कृष्णविवरे - लेख

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2013 - 01:16

आपले छंद या दीपावली अंकात हा लेख प्रकाशित झाला. त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे देत आहे.

-'बेफिकीर'!

====================================

मित्रांनो, एक जग आहे ही आपली पृथ्वी. ही पृथ्वी निर्माण झाल्यापासून आजवर तिच्यावर अनेक स्थित्यंतरे, अनेक बदल होत गेले. आधी जीवसृष्टी नव्हती. आज नुसतीच जीवसृष्टी नाही आहे तर जीवसृष्टीमधील आजवरचा सर्वाधिक विकसित जीव म्हणजे माणूस, म्हणजे आपणही पृथ्वीवर आहोत. माणसाने मर्यादीत प्रमाणात निसर्गावर विजय मिळवलेला आहे. धरणे बांधली आहेत, इमारती आणि पूल बांधलेले आहेत, रस्ते बांधलेले आहेत, वाहने निर्माण केली आहेत, विमाने निर्माण केली आहेत आणि अत्याधुनिक सेवासुविधा निर्माण करून आज आपण मस्त जगत आहोत.

याच जगात इतर कोट्यावधी सजीवही आहेत जे माणसाइतके प्रगत तर नाहीतच पण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. त्यांच्या जगात फक्त अन्नाचा शोध, प्रजनन आणि जन्म मृत्यू किंवा इतर काही घटकच आहेत.

याच पृथ्वीवर समुद्राच्या पाण्याने सत्तर टक्के पृष्ठभाग व्यापलेला आहे आणि बाकीचा पृष्ठभाग आहे जमीन. या जमीनीचे भाग पडल्यामुळे खंड निर्माण झाले आहेत. त्या खंडात माणसाने आपापल्या राजकीय सीमा निर्माण करून त्यांना देश असे संबोधलेले आहे. काही वेळा या सीमा धार्मिक पार्श्वभूमीवरही पडलेल्या दिसतील. आपापल्या जगातील शासनव्यवस्थेनुसार - जसे भारतात लोकशाही आहे - माणूस आपले जीवन व्यतीत करत आहे.

हे जीवन जगताना माणूस आपले राहणीमान सुधारणे, संपत्ती प्राप्त करणे, सुखसुविधा व समाधान मिळवणे, सुरक्षितता व अन्न वस्त्र निवारा या गरजांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक गरजा निर्माण करून त्या भागवणे हे सर्व प्रकार करत आहे. हे करताना तो त्या मार्गात येणार्‍या इतरांशी, इतर भूभागांशी, इतर देशांशी, शहरांशी लढत आहे, झुंजत आहे.

स्वतःसाठी हजारो सुखांच्या व्याख्या निर्माण करून त्या सुखांच्या प्राप्तीसाठी सगळे जीवन माणूस खर्च करत आहे. ही सुखे, या सुविधा, हे समाधान मिळवणे हेच त्याचे आयुष्य झालेले आहे. त्यात तो इतका गुंतलेला आहे की आपण कोठे आहोत, का आहोत, काय करतो आहोत, आपण नव्हतो तेव्हा काय होते, आपण नसू तेव्हा काय असेल या सर्व बाबींवर विचार करण्याइतका तो सूज्ञ राहिलेला नाही.

माणूस युद्ध करत आहे, शस्त्रास्त्रे निर्माण करत आहे, तंत्रज्ञानाचा विकास करत आहे, सगळे काही करत आहे. पण याच माणसांमधील काही अशी माणसे आहेत, ज्यांना या गोष्टीचे भान आहे की आपण ज्या पृथ्वीवर जगतो ती अत्यंत परावलंबी आहे. विश्वातील अनेक घटनांचा तिच्यावर प्रभाव पडत आहे. ती एका क्षणी निर्माण झाली होती तशीच एका क्षणी नष्टही होणार आहे.

याच माणसांनी शतकानुशतके शक्य होईल त्या पद्धतीने संशोधन करून अफाट आणि अचाट ज्ञान मिळवले आहे. या ज्ञानाचे वाटप करताना ते आपण कोणाला द्यावे यावर राजकारण, धर्म, भौगोलीक सीमावाद या कशाचाही प्रभाव त्यांनी पडू दिलेला नाही. त्यांचा उद्देश एकच. या अफाट विश्वात माणसाचे स्थान काय आणि भविष्य काय, अजून कोणी या विश्वात हेच तपासत असेल काय याची जमेल तितकी माहिती मिळवून मानवजातीला अधिक ज्ञानी बनवणे. अधिक जाणीव देणे की आपण कोण आहोत.

याच माणसांनी, याच संशोधकांनी आपल्याला 'दुसरे', 'एक वेगळे' जग दाखवलेले आहे. ते जग आपल्या जगापेक्षा 'खरे' आहे, अफाट आहे, आपल्या या लहानश्या पृथ्वीवर परिणाम करणारे आहे. या जगात, या विश्वात अब्जावधी तारे, ग्रह इतकेच नाही तर अब्जावधी आकाशगंगा आहेत. आपली संपूर्ण सूर्यमालिकाही या विश्वाच्या तुलनेत एक नगण्य ठिपकाही नाही. कुठे आपले हे सुखसमाधानाच्या शोधात सातत्याने झगडणारे, झुंजणारे आणि अतृप्त राहणारे अतीसामान्य जग आणि कुठे ते अफाट विश्व, ज्यात तारे, ग्रह, उपग्रह, लहानसे ग्रह, धूमकेतू , या सर्वांना सामावणार्‍या आकाशगंगा आणि.... कृष्णविवरेही आहेत.

स्वतःचे खुजेपण जाणवून घेणे, कृष्णविवरे म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होतात हे पाहणे आणि जीवनाबाबतच्या एका अत्यंत नावीन्यपूर्ण, कुतुहलजनक आणि रंजक अशा दृष्टिकोनाची झलक पाहणे हा या लेखाचा हेतू. लेखात दिलेली माहिती ही विविध आंतरजालीय स्थळे, विविध पुस्तके, विविध लेख व अनेकांशी केलेल्या चर्चेतून आलेली माहिती आहे. ही माहिती मी नव्याने तर देत नाहीच आहे पण मी ती केवळ संकलित करत आहे. ती मुळातच उपलब्ध आहे. मी या विषयाचा तज्ञ नसून केवळ रसिक वाचक आहे. मात्र या विश्वाच्या क्षुल्लक माहितीनेही आपण किती स्तिमित होतो हे पाहून मला ही माहिती एका विशिष्ट आराखड्यानुसार एकाच लेखात संकलित करावीशी वाटली. असे केल्याने एकाच ठिकाणी व आपल्या मराठी भाषेत विश्वातील घटनांबाबतचा एक उपयुक्त लेख तयार होईल असे माझे मत आहे, त्यामुळेच मी ही माहिती त्यानुसार नोंदवत आहे.

