घाम फुटला. पण आत्ता तिची भूमिका आधार देण्याची होती, मागण्याची नव्हे. अश्या अवस्थेत एक शब्दही न बोलता सिमला नुसते जवळ घेऊन थोपटत राहणे आवश्यक आहे हे निलीला ज्ञात होते. शून्यात नजर लावून निली कितीतरी वेळ सिमला थोपटत राहिली. सिमची निलीच्या पाठीवरची हातांची पकड अंशानेही ढिली झालेली नव्हती. असहाय्यता, विवशता, दुर्बलता या सर्वांना आपल्या डोळ्यांमधून अश्रूंच्या रुपाने वाहू देत होती सिम. निलीचा कुर्ता सिमच्या डोळ्यातील पाण्याने ओला झाला होता. निलीचा हात सिमच्या पाठीवरून फिरताना मधेच सिम वेदनांनी किंचित विव्हळतही होती. तिला बहुतेक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असणार होती. बसूनच निलीने सिमचा टीशर्ट ताणून तिच्या पाठीवर नजर टाकली. नखांनी सोलली गेल्यासारखी ती पाठ हुळहुळलेली होती. सिमला दवाखान्यात न्यायला हवे होते. पोलिस केसही होणारच होती. पण आधी सिमला आश्वस्त करायला हवे होते की हा तिच्या आयुष्याचा, स्वातंत्र्याचा, व्यक्तीमत्वाच्या विकासाचा शेवट नाही. ही फक्त एक परिक्षा होती जी पाशवी जगाने तिला द्यायला लावलेली होती. आयुष्य यापुढेही होते, करिअर यापुढेही होते, तिच्याबद्दलचा इतरांच्या मनात असलेला सन्मान यापुढेही तसाच राहणार होता.

रेप झालेला होता हे तर निश्चीतच होते. दोघांना मान्य असलेले शरीर संबंध इतके रक्ताळलेले असूच शकत नव्हते. तसेच, त्यानंतर सिम अशी रडली नसतीच. निलीला ब्रह्मांड आठवले. आता पोलिस केस, वैद्यकीय तपासण्या, या बाकीच्या तिघींनाही धीर देत राहण्याची जबाबदारी, सिमवर प्रश्नांची सरबत्ती, सिमच्या चारित्र्याबाबतच्या शंकांना उत्तरे! तोच सगळा महागदारोळ आणि त्यातून निष्पन्न काय? तर तो जो कुणी रेपिस्ट असेल त्याची केस कोर्टात दाखल होणार आणि त्याचा वकील त्याला शक्य तितक्या कमी शिक्षेत किंवा जमलेच तर निर्दोष सोडवणार! पुन्हा एकदा त्या सगळ्यातून जावे लागणार. तेही आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीसाठी! होस्टेलवरच्याच मुलीबाबत हे झाल्याने इतर मुली प्रचंड घाबरणार, सिम तसलीच आहे या चर्चेलाही ऊत येणार! अवघड, सर्व काही अवघड होते. रूमच्या बाहेर ही बातमी जाऊच द्यायची नसेल तर सिमला न्याय मिळणार नव्हता. पुनर्वसन आणखीनच अवघड होणार होते.

जवळच सिमचा सेल पडलेला होता. निलीने तो सहज ऑन केला. त्यातील कॉळ डिटेल्स किंवा मेसेजेस पाहून काही जाणवते का, काही कळते का हे तिने तिच्या परीने बघायचा प्रयत्न केला. पोलिस चौकीत काय प्रश्न विचारले जातात आणि एकदा नग्न झालेल्या स्त्रीला कसे पुन्हा नग्न केले जाते हे निलीला माहीत होते. पुनर्वसन केंद्राशी संलग्न असलेल्या मीरा भाटिया या अ‍ॅडव्होकेट बाईंना इन्व्हॉल्व्ह करायचे तिने ठरवलेले होते. पण सिमला विचारल्याशिवाय नाही. सिमचे एकुण म्हणणे काय आहे ते आधी समजून घ्यायला हवे होते.

सिमची पकड ढिली झाली, चेहरा वर उचलला गेला. अश्रूंनी पूर्ण चेहरा भरलेला होता. लालबुंद झाला होता. सगळे काही संपले असल्याची भावना त्या चेहर्‍यावर होती आत्ता. ही भावना निलीला अर्थातच परिचीत होती. आधार देणे, धीर देणे, एकटे राहू देणे हे सगळे ठीक होते. पण जर केस करायची असली तर तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी न्यायलाच लागणार होते सिमला. त्यासाठी तिला तयार करावे लागणार होते. पण सिमच्या अंगात ताप वाटत होता. सिमच्या कानात कुजबुजत निली म्हणाली...

"चल.. डॉक्टरकडे जाऊ"

सिमने शून्यात बघत हळूहळू नकारार्थी मान हालवली. क्षणार्धातच निलीला सिमच्या मनाची तयारी कोणत्या दिशेने होत असेल याचा अंदाज आला. ती काही ही पहिलीच बलात्कारिता पाहात नव्हती, शेकडो केसेस पाहिलेल्या होत्या तिने! सिमला लाज वाटत आहे, आपले भांडे फुटू नये याची तिला काळजी घ्यायची आहे व प्रकरण दाबायचे आहे हे निलीच्या लक्षात आले होते. आता सिमच्या मनासारखे करायचे की एक जबाबदार नागरीक म्हणून सिमला न्यायसंस्थेचा दरवाजा ठोठावायला लावायचा यावर निली विचार करत होती. कंप्लेंट करणे हाच निर्णय होता निलीचा, पण आजवर दाखल केलेल्या तक्रारींमधून फारसे काही निषन्नच न झाल्याने तीही तशी निराशच झाली होती एकुण!

