एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’

Submitted by Discoverसह्याद्री on 11 January, 2013 - 11:17

.... कोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. पण, सह्यधारेच्या डोंगरांच्या गराड्यात ‘अनघाई’चा डोंगर लपून गेला होता - नेहेमीप्रमाणेच उपेक्षित. म्हणूनच, आजची खास मोहीम होती, कोणीच ट्रेकर्स कधीच न गेलेल्या ‘अनघाई’ या डोंगराच्या शोधाची. पडताळून पहायचं होतं की, हा एक सामान्य डोंगर आहे, की विस्मृतीच्या आड गेलेला अपरिचित दुर्ग!!!

...कधी कधी आयुष्यात ‘जब-या’ संधी चालून येतात. अशीच एक संधी मला मिळाली होती - सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘डोंगरयात्रा’ कार ‘श्री. आनंद पाळंदे’ यांच्यासवे ट्रेकची. मागं एकदा सह्याद्रीतल्या जुन्या घाटवाटा शोधताना पाळंदेकाका नि उष:प्रभा पागे यांना कोरीगडाजवळच्या ‘अनघाई’ अन् ‘कोराई’ या अनगड जुन्या घाटवाटांजवळ एका लक्षवेधी सुळक्यानं साद घातली. सुळका दिसायला चांगलाच बेलाग, पण घाटांजवळ मोक्याच्या जागी. म्हणून सुळक्यावर एखादा ‘टेहळणी नाका’ असू शकेल, असं वाटलं. पायथ्याच्या कळंब गावच्या लोकांनी सांगितलं, ‘हा तर अनघाई देवीचा किल्ला.’ म्हणून खरंच वर काही किल्ला आहे काय, हे बघण्यासाठी आम्ही खास शोधमोहीमेला निघालो होतो - सरकारी gazetteer मध्ये नोंद नसलेल्या, अनोळखी अशा ‘अनघाई डोंगरा’वर.

Anaghai_DiscoverSahyadri_2013.JPG

....रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावरच्या जांभूळपाड्यापासून दोन-अडीच तास पायपीट करून, रात्रीचे कळंब गावी डेरेदाखल झालो. कळंब हे सह्याद्रीच्या अगदी जवळ वसलंय.. एका गावकर्याच्या अंगणात कॅरीमॅट्स पसरली. शरीरं विसावली. पण झोप थोडीच लागतीये! कोकणातली दमट हवा चांगलीच जाणवत होती.

...दिनमणी उजाडता उजाडता निवडक साहित्य घेऊन, पूर्वेला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून बाहेर डोकावणा-या ‘अनघाई’ सुळक्याकडे निघालो. सोबत घेतलं कळंब गावातल्या ‘संजय तांबे’ नावच्या मुलाला वाटाड्या म्हणून. गावाशेजारची नदी पार करून, पलीकडच्या टेपाडावर चढून दाट रानात शिरलो. लाल मातीनं अन् घामानं डबडबून निघालो. गच्च रानात साग-साल वृक्षांचा पाचोळा तुडवताना कर्र-कर्र आवाज शांतता डहुळवत होता. सकाळचं धूसर वातावरण, गच्च जंगल, नाजूक फुलपाखरांच्या मोहक रंगछटा, पक्ष्यांची किलबिल... सारं सारं मोहक, मनाला प्रसन्न करणारं, धुंद-बेहोश करणारं!!! सह्याद्रीचा हा ‘अनुभव’ आम्ही अंतर्यामी साठवू लागलो...

....चालता चालता मोकळवनात आलो. समोर तीव्र उठावला होता ‘अनघाई’चा काळाकभिन्न सुळका. धुक्यात अन् कोवळ्या उन्हात न्हाउन निघताना गूढ अनोळखी वाटत होता. समोर उभा ठाकलेला हा बेडर आणि उन्मत्त सुळका एक आव्हान होतं आमच्याकरता! सुळक्याच्या दक्षिणेकडून उभ्या उतरलेल्या नाळेतून चढायचंय, हे आमच्या वाटाड्या संजयनं सांगितलं. तो सांगत होता ‘सुळक्यावर पायर्या खोदलेल्या आहेत, पाण्याचे हौद आहेत.’ त्याला विचारलं, ‘कुणी केलं हे सारं काम?’. तर अगदी अपेक्षित उत्तर - ‘अनघाई देवीनं’!!!