या लेखात आपण तारे, ग्रह व कृष्णविवरे कशी तयार होत असतील याबाबतची माहिती करून घेणार आहोत.

===============================

झाडावरून सफरचंद खाली पडले हे पाहून न्युटन याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला अशी रोचक कथा आपण लहानपणापासून ऐकतो. हे कितपत खरे हे इतिहास व उपलब्ध लेख सांगतील. मात्र हे असे झालेले नाही असे दिसते. न्यूटन आधीपासून त्यावर अभ्यास करत होते. पण गंमतीची गोष्ट म्हणजे ज्या काळात दुर्बीण नव्हती त्या काळात नुसते डोळ्यांनी पाहून लोकांना कसे समजले असेल की कोणता ग्रह कोणता आणि कोणता तारा कोणता?

निसर्गाचा एक चमत्कार माणूस आहे तर दुसरा चमत्कार आहे माणसातील असे अत्यंत असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले लोक. जसे अ‍ॅरिस्टॉटल, भास्कराचार्य, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन वगैरे!

सर्वप्रथम जेव्हा माणूस जन्माला आला असेल आणि त्याने समजू लागल्यावर जेव्हा दिवसा सूर्य आणि रात्री आकाश पाहिले असेल तेव्हा त्याला काय वाटले असेल? मधेच धबधबे, कुठे डोंगर तर कुठे दर्‍या, कुठे नद्या समुद्र तर कुठे वाळवंट! कुठे तळी तर कुठे पाऊस. ऋतूंचे चक्र, लक्षावधी तारे आणि डोंगर झाडे हे सर्व पाहून माणूस हबकलाच असेल नाही?

प्रथम त्याने पोट भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतील. भूक लागल्यावर अन्न मिळवण्याचे प्रयत्न आणि तहान लागल्यावर पाणी मिळवण्याचे प्रयत्न हे तरी निसर्गीक असेलच ना? मग त्याने अनेक गोष्टी खाऊन पाहिल्या असतील. मग शिकार सुरू केली असेल जिवंत प्राण्यांची किंवा पाने खाल्ली असतील. थंडी वाजल्यावर गुहेत जाऊन बसला असेल आणि उन्हाळ्यात तळ्यात डुंबला असेल. मग त्याला जाणवले असेल की प्रत्येक पशूपक्ष्याला काही ना काही संरक्षणाचे आणि आक्रमणाचे हत्यार निसर्गानेच दिलेले आहेत. संरक्षणासाठी वेगात पळता येणे आणि आक्रमणासाठी सुळे आणि नख्या! किंवा चोच! पण माणसाला? माणसाला काय दिले आहे? मग आपोआप बुद्धीने आपला प्रभाव दाखवला असेल. 'निवारा' ही गरज आहे आणि त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात हे माणसाला सुचलेले असेल. अशाच पद्धतीने वस्त्रे ही गरज आणि मग शतकानुशतके गरजाच गरजा!

हे करताना काही असामान्य बुद्धीची माणसे मात्र संशोधनाचा प्रयत्न करत असतील. रात्र का होते, दिवसा तारे का दिसत नाहीत, सूर्य रात्री कुठे जातो, आपण जमीनीवरून उडून कायमचे आकाशात का जाऊ शकत नाही?

काहीच माहीत नाही आणि काही कळतही नाही यामुळे निर्माण झालेल्या भुते, राक्षस, अंधश्रद्धा अशा गोंधळाच्या वातावरणात हेच संशोधक केवळ असे होते जे 'समोर जे दिसते ते तसे का होत आहे' यावर विचार करत होते.

पण संशोधनासाठी साधने कोणतीच नव्हती हाताशी. ना दुर्बीण ना यान! फक्त डोळे आणि मेंदू. जे होते ते पाहणे आणि तसे का होते यावर विचार करत बसणे. चांगली गोष्ट ही होती की विचार करायची इच्छा होती, पण दुर्दैवी बाब ही होती की उपकरणे कोणतीच नसल्याने जे मनात यायचे त्याला संशोधन म्हंटले जायचे.

मग कोणी म्हणायचे की पृथ्वी समुद्राच्या पाण्यावरच तरंगत आहे. कोणी म्हणायचे पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. विश्वातले सर्व ग्रहगोल आणि सूर्य हे पृथ्वीभोवती फिरत आहेत. कोणी म्हणायचे गीतेतील विश्वरूपदर्शनात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या श्वास - निश्वासातून हजारो आकाशगंगा लयाला जात आहेत आणि नव्या तयार होत आहेत.

पण जसजसे प्रयोगातून निष्कर्ष काढणे सुरू झाले तसतसा या विश्वाचा उलगडा होऊ लागला. हे लगेच, क्षणभरात अथवा काही वर्षात झाले नाही. कित्येक शतके लागली हे व्हायला. तोवर आधीच्या संकल्पनांना विरोध करून काही खरे व नवे सांगणार्‍यांचा छळ झाला. जाहीर माफी मागावी लागली. त्या देशातून पळ काढावा लागला. माणसाची तर्‍हा बघा. जो काही प्रयोग करून काही सांगू पाहात आहे त्याला केवळ आजवर माहीत असलेल्या बाबीपेक्षा काही वेगळे म्हणत आहे म्हणून छळायचे, पण तपासून बघायचे नाही, अभ्यासायचे नाही की तो असे का म्हणू पाहात आहे.

अशा परिस्थितीत जिवाला घाबरून अनेक महान संशोधकांनी आपले म्हणणे जगासमोर आणलेच नाही. पुढे कित्येक वर्षांनी या गोष्टींचा उलगडा झाला. मग अशा संशोधकांचे नाव एखाद्या नवीन ग्रहतार्‍याला दिले गेले. त्यातून तरी त्यांची स्मृती या जगाला राहावी म्हणून.

पण आजचा मानव खूप खूप अधिक सुसज्ज आहे अभ्यास करायला. त्याने विश्वाची अत्यंत अनोखी, चमत्कारीक आणि अविश्वसनीय कोडी सोडवली आहेत. गणिते तयार आहेत. चंद्रावर माणूस जाऊन आलेला आहे. शनीपर्यंत मानवविरहीत यान जाऊन आलेले आहे. आपली सूर्यमाला किती लहानशी आहे आणि विश्व किती अफाट आहे याचा किंचित तरी अंदाज माणसाला आता आलेला आहे.

यातूनच माणसाने हे ज्ञान जगासमोर ठेवलेले आहे.

आपले विश्व अत्यंत अनोख्या आणि अविश्वसनीय बाबींनी बनलेले आह. त्यात भौतिकशास्त्र व गणित यांचे सर्वाधिक प्रकट रूप आहे. चुंबकत्व हे तितकेच महत्वाचे आहे. त्याखालोखाल रसायनशास्त्र व जीवशास्त्र आहेत.

