तळघर

Submitted by ashishcrane on 1 January, 2013 - 11:50

तळघर

रस्त्यावरचे 'वाहने सावकाश चालवा' असे बोर्ड कित्येकदा वाचून पुढे भराभर जाणारी माणसं आपण.
तुमच्या आमच्या सारखाच हा श्री. गाडीच्या वेगावर ताबा नाही मिळवला तर, नियती आपल्या वेगावर ताबा मिळवते.
मग या नियतीच्या खेळातून श्री कसा सुटेल? रस्त्यावरच्या एका अपघातात श्री सर्व काही गमावून बसला.
सर्वस्वाची व्याख्या ज्याच्या त्याच्यासाठी वेगळी असते आणि ती समोरच्याला पटेलच असे नाही.
झालेल्या अपघातात श्रीच्या शरीराची एक बाजू पांघळी पडली.शरीर पांघळं पडलं कि, त्यासोबत बऱ्याच गोष्टी पांघळ्या होतात....अगदी नातीसुद्धा...
हसत्या घरात दुखवटा पसरवायला अपघाताचा एकच क्षण पुरेसा असतो.श्री तसा चांगल्या पदावर कामाला होता.बँकमध्ये शिल्लक हि होती.
पण पैसा हि अशी गोष्ट आहे कि जी मिळताना कासवासारखी मिळते आणि जाताना सश्यासारखी पळते.
घरातला कमावता माणूस श्री असा बिछान्यावर आल्याने अनुला घराबाहेर पडणे भाग होते.
धीर खचू देऊ नकोस, होईल सगळे ठिक असे सल्ले कित्येक नातेवाईकांनी दिले.हालचाल करत रहा, बसून कसे चालेल...इ गोष्टी सांगून हि झाल्या.
पण एका हद्दी नंतर सल्ले हि टोचू लागतात. आपल्या हक्काचा श्वास कुणीतरी दुसरं घेतंय, मग आपण का जिवंत आहोत? असे वाटू लागते.
अपघातानंतर बरेच दिवस गेले.जसजसे दिवस जात होते, श्री विचित्र वागत होता.शांत झाला होता.बाजूला असूनही नसल्यासारखा वाटायचा.गप्प राहायचा....छपराकडे एकटक बघत बसायचा.
अनुकडे प्रेम होते पण वेळ नव्हता.दिवस ऑफिस मध्ये आणि घरी आल्यावर घरकामात जायचा.श्री चे औषध पाणी वेळेवर करता करता तिचे नाकी नऊ यायचे.
मध्येच ती श्रीची चौकशी करायची, धीर द्यायची.पण स्वत:कडे नाही ते दुसऱ्याला कसे देणार? श्रीच्या परिस्थितीत काही बदल नव्हता.... स्वभाव सोडला तर दुसरं काहीच बदलत नव्हतं.
श्री ची चिडचिड अनुच्या अंगवळणी पडली होती.कामाचा भार पेलवेनासा झाला कि ती हि चीडचीड करायची.
पण आज वातावरण वेगळं वाटत होतं.घरात मुलं नव्हती, त्यामुळे आधीच शांतता पसरलेल्या घरात अजून शांतता पसरली होती.
शांत बसून बसून श्री चेहरे वाचायला शिकला होता.अनुच्या चेहऱ्यावरचे भाव बघून श्री ला वाटले तिची चौकशी करावीशी.
पण धीर खचला कि माणूस सर्वात जास्त भित्रा बनतो.अगदी स्वतःच्या श्वासालाही घाबरतो.अपघात नंतर श्रीची हि अवस्था अशीच होती.
अनुशी बोलतानाही त्याला हल्ली भीती वाटायची.तिच्याशी बोलताना हजार वेळा विचार करायचा तो.

"काय झालं अनु? चेहरा का उतरलाय?"
मन भरलेलं असलं कि पापण्यांचे बांध क्षणात विरघळतात.त्रासलेल्या अनुचे डोळे भरून आले. बऱ्याच दिवसानंतर अनु श्रीच्या मांडीवर डोके ठेऊन शांत बसली.
पांघळेपण आल्याने पायात काहीच जाणीव नव्हती.पण तरीही अनुचा स्पर्श श्री ला मनापासून जाणवत होता.
"काय झालं अनु ? दमली असशील ना?"
"ह्म्म्म...आज खुप एकटी पडलीय असं वाटतंय रे.कितीही केलं तरी कमी का पडतं नेहमी? तूझ्याशिवाय एकटी पडलीय मी"
"माझ्याशिवाय?"
"हो तुझ्याशिवाय.तू शरीराने इथे आहेस.पण मनाने आहेस का? दिसणं म्हणजे अस्तित्व असतं का रे? आठवतंय का याआधी माझ्याशी कधी मोकळेपणाने बोलला होतास ते?"
"तुला काय वाटतं अनु ? मला तुझ्याशी बोलावंसं वाटत नसेल का? पण तू हि शेवटी परकीच ना?"
"परकी??..."
"ह्म्म्म....परकी...काही काही गोष्टींच्या बाबतीत 'आपलं माणूस' पण 'परकं' असतं.
आयुष्यातली आपली काही दु:ख आपली आपल्यालालाच सहन करावी लागतात.
म्हटली तरी ती जवळच्या माणसाला सांगता येत नाहीत आणि सांगितलीच,समोरच्याने ती समजून घेतली तरी
समोरची व्यक्ती वाटूनही त्या दु:खात आपली भागीदार बनू शकत नाही.
बोललेले शब्द, ऐकलेले शब्द आणि समजलेले शब्द यांच्यातली तफावत म्हणजे नात्यांमधला गैरसमज .
पण मी तुला जे काही सांगतोय ते स्पष्ट सांगतोय.खूप काही गमावलं ना मी अनु त्या अपघाताने?
पण फक्त मीच गमावलं कि तू हि गमावलंस?
आज स्वत:ला मी म्हणताना, स्वत:ला मोजताना भीती वाटते मला.
मी इथे झोपून झोपून छप्पर पाहतो.हसायला येतं.वाटतं कि,या छपरात आणि माझ्यात फरक काय?
मी हि जागचा हलत नाही आणि ते हि जागचे हलत नाही."