"कोण होता तो?"

सिमने जवळच्या जगमधील पाणी गटागटा प्यायले. मागे टेकून भिंतीकडे बघत बसली आणि म्हणाली...

"कोणीतरी पुरुष होता... त्याला नाव नव्हते.. चेहरा नव्हता... पण चोच होती गिधाडासारखी... नख्या होत्या लांडग्यासारख्या.. काहीतरी तापलेल्या सळईसारखे आत आत जात राहिले... मी फाटत राहिले... माझे लचके तुटत राहिले.. एक होता की दोघे की चौघे... समजले नाही.. या सगळ्याच्या बदल्यात.. मला एक असाईनमेन्ट मिळाली.. टू पीस बिकिनीवर फोटो देण्याची आणि बंद खोलीत नग्न झाल्यानंतर पुन्हा सगळ्या जगासमोर नग्न होण्याची... निली... मला राजस्थानला जायचे नाही आहे.. तिकडे हे सगळे कळले तर गावादेखत माझे दोन्ही बडे भैय्या माझे मुंडके कापतील आणि माँला त्या दोघांचा अभिमान वाटेल.... मला आत्ता नीट समजते आहे निली... की तू असे का म्हणालीस की यू वॉन्ट टू बी रेप्ड... आता मी फक्त बलात्कार करून घेण्याच्याच लायकीची राहिलेली आहे... होय ना?"

निली थक्क झाली होती. इतकी निर्घृण घटना घडल्याच्या केवळ दोन तासात एक मुलगी इतकी सावरलेली असावी? काय करू शकणार नाही ही? मनाची उभारी इतकी जोरदार असली तर ही जगात काहीही करू शकेल. निलीच्या अनुभवानुसार या कालावधीत मुली अबोल व्हायच्या आणि पाणी पिण्याशिवाय काहीही करायच्या नाहीत. बोलू शकायच्या नाहीत. पण सिम कशी काय सावरलेली होती हेच निलीला समजत नव्हते.

"नाही सिम! तू ताठ मानेने जगायच्या लायकीची आहेस. मान खाली जायला हवी त्या लोकांची. कोण होते ते, सांग मला"

"........."

"आशिष?"

"असेल, तो तर असणारच, शिवाय कोणीही असेल.. "

"तुझी मेडिकल व्हायलाच हवी... मनाची तयारी कर आणि चल माझ्याबरोबर..."

"त्यातून काय मिळणार आहे? चारजणांच्या सिमेनची सँपल्स, पेपरमध्ये बातमी आणि आयुष्यभरासाठी गढूळलेल्या आणि अपमानीत करणार्‍या नजरा"

"तुला लढायला हवे सिम... इतके बोलू शकतीयस तर तुझ्यासारखीने तरी लढलेच पाहिजे... "

"हो? काय म्हणतेस? तुला तर अठ्ठाविसावे वर्ष चालू असूनही आणि तुझ्याबाबतीत ते घडून गेल्याला आठ वर्षे होऊनही तुला हेसुद्धा माहीत करून घ्यावेसे वाटत नाही आहे की नरेशला शिक्षा मिळाली की नाही! आणि मला लढायला हवे आहे?"

फाडकन तोंडात मारल्यासारखी निली चूप बसली. सिमचे काय चूक होते?

"चल, कोमट पाण्याने आंघोळ कर"

निलीच्या आधाराने सिम उठली. निली खाली कोमट पाणी आणण्यासाठी गेली. सिमने स्वतःला फुलसाईझ आरश्यात पाहिले. जैन घराण्यातील कडक संस्कारांमध्ये आणि शुद्ध आहारावर वाढून रुबाबदार झालेले ते घाटदार सौंदर्य! आत्ता त्या सौंदर्याची लक्तरे ठिबकत होती. भैय्यांना फोन केला असता तर ते फ्लाईटने इकडे पोचले असते आणि केवळ सहा तासात गोयल सरांसकट पाचहीजणांचे मुडदे पडले असते. त्या पाठोपाठ आपलाही.

जड पावलांनी सिम बाथरूमकडे वळली. दार लोटून घेऊन तिने टीशर्ट काढला. टीशर्ट काढताना वेदना झाल्या. तिने टीशर्ट हातात घेऊन नीट निरखून पाहिला. दोन तीन रक्ताचे सूक्ष्म डाग होते त्यावर. खरे तर तिच्या अंगावरील प्रत्येक कपडा आणि तिचे शरीर हा एक मोठा पुरावा होता बलात्काराच्या सैतानाचा बंदोबस्त करण्यासाठीचा! तिने कपडे भिजवले नाहीत. एका बादलीत तसेच ठेवून दिले. न जाणो पुढे काय घडणार आहे? कदाचित हे कपडे महत्वाचे ठरतीलही. निली बाथरूममध्ये आली. तिने सिमचे शरीर निरखून पाहिले. निलीच्या डोळ्यात पाणी आले होते, पण सिम ठामपणे उभी होती. उभ्याउभ्याच निलीने एक तांब्या पाणी सिमच्या पाठीवर ओतले आणि मगाचपासून कुजबुजत असलेल्या सिमच्या तोंडातून प्रथमच वेदनेचा हुंदका जोरात निघाला. काय धुतले जात होते? पुरावे? की वासनेची बरबट? की बलात्कार झाल्याची भावना? काही समजत नव्हते. स्टूलवर बसलेली सिम निलीवर स्वतःचे शरीर सोपवून पुतळ्यासारखी थिजून भिंतीकडे बघत राहिली होती.