तर थोडीफार ओळख या विश्वाची आणि मग कृष्णविवरांची.

==========================================

आपण जी काडेपेटी विकत घेतो त्यात किती काड्या असतात? असतील चाळीस पन्नास! काडेपेटीतील सर्व काड्या संपल्या की आपण काडेपेटी फेकून देतो. कारण त्यावेळी त्या काडेपेटीत असते एक पोकळी, बाकी काहीच नाही. पण त्याच काडेपेटीत जर काडेपेटी बनवणार्‍यांनी चाळीस ऐवजी चारशे काड्या कोंबल्या तर काय होईल? काडेपेटीचे वजन वाढेल. (इतक्या काड्या त्यात कशा मावतील हा गंमतीदार प्रश्न आहे, पण मावल्या तर?) चारशे काड्या असलेली काडेपेटी दसपट जास्त दिवस वापरून आपण आनंदी होऊ. पण याच काडेपेटीत चार हजार काड्या कोंबल्या तर? सर्व काड्या एकमेकांवर दाबल्या जाऊन त्यांच्यातील दाब इतका होईल की काडेपेटी फटाक्यासारखी फुटून सर्व काड्यांचा भुगा इकडे तिकडे उडेल. हे तर चारशे काड्यांनाही होईलच. पण समजा, याच काडेपेटीत, चार कोटी काड्या कोंबल्या तर? ती काडेपेटी आपल्या हातात पेलवणार नाही. तिचे वजन इतके वाढेल की ती उचलता येणार नाही. जागेवरून हालवणारही येणार नाही? हालवता येईल, पण चारशे कोटी काड्या कोंबल्या तर? मग येईल का हालवता? या सगळ्या काड्या मावणारच नाहीत हे खरेच, पण काडेपेटीची शकले झाली तरी एकमेकांवर समजा चारशे कोटी काड्या दाबून बसवल्या आणि त्यांचा एकंदर आकार काडेपेटीइतकाच ठेवण्यात यश मिळाले तर? मग रस्त्यावर पडलेली अशी काडेपेटी हत्ती लावूनही हालवता येणार नाही. ती लाथेने उडवायला गेलो तर पाय ठेचला जाईल. माणूस पाय हातात घेऊन ओरडत सुटेल. दिसायला मात्र काडेपेटी एका नेहमीच्या काडेपेटीइतकीच असेल.

आता काडेपेटीच्या आत काय होईल? चारशे कोटी म्हणजे चार अब्ज काड्या आतमध्ये दाबल्या गेलेल्या आहेत. त्यांचा एकंदर आकार एखाद्या काडेपेटीइतकाच असला तरी आत इतका प्रचंड दाब निर्माण होईल की सर्व काड्या एकदाच्या त्या दाबामुळे एकमेकांपासून एखाद्या स्फोटाप्रमाणे दूर फेकल्या जाण्याची इच्छा करू लागतील. पण त्याचवेळी आणखीन एक बाब होईल. काडेपेटीचा जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूवर चार अब्ज काड्यांचे वजन पडेल. दोन कण एकमेकांना गुरुत्वाकर्षणाने एकमेकांकडे खेचतात हे आपण जाणतोच. काड्यांमधील एकमेकींवरचे एकमेकींचे गुरुत्वाकर्षण इतके अमाप वाढेल की त्या एकमेकांच्या अतिशय जवळ खेचल्या जातील व त्यांचे एकत्रीत वस्तूमान अमाप वाढेल. हे वस्तूमान काडेपेटीच्या केंद्रबिंदूपाशी सर्वाधिक असेल व त्याच्यातून वरच्या भागात असलेल्या काड्यांना स्वतःजवळ खेचण्याची ताकद अंमलात येईल.

म्हणजे, काडेपेटीच्या केंद्रबिंदूपाशी इतके अमाप वस्तूमान व गुरुत्वाकर्षण निर्माण होईल की ते सर्व चार अब्ज काड्यांना आत आत खेचू लागेल व त्यामुळे काडेपेटीचा आधीचा आकार लहान लहान होत केंद्राच्या दिशेने खेचला जात राहील. शेवटी असे होईल की अमर्याद गुरुत्वाकर्षणामुळे काडेपेटी आत आत खेचली जाऊन तिचे रुपांतर एका बिंदूत होईल. आता हा बिंदूही इतक्या प्रचंड वस्तुमानाचा होईल की स्वतःला आणखीन आत आत खेचत शेवटी अशा पातळीला पोचेल, की त्याला मितीच राहणार नाहीत. म्हणजे बिंदूवत अवस्था. याचा अर्थ त्याला व्यास नाही, त्रिज्या नाही आणि परीघही नाही. तो केवळ एक बिंदू, ज्यात अमर्याद मॅटर, अमर्याद वस्तूमान साचलेले आहे.

हे स्वतःचेच वस्तूमान इतक्या लहानशा बिंदूवत आकारात साचल्यामुळे त्या बिंदूलाच ते सहन होणार नाही व त्यामुळे होईल एक स्फोट! एक महास्फोट, जो या विश्वाचा आरंभ मानला जातो. अशाच एका बिंदूवत आकारात अमर्याद वस्तूमान साचत गेल्यामुळे व ते न झेपल्यामुळे त्या बिंदूचा महास्फोट झाला व विश्वाची निर्मीती झाली.

स्फोटामुळे अर्थातच त्या बिंदूत असलेले सर्व वस्तूमान, म्हणजे जे काही होते ते अतिशय जोरात एकमेकांपासून दूरवर फेकले गेले. काय होते त्या बिंदूत?

त्या बिंदूमध्ये होती आज आपल्या शरीरात असलेली व नसलेली सर्व द्रव्ये. आपल्या वातावरणात असलेले नसलेले असे वायू.

हे सर्व मॅटर अतीप्रचंड ताकदीने एकमेकांपासून दूर फेकले गेले व फेकेले गेलेल्या वस्तूमानातून स्वतंत्र असे वस्तूमानाचे तुकडे झाले. हे तुकडे जवळच्या वायूंना व धुळीला आपल्याजवळ खेचू लागले. अशा वायू, धूळ यांना खेचणार्‍या वस्तूमानापासून दीर्घिका तयार झाल्या.

