आणि तयारी फुकट गेली...

Submitted by अनुराधा म्हापणकर on 11 January, 2013 - 02:16

"उद्यापासून दूध नको".. दूधवाल्याला सांगून टाकलं.. क्यूं भाभी ? तो कळवळून विचारु लागला. पण त्याचं टेन्शन का वाढवा उगाच ! म्हटलं, कुछ नही, बाहर जा रहे है .. दूधवाला हारवाला इस्त्रीवाला कामवाली सा-यांचे हिशोब चुकते केले. म्हटलं उगाच कुणाचं देणं राहून जायला नको. मुलांना शाळेत पाठवलं नाही. शाळेला काही माणुसकी वगैरे आहे की नाही, हा वर उद्धारही करुन झाला. शांतपणे सारे घरीच राहिलो. मस्त चिकन बिर्याणी, पापलेट वगैरे करुन झ्याक बेत केला.. दिवाळीला घेतलेले नवे कपडेही घातले. घर आवरुन घेतलं. चार जणांचे अत्यावश्यक कपडे मावतील इतकी छोटीशी हॆण्डबॆगही भरुन ठेवली. काही आवडीची पुस्तकं घातली त्यात.. ते पाहून मुलगा म्हणाला, माझं हिस्ट्र्ररी बुक घेऊ ? म्हटलं नकोच..! उगाच इतिहासात कशाला अडकायच ? नवरा म्हणाला,फोनचा चार्जर घे हं आठवणीने ! कुणाकडे असेल नसेल तर अडायला नको, मग तोही टाकला. अरे हो... चष्मा राहिलाच की.. तो म्हणाला एक पेन आणि वही सुद्धा घे.. तुझा मूड लागला तर लिहायला ! वा ! बरं सुचवलंस.. घेतेच ! आमच्या वस्तू वाढत होत्या, ते पाहून लेक म्हणाली, आम्ही पण आमचा आयपॊड आणि व्हिडिओ गेम घेतो ना ! मलाही वाटलं, ठिकच आहे, "तिथे" कंटाळ आलाच तर उगाच मुलं चिडचिड करत राहतील. म्हणून म्हटलं, घ्या आणि मात्र आयपॊडवर माझी जुनी गाणी सुद्धा कॊपी करुन घे. ती तयार झाली. नवरा म्हणाला, मी ही घेतोच, माझा डाटा पेन ड्राइव्ह वर .

मलाही मग वाटलं इतकं सगळं आहेच तर एक छोटी टूथपेस्ट, ब्रश, साबण आणि हो ! मॊइश्चरायझरही घेऊन ठेवू. इतक्या उंचावर हवा कोरडी असेल तर !! एकेक करुन सामान वाढत होतं आणि मग बॆगेत मावेनासं झालं. मग एक आणखी छोटी बॆग काढली. काही महत्वाचं सुटत नाही ना म्हणून सहज कपाट उघडलं तर मी घडी न मोडलेली मोराच्या पदराची कोरी पैठणी दिसली.शी ! आपला मोह काही सुटत नाही असं पुटपुटत, नव-याचं लक्ष नाहीसं बघून हळूच तिला बेगेत सरकवली. पण तरी लेकीने पाहिलंच. म्हणाली, माझा पण तो नवा वेस्टर्न ड्रेस घे, छोटीशीच घडी होईल त्याची.. मी आठी चढवताच तिने बाबांकडे पाहिलं. मी निमूट तिचा ड्रेस बैगेत ठेवून दिला. पाहिलं तर नवरा, आपल्या कैमेराचे सेल चार्ज करत होता. म्हटलं हे कैमेराचं धूड कशाला आणि. तर म्हणे, मी माझ्या कैमेराची बैग घेईन पाठीवर ! अग, एखादी हटके फ़्रेम दिसलीच क्लिक करण्याजोगी ,तर नंतर पश्चाताप व्हायला नको.. यु नेव्हर नो, यु नो ! मी गप्प ! मुलगा म्हणाला आई बिस्किटांचे पुडे तरी घेऊन ठेव. गुड आयडिया ! मला सुचलंच नव्हतं. मग बिस्किटं, दिवाळीचे उरलेले बेसन लाडू, चकलीसुद्धा घेतली. उद्या जर काही मिळालंच नाही तर पंचाईत नको. एकदा विचार आला, चपाती भाजी करुन घ्यावी का ? मग आठवलं थोडीशी बिर्याणी उरली आहे ती ही घ्यावी डब्यात भरुन.

