जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 January, 2013 - 05:28

खडा वा धान्य भरडू दे, कशाचे काय जात्याला
जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला

जुनी पत्रे, जुना अल्बम, जुनी मीही, जुनेरे मन !
नव्याने जन्म दे अथवा नवा दे अर्थ नात्याला

शिका-याने शिकारीचे असे औचित्य साधावे
स्वतःचे प्राण लावावे कधी काढून बाणाला

कितीदा आरसा माझ्या मनाचा लख्ख मी करते
कितीदा चेहरा त्याचा भुलवतो तोच पा-याला

फुलांचा गंध किंवा रंग किंवा रूप नसते... पण
स्वतःचे वेगळे अस्तित्व या प्रत्येक काट्याला

सुन्याश्या मैफिली माझ्या कशी येईल मादकता
कधी ओसंडुनी वाहेल का निम्मा रिता प्याला

कमालीची निरर्थकता मनाला ग्रासते आहे
जिण्याचा अर्थ समजावेल का कोणी खरा त्याला

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मथळा मला समजला नाही (म्हणजे अर्थ लागला नाही. 'कु'पणाने म्हणत नाही. खरोखरच अर्थ समजला नाही. म्हणजे बाकी समजले; फक्त 'प्रिया' या शब्दाचा संदर्भ समजला नाही.). बाकी सार्‍या द्वीपदी (शिकारी सोडून) आवडल्या.

"जुनी पत्रे, जुना अल्बम, जुनी मीही, जुनेरे मन !
नव्याने जन्म दे अथवा नवा दे अर्थ नात्याला

शिका-याने शिकारीचे असे औचित्य साधावे
स्वतःचे प्राण लावावे कधी काढून भात्याला

फुलांचा गंध किंवा रंग किंवा रूप नसते... पण
स्वतःचे वेगळे अस्तित्व या प्रत्येक काट्याला" >>> हे तीन सर्वात विशेष वाटले.

ओ हो! प्रिया म्हणजे 'सुप्रिया'! आता लक्षात आले. तुम्हाला पूर्वी कधी तखल्लुस वापरताना पाहिले नाही म्हणून चूक झाली. क्षमस्व!

आणखी एक तद्दन फालतू गझल. जात्यात भरडताय काय आणि पोत्यात भरताय काय. काहीतरी जगाला उपयोगाचे लिहा ना. फालतू काही लिहायचे म्हणजे वाचणार्‍याच्या डोक्याला ताप.

पाश तुम्ही मात्र तुमच्या अभ्यासू प्रतिक्रियांनी खुप मनोरंजन करताय आमचं.

चालू द्या , चालू द्या .

-सुप्रिया.

Pages