अर्ध्या तासाने सिमला आवश्यक तेथे क्रीम लावून निलीने बाहेर आणले आणि बेडवर झोपवले. चहाची ऑर्डर देऊन ती परत आली तेव्हा सिम स्वतःच्या हातातला सेल दाखवत निलीला म्हणाली..

"हा टेक्स्ट बघ निली... आय डोन्ट नो व्हॉट इट मीन्स...??????"

सिमला कोणाचातरी मेसेज आलेला असावा. निलीने त्वरेने जाऊन सेल हातात घेऊन मेसेज वाचला.

"यू कॅन गेट इन टच विथ अ‍ॅडव्होकेट मिस वारिया दस्तूर टू पनिश दीज गाईज, अ‍ॅड दस्तूर'स नंबर इज....."

हा मेसेज कोणी पाठवला होता हेही समजत नव्हते. आशिषचा तर हा नंबर नव्हताच. पार्टीमध्ये लगट करणारा देव तर नक्कीच बलात्कार करणार्‍यांपैकी एक असणार होता. गोयल सर तर खास आपल्याला भोगण्यासाठीच परत आलेले दिसत होते. मग असा कोण होता जो अगदी इतके स्त्रीदाक्षिण्य आत्ता दाखवत होता, पण तेव्हा प्रत्यक्ष काहीच करू शकला नव्हता? बलात्कार थांबवू शकला नव्हता? की हा मेघनाचा एखादा दुसरा नंबर असेल?

निली आणि सिम एकमेकींकडे काही वेळ बघत राहिल्या. निलीने कसलासा निर्णय घेतला आणि सरळ फोनच लावला वारिया दस्तूरला.

"वारिया दस्तूर बोलतीय"

"मॅम मी नीलाक्षी कस्तूरीरंगन बोलतीय.. मला आपला रेफरन्स एका मैत्रिणीकडून कळाला... मॅम माझ्या एका दुसर्‍या मैत्रिणीसाठी आपल्याला भेटायचे आहे.."

"कुठून बोलताय?"

"मुलवानी वर्किंग वूमेन्स होस्टेल.. नेव्ही रोड"

"अर्जंट?"

"येस मॅम"

" काय केस आहे?"

"मॅम.. अ‍ॅसॉल्ट"

"हंहं... ठीक आहे.. ऑफीसला या.. अर्ध्या तासात पोचा... "

पत्ता नीट नोट करून निलीने फोन ठेवला आणि सिमला तयार होण्यास सांगितले. अंगात कसकस वाटत असूनही सिम उठून तयार होऊ लागली. तिच्या मनात वादळे उठलेली होती. आपण्जे करतो आहोत ते आपल्याकडून करून घेतले जात आहे की आपलीही अशी इच्छा आहे? खरंच लढायचे आहे का? मग लढायचेच असले तर करिअरच्या मागे लागलो तरी कशाला? म्हणजे आता करिअर संपलेच का? जर करिअर करायचे असेल तर याच फील्डमधील लोकांशी इतक्या सुरुवातीच्या स्टेजलाच वाकडे घेऊन चालणार आहे का? आपल्यासारख्या शेकडो मुली या करिअरसाठी धडपडत असताना बिकिनीवरचे का होईनात पण आपले फोटो किणीतरी स्वीकारत आहे ही अ‍ॅचिव्हमेंट एरवीच्या सर्कमस्टन्सेसमध्ये आपल्याला किती महत्वाची वाटली असती. मग आपण का जातोय त्या बाईकडे?

पंचविसाव्या मिनिटालाच दोघी वारिया दस्तूरच्या ऑफीसमध्ये तिच्यासमोर बसलेल्या होत्या. सिमच्या चेहर्‍याचा रंग पाहूनच अनुभवी वारियाला यातील निली कोणती आणि सिम कोणती हे लक्षात आलेले होते. तिने सिमपुढे पाणी सरकवले आणि समोरचे सर्व कागद बाजूला सारून मागे रेलून टेकत तिने पूर्ण लक्ष सिमकडे आहे याबद्दल सिमला प्रथम आश्वस्त केले आणि मग म्हणाली...

"जमेल तसे सांग, पण सगळे काही पूर्ण सांग, अगदी लहानातली लहान गोष्टही सोडू नकोस.. कदाचित एखादी कमेंट, एखादी नजर, यातूनही अनेक गोष्टी फिरवल्या जाऊ शकतात... जे जस्से झाले तस्सेच सांग, तुझे मत त्यात अ‍ॅड करू नकोस.. फक्त फॅक्ट्स सांग... "

तीन वर्षांपूर्वी पश्चिम भारतात आणि सहा महिन्यांपूर्वी मुलवानी होस्टेलमध्ये आल्यापासून सिमने सुरुवात केली. निलीही थक्क होऊन ऐकत बसली होती. ही लहानशी एकटी मुलगी तीन वर्षात कोणकोणत्या घातक परिस्थितीतून सहीसलामत सुटत राहिलेली आहे याचे निलीला आश्चर्य वाटत होते. आज सकाळपासूनचा किस्सा सांगताना मात्र सिमच्या डोळ्यातून पाणी वाहात होते. पण बोलण्यात खंड पडत नव्हता. शेवटी सिमने गोयल सरांची ऑफर स्वीकारल्याचे व नंतर रूमवर निघून आल्याचे सांगितले आणि वारिया दस्तूरने डोळे उघडले. आता बोलण्याची पाळी वारिया दस्तूरची होती.