सामान वाढत होतं. सूर्यही मावळतीला आला. आता म्हटलं उगाच घरात फिरुन इथे तिथे काही गोळा करण्यापेक्षा स्वस्थ वाट पाहत बसावं शांतपणे. अरे हो… मनात आलं घरात आहोतचं तर रोजची सिरियल तरी पहावी. मुलं म्हणाली, नाही नाही, आम्हाला आमचं चैनेल लावू दे. नवरा म्हणाला, न्यूज पाहूया, म्हणजे कळेल जगात काय घडतंय. तिन्हीमध्ये तेच जास्त महत्वाचे आहे असे सर्वांचेच एक मताने शिक्का मोर्तब झाल्याने, घरात पहिल्यांदाच जास्त वाद न होता चैनेल सिलेक्शन झालं.

जगात सारं आलबेल होतं. म्हणजे कुठे खून कुठे बलात्कार, कुठे भ्रष्टाचार कुठे गोळीबार इत्यादी इत्यादी अशी रोजचीच यादी ! काहीच नवं किंवा जगावेगळं घडलेलं नव्हतं. नऊ वाजत आले.आम्ही वाट पाहून एव्हाना थकलो. रात्री घरी नसणार या हिशोबाने जेवणही संपलेलं होतं. मी शांतपणे बिस्किट चकलीची पिशवी आणि बिर्याणीचा डबा बाहेर काढला. तितक्यातच टीव्हीच्या एका चैनेल वर "ती" बातमी आली. तो माणूस शिरा ताणून बोलत होता.. नासा ने आवाहन केलंय, की "अफवोंपर ध्यान न दे. दुनिया सुरक्षित है कोई संदेहजनक आपत्ती की जानकारी नही .... "

हं...!! म्हणजे काहीच घडणार नाही तर ! २१ डिसेंबरला काहीतरी घडेलच म्हणून आम्ही गेले काही दिवस बारीक सारीक तयारीत गुंतलो होतो. काय होईल याचा अंदाज नव्हता. जगाचा शेवट आलाच तर कुठल्या पद्धतीने होईल कळत नव्हतं. तशी काही फार दंडनीय पापं केली नसल्यामुळे स्वर्गात वर्णी लागायला हरकत नव्हती.. परंतु स्वर्गाचा रस्ता, जल - वायू - भूमी - आकाश, म्हणजे सुनामी - वादळ - भूकंप- अतिवृष्टी यापैकी कुठून आहे ते दिसत नव्हते. बरं, ""२०१२"" सिनेमात दाखवल्याप्रमाणे काही स्पेसशिप वगैरे मध्ये नशिबाने आपली सोय लागलीच तर हाताशी काही सामान तरी हवे, म्हणून ही जमवाजमवही केली होती.

रात्र होत आली, तरी काही जगबुडीचा काही मागमूस नाही. अकरा वाजले, मुलांना म्हटलं चला ! उद्याचं दप्तर भरुन घ्या आणि झोपा. सकाळी सातला बस येईल.. दाराबाहेर निमूट दूधाची पिशवी लावली आणि नव-याकडे बघत म्हटलं.. चल झोपू..! आपलं स्वर्गाचं तिकिट कॆन्सल ! अजूनही.. भ्रष्टाचार, महागाई, प्रदुषण, खून दरोडे…. ब-याच "नरक यातना" भोगणं बाकी आहे.

: अनुराधा म्हापणकर
(काल्पनिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

Thank you.

मजेदार Happy

<दाराबाहेर निमूट दूधाची पिशवी लावली> पण दूधवाल्याला दूध नको म्हणून सांगितलेले ना?

<दाराबाहेर निमूट दूधाची पिशवी लावली> पण दूधवाल्याला दूध नको म्हणून सांगितलेले ना?
>>
ते परवासाठीची तजबीज म्हणुन असेल हो

मला आधीच सगळं लक्षात आलेलं
पण मस्त वाटलं वाचून Happy

मस्त Happy