जुन्या काळातील गोष्ट

Submitted by अनिल तापकीर on 11 January, 2013 - 01:51

साऱ्यांची घरट्यात परतण्याची वेळ ,म्हणजे शेतकऱ्यांची शेतातून, गुरांची रानातून ,पक्षांची आकाशातून, मुलांची शाळेतून आदी,तर अश्या सांजवेळी आम्ही सारी पोरं सुताराच्या ओट्यावर जमायचो आणि तिथे चार पाच म्हातारे बसलेले असायचे.म्हणजे पत्ते कुटीत बसायचे आम्ही पोरं तिथं गेलो कि ते आम्हाला जागा करून द्यायचे. आणि ते बाजूला बसायचे मग आमचे चालू व्हायचे -मेंडीकोट, सहाहाती , असे पत्यांचे करमणुकीचे खेळ.हा आमचा रोजचाच नेम असायचा, खेळात मनोरंजन तर व्हायचेच पण ह्या जुन्या लोकांकडून जुन्या काळातल्या कथा ऐकायला मिळायच्या, सगळ्या कथा भन्नाट असायच्या काही खरया वाटत नव्हत्या पण त्या खर्या असायच्या कारण जुन्या लोकांच्या ताकदीचे वर्णन जरा अति वाटायचे पण ह्या म्हातार्यांकडे पाहिले कि खरेही वाटायचे कारण म्हातारे एकजात धिप्पाड होते त्यांचे दंड म्हणजे आमच्यातील काहींच्या मांड्या होत्या. तर त्यांच्यात सगळ्यात धिप्पाड होता सुताराचा म्हातारा. आणि खेळता खेळता तो जुन्या गोष्टी सांगायचा. अशीच त्याने आमच्या गावच्या नीलकंठ पाटलाची गोष्ट सांगितली ती गोष्ट साधारणता शंभर वर्ष्यापुर्वीची असेल.
तर त्याकाळी साठ सत्तर घरांचे आमचे गाव होते. गरीब पण सुखी,सर्व शेतीच करायचे आणि त्याकाळी कोरडवाहू शेती असल्यामुळे तरुणांना भरपूर वेळ असायचा मग सगळे संध्याकाळी तालमीत मेहनत करायचे. सकाळ संध्याकाळ व्यायाम कसदार आहार त्यामुळे सगळे कसे दणदणीत दिसायचे. असाच नीलकंठ पाटील (काही कारणाअंती नाव काल्पनिक घेतले आहे )साडे सहा फुट उंच धिप्पाड गडी देखणा आणि रुबाबदार,
तर त्याचा हा किस्सा, त्याकाळी लवळे येथील काही माळी भाजीपाला विकण्यासाठी घोटावड्याला पायीच जायचे जाताना आमच्या गावावरून जायचे. आणि आमचे गाव आले कि पाराखाली विसाव्या साठी थांबायचे थोडावेळ गप्पा तंबाखू खाणे कि पुढे निघायचे. आणि ते ज्यावेळी तिथे थांबायचे त्यावेळी गावातील बायकांची नदीवरून पाणी भरायची वेळ असायची. आणि हे माळी त्यांच्याकडे टकामका बघत बसायचे. एकदा काय झाले गावातील एक अतिशय सुंदर बाई पाणी घेऊन येत होती. सगळ्या गावात ती देखणी होती. आणि एकटीच दोन हंडे घेऊन येत होती. तिला पाहून एक रगेल माळी मोठ्याने म्हणाला -"आयला कुर्हाड लयच भारी हाय कुर्हाडीचा पर दांडा कसा असल तर असू " तो असे म्हणाला नि बाकीचे सारे फिदीफिदी हसले आणि हे सर्व त्या बाईने ऐकले ती काही न बोलता निघून गेली. थोड्यावेळाने ते माळीही निघून गेले. दुसऱ्या दिवशीही तेच घडले आणि तो माळी तेच वाक्य बोलला.
ह्या बाईने आता मात्र नवऱ्याला सांगितले तो म्हणाला कोण बोलला त्याला तू ध्यानात ठीवलाय का?
हो आवो तो काल पण असंच म्हणला हुता त्यामुळं माझ्या चांगला ध्यानात हाय.
बरं सांच्यापारी ते माल विकून यितिल तव्हा दाव मला.
संध्याकाळच्या वेळी ती माळी मंडळी आली नि पारावर बसली त्यांच तंबाखू खाणं चालू होतं तोच हा नीलकंठ पाटील आला, त्याला त्याच्या बायकोने दुरूनच तो माळी दाखवला होता. हा थेट त्या बोलणाऱ्या माळ्या जवळ आला राम राम पाव्हनं म्हणून त्याचा हात हातात घेतला (आपण आता सेकहंड करताना हातात घेतो तसा )आणि असा काही जोरात दाबला त्या माळ्याची चारी बोटे पुढे शेंड्याला तटातट फुटली नि रक्तच आले. तो माळी वेदनेने कळवळला पण ह्याने हात सोडला नाही. आणि त्या माळ्याला हा निळकंठ पाटील म्हणाला- "सकाळच्या कुर्हाडीचा दांडा हा हाय"
तेवढ्यात गावातले बाकीचे लोक तेथे जमले होते त्यातील एक म्हातारा त्या माळ्यांना म्हणाला- आरं आमच्या गावात यिउन शान आमच्या पोरींवर वाईट नजर ठेवता व्हय आणि आमच्या गावाच्या वाघाच्याच वाटला गेला तुम्ही, नशीब बोटावरच निभावलय तुम्ही साहीच्या साहीजण जरी त्याला भिडला तरी तो एकटा तुमचं हातपाय ढिलं करील.
बोटं फुटलेला माळी अजून हात झटकत होता नि रक्त पुशीत होता
त्या माळ्यांनी माना खाली घातल्या होत्या त्या वर केल्या आणि म्हणाले पाव्हनं चूक झाली माफ करा पुन्हयांदा न्हाय व्हणार असा गुन्हा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल तापकीर, कथा सुरस आहे. फार पूर्वी मर्मकला नावाची एक विद्या होती. तिच्यात पारंगत मनुष्य केवळ हाताने शत्रूचा सहज जीव घेऊ शकत असे. हे खरं असेल तर हल्ली या कलेचा लोप झालेला आढळून येतो.
आ.न.,
-गा.पै.