"तुला आजच्या पार्टीला कोणी बोलावले होते?"

"आशिष"

"फोनवरून?"

"हो"

"काय म्हणाला? गोयल येणार आहेत म्हणून म्हणाला?"

"हो"

"तुझा तेथे जाण्याचा उद्देश काय होता? प्रमुख उद्देश? गोयलांना भेटणे की आशिष या मित्राचा बर्थ डे?"

"खरे तर... दोन्ही"

"तरीही, दोन्हीतले एकच निवडायचे म्हंटलेच तर?"

"गोयल सरांना भेटणे"

"तुला गोयल सर भेटतील असे आश्वासन मिळाले होते?"

"नाही, ते फक्त येऊन जाणार होते आणि परिचय होणार होता"

"आले होते?"

"हो"

"परिचय झाला?"

"प्रत्यक्ष तेव्हा नाही झाला..."

"का?"

"ते घाईत होते"

"मग तू उढे होऊन स्वतःला इन्ट्रोड्यूस का नाही केलेस?"

"आय वॉज... म्हणजे... इतका मोठा माणूस... मी कसे काय स्वतःहून..."

"त्याच मोठ्या माणसाने रेप केला ना पण? तू बीअर घेत होतीस असे म्हणालीस..."

"हो... थोडी घेतली होती..."

" थोडी म्हणजे?"

"मे बी... अर्धा टिन..."

"नेहमी घेतेस?"

"नाही... "

"किती वेळा घेतेस?"

"हार्डली... दोन महिन्यांमधून एखादएळेस..."

"किती घेतेस?"

"एखादा टिन..."

"म्हणजे तुझ्या कपॅसिटीच्या अर्धी बीअर तू घेतलेली होतीस साधारण.."

"कपॅसिटी असे नाही... पण मी फार घेतच नाही.."

"तुला नशा वाटत होती..."

"अगदी किंचित..."

"झोक जात होते?"

"नाही नाही"

"डान्स केलास?"

"हो.."

" कोणाबरोबर?"

"आशिष... आणि देव.."

"आणि समीर?"

"नाही..."

"गोयल?"

"छे त्यांचा प्रश्नच नाही..."

"ती मेघना की कोण... ती काय करत होती..."

"तीही बीअर घेत होती ... डान्स करत होती..."

"तिने काय कपडे घातले होते?"

"शी वॉज... शी वॉज वेअरिंग अ मिडी"

"शी वॉज प्रॉपरली ड्रेस्ड?"

"एव्हरीवन वॉज प्रॉपरली ड्रेस्ड"

"तू काय घातले होतेस?"

"टीशर्ट... जीन्स..."

"स्लीव्हलेस टीशर्ट?"

"नाही.. हाफ स्लीव्हज"

"जीन्स?"

"नॉर्मल"

"वेस्ट?"

सिमने खाली बघत उत्तर दिले.

"लो वेस्ट"

"आणि डान्स करत होतीस...."

" आय डोन्ट नो व्हॉट आर यू कमिंग अ‍ॅट..."

"लीह इट... गोयल निघून गेल्यावर तिथे कशासाठी थांबलीस?"

"म्हणजे.. लगेच कसे निघता येईल... इट विल बी सेल्फिश..."

"किती वेळ थांबलीस?"

"एक.. अर्धा तास वगैरे असेल.."

"त्यांचा फोन येईपर्यंत..."

"त्यांचा फोन येणार आहे हे मला माहीतच नव्हते..."

"त्या अर्ध्या तासात तू काय करत होतीस?"

"नुसती बसून डान्स बघत होते बाकीच्यांचा.."

"बीअर घेत घेत?"

"हो..."

"तू डान्स करत होतीस तेव्हा कोणी तुझ्याशी लगट केली होती?"

सिमने निलीकडे पाहात पुन्हा खाली पाहिले व म्हणाली...

"होय... देव म्हणून जो होता त्याने..."

"काय केले त्याने?"

"ही वॉज ट्रायिंग टू किस मी..."

"त्याने तुला कोठे धरले होते?"

"अं? ... एक हात ... इथे कंबरेवर होता.. आणि एक हात पाठीवर..."

"एक हात कंबरेवर होता... आणि तू लो वेस्ट जीन्स घातली होतीस..."

सिमने पुन्हा खाली पाहिले आणि पुन्हा वारियाकडे ठामपणे पाहात म्हणाली...

"येस मॅम"

"त्याने त्याचा कंबरेवर ठेवलेला हात... जीन्सच्या आत घालायचा अटेंप्ट केला होता का?"

"नो.. नाही.."

"नक्की? की आठवत नाही? कारण तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या कंबरेवरही मागच्या बाजूला नखाम्च्या खुणा आहेत ना?"

"त्या नंतर झालेल्या आहेत... त्यावेळी नाही..."

"म्हणजे त्याने हात बाहेरच ठेवलेला होता.."

"हो... पण या... या सगळ्याचा काय संबंध आहे?"

"आरोपीचे वकील केस कश्यावरती फिरवतात हे तुला कळायचेही नाही... त्या देवने लगट केल्यावर तू प्रतिकार केलास का?"

"हो.."

"कसा? तोंड बाजूला फिरवून?"

"हो.."

"कितीवेळा तोंड जवळ आणले होते त्याने?"

"चार पाच वेळा.."

"आणि प्रत्येकवेळी तू तोंड बाजूला फिरवलेस?"