आपल्या दीर्घिकेला आपण आकाशगंगा असे म्हणतो. वीस अब्ज वर्षांपूर्वीच्या सुमारास झालेल्या या महास्फोटामध्ये एकमेकांपासून दूर फेकले गेलेले अमर्याद वस्तूमान हळूहळू एकमेकांपासून दूर दूर जात आहे व आजही जात आहे. हे विश्व त्याचक्षणी निर्माण झाले होते ज्या क्षणी तो स्फोट झाला. तो स्फोट झाला तो आपल्या या वीस अब्ज वयाच्या विश्वाचा पहिला सेकंद होता. ज्याप्रमाणे जन्मवेळेनुसार पत्रिका मांडतात तसे करायला गेलो तर पंधरा ते वीस अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटाच्या वेळेनुसार पत्रिका बनवायला लागेल. पण ते करता येणार नाही याचे कारण तो स्फोट नेमका केव्हा झाला, कशामुळे झाला, त्या आधी तेथे काय होते हे माणसाला अजूनही ज्ञात नाही.

पहिला सेकंद! कल्पना कशी वाटते वाचायला? विश्वाचा पहिला सेकंद! पहिला क्षण! त्या आधी 'काळच' नव्हता. त्या आधी घड्याळ असू शकत नव्हते, तारीख वार नव्हते, कॅलेंडरे नव्हती याचे कारण तेव्हा काळच नव्हता. 'अहो, मित्रांबरोबर फिरायला जाताय पण तासाभरात परत या' असे पत्नी आपल्याला पतीला बजावून सांगू शकत नव्हती कारण मित्र, फिरायला जाणे, तास, सेकंद, पती आणि पत्नी यातील काही नव्हतेच. किती उशीर झाला तुला असे म्हणता येत नव्हते कारण उशीर होणे अस्तित्वात नव्हते आणि म्हणणारे कोणीही अस्तित्वात नव्हते. वेळच्यावेळी लग्न झालेले बरे हे वाक्य म्हणता आले नसते कारण वेळ हा प्रकारच नव्हता.

या स्फोटातून बाहेर पडलेले वस्तूमान जवळच्या धूळ व वायूंना आपल्याजवळ खेचत खेचत स्वतःच्याच केंद्राभोवती गरागरा फिरू लागले. असे म्हणतात की त्याचे हे फिरणे सर्पिल आकाराचे होते. म्हणजे सर्पाच्या आकाराप्रमाणे! अशा भुजांसहीत ते केंद्राभोवती सर्पिल आकारात फिरू लागल्यामुळे तेथे विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण झाले. ज्या वस्तूमानाच्या तुकड्याचा फिरण्याचा वेग कमी होता त्यांच्यापासून वर्तुळाकृती दीर्घिका तयार झाल्या. अशा सर्पिल व वर्तुळाकृती दीर्घिका एकमेकींपासून दूर जाऊ लागल्या.

विश्वातील अंतरांचा एक साधारण अंदाज देण्यासाठी ही खालील माहिती.

आपली सूर्यमाला, म्हणजे सूर्यापासून प्लूटो या सर्वात दूरच्या ग्रहापर्यंत व मधे जे काय आहे ते सर्व वस्तूमान, हे एका दीर्घीकेत आहे. आपल्या दीर्घिकेला आपण आकाशगंगा असे नाव दिलेले आहे . पण या दीर्घिकेत आपल्या सूर्यापेक्षा प्रचंड मोठे व काही लहानही असे एकंदर सुमारे सहाशे अब्ज तारे आहेत. आता सूर्याचे प्लूटो या सर्वात दूरच्या ग्रहापासूनचे अंतर जवळपास साडे सात अब्ज किलोमीटर इतके आहे. सूर्याचा व्यास हा जवळपास चौदा लाख किलोमीटर इतका आहे. चौदा लाख किलोमीटर व्यास असलेल्या या महाभयंकर भट्टीभोवती फिरणारा सर्वात शेवटचा ग्रह साडे सात अब्ज किमोमीटर्सवरून फिरत आहे. मात्र अशा सूर्यापेक्षा लाखो पटींनी मोठे व काही लहान असे सुमार सहाशे अब्ज तारे नुसते आपल्याच दीर्घिकेत, आपल्याच आकाशगंगेत आहेत. अशा अब्जावधी दीर्घिका या विश्वात आहेत. आपण अजून आपल्या आकाशगंगेलाही नीटसे ओळखलेले नाही. आपल्याला इतकेच माहीत आहे की आपली आकाशगंगा स्वतःच्या केंद्राभोवती फिरत असून तिचा व्यास सुमारे एक लाख प्रकाशवर्षे आहे.

प्रकाशवर्षे ही एक आणखीनच रोचक व स्तिमित करणारी बाब! ते अंतर मोजण्याचे परिमाण आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या अंतराला 'एक खगोलीय एकक' असे म्हणतात. या खगोलीय एककाच्या सहाय्याने अनेक गणिते सोडवून काही उत्तरे मिळतात. पण अती अती दूर असलेल्या ग्रहतार्‍यांचे अंतर खगोलीय एककात मोजणे वेडेपणा ठरेल. ते अंतर असतेच मुळी इतक भयंकर!

प्रकाशकिरणे ही मानवाला ज्ञात अशी सर्वात वेगवान बाब आहे. प्रकाशाचा वेग एका सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर इतका असतो. एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर म्हणजे अतीभव्य वेग! या वेगाने माणूस फिरला तर एका सेकंदात पृथ्वीभोवती तो सात ते आठ वेळा फिरेल. काश्मीर ते कन्याकुमारी व उलट अशा फेर्‍या एका सेकंदात तो जवळपास पनास वेळा करेल. असा हा प्रकाश एका वर्षात किती अंतरावर जाऊन पोहोचेल?

साडे नऊशे अब्ज किलोमीटर? म्हणजे किती? बहुधा रजनीकांतलाही माहीत नसेल. आता एका वर्षात जर प्रकाश दहा परार्ध किलोमीटर अंतरावर जात असेल तर आपल्या आकाशगंगेचा व्यास एक लाख प्रकाशवर्षे म्हणजे किती होईल? एक लाख वेळा दहा परार्ध किलोमीटर इतके लांब गेले की समजेल. इतक्या भयंकर व्यासाच्या आपल्या आकाशगंगेमध्ये, आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपासून आपला सूर्य साधारण तीस ते चाळीस हजार प्रकाशवर्षाच्या अंतरावर आहे असे म्हणतात. म्हणजे आपली पृथ्वी ही सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरतानाच सूर्यासकट आकाशगंगेच्या केंद्राभोवतीही फिरत आहेच. सूर्याच्या म्हणे आत्तापर्यंत आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फक्त वीसच फेर्‍या झालेल्या आहेत. एक फेरी म्हणे पंचवीस कोटी वर्षांनी पूर्ण होते. आपली पृथ्वी सूर्याभोवती एकदा फिरली की आपले एक वर्ष होते. आपल्या पंचवीस कोटी वर्षांनी सूर्याचे त्याच्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरून एक वर्ष संपते. म्हणजे तुम्ही सूर्यावर राहायला गेलात तर पंचवीस कोटी वर्षांनी एक वर्षाचे लहानगे बोबडे बालक व्हाल आणि शंभरी गाठलीत तर तुमचे वय पंचवीस अब्ज वर्षे इतके असेल, पण तुम्ही शंभरी गाठू शकायचा नाहीत. याचे कारण त्या आधी सूर्यच नष्ट होणार आहे.

