तू अशा वेळी अशी, उजळू नको!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 January, 2013 - 11:00

गझल
तू अशा वेळी अशी, उजळू नको!
अन् अवेळी लोचनी तरळू नको!!

दोन हातांनी कुठे का थांबते?
लाट जाऊ दे, असे उसळू नको!

कागदी पानाफुलांचा हा बहर....
गंध वेड्यासारखा उधळू नको!

कोण आहे मोकळा इतका इथे?
शायरी सगळ्यांपुढे बरळू नको!

या अशा नजरा फुलांच्या बेरकी....
चालताना चांदणे निथळू नको!

वेचले अद्याप नाही चांदणे;
तोच तू माझ्यातुनी निखळू नको!

ठेव तू ताबा तुझ्या तोंडावरी!
लोक बोलू देत, तू बरळू नको!!

तू तुझे मालिन्य आधी दूर कर.....
पूर्ण दुनियेला असे विसळू नको!

आपले, परके तुला कळते कुठे?
बोलताना एवढे नितळू नको!

चेह-यांना माणसे समजू नये....
मुखवट्यांना एवढा भुरळू नको!

कोण तू आहेस? हे तू जाणतो!
या स्तुती-निंदेमुळे वितळू नको!!

पसरते अफवा कधीही कोणती....
बातमी कुठली असो, हुरळू नको!

हे विडंबन, ही टवाळी व्हायची!
धूळ ही उडणार, तू धुरळू नको!!

केवढा घनदाट हा मतला तुझा!
मात्र कोठेही पुढे विरळू नको!!

रंग जो ज्याचा, तसा तूही पहा.....
त्यात कोणाची छटा मिसळू नको!

स्पंदने माझ्या उराची वाढती!
याद माझी तू उरी कवळू नको!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाट जाऊ दे, असे उसळू नको!
>> अशी उसळू नको हवंय का?

कोण आहे मोकळा इतका इथे?
शायरी सगळ्यांपुढे बरळू नको!
>> मोकळा पेक्षा अधिक टोचणारा शब्द हवा होता असं वाटलं.

लोक बोलू देत, तू बरळू नको!!
>> बोलू आणि बरळू ची आलटापालट हवी(च) होती. (काफिया चा प्रॉब्लेम होणार हे खरं आहे.)

शेरांची संख्या लईच जास्त झाली आहे.

धन्यवाद आनंदयात्री!
अशी उसळू नको हवंय का?<<<<
चालू शकेल! पण मग फक्त स्त्रीलिंगी अर्थ होतो व शेर मर्यादीत होतो असे वाटते! कदाचित आपण मतल्याशी सांगड घालत असावा या शेराची!
तरीही जर ही गझल गायची असेल तर निवडक शेरच घेवून आपण म्हणता तो बदल सुरेख दिसेल!
>> मोकळा पेक्षा अधिक टोचणारा शब्द हवा होता असं वाटलं.<<<<
या शेरात लिहिताना उपहास गर्भित नव्हता म्हणून आपण म्हणता तसा दुसरा शब्द योजण्याचा विचार मनात आला नाही!

भावना मनात अशी होती की..... आम्ही शायरीने तुडुंब आहोत. आम्ही आमच्या शायरीत इतके बुडून गेलो आहोत की, आमच्या ओठांवर सदैव शायरीच येत असते. कुणाला तरी नवे लिहिलेले ऐकवावेसे वाटते. पण कुणाला? किती लोकांना शायरीत गोडी असेल?
शिवाय गोडी जरी असली तरी प्रत्येकास त्याचे त्याचे इतके व्याप असतात की, शायरी ऐकायलाही त्यांच्याकडे उसंत असेलच असे नाही. इथे आम्हाला कुणाचीही तक्रार करायची नाही.
आमची शायरी म्हणणे कुणाकुणाला त्यामुळेच बरळणे वाटण्याचा संभव असू शकतो. विशेषत: दोन लोकांना ते आवडत असेल पण त्यांच्याबरोबरच्या चार लोकांना शायरीत रस नसल्याने उगाचच अडकून पडल्यासारखे वाटू शकते. म्हणून आम्ही आमच्या शायरीला बरळणे व कुणाला उसंत/वेळ असेल या अर्थी कोण एवढा मोकळा असेल इथे असे आम्ही म्हटले!
अवांतर..... एका शेरात एक आमचा मिसरा होता, बराचसा अशा अर्थाचा........

का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!..............असे आहे सगळे! असो.
पण आम्हास आपण सुचवलेल्या बदलांचा आदर आहे.

तरीही आपण सुचवल्याप्रमाणे जर दुसरा शब्द वापरायचा असेल तर हा शेर असा लिहिला असता आम्ही....

एवढा नाही निरुद्योगी कुणी.....
शायरी सगळ्यांपुढे बरळू नको!

>> बोलू आणि बरळू ची आलटापालट हवी(च) होती. (काफिया चा प्रॉब्लेम होणार हे खरं आहे.)<<<<<<
आपण म्हणता ते पटते आहे.....काफियाचे बंधन आहेच! पण आपण जर ही दुसरी ओळ पुन्हा पुन्हा गुणगुणलात तर असे लक्षात येईल की, लोक बोलू देत, तू बरळू नको.....म्हणजे लोक काहीही(इथे हा शब्द अव्यक्त आहे) बोलू देत म्हणजेच बरळू देत असेच सूचीत होते असे वाटते!
शेरांची संख्या लईच जास्त झाली आहे.<<<<<कबूल!
पण लईच मूड लागला की आमची लेखणी पाघळते अशी कधी कधी!
पण गझल मैफिलीत सादर करताना मात्र आम्ही फारच चूजी असतो व अनेक शेरांना सरळ फाटा देतो!
पुनश्च प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
असाच लोभ असू द्या!

टीप: ही गझल आमच्या रानफुले गझलसंग्रहातील आहे, मूळ गझलेत फक्त ६शेर होते! पण पुन्हा ही गझल जेव्हा २०वर्षांनी वाचू लागलो तेव्हा १० शेर आज सकाळी स्फुरले , ते लिहून काढले व ही सुधारीत १६शेरांची गझल आता इथे पोस्ट केली!

............प्रा.सतीश देवपूरकर
कृपया आपली मते कळवावीत, वाचायला आवडेल!

ढवळू नको ... खवळू नको.... चिघळू नको ... चघळू नको ...वगळू नको.....अवळू नको .....निवळू नको .....

असेही आणखी शेर होवू शकले असते !!!
Happy

?????????!
ढवळू नको ... खवळू नको.... चिघळू नको ... चघळू नको ...वगळू नको.....अवळू नको .....निवळू नको .....

असेही आणखी शेर होवू शकले असते !!!<<<<<<

हे पुण्याईचे काम आपल्यावर सोडतो!

केले विडंबन, स्वभाव च आपला |
समजुन घे, उगा खवळू नको ||

बरे नव्हे फक्त भाटांना उत्तर देणे |
आम्ही खवट थोडे, पण वगळू नको ||

नविन शोध काहितरी, जुने टाक |
तेच तेच विषय आता चघळू नको ||

कायम ठेव तुझ्या गजलांचा अभिमान |
लोक काहिही म्हणली तरी निवळू नको ||