"हो"

"पण डान्स मात्र करत राहिलीस त्याच्याच बरोबर..."

"नाही... सहाव्या वेळेला मी माझी सुटका करून घेऊन सोफ्यावर बसले"

"पाच वेळेला केलेला प्रतिकार सहाव्या वेळेस उपयोगी पडला नव्हता"

"नव्हता पडला... ही वॉज अ‍ॅडव्हान्सिंग..."

"त्याने तुला मिठीत आवळले होते?"

"नाही... "

"पण त्याच्या भावना चाळवल्या गेल्या होत्या हे तुला मान्य आहे..."

सिम काही क्षण वारियाकडे पाहात राहिली. मग म्हणाली.

"होय..."

"तो मेघनाशीही तसाच वागत होता?"

"मेघना स्वतःच कोणालाही किस करत होती..."

"सगळ्यांसमोर..."

"हो..."

"पण देवने मेघनाला जवळ घेतले होते?"

"नाही..."

"का?"

"आय डोन्ट नो..."

"त्याने तुलाच का डान्सला बोलावले?"

"असे काहीच नाही... मला डान्स करण्यात काहीच आपत्ती नव्हती..."

"तू म्हणालीस की आशिषने तुला किस देण्यास भाग पाडले.."

"हो..."

"भाग पाडले म्हणजे काय? जबरदस्तीने धरले होते?"

"नाही... फक्त हात फैलावून उभा होता..."

"आणि तू स्वतःहून त्याला किस केलेस..."

"ती... ती सिच्युएशनच तशी झाली होती मॅम... आय ऑज अंडर हिज ऑब्लिगेशन्स..."

"अ‍ॅन्ड अल्सो अंडर द इफेक्ट ऑफ बीअर"

"नॉट मच रिअली..."

"सगळ्यांसमोर किस केलेस?"

"हो"

"किती वेळ?"

"काय????"

"किती वेळ किस करत होतीस?"

"आय मीन... आय डोन्ट गेट यू... म्हणजे हार्डली.. दोन चार सेकंदच किस करणार ना?"

"किस करताना तो आक्रमक झाला होता? अ‍ॅडव्हान्स करत होता?"

"म्हणजे... होणारच कि कोणताही पुरुष किस करत असताना आक्रमक?"

"म्हणजे तुला कल्पना होती की तू किस करू लागलीस की तो आक्रमक होऊ शकेल.. . आक्रमक म्हणजे काय झाला होता? काय केले त्याने?"

"ही.. ही हग्ड मी..."

"किती जोरात? की हलकेच?"

"नाही.. म्हणजे.. इट वॉज... जस्ट"

"किती जोरात? तू गुदमरलीस?"

"नाही नाही..."

"सहज सुटू शकलीस त्याच्या मिठीतून?"

"हो... लगेचच..."

"त्या क्षणी तुला तेथून काढता पाय घेणे शक्य होते?"

"म्हणजे?"

"म्हणजे आणखी काही अनर्थ होऊ नये म्हणून निघून जाणे शक्य होते?"

"शक्य म्हणजे... तसे शक्य होते... मला काही कोणी जबरदस्तीने अडवून ठेवलेले नव्हते... पण ते त्या क्षणी... नंतर जबरदस्तीच केली ना?"

"किस न घेताच निघून गेली असतीस तर जाता आले असते?"

"जाता आले असते... पण..."

"पण तुला किस घेण्यात किंवा देण्यात काही आपत्ती नव्हती..."

"आय मीन.. ते सगळे इतके अचानक घडले..."

"पण मग तू निघाली का नाहीस?"

"एकदम निघून गेले तर मी सेल्फिश आणि इगोइस्टिक ठरले असते... कदाचित गोयलांची ऑफर हातातून गेली असती..."

"तेव्हा तुला ऑफर हातात मिळालेली होती?"

"नाही... नुसतेच टेस्टला बोलावणे आल्याचे माहीत झालेले होते..."

"मग हातातून ऑफर कसली जाणार होती?"

"हो पण त्यांनी खास माझ्यासाठी आठवून फोन केलेला होता... प्रॉस्पेक्ट्स तर होतेच..."

"आशिष तुझ्या ओठांना चावला? की फक्त... "

"नाही... चावला नाही..."

"किती वेळा त्याने तुला किस करण्यासाठी आवाहन केले?"

"......"

"दहापाच वेळा? की अनेकदा?"

"दोनदा"

"अ‍ॅन्ड यू अ‍ॅक्सेप्टेड इट"

"सगळे माझ्याकडे बघत थांबले होते... त्या परिस्थितीत मी आखडूपणा करणे हे..."

"करिअरसाठी धोक्याचे ठरले असते?"

"हो"

"नाईस काँप्रो... मग काय झाले?"

"मग... आशिषने मला अचानक उचलले"

"किसिंग करतानाच?"

"नाही... मी बाजूला झाल्यावर"

"तू काय केलेस? प्रतिकार?"

"मला समजलेच नाही... कारण त्याने मागून येऊन उचलले..."

"उचलले म्हणजे कसे उचलले?"

"माझ्या... म्हणजे ... त्याच्या डाव्या हातात माझे दोन्ही पाय आणि उजव्या हाताने मला पाठीकडून उचलले.."

"तू सुटायचा प्रयत्न केलास..."

"अर्थातच..."

"पण सुटली नाहीस..."

"ही इज पॉवरफुल.. माझ्या पाचपट ताकद असेल त्याची..."

"बाकीचे बघत बसले होते..."

"हो..."

"मेघनाही.."

"हो"

"तू सुटण्याचा किती तीव्रतेने प्रयत्न केलास?"