"श्री इतकी वागते का रे मी तुझ्याशी? कधी काही बोललीय का मी तुला?तुला कधी जाणीव करून दिलीय का माझ्या त्रासाची?"
"अनु, आपण लपवलं म्हणजे कुणाला दिसणारच नाही याची शाश्वती असते का? बोललेल्यापेक्षा लपवलेलंच जास्त टोचतं.आपण गुदमरतोय पण आपल्या सोबतची लाडकी व्यक्तीही आपल्यामुळे गुदमरतेय हि जाणीव भयंकर असते.
तू काहीच बोलत नाहीस, म्हणून तुझ्या मनातलं मीच माझ्याशी बोलून घेतो.माझ्या मनातली ती तू तेव्हा खूप रडते माझ्या समोर.पण तेव्हा गोंजारून धीर द्यायला हि माझा हात माझी साथ देत नाही.
अजून एक सांगू?...नको राहू दे.तुझ्या नजरेतून पडेन मी"
"नाही.बोल श्री.ऐकायचंय मला सगळं."
"शरीराने साथ सोडली तरी भावना, इच्छा साथ सोडतात का? याच बिछान्यावरून खाली झोपलेल्या तुला पाहतो मी.इच्छा चाळवतात.वाटतं कि उठावं थेट आणि तुला उचलून या बिछान्यावर आणावं.शरीराची एक एक इच्छा पूर्ण करावी.पण हिच इच्छा प्रत्यक्ष करण्यासाठी उठायचा प्रयत्न करतो तेव्हा, शरीरातून फक्त वेदना बाहेर हजेरी लावतात. आत्मा आतून किंचाळत राहतो.मागत राहतो.
आपलीच एखादी गोष्ट आपली असूनही आपल्याला नाही मिळत तेव्हा काय वाटतं माहितीय का? तेव्हा नरक दिसतो.
तुला दोष नाही देत मी.विश्वास हि आहे तुझ्यावर.पण.....
जश्या माझ्या इच्छा अपूर्ण राहतात तश्या तुझ्या हि राहत असतील हे नेहमी जाणवतं. त्या इच्छेसाठी तुझी पावलं भटकतील अशी भीती ही वाटते,पण 'ती भटकलेली पावलं खरंच चुकीची आहेत' हे ठरवायचा हक्क असेल का मला? हा प्रश्न हि पडतो.
चुकीला चूक ठरवताना आपण ती गोष्ट आपल्या दृष्टीकोनातून बघतो, पण कोणता तरी एक दृष्टीकोन त्याच चुकीला बरोबर हि ठरवत असतोच."

श्री नुसता बोलत होता....बोलतच होता....
"कित्येकदा सहन नाही झाला ना कि वाटतं जाऊन जीव द्यावा.पण...
आपल्या नशिबात लिहिलेली सगळी चांगली-वाईट दृश्य पाहिल्याशिवाय जगातून अदृश्य होता येत नाही.
इथे एकटा पडून पडून खूप विचार केला मी.अनु तुझी चिडचिड पाहिली ना कि पटतं...
आयुष्याच्या एखाद्या क्षणी माणसाला जिथे स्वत:चा स्वतःलाच कंटाळा येतो, तिथे दुसऱ्या व्यक्तीला आपला कंटाळा येणार नाही अशी अपेक्षा कशी करावी आपण?
फक्त 'ज्याने कंटाळा करावा' अश्या जागी उभे न राहता, आज आपण 'ज्याच्या कंटाळा यावा' अश्या जागेवर उभे आहोत हे माणसाला जास्त छळत राहते.
अनु.....धृतराष्ट्राच्या आंधळेपणापायी आयुष्य भर आंधळेपण स्वीकारणारी गांधारी कितीही महान वाटली,
तरी एक माणूस म्हणून एका क्षणासाठी का होईना, ती हि त्या कृत्रिम आंधळेपणाला कंटाळली नसेल कशावरून?

