वाढला संचार येथे

Submitted by निशिकांत on 16 January, 2013 - 01:46

कौरवांचा वाढला संचार येथे
द्रौपदीला ना मिळे आधार येथे

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे

काय किमया आश्रमी बाबागुरूंची !
नार भाकड राहते गर्भार येथे

लाजही लाजून खाली मान घाली
बेशरम राजेच झाले फार येथे

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

फोडली वाचा गुन्ह्यांना, हा गुन्हा का?
मी कशाला आज ताडीपार येथे?

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

सूर्य भित्रा का असा ढोलीत लपला?
अश्वमेधाला निघे अंधार येथे

मंदिरे होती कधी का ईश्वराची?
भरवती बडवे सदा दरबार येथे

तत्व का "निशिकांत" सोडावे जगाया
जाउ दे! धेंडास मिळती हार येथे

निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mali-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच वास्तववादी शेर......

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे >>>>> हा अगदी जबरीच....

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

व्वा..! हे दोनही शेर आवडले.