दीर्घिका फिरत असताना त्यांच्यापासून तारे बनतात.

दीर्घिका स्वतःच्या केंद्राभोवती फिरत असताना त्यांच्यातील जे वस्तूमान विविध ठिकाणी एकत्र गोळा झालेले असते त्या वस्तूमानात अमर्याद वायू असतो. स्वतःचेच वस्तूमान न पेलता आल्यामुळे ते सर्व वस्तूमान स्वतःच्याच केंद्राकडे खेचले जाऊ लागते.

येथेच तार्‍याच्या जन्माची कहाणी सुरू होते.

स्वतःच्याच केंद्राकडे खेचले गेल्यामुळे त्या केंद्रावर व केंद्राभोवती असलेल्या गाभ्यावर भयंकर दाब पडतो. जेथे दाब वाढतो तेथील तापमानही वाढते हे आपण जाणतोच. तापमान अतिभयंकर वाढते व त्या वस्तूमानात असलेले वायू प्रज्वलीत होतात. त्यांच्यापासून प्रकाश बाहेर पडायला लागतो व तारा जन्माला येतो.

हा छोटासा बालक तारा अजून परिपक्व झालेला नसतो. त्याच्या आत असलेल्या हायड्रोजन या वायूचे ज्वलन होत असते. ही आण्विक प्रक्रिया आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून अथवा एकमेकावर हायड्रोजनचे अणू दाबले गेल्यामुळे त्यांच्यापासून हेलियम हा वायू तयार होऊ लागतो. मात्र हायड्रोजन या वायूचे तार्‍यातील प्रमाण किती आहे यावर तो तारा किती काळ जळणार हे ठरते. सूर्य या आपल्या तार्‍यामध्ये दर सेकंदाला साठ कोटी टन हायड्रोजनचे ज्वलन होत आहे. इतके प्रचंड ज्वलन होऊनही सूर्य अजून पाच अब्ज वर्षे तरी जगेल असे म्हणतात. आज सूर्याचे वय आधीच पाच अब्ज वर्षे आहे. अजून पाच अब्ज वर्षे तरी सूर्य जगेल असे संशोधकांनी नोंदवलेले दिसते.

मात्र तार्‍यामधील हायड्रोजन संपला की मात्र पुन्हा पहिली प्रक्रियाच सुरू होते. हायड्रोजनच्या ज्वलनामुळे तार्‍याच्या केंद्रापासून तार्‍याच्या इतर भागाला बाहेर ढकलणारी शक्ती निर्माण होते. हायड्रोजन संपल्यावर अर्थातह ती शक्ती कमी कमी व्हायला लागते व एका विशिष्ट क्षणी, जेव्हा तार्‍याच्या केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने तार्‍याच्या बाहेरच्या भागाला स्वतःजवळ खेचण्याची ताकद या बाहेर ढकलण्याच्या ताकदीहून जास्त होते तेव्हा तारा पुन्हा आपल्या केंद्राकडे खेचला जाऊ लागतो.

पुन्हा एकदा तीच प्रक्रिया होते. पुन्हा दाब वाढतो व पुन्हा तापमान पराकोटीचे वाढते. आता हायड्रोजन संपलेला असतो व त्याजागी हायड्रोजन ज्वलनामधून निर्माण झालेला हेलियम हा वायू असतो. तारा आत आत खेचला जायला लागला की एका क्षणी इतके तापमान निर्माण होते की हेलियमही जळू लागतो. हायड्रोजन पूर्णपणे संपलेला असतो असे नाही तर तो काही प्रमाणात उरलेला असतो. मात्र आता हेलियमच्या ज्वलनामुळे तार्‍याचे आत आत खेचले जाणे पुन्हा थांबते व तारा पुन्हा बाहेर ढकलला जाऊ लागतो.

आपला सूर्य या तार्‍याप्रमाणेच आहे. हेलियमचेही ज्वलन होऊन तो संपला की सूर्याचे ज्वलन संपेल व त्याचे आयुष्यही! त्याआधीच अर्थातच आपल्या पृथ्वीचेही आयुष्य केव्हाच संपलेले असेल. सूर्याचा मृत्यू पाहायला आपला वंशज उरलेला नसेल.

मात्र सूर्याचे असे होणार असले तरी सूर्यापेक्षा अवाढव्य आणि लक्षावधी पटींनी मोठे असे तारे या विश्वात आहेत. सूर्यापेक्षा एका विशिष्ट पातळीहून अधिक वस्तूमान असलेला तारा (१.३८ चंद्रशेखर लिमिट) हा इतक्या वस्तूमानाचा असतो की त्यातील हेलियम जळून गेल्यानंतर त्याचे केंद्र पुन्हा त्याला स्वतःकडे खेचू लागते. सूर्याच्या बाबतीत हे होत नाही कारण सूर्याचे वस्तूमान इतके कमी आहे की त्याचे केंद्र सूर्याच्या बाह्य भागाला स्वतःकडे खेचूच शकणार नाही. मोठ्या तार्‍याचे केंद्र तार्‍याचा पृष्ठभाग पुन्हा स्वतःकडे खेचू लागते व परिणाम असा होतो की हेलियम जळून संपल्यानंतरही मोठा तारा पुन्हा केंद्राकडे खेचला जातो.

पुन्हा तीच प्रक्रिया होते. दाब वाढतो व तापमानही वाढते. मात्र यावेळी हेलियम ज्वलनाच्या तापमानामुळे तार्‍यात असल्ले कार्बन हे मूलद्रव्य जळू लागते व पुन्हा त्या ताकदीमुळे तार्‍याचा पृष्ठभाग बाहेर ढकलला जायला लागतो.

ही प्रक्रिया कार्बनज्वलनानंतरही होते व त्यावेळी कार्बनज्वलनामुळे ऑक्सीजन जळू लागतो व शेवटी ऑक्सीजनमुळे सिलिकॉन जळू लागतो. एकाच्या ज्वलनातून दुसरे द्रव्य तयार होणे व वस्तूमानामुळे ते पुन्हा जळून त्यातून तिसरे द्रव्य तयार होणे हे एकूण पाच वेळा होते. सिलिकॉनच्या ज्वलनातून लोह तयार होते. हे सर्व होण्यास कोट्यावधी वर्षे लागत असतात. सिलिकॉन ज्वलनानंतर मात्र आतील लोह जळू शकत नाही. तितके तापमान निर्माण होऊ शकत नाही.