....गच्च रानातून पुढं निघालो. वाट अशी नव्हतीच. पाऊल बुडेल अशा पाचोळ्यातून वाटचाल सुरु झाली. सुळक्याची नाळ उजवीकडे डोक्यावर आल्यावर समोरची मळलेली वाट सोडून, संजय एकदम उजवीकडे वळला. वळणावर वैशिष्ट्यपूर्ण अशी काहीच खूण नव्हती. पाचोळ्यातून, खडक-शिळांवरून वाटचाल सुरू झाली. अनघाईच्या सुळक्याच्या उजवीकडील (दक्षिणेकडील) खिंडीतून सुळक्यावर वाट आहे. तेव्हा त्याच खिंडीतून उतरलेल्या ओढ्याच्या घळीतून वाट जात होती. खरं तर, वाट ती कसली? अरुंद नाळेतून, कधी कातळ-शिळा, तर कधी अरुंद, चिंचोळ्या चिमणीतून (छोटी भेग) ६०-७० अंशात चढत, नाळ पार केली. खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी जागा दिसली. हे असणार मेट किंवा चौकीची जागा! गडाच्या थोड्या खालच्या उंचीवर वाटेजवळ टेहेळणीकरता अशी मेटं उभारली जात. मेट हे ‘गड’पणाचं एक लक्षणंच असतं.

....खिंडीत पोहोचलो. चहूबाजूंना पाहिलं तर वाटच खुंटलेली. खिंड म्हणजे थोडी सपाटी आणि पुढे दरी होती. दरीपलीकडे सहयधारेजवळचे कातळटप्पे अन् दाट रानाचं दर्शन घडलं. आणि डावीकडे अनघाईच्या सुळक्याकडे पाहिलं, पण वाटंच दिसेना. आता संजयनं सांगितलेल्या वाटेवर विश्वास ठेवणं भाग होतं. ऐन कातळात ६-७ फूट उंचीवर खोदलेली एक मनुष्यनिर्मित खाच (hand hold) दिसली. हीच सुळक्याच्या कातळकोरीव वाटेची सुरुवात. मी पुढं झालो. चाचपणी केल्यावर थोड्या वर दुसरी खाच लागली. कातळारोहणाचं कर्म वाटलं तेव्हड कठीण नव्हतं. हळूहळू खिंड खोल जात गेली. आता कातळपथ डावीकडून आडवा वर सरकत होता. या ट्रॅव्हर्सच्या वर खोदीव पायर्या लागल्या. थोडं वर गेलो अन समोर काहीतरी रचलेलं दिसलं. त्या अवघड वाटेवरदेखील जलद हालचाली केल्या. एकावर एक दगड रचलेली ती रचना बहुधा ‘प्राकाराची-तटाची’ असावी. थोडं वर एकावर एक अश्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. पण वापरात नसल्यानं पाणी पिवळसर होतं. चढावरून येणारं चिखलपाणी थेट टाक्यात पडू नये, याकरता टाक्यावर पन्हळ होती. माथ्यावर डावीकडे देवी अनघाईची मूर्ती, अर्धवट जळलेली उदबत्ती अन नारळाची करवंटी! दस-याला येणा-या ४-२ स्थानिक कातकरी भाविकांखेरीज एरवी कोणीच फिरकत नसावं..