"जितका जास्त प्रयत्न करत गेले तितके त्याने अधिक घट्ट आवळले..."

"आणि तेव्हा गोयल तेथे नव्हते"

"नव्हते"

"देव, जो तुझ्याशी लगट करू पाहात होता त्याने आशिषची साथ दिली नाही त्यावेळी?"

"गरजच नव्हती... आशिश अलोन वॉज एबल टू हँडल मी"

"मग तू हातातून सुटलीच नाहीस..."

"नाही"

"मग तो तुला वर कसा घेऊन गेला?"

"उचलून..."

"उचलून जिना चढून?"

"सांगितले ना? ही इज पॉवरफुल"

"तेव्हा बाकीचे खालीच उभे होते?"

"होय"

"रेकॉर्ड्स?"

"ऑफ केल्या होत्या"

"का?"

"कारण जस्ट गोयलांचा फोन येऊन गेला तेव्हाच त्या ऑफ केल्या गेल्या होत्या"

"जिन्यात तू एकदाही सुटण्याचा प्रयत्न करू शकली नाहीस?"

"मॅम... आय डोन्ट नो... पण पहिल्याच पायरीपाशी मला चक्कर आल्याचे मला आठवत आहे..."

"ते थेट शुद्धीवर आलीस अडीच वाजताच?"

"होय... "

"तुला रेप होत असताना काहीही समजले नाही?" [*]

"मला कळत नव्हते की नेमके काय आणि कसे चाललेले आहे"

"आशिषने तुला वरच्या बेडरूममध्ये नेले?"

"होय"

"हे तुला कळले?"

"हे मला नंतर लक्षात आले..."

"तू म्हणतेस कमीतकमी चौघांनी तुझा रेप केला, फोर्स्ड एंट्री ... अ‍ॅसॉल्ट्स... तुला शुद्ध आली नाही एकदाही?"

"मी... मी बेशुद्ध होते की काय होते तेच समजत नाही आहे..."

"बीअरचा टिन तुझा तू फोडून घेतला होतास?"

"येस मॅम"

"बाकी काही खाल्ले प्यायले होतेस?"

"जस्ट.. पेस्ट्री"

"सगळ्यांनी तीच पेस्ट्री खाल्ली होती?"

"होय मॅम"

"म्हणजे तुला गुंगीचे औषध दिलेले नव्हते तर"

"अं? ... नाही... नसणार दिलेले...."

"मग रेप होताना समजले नाही की तू झोपून गेलेली होतीस आणि रेप झालाच नाही?"

"एव्हरी इंच ऑफ माय बॉडी टेल्स आय ऑज रेप्ड"

"ते तर आहेच... मेडिकलमध्ये सगळे प्रूव्ह होईलच.. पण तुला कसे समजले नाही?"

"प्रचंड घाबरून मी बेशुद्ध झालेले असणार..."

"असणार आणि नसणार हे अंदाज झाले.. मी आधीच म्हणाले होते की मत सांगू नकोस.. फक्त फॅक्ट्स"

"द फॅक्ट इज आय हॅव बीन रेप्ड... डोन्ट नो बाय हाऊ मेनी अ‍ॅन्ड फॉर हाऊ मेनी टाईम्स इन दोज टू अवर्स"

"तू उठलीस तेव्हा रूममध्ये कोणी नव्हते"

"नव्हते"

"तुला जाग आल्यावर पहिल्यांदा काय जाणवले?"

"दॅट... दॅट.. देअर आर पेन्स एव्हरीव्हेअर... अ‍ॅन्ड... आय अ‍ॅम न्यूड... नेकेड"

"खाली आवाज येत होते?"

"हो"

"कसले?"

"रेकॉर्ड्स... डान्स करतानाच्या आरोळ्या"

"तुझ्या... प्रायव्हेट पार्ट्समध्ये वेदना होत होत्या... "

"अतिशय.."

"ब्लीडिंग"

"झालेले होते..."

"इतर शरीरावर काय खुणा होत्या?"

"अनेक ठिकाणी रक्ताळलेले होते मी..."

"सो इट वॉज ऑब्व्हियस रेप यू मीन"

"व्हॉट द.... "

सिमने तोंदात आलेली शिवी आवरली आणि जीभ चावली आणि पुढे म्हणाली.

"ऑफकोर्स इट वॉज नथिंग एल्स बट रेप... सामुहिक बलात्कार झाला होता... इट वॉज अ गँग रेप"

"आणि तुला हेही माहीत नाही की कितीजणांनी केला की फक्त आशिषनेच केला"

"मॅम... एक तरुण कुमारिका बेडवर नग्नावस्थेत पडलेली आहे... एकाने तिचा रेप केलेला आहे... तिचा विरोध आणि प्रतिकार शक्ती संपलेली आहे... बाकीचे तिघे बीअर घेत तिथेच, त्याच घरात आहेत.. ते तसेच बसतील का?"

"यू हॅव अ पॉईंट... गुड... आता मला सांग... समवन एन्टर्ड यू फ्रॉम द फ्रंट ओन्ली... राईट???"

"आय... आय हॅव.. "

"यू हॅव नो आयडिया... "

"बट आय हॅव पेन्स..."

"आय नो.. आणि तू कपडे घालून खाली गेलीस तर स्वतः गोयलही होते..."

"येस मॅम"

"ते कधी आले होते?"

"नो आयडिया"

"नो आयडिया.. सगळंच धूसर, अविश्वसनीय वाटेल कोर्टात... गोयलांनी तुला तेथे ऑफर दिली??"