मात्र या लोहावर अतीप्रचंड दाब असतो. या दाबामुळे तो गाभा इतका दाबला जातो की त्यातून प्रचंड उर्जा बाहेर पडते व ती त्या तार्‍याला पूर्णपणे उद्ध्वस्त करते. (सुपरनोव्हा). अशा वेळी तारा अभूतपूर्व प्रकाशित होतो.

अशा प्रकारे विश्वात फेकल्या गेलेल्या वस्तूमानापासून दुसरे लहान तारे बनतात. आपला सूर्य असाच बनलेला आहे. ज्या मूलद्रव्यापासून दुसरा लहान तारा प्रामुख्याने बनतो त्या मूलद्रव्याचे अस्तित्व त्यावर तसेच प्रामुख्याने राहते. आपल्या शरीरातील लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि हवेतील ऑक्सीजन व इतर सर्व वायू हे अशाच एखाद्या मोठ्या तार्‍यापासून आपल्या सूर्यात व आपल्या सूर्यापासून आपल्या पृथ्वीवर व शेवटी आपल्यात आलेले आहेत. म्हणूनच पंचमहाभूतांपासून आपण बनलो असे म्हणणे चुकीचे नाही.

मात्र हा जो लोहगाभा मागे उरलेला असतो, त्याचे वस्तूमान किती यावर अवलंबून ठरते ती एक गोष्ट! त्या त्यार्‍यापासून कृष्णविवर बनणार की नाही!

कृष्णविवर! या अफाट विश्वातील एक अविश्वसनीय, भयंकर व न दिसणारी गोष्ट!

====================================================

आपल्याला एखादी गोष्ट दिसते याचा अर्थ काय असतो? त्या गोष्टीवर पडलेला प्रकाशकिरण त्या गोष्टीवरून परावर्तीत होऊन तो किरण आपल्या डोळ्यात शिरतो. असे झाले की ती वस्तू आपल्याला दिसते. रात्रीच्या अंधारात प्रकाशकिरण कशावरच पडत नसल्याने व परावर्तीत होऊन पुन्हा आपल्या डोळ्यात न येत असल्याने काहीच दिसत नाही. पुन्हा सूर्य उजाडला की प्रकाशकिरण पडतात व वस्तू दिसू लागतात.

मगाशी आपण पाहिले की प्रकाश किरणांना वेग असतो. प्रकाशाचा किरण सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर ऐतक्या महाभयानक वेगाने प्रवास करतो. तरीही आपला सूर्य आपल्यापासून इतका लांब आहे (१४.९८ कोटी किलोमीटर) की सूर्य उगवल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा पहिला किरण पृथ्वीवर पोचायला सुमारे आठ मिनिटांइतका कालावधी लागतो. म्हणजे वर्तमानपत्रात जेव्हा 'सूर्योदय सकाळी ६.४५' असे लिहिलेले असते तेव्हा तो आपल्याला ६.४५ ला दिसणार असतो. मात्र प्रत्यकात सूर्योदय आठ मिनिटे आधीच, म्हणजे ६.३७ लाच झालेला असतो.

याचा अर्थ प्रकाश ही एक गोष्ट आहे जी प्रवास करत करत कोठेतरी पोचते अथवा कशावर तरी आपटून परावर्तीत होते. प्रकाशाला आवाजाप्रमाणे वातावरणाचे बंधन नाही. वातावरण नसलेल्या ठिकाणी आवाज ऐकूच येत नाही, जसे आपला चंद्र! पण प्रकाश वातावरण नसले तरीही तेथे पोचतोच.

विश्वाने मानवाला फक्त अंधारातच ठेवले आहे असे मुळीच नाही. त्याने मानवाला बुद्धी तर दिलीच, पण एकसे एक असामान्य असे संशोधकही दिले. त्यातील शिरोमणी म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईन!

या माणसाने नोंदवलेले सिद्धान्त अक्षरशः क्रांतीकारी ठरले.

व्यापक सापेक्षता व क्वान्टम मेकॅनिक्स हे आईनस्टाईनने मानवाला दिलेले बक्षीस आहे.

त्यातील सापेक्षतेमध्ये आईनस्टाईन यांनी असे सांगितले आहे, की जर चार जणांनी एका चादरीचे एकेक टोक धरले आणि चादर उचलली व त्या चादरीच्या मध्यभागी एखादा फूटबॉल ठेवला, तर काय होईल? त्या फूटबॉलच्या अगदी लगतचा जो चादरीचा भाग आहे, तो गोलाकार होईल. जसजसे आपण फूटबॉल या मध्यबिंदूपासून चादरीच्या टोकाकडे जाऊ लागू, तसतसा चादरीचा खोलगटपणा कमी कमी होत जाईल व चादर सपाट होऊ लागेल. आईनस्टाईन यांनी असे सांगितले होते की जेथे जेथे एखादा तारा किंवा ग्रह आहे, तेथे तेथे त्या तार्‍या / ग्रहाभोवती जे काही विश्व असते, ते असेच चादरीसारखे खोलगट झालेले असते. त्या तार्‍या/ ग्रहापासून आपण लांब लांब जाऊ लागलो की विश्वाचा तो भाग, ती पोकळी सपाट सपाट होऊ लागते.

याचाच अर्थ असा, की एखाद्या ग्रहावर जर प्रकाश पडला, तर तो प्रकाश त्या ग्रहापाशी प्रत्यक्षात पोचेल तेव्हा वाअडा होऊन पोचेल आणि हे त्या ग्रहाभोवती असलेल्या खोलगट भागामुळे होईल. मात्र, जो माणूस त्या खोलगट भागापासून खूपच लांब असेल, त्याला तो प्रकाश सरळच पोचताना दिसेल. याचा अर्थ असा होईल की माणसाला जो ग्रह जेथे आहे असे वाटत आहे त्यापेक्षा तो ग्रह प्रत्यक्षात थोडासा तिसरीकडेच असेल.

असे का होईल? याचे कारण प्रकाश त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे खोलगट झालेल्या भागातून प्रवास करताना खोलगट भागानुसारच वळत वळत जाईल. आपल्याला जे काही दिसते ते प्रकाश परावर्तीत झाल्यामुळे दिसते. अर्थातच, असा वळत वळत गेलेला प्रकाश आपल्याला तो ग्रह थोडासा तिसरीकडेच असल्याचे दाखवेल. मात्र ग्रहाचे स्थान किंचित वेगळे असेल.

ग्रहाच्या, तार्‍याच्या अथवा कोणत्याही सॉलीड वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाश असाच वळेल.

तार्‍यापासून निघालेला प्रकाश तार्‍याच्या स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाला न जुमानता, मात्र तरीही प्रभावीत होतच बाहेर पडेल.

पण ज्या तार्‍याचा वर सांगितल्याप्रमाणे मृत्यू झालेला आहे, ज्याचा आता फक्त लोहगाभा राहिलेला आहे, त्याचे काय होईल?