....शिखरमाथ्याचा थंड वारा सुटला होता. माथा अगदीच आटोपशीर. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच झाडं. बाकी सगळे सगेसोबती आदित्य पाळंदे, सागर शाळीग्राम, उदय नाडगौडा, भूषण पानसे सुद्धा पोहोचले, अन् आम्ही भटकायला निघालो. दक्षिणेकडून सुरुवात करून कडेकडेनं निघालो. पाण्याचे सलग तीन हौद वैशिष्ट्यपूर्ण होते. उत्तरेकडे पाणी वाहून जाण्याकरता चर मिळाले. काही हौद, उखळ, खांब रोवण्याकरता वापरात असलेले खड्डे सापडले. या खड्ड्यांमध्ये खांब रोवून, मग आसरा निर्माण करत असावेत. पश्चिमेला जोते (घराचा पाया) मिळाले. ह्या सार्या गोष्टी या सुळक्यावर का? त्यांचे प्रयोजन काय? या गोष्टी आज तरी माहीत नाहीत. मात्र कोकण दफ्तरात, जुन्या एखाद्या कागदपत्रावर या डोंगराचा ‘दुर्ग’ असा उल्लेख मिळाला, तरच हा डोंगर केवळ ‘डोंगर’ नसून ‘दुर्ग’ असल्याचे सिद्ध होईल. अन्यथा अनघाई अन् कोराई घाटाचा मोक्याच्या जागचा टेहेळणी नाका असं ग्राह्य धरता येईल. डोंगर पूर्ण भटकून झाला. कसल्याशा आवाजानं तंद्री भंगली. सहज मनगटाकडे नजर गेली - वेळेचा अंदाज घ्यायला! मुकाट्यानं सॅक्स उचलल्या. वर सूर्यनारायण तळपू लागले होते. अनघाई डोंगराची अवघड नाळ/ उतरण उतरत होतो...

....एका तरूतळी हातांची उशी करून शांतपणे पहुडलो. ऊर् धपापत होतं.. मनात आलं, ‘कश्यासाठी करतो आपण ट्रेकर्स एवढा अट्टाहास. मग वाटलं, actually किती भारीये की आपण सह्याद्रीच्या प्रांतात जन्मलोय. सह्याद्रीच्या कुशीत असं निवांत पहुडलो, की काय अपार समाधान मिळतंय. आणि याचकरता आपण सह्याद्रीत, डोंगर-किल्ल्यांवर जातो नाही का.. रोजच्या जगण्यातली सारी कटुता, तणाव विसरून हरवून जायचं - त्या गच्च वनश्रीत, तांबड्या-लाल मातीच्या पाऊलवाटांवर, थंडगार-अमृतमय पाण्याच्या टाक्यांजवळ, पाखरांच्या किलबिलाटात, झर्यांच्या खळखळाटात, वार्याच्या ध्रोंकारात दबून जायचं... खोल-खोल दर्या पाहून, रौद्र-भीषण कातळकडे नि सुळके पाहून रोमांचित व्हावं... हे सारं सारं करायचं ते ‘आपल्या’ सह्याद्रीला सांभाळूनच! Leave Nothing But Foot Prints, Take Nothing But Memories.

....केवळ भाग्य थोर की या Memories फारच अनोख्या आहेत, कारण भाग्य लाभलं श्री आनंद पाळंदे यांच्याबरोबर नवीन किल्ला शोधण्याचं!!!!

महत्वाच्या नोंदी:
१. भटकंतीचा हा अनुभव मे १९९६ सालचा आहे. छायाचित्रे माझ्याकडे उपलब्ध नाहीत.
२. अनघाई हा एक अगदी साधारण दुर्ग आहे. फक्त फक्त फक्त अभ्यासकांकरता. बाकी सगळे सगळे किल्ले बघून झाले, की मगच उरला-सुरला म्हणून करावा असा...
३. Coordinates: 18°36'41"N 73°20'10"E
४. दुसऱ्या ट्रेकरभाऊ – प्रसाद परदेशी यांनी २०११ मध्ये केलेल्या अनघाई भटकंतीचे अनुभव व छायाचित्रे इथे: ब्लॉग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघाई हा एक अगदी साधारण दुर्ग आहे. फक्त फक्त फक्त अभ्यासकांकरता. बाकी सगळे सगळे किल्ले बघून झाले, की मगच उरला-सुरला म्हणून करावा असा...