"येस मॅम.."

"काय म्हणाले ते?"

"एका सुप्रसिद्ध कॅलेंडरसाठी मी निवडली गेलेली आहे.. बट आय वूड हॅव टू वेअर अ बिकिनी"

"अ‍ॅन्ड यू अ‍ॅक्सेप्टेड..."

"..... येस... आय डिड"

"हाऊ डू यू एक्स्प्लेन धिस सिमेलिया?"

"मी ऑफर अ‍ॅक्सेप्ट केली नसती तर... .."

"... तर???"

"तर... कदाचित..."

सिमला रडू कोसळले. रडण्याचा आवेग ओसरल्यावर तिने उत्तर दिले.

"तर कदाचित... त्या सगळ्यांनी परत तेच सगळे केले असते..."

"आणि एवढा त्याग करून परत करिअर झालेच नसते..."

आता मात्र सिम आणि नीलाक्षी भडकल्या. सिमने ताडकन विचारले.

"यू आर टेकिंग धिस केस ऑर नॉट?"

"लक्षात घे बाळा... मी विचारत असलेले प्रश्न तुला प्रतिपक्षाचे वकील विचारणार आहेत.. तेव्हा मला ते विचारूदेत"

".... ओ के"

"मग तू काय केलंस?"

"मी सरळ निघून आले"

"नो वन स्टॉप्ड यू"

"नो वन... कारणच नाही ना? दोन्ही कामे झालेली होती त्यांची... बिकिनी घालणारी मुलगीही मिलाली होती आणि ती मुलगी भोगायलाही मिळाली होती..."

"ऑफर लेखी दिली?"

"नाही... व्हर्बल"

"म्हणजे त्यांनी ऑफर दिली असे म्हणायला पुरेसा पुरावाच नाहीये"

"म्हणजे?"

"म्हणजे कोणतीही ऑफर वगैरे नसताना उगाचच गोयलांवर भलते सलते आरोप केले जात आहेत असे गोयलांचा लॉयर म्हणू शकतो"

"बट... बट... "

"असो! तू झाला प्रकार कोणाकोणाला सांगितलास?"

"फक्त... निलाला"

"घरी?"

"नाही"

"सांगणार आहेस कोणाकोणाला?"

"माहीत नाही... ठरलेले नाही... ही केस कशी वळणे घेणार हे मला अजून समजलेले नाही"

वारिया दस्तूर पुन्हा मागे रेलून बसली. सिमकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिने नीलाक्षीशी बोलायला सुरुवात केली.

"मिस नीलाक्षी... बघा.. एक चोवीस वर्षाची अतिशय सुंदर मुलगी, जी ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपल्या सौंदर्याचा ठसा उमटवायला स्ट्रगल करत आहे.. एका मित्राच्या वाढदिवसाला जाते... आणि जाण्याचे प्रमुख कारण त्या मित्राचा वाढदिवस असे नसून तेथे गोयल येणार आणि त्यांच्याशी परिचय होणार हे असते... जाताना ती लो वेस्ट जीन्स आणि उठावदार टी शर्ट घालून जाते... तेथे एकच मुलगी आणि चार मुले यांच्याशिवाय कोणी नसते हे तिला माहीत होते... तरीही ती गोयलांसाठी बसून राहते... नुसती बसत नाही तर बीअरही घेते... नुसती बीअर घेत नाही तर पाच पाच वेळा किसिंगचे आवाहन देणार्‍या देव नावाच्या मुलाच्या मिठीत डान्स करते... त्याच्या दोन्ही हातांना आपल्या शरीरावर कोठेही फिरू देते... मात्र प्रत्यक्ष गोयल तेथे येतात तेव्हा ही त्यांच्याशी परिचयही करून घ्यायला पुढे होत नाही.. गोयल निघून जातात... आपले काहीच काम झाले नाही, गोयलांशी परिचयही झाला नाही हे या मुलीला समजते... तरीही ती तिथेच बसून पार्टीचा आनंद घेत राहते... बीअरही घेत राहते.. मग गोयलांचा आशिषला फोन येतो की त्या मुलीला उद्या ऑफीसला पाठव... गोयल येऊन गेले आणि त्यांच्या अनुभवी नजरेने आपल्याला हेरले या प्रकारामागे आशिषचे उपकार आहेत हे स्मरून ही मुलगी आशिषच्या चुंबनाच्या हाकेला चुंबनाने प्रत्युत्तर देते... त्यावेळी तिचे हलकेसे चुंबन, फक्त ओठांनी ओठावर असे चुंबन घेणारा आशिष तिला जोराने आवळतसुद्धा नाही... आता बघा... घर आशिषचे... ही तिथे बसून मोकळेपणाने बीअर घेत आहे... मेघना नावाच्या मुलीनेही आपल्या वर्तनातून सर्वांच्या भावना चाळवल्या आहेत.... हिनेही लो वेस्ट जीन्स घालून त्या चाळवलेल्या आहेत.. हिच्यावर तिथल्यातिथे आशिषने उपकार केलेले आहेत... त्यांचे स्मरण करून ही स्वतःहून त्याला किस करत आहे... तो तिला आवळतही नाही की चावतही नाही आहे.. पण तो पुरुष आहे.. तरुण मुलगा आहे.... नुसतीच सगळी परिस्थिती त्याच्या फेव्हरमध्ये आहे असे नाही तर त्याला अ‍ॅडव्हान्स व्हावेसे वाटेल अश्या स्टेप्स स्वतः सिमेलियाने घेतलेल्या आहेत... मला सांगा नीलाक्षी... एका सत्तावीस वर्षे वयाच्या तरुणाच्या मिठीत एक चोवीस वर्षाची इतकी सुंदर आणि सेक्सी दिसणारी मुलगी स्वतःहून शिरली आणि किस घेऊ लागली... तर डू यू फोरसी एनीथिंग एल्स एक्सेप्ट सेक्शुअल इंटरकोर्स ऑर अ‍ॅटलीस्ट दॅट गाय एक्स्प्रेसिंग सच विश टू हर? त्यात पुन्हा म्हणे गोयल तिथे परत आले... त्यांनी हिला सिलेक्ट केल्याचे व्हर्बली सांगितले.. ती ऑफर हिने स्वीकारली... तीही दोन कपड्यांमध्ये जगासमोर नग्न होऊन उभे राहण्याची.. जिच्याकडे आजवर अशी एकही खास असाईनमेन्ट आलेली नहती.. तिच्यासाठी ही सगळीच परिस्थिती स्तिमित होण्याची होती आणि त्या आनंदात तिने आशिषला बीअर घेत, डान्स करत, जीन्समधून आपले इनर्स दाखवत, त्याच्या भावना चाळवून जर किस केले... तर नंतर काय होईल अशी तुमची अपेक्षा आहे?"