त्या तार्‍याच्या त्या लोह गाभ्याचा स्वतःवरचाच गुरुत्वीय दाब इतका अफाट प्रचंड असेल की तो गाभा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने स्वतःच्याच केंद्राकडे खेचला जाऊ लागेल. त्याचे गुरुत्वाकर्षण इतके असेल की आजूबाजूला सापडलेले वस्तूमान तो गाभा एखाद्या भयानक मगरीप्रमाणे गिळंकृत करून तेही आपल्याच केंद्राकडे दाबू लागेल. अशा तर्‍हेने तो गाभा लहान लहान होत पुन्हा बिंदूवत व्हायला लागेल. अशा गाभ्यापासून जे काही जवळ असेल ते त्या गाभ्याचाच एक भाग बनून स्वतंत्र अस्तित्व म्हणून नष्ट होईल. जे दूर असेल ते मात्र कसेबसे वाचेल. पण अशा बिंदू होत चाललेल्या गाभ्याकडे जर प्रकाश किरण गेला तर?

तर तो प्रकाशकिरणहीत्या गाभ्यात खेचला जाईल इतके त्या गाभ्याचे गुरुत्वाकर्षण असेल.

महाकाय तार्‍याच्या त्या गाभ्याची ही स्थिती, की जेथे तो स्वतःचे केंद्राकडे खेचले जाणे थांबवू शकतच नाही व ज्यात प्रकाशकिरणही खेचला जातो व स्वतंत्र अस्तित्व म्हणून नष्ट होतो, या स्थितीला कृष्णविवर म्हणतात.

असे कृष्णविवर सूर्यासारख्या लहान तार्‍यापासून बनू शकत नाही. त्यासाठी तारा महाकाय असावा लागतो.

हे कृष्णविवर प्रकाशालाही आपल्यात खेचून त्याला बाहेर दिसू देत नाही.

आपण पाहिले की आपल्या डोळ्यात परावर्तीत झालेला प्रकाश गेला तर आपल्याला ती वस्तू दिसते. कृष्णविवराच्या फटक्यात प्रकाशकिरणही खेचला गेल्यामुळे आपल्याला कृष्णविवर कधीही दिसत नाही. फक्त कृष्णविवराची सीमा समजू शकते. कोणत्या पातळीच्या आत कृष्णविवर आहे याचा अंदाज येतो.

कृष्णविवर ही तार्‍याची एक महाभयंकर अवस्था असते. हे कृष्णविवर त्याच्या सीमेत येईल त्या गोष्टीला नष्ट करून आपला स्वतःचा भाग बनवते. कृष्णविवर म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीची परमावधी!

तार्‍यापासून कृष्णविवर कसे बनते हे आपण पाहिले.

आता विश्वातील काही गंमती जमती बघू

=========================================

हा सूर्य, हा जयद्रथ -

महाभारतातील युद्धात अभिमन्यूला मारणार्‍या जयद्रथाला उद्या सूर्यास्तापूर्वी नष्ट करेन अशी प्रतिज्ञा केलेल्या अर्जुनाला जयद्रथ काही सापडत नव्हता. तेव्हा श्रीकृष्णाने ऐनवेळी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्यच झाकला व सूर्यास्त झाल्याचे दाखवून जयद्रथ बाहेर आल्यावर पुन्हा सुदर्शन चक्र काढून घेऊन सूर्य आहे असे दाखवले.

प्रत्यक्षात सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचायला लागतात आठ मिनिटे! सुदर्शन चक्र पुन्हा काढून घेताना सूर्याचा प्रकाश पोचायला जर आठ मिनिटे खरच लागली असती, तर तेवढ्या अवधीत अर्जुनाने स्वतःची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी स्वतःलाच मारले असते. पण ते सुदर्शन चक्र दस्तुरखुद श्रीकृष्णाचेच असल्याने ते काढून घेतल्या घेतल्या सूर्याचा प्रकाश त्याच क्षणी पृथ्वीवर पोचला हे बरे झाले नाही का?

==========================================

प्रेयसीचा चेहरा चंद्रासारखा -

'चौदहवी चाँद हो'! कवींना ग्रहतारे म्हणजे खेळणीच वाटतात. आपल्या प्रेयसीच्या सुंदर मुखड्याला ते चंद्राची उपमा देऊन मोकळे होताना दिसतात. आपली सदा सांभाळून वागणारी प्रेयसी कधी अचानक चुकून आपल्या अंगावर येऊन आदळली तर प्रियकराला कोण आनंद होईल! पण चंद्र जर निखळला आणि चुकून पृथ्वीवर धडकला, तर प्रेयसी कशी दिसते हे सांगायला एकही कवी जिवंत राहायचा नाही.

==========================================

पत्रिकेत मंगळ -

पत्रिकेत मंगळ असल्याने ज्या मुलींची लग्ने होत नाहीत, त्यांना सरळ गुरूवर पाठवून द्यावे. गुरू या अतीप्रचंड ग्रहाकडे वाकडे बघण्याची मंगळाची काही हिम्मत व्हायची नाही.

====================================

बुधावर प्रसूती -

सुनेला दिवस गेल्यावर कधी एकदा नातवाचे तोंड पाहतोय असे वाटून एखाद्या सासूने जर असे ठरवले की पटकन नऊ महिने ज्या ग्रहावर होतात तिथे तिला न्यावे, तर अर्थातच सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून ती तिला बुध या ग्रहावर नेईल. पण तिथे मोठा घोळ होईल. बुधाचे एक वर्ष जरी पृथ्वीच्या ८८ दिवसांत पूर्ण होत असले (सूर्याभोवतीची बुधाची एक प्रदक्षिणा) तरीही बुधाचा एक दिवस मात्र ५८ दिवसांचा असतो आणि सूर्यास्त ते सूर्यास्त या घटनेला तर १७६ दिवस लागतात. त्यापेक्षा पुन्हा पृथ्वीवर आणलेले किंवा फारच घाई असली तर गुरूवर नेलेले बरे.

===========================

तुझे तोंड पाहायचे नाहीये मला -

असे एखाद्याला म्हणण्यापेक्षा त्याला सरळ चंद्राच्या पलीकडच्या बाजूला पाठवून द्यावे. चंद्राची एक बाजू पृथ्वीवरून कधी दिसतच नाही.

==========================

पृथ्वी चंद्र सीमावाद -

पृथ्वीवर फार माणसे झाल्यामुळे काहींना जर चंद्रावर ठेवायचे ठरवले तर ऑक्सीजनचा पुरवठा मात्र इथूनच करावा लागणार! अशा वेळी आवश्यकतेपेक्षा अधिक ऑक्सीजन चंद्रावर नेला जात आहे असे भांडण पृथ्वीवरचे लोक काढतील आणि कृष्णेच्या वादाप्रमाणे ऑक्सीजन सीमावाद सुरू होईल. चंद्रावर एक रुपयाला हजार एकर जमीन मिळेल, पण एक कोटी रुपयांना एक वर्षाचा ऑक्सीजन मिळेल. त्यामुळे चंद्रावरची जागा विकणार्‍यांना आधी ऑक्सीजनहा भाव विचारायला हवा.

