अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 January, 2013 - 04:36

गझल
अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!
पुन्हा पुन्हा की, मलाच होतात भास येथे!!

तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

मधेच दाटून मेघ येती तुझ्या स्मृतींचे....
मधेच घोंगावतात वारे उदास येथे!

हरेक वेळेस देव धावून येत नाही;
नकोस ऐशी करू कधीही मिजास येथे!

लुटून सारा सुगंध ते जाहले फरारी....
कुणीच उरले न सोबतीला फुलास येथे!

कधीच ती काळजात माझ्या हळूच शिरली;
अजून सजवीत बैसलो मी घरास येथे!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

अम्हास आले न ओळखाया कधीच मोती!
उगाच मोती म्हणून टिपले दवास येथे!!

खुशाल त्यांना तिथे लिहू दे निकाल माझा!
मला करू दे अजून थोडा प्रयास येथे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

पर्फेक्ट ! वा !! खूप आवडला शेर
उर्दू शायरीचा फील आला

'बिट्वीन द लाईन्स' व 'आफ्टर द लाईन्स' देखील मस्त आहे हा शेर

तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!>>> छान, पहिला मिसरा अजून उंच हवा होता, पुरेसा न्याय देऊ शकलेला नाही असे वाटले.

ज्ञानेशचा 'इतके दव ह्या रस्त्यावरती' हा शेर आठवला

मधेच दाटून मेघ येती तुझ्या स्मृतींचे....
मधेच घोंगावतात वारे उदास येथे!>>> व्वा!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!>>> झकास!

खुशाल त्यांना तिथे लिहू दे निकाल माझा!
मला करू दे अजून थोडा प्रयास येथे!!>>> भारी आहे.

धन्यवाद विजयराव!
तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

हा शेर असा लिहिला तर कसे वाटते पहाल काय?

अजूनही शांतता स्मशानी, तिचाच गलका................
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

किंवा....
अजून येथे स्मशान शांती, तिचाच गलका......
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

कृपया मार्गदर्शन कराल काय?
..........प्रा.सतीश देवपूरकर

Mast!

विजयराव!
काही वदला नाहीत?
आम्ही जिवाचे कान करून बसलो आहोत!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

व्वा..बढीया शेर..

खुशाल त्यांना तिथे लिहू दे निकाल माझा!
मला करू दे अजून थोडा प्रयास येथे

मस्त....मस्त..

एकंदरीत गझल आवडली..
शुभेच्छा..