हबकलेली नीलाक्षी एकदा सिमकडे आणि एकदा वारियाकडे बघत राहिली आणि शेवटी म्हणाली..

"व्हॉट डू यू... व्हॉट डू यू मीन मॅम???"

"मिस नीलाक्षी, धिस केस डझन्ट स्टँड इन द कोर्ट अ‍ॅट ऑल... आणि हो... तुमच्या पुनर्वसन केंद्राची ती मीरा भाटिया वकील आहे ना? तिची तर हिम्मतच होणार नाही ही केस स्वीकारण्याची...... कारण या केसमध्ये काही दमच नाही आहे... सो... आय विल सजेस्ट... लेट्स फर्गेट हॉट हॅपन्ड अ‍ॅन्ड बी केअरफुल इन द कमिंग डेज... सो दॅट इट डझन्ट रिकर... यू मे प्लीज लीव्ह नाऊ"

थिजलेल्या रक्ताने दोघी यंत्रवत उठल्या आणि दारात आल्या. नीलाक्षीचे रक्त आता उसळ्या मारत होते. ही वकीलीण बाई गोयलला फितूर असण्याची शक्यता तिला ठामपणे वाटत होती.. मागे वळून नीलाक्षीने निकराचा घाव केला वारिया दस्तूरवर..

"अ‍ॅडव्होकेट वारिया दस्तूर... तुम्हाला जेव्हा पुरुषाच्या राक्षसी ताकदीपुढे नमते घेऊन तंगड्या फाकाव्या लागतील ना आयुष्यात? तेव्हा तुम्हाला समजेल की सिमेलियाने काय सहन केले होते"

अपमान सहन न होऊन वारिया ताडकन उभी राहून काहीतरी बोलणार तोवर या दोघी खाली आलेल्याही होत्या...

... खाली एक मोठी पांढरी गाडी उभी होती... ड्रायव्हरने दार उघडून ठेवलेले होते... या दोघींना पाहून ड्रायव्हर अदबीने म्हणाला..

"गोयल सरांनी तुम्हाला होस्टेलवर सोडायला गाडी पाठवली आहे मॅडम... प्लीज बसा..."

तीळपापड झालेली नीलाक्षी बसस्टॉपच्या दिशेने चालू लागली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला... कारण स्वतःच्या बापाची गाडी असल्याच्या थाटात सिमेलिया जैन मागच्या सीटवर शिरत होती.. तिचे गाडीतून एकटीने जाणे निलीला कदापीही मान्य होण्यासारखे नव्हते.. भडकलेली निली राग काबूत ठेवून गाडीत शिरली..

हलकासा धक्का बसून गाडी सुरू झाली... तेव्हा वर वारिया दस्तूर गोयलांना रिपोर्ट करून गोयलांच्याच सूचनेवरून मीरा भाटियांना फोनवर सांगत होती..

"सो मीरा, अ‍ॅज डिस्कस्ड, डोन्ट अ‍ॅक्सेप्ट हर केस... द कॅश विल रीच यू सून"

==================================================

[*] - चौथ्या भागानंतर हा मुद्दा मला बागेश्रींनी सुचवलेला होता. तो या भागात मी कव्हर केला आहे. सुचवणीसाठी बागेश्रींचे मनापासून आभार

==================================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, एक विनंती आहे. कृपया शेवटी क्रमश: लिहीत जा. सगळे भाग एकदम वाचायचा मानस आहे. तुम्ही नेहमी शीर्षकात अंतिम भाग असं लिहिता. तरीपण क्रमश: चा बिल्ला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. Happy
आ.न.,
-गा.पै.

नक्कीच सिमच्या खाण्यात काहितेरी मिसळले असणार कसे ते कळत नाही.

>> अगदी हाच मी सुचविलेला मुद्दा होता.
नकोश्या घटना एकामागे एक घडत गेल्याने मनावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे मूर्च्छित सिम ला शारिरीक प्रचंड वेदनांनेही जाग कशी नाही येऊ शकली, तिच्या ड्रींक्स मध्ये काही मिसळले असण्याची शक्यता!

पण वरिल प्रश्नावलीमध्ये लेखकाने ती शक्यता नाकारून कथेला वेगळे वळण दिले आहेच... बघूयात पुढे काय आहे ते