रात्र जेव्हा बांधुनी येते स्मृतींची पैजणे.....

Submitted by सतीश देवपूरकर on 4 January, 2013 - 21:55

गझल
रात्र जेव्हा बांधुनी येते स्मृतींची पैजणे.....
दरवळू लागे पुन्हा श्वासात माझ्या चांदणे!

एकटा असुनी न तेव्हा एकटा मी राहतो!
सोबतीला राहती माझीतुझी संभाषणे!!

जाहली तिन्हिसांज, परतू लागल्या वाटा घरी....
चल निघू, आता इथे, नाही बरे घोटाळणे!

चेह-यांनी हास-या जेव्हा मला कवटाळले;
जाणले तेव्हाच मी संभावितांचे टाळणे!

ठेवुनी बाजूस थोडा वेळ त्यांचे वागणे;
पाहिले हेतू किती दिसतात त्यांचे देखणे!

कैद झालेल्या कळ्यांनी गंध वा-यांना दिले....
जागच्या जागीच सारी कैद झाली कुंपणे!

भक्त काही मोजके दारात त्यांनी पाळले!
काम ज्यांचे फक्त होते वेळ पडता भुंकणे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली गझल आहे.
टाळणेचा शेर गंडला आहे का ? भुंकणे हा शेर ठीक आहे. पण इतक्या चांगल्या गझलेत अशा अर्थाचा शेर रसभंग करतो हे वै. मत.

एकप्रतिसादक!
धन्यवाद, प्रांजळ प्रतिदसादाबद्दल!
टाळणेच्या शेरात काय गंडले आहे? काय खटकते आहे?
भुंकणे शेराबाबतचे मत पटले!
पण ही गझल जशी आमच्या रानफुले गझल संग्रहात होती तशी दिली! काहीही फरक न करता!
जेव्हा गझल सादर करायची असते मैफिलीत तेव्हा असे शेर आम्ही कटाक्षाने टाळतो ते याच कारणासाठी की, रसभंग होवू नये म्हणून!
उचित प्रसंगी, औचित्य साधणार असेल तेव्हाच असे शेर आम्ही पेश करतो, किंवा सादर करताना श्रोत्यांना आधी कल्पना देतो की, हा शेर खूपच वेगळा, वेगळ्या विषयावरचा व वेगळ्या मूडचा आहे म्हणून!
असे केले तर चालते कारण गझलेत शेरांचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो.
हां, जर गायनासाठी अशी गझल जेव्हा द्यायची असते तेव्हा असे पूर्ण वेगळ्या मूडचे व रसभंग वाटणारे शेर टाळायलाच हवेत व असेच आम्ही कटाक्षाने करतो!
पुनश्च सूचनेबद्दल धन्यवाद!
..........प्रा.सतीश देवपूरकर

चेह-यांनी हास-या जेव्हा मला कवटाळले;
संभावित हा शब्द कुठल्या अर्थाने वापरला आहे ? पहिल्या ओळीतून धोका सूचित केला असं वाटलं.

जाणले तेव्हाच मी संभावितांचे टाळणे!
मग ज्यांच्यापासून धोका आहे ते टाळतील हे कसं ? Uhoh इथे गोंधळ उडाला. असो.

एक प्रतिसादक!
चेह-यांनी हास-या जेव्हा मला कवटाळले;
जाणले तेव्हाच मी संभावितांचे टाळणे!

या शेरात उपहास आहे!
पोटात एक व ओठात एक या प्रवृत्तीवर बोट ठेवायचा प्रयत्न केला आहे.
संभावीत लोक म्हणजे असे लोक ज्यांच्या चेह-यावरून/हसण्यावरून त्यांच्या हृदयातील भावनांचा अंदाज करणे ब-याचदा चुकीचे ठरू शकते!
वरून हासून ते तुम्हाला कवटाळतीलही, पण मनातून खरे तर त्यांना तुम्हाला टाळायचे देखिल असते!
केवळ शिष्टाचार म्हणून ते वरून हसतीलही, हात मिळवतील पण त्यांच्या मनातील ख-या भावभावनांचा अंदाज ते समोरच्याला येवू देणार नाहीत!

हा आम्हास आलेला अनुभव आहे.
आम्हास अपेक्षित अर्थ वर दिला आहे. तो अभिव्यक्त होतो का कृपया कळवावे!
अन्यथा काही पर्याय सुचत असेल तर जरूर द्यावा, वाचायला आवडेल!
..............प्रा.सतीश देवपूरकर

मास्तर,
परत एकदा रटाळ गझल टाकलात बघा.
तुम्ही तेल विभागवाले अन गझलही एकदम तेलकट वाटली.
त्यावर आता माझी एक तेलकट प्रतिक्रिया घ्या.....
खूप सारं गार्बेज देऊण्यापेक्षा थोडसं पण दर्जेदार देता येईल का ते बघा!
तुम्ही जेंव्हा चांगलं लिहता तेंव्हा ईथे तुमची स्तूती होतेच.
तुमच्या बहुतांश गझला सुमार असतात. त्याचं एक कारण मास प्रोडक्शन असावं असं मला वाटतं.
जरा ब्रेक घेऊन महिन्यातून दोनच गझल लिहण्याचा प्रयत्न करुन पहा... बहुतेक दर्जेदर निघेल.
कारण तुमच्यात प्रतिभेचा अभाव नाही, पण मास प्रोडक्शनमुळे घोळ होतोय बहुतेक....

सरतेशेवटी एक तेलकट नमस्कार...

एम,
आपला घाऊक, मळकट व बेसुमार प्रतिसाद पोचला.
का स्तुतीमुळे हुरळू मी?का निंदेने कचरू मी?
परमेश्वर आता देतो लेखणीस माझ्या वाणी!

जाऊ द्या एम, हे आपल्या डोक्यावरचे आहे!

पहिले ३ शेर चांगले आहेत - नंतरच्या भागात कडवटपणा जाणवतो - थोडासा रसभंग होतो. शेवटचा शेर तर फारच अनाठायी वाटतो.

पण एकंदरीत छान आहे Happy