=========================

शुक्रतारा मंद वारा -

शुक्रतारा मंद वारा हे गाणे म्हणायला छान असले तरी शुक्राला तारा म्हंटल्यामुळे सूर्यमहाराज रागवू शकतील. शुक्र हा ग्रह असला तरी आकाशात तार्‍यासारखा चमकत असल्यामुळे कवींना अशा कल्पना सुचतात. पण ते बरोबर नाही.

=======================

मै आयी आयी आयी आयी आज्जा -

हिंदी चित्रपटात बागेत बागडत गाणार्‍या प्रेयसीने 'मी आले आले' असा इशारा दिला की प्रियकर सर्व शक्तीनिशी तिला उचलतो. मात्र बिचार्‍याचा चेहरा वेदनेने पिळवटत असला तरी तसे दाखाता येत नाही कॅमेर्‍यासमोर! अशा चित्रपटांचे चित्रीकरण चंद्रावर केल्यास हा प्रश्न सुटेल. चंद्रावर प्रेयसीचे वजन पृथ्वीवरील तिच्या वजनाच्या एक षष्ठांश होईल. प्रश्न फक्त इतकाच आहे की प्रियकराचेही वजन तितकेच कमी होईल, ते त्याने त्याचे पाहून घ्यावे

=======================

- भूषण कटककर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान भाषेत लिहिला आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्र्स्थानी देखिल असे एक कृष्णविवर आहे.
सुर्य जयद्रथ याच्या कल्पनेत, जर सुदर्शन चक्र सुर्याच्या जवळ असते तर ते सुर्याच्या साइझचे ठेवावे लागले असते आणि आपण म्हणतात तसा फारसा उपयोग झाला नसता.
(कदाचित कृष्णाने आठ मिनटे आधिच असे चक्र सुर्याच्या जवळ ठेवले असावे, अब इतना कुछ किया तो ..)
याउलट साधारण २ किलोमिटर्वर हत्तीच्या साइझचे ठेवले असते तरी सुर्य झाकता आला असता.
अर्थात हे सुर्य अगदी मावळायला आला असतानाच १-२ मिनटे आधी शक्य आहे, तरीपण वातावरणातील वक्रीभवन झालेला प्रकाश नाहीसा होणार नाहीच.

>> पण ते सुदर्शन चक्र दस्तुरखुद श्रीकृष्णाचेच असल्याने ते काढून घेतल्या घेतल्या सूर्याचा प्रकाश त्याच क्षणी पृथ्वीवर पोचला हे बरे झाले नाही का?
कृष्णाने सूर्य 'बंद' पाडला नाही. फक्त (डोळ्यांवर हात धरावा तद्वत) प्रकाश अडवला. 'त्याच क्षणी' पडला तो आठ मिनिटांपूर्वीचा उजेड हे मात्र खरं.

पूर्ण लेख वाचून झाला नाही त्यामुळे त्यावर अभिप्राय आत्ताच देता येत नाही. महाभारतातल्या उल्लेखाकडे पटकन लक्ष गेलं.

बेफिकीर,

लेख आवडला. हा लहान मुलांसाठी आहे का? तसा असल्यास प्रेयसी वगैरे उल्लेख टाळलेले बरे. हे माझं वैयक्तिक मत.

बाकी लेखाबद्दल म्हणायचं झालं तर एक गोष्ट नमूद करू इच्छितो. आपल्या दीर्घिकेतले बरेचसे तारे शुभ्र बटू आहेत. त्यांच्यात कार्बन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. त्यापेक्षा जड तारे न्यूट्रॉन तारे बनतात. पल्सार म्हनजे स्वतःभोवती वेगाने फिरणारा न्यूट्रॉन तारा असतो. यापेक्षाही जास्त वस्तुमानाचे तारे शेवटी कृष्णविवर होतात. आपला सूर्य कालांतराने शुभ्र बटू होणार आहे.

तर लेखात तार्‍याची ज्वलनप्रक्रिया चर्चिली आहे. म्हणून शुभ्र बटू आणि न्यूट्रॉन तारा यांच्याविषयी माहिती हवी होती. अन्यथा (म्हणजे ज्वलनप्रक्रिया टाळून) थेट कृष्णविवरावर चर्चा केली असती तरी चालले असते.

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीरजी, इतका गहन विषय इतक्या सोपा करून सहजपणे समजावल्याबद्दल धन्यवाद.
[ माझ्या एका मित्राची मुलगी अमेरिकन युनिव्हर्सिटीत 'कृष्णविवरा'वरच्या संशोधनाचंच काम करते आहे. गेल्याच महिन्यात मुंबईत आली असताना नेहरू सेंटरला हाच विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी तिचं लेक्चरही होतं. मीं माहित असूनही जावूं शकलो नव्हतो. त्याची भरपाई वरचा लेख वाचून झाली ! मला वाटलेलं आश्चर्य म्हणजे आमच्यासारख्याचं डोकं फिरवणार्‍या या संकल्पनेवर दिवस रात्र संशोधन करणारी ही मुलगी आपल्याशीं बोलताना मात्र अगदीं ' डाऊन टू अर्थ' कशी होऊं शकते !! ]

साहेब आपल्याला अनेक धन्यवाद. माझ्या मुलाला जेव्हा वाचायला दिला (बराच वाचून दाखवला) तेव्हा त्याच्या ढेंग्यात (तो मोठा झाल्यावर हा प्रतिसाद काढावा लागेल) शिरले. एरव्ही मी सांगायचो ते त्याला समजायचे नाही. सांगायचे असे की अवघड विषय सोपा होऊ शकतो जर त्या ताकदीचा गूरु असेल तर.

आत्मीयतेने लिहिलेला माहितीपूर्ण लेख..विषय मोठा असल्याने अशावेळी लेखनसीमा करणे कठीण जातेच.अनेक आनुषंगिक विषयही स्पर्शले जातात.
शेवटच्या गमतीही आवडल्या.

>>'चौदहवी चाँद हो'! कवींना ग्रहतारे म्हणजे खेळणीच वाटतात >>

कवींना खगोलावर सीरियसली कविताही करणे आवडते बरे का.
(मी नाही का 'शून्यमाळा' लिहिलीय.. Happy )

मस्त आहे लेख. आवडला.

असाच एखादा लेख आमच्या अत्यंत प्रिय टाईममशीन आणि त्याच्यावर आधारित थेअरीज/परिकल्पना यांवर येऊदेत.. Happy