>>> मान्य नाही. Proud

सह्याद्रीमधील प्रत्येक जागा आमच्याकरिता तितकीच महत्वाची... Happy

@ रोहन...:
सह्याद्रीमधील प्रत्येक जागा आमच्याकरिता तितकीच महत्वाची
>>> शंकाच नाही!!!!!!!

वरील वाक्याचा हेतू फक्त हा, की लेख वाचून अनघाईचा ट्रेक कोणी ठरवत असेल, तर realistic अपेक्षा ठेवून जावं.. सह्याद्री प्रेमींनी अवश्य भेट द्यावी.

तळकोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. >>>>

तळकोकण म्हणजे रत्नांगिरीच्या दक्षिणेकडील भाग, जसे - देवगड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग (मालवण), सावंतवाडी, वेंगुर्ला वगैरे भाग येतो. शब्दशः तळाकडील कोकण (नकाशामध्ये दक्षिण दिशा तळाकडे दाखवायची पध्धत असते म्हणून दक्षिण दिशेला (नकाशाच्या) तळाकडील भाग म्हणतात).

त्यामूळे या लेखात उल्लेखलेला भागाला - उत्तरकोकण म्हणायला हवे. ही दुरुस्ती करावी असे मला वाटते. Happy

@अतुलनीय:
>> तळकोकण म्हणजे रत्नांगिरीच्या दक्षिणेकडील भाग, जसे - देवगड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग (मालवण), सावंतवाडी, वेंगुर्ला वगैरे भाग येतो. शब्दशः तळाकडील कोकण (नकाशामध्ये दक्षिण दिशा तळाकडे दाखवायची पध्धत असते म्हणून दक्षिण दिशेला (नकाशाच्या) तळाकडील भाग म्हणतात).
एकदम बरोबर आहे.

>> त्यामूळे या लेखात उल्लेखलेला भागाला - उत्तरकोकण म्हणायला हवे. ही दुरुस्ती करावी असे मला वाटते.

ठाणे जिल्ह्यातल्या गंभीर-अशेरीगड भागाला ‘उत्तरकोकण’ म्हणावे असे वाटते. म्हणून ‘तळकोकण’ च्याऐवजी फक्त ‘कोकण’ अशी दुरुस्ती करत आहे.

खूप खूप धन्यवाद!!

मस्तच...अनघाई किल्ला माहीती होता पण त्याची शोधयात्रा एवढी अलीकडील असेल असे वाटले नव्हते..

घाटवाटेच्या प्रथेप्रमाणे हा जरी टेहळणी नाका वाटला तरी ह्या घाटवाटेच्या कोकणातील बाजूने दुसरी संरक्षक जागा नसल्याने किल्ल्यावर जरी शिबंदी नसली तरी पायथ्याच्या गावात नक्किच सैन्य असणार. ह्या भागातल्या घाटवाटांचे कोकणाकडून मृगगड आणी अनघाई अश्या किल्ल्यांकडून संरक्षण असणार..

@स्वच्छंदी: धन्यवाद!!!!!!!

...किल्ल्यावर जरी शिबंदी नसली तरी पायथ्याच्या गावात नक्किच सैन्य असणार..

>>>> अनघाई अन् मृगगडाच्या जवळच सुप्रसिद्ध ऐतिहासिक उम्बर खिंड आहे. पायथ्याच्या गावाचं नाव आहे ‘चावणी’, जे अर्थातच ‘छावणी’चा अपभ्रंश असणार, हे नक्की! म्हणून, तुमचा अंदाज बरोबर असू शकेल.

छान लिहीले आहे. डोंगर - टेकड्यांवरील घोंघावणार्‍या वार्‍यात अनेकदा माणूस हरऊन जातो खराच...

@ रोहित ..एक मावळा: धन्यवाद!!!! Happy

----मोरगिरी हा लोणावळे – तेलबैला/ आंबी खो-याच्या रस्त्यावरील, घुसळखांबपासून तुंगकडे जाताना वाटेत आहे.
नकाशा: http://wikimapia.org/10507733/Morgiri-Killa

----अनघाई कोरीगडाजवळच, मात्र कोकण बाजूस आहे.
नकाशा: http://wikimapia.org/16406607/Kille-Anaghai