'गाड्या सांभाळून चालवा' असा सल्ला देतो आता सगळ्यांना.
समोरच्याला सल्ला देण्यासाठी आयुष्यात काही चांगले झाले नसले तरीही चालेल पण काहीतरी वाईट नक्की घडलेले असावे लागते.
काहीतरी भयंकर वाईट सहन केल्याशिवाय सल्ला देण्याचा हक्क सुद्धा हा समाज तुला देत नाही.
कधीकधी मनापासून दिलेला निरागस सल्ला हि आपल्याच माथ्याशी येतो आणि "तुला नाही कळायचं यातलं दु:ख.तू जाशील ना यातून तेव्हा कळेल." असे फटकार खावे लागतात.
पण सल्ला देण्याच्या हक्कासाठी इतकी मोठी किंमत भरावी लागेल असे वाटले नव्हते मला......
अनु....अनु....."
मान वाकवून श्री ने अनुला पाहिले.गालावर सुकलेले पाणी घेऊन ती शांत झोपली होती."कधी झोपली ती? आपण बोललो त्यातले अनुने किती ऐकले, किती निरागस झोपलीय ती.दमली असेल बिचारी...." श्री ने स्वत:च समजूत काढली.पण मनात कुठेतरी खोल घाव जरूर झाला होता.
पूर्ण घर शांत होते...दोन देह एकमेकांजवळ निपचित पडले होते....स्तब्ध होते...हालचाल दोन्ही शरीराची होत नव्हती..पण एक स्तब्धता ऐच्छिक होती आणि दुसरी अनेच्छिक.
श्री ला घड्याळ्या च्या काट्याची टिकटिक ऐकू येत होती...तो पुन्हा विचार करू लागला.
"घड्याळ्याचा हा निर्जीव काटा हि हालचाल करतो, पण मला हालचाल करणे जमत नाही...".....
नकळत एक थेंब श्रीच्या हि गालावरून खाली सरकत होता....ते पाणी त्याला तळघरात वाहून नेत होते.

वरून माणूस कसाही वागला तरी ज्याच्या त्याच्या मनात एक तळघर असतं.जिथे फक्त आपण एकटे असतो....
तिथे हसणं असतं, खिदळणं असतं, किंकाळ्या असतात....पण त्या फक्त आपल्या एकट्याच्या असतात.

स्वत:चं सांत्वन करत बसण्यात अर्थ नसतो....
कधीकधी सांत्वनच माणसाला जास्त दुबळं करतं.
जगात नव्याने जन्माला येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहणारे आई वडील हि बाळ काही दोषांसकट जन्माला आले तर परक्यासारखे वागतात.
तर तिथे जागा कडून अपेक्षा कशी करणार?
माणसाला प्रकृती आवडते, विकृती आवडत नाही. हा मानवी स्वभाव आहे.ज्याला त्याला एक सहनशक्ती असते.घडलेले प्रसंग कधीकधी प्रेम, जिव्हाळा या गोष्टींना प्रचंड धक्क देऊन जातात.जगात प्रेम हि गोष्ट नक्की आहे का अस्तित्वात अशी शंका मनात येऊ लागते.
पण हा हि प्रश्न सोडवता येतो. ज्याला आपण दोष लावतोय त्या व्यक्तीच्या जागेवर आपण असतो तर काही वेगळे वागलो असतो का? हा प्रश्न सगळे वाद मोडून काढतो.

जग आपल्याशी जसं वागतंय त्याबद्दल जगाला दोष देवून खचून जाण्यापेक्षा ते पचवून घ्यावं...आयुष्य थोडं का होईना सोप्पं होतं.

=====================================================
तळघर (पण अनुच्या नजरेतून)

"शी बाई उशीर झाला आज निघायला.श्रीच्या औषधाची वेळ निघून जायला नको.आजच का बरं हि ट्रेन मध्ये इतकी गर्दी.
हि वेळ आपली दोस्त असते कि दुश्मन असते ना तेच कळत नाही मला.जेव्हा आपल्याला सगळं जगून घ्यावसं वाटतं,एक एक क्षण साठवून घ्यावासा वाटतो,तेव्हा हि वेळ धावत सुटते
आणि जेव्हा आपल्याला एक एक क्षण जगणं कठीण होऊन जातं तेव्हा हि वेळ हट्ट करून बसते."
"जरा सरकून बस ना"
"आता कोण आलंय तडमडायला? जरा निवांत विचार करायला मिळत नाही. किती बोलतात ना ह्या बायका?नुसती चपड चपड.... अय्या.....मी पण बाईच आहे कि... Happy
उद्या एकादशी आहे.उपास ठेवायला हवा. उपास... Happy आपण कधीपासून विश्वास ठेवायला लागलो या सगळ्यावर?
आपण उपाशी राहिलं कि,आपल्याला देव मागू ते देतो हि भाबडी भावना माणसाकडून किती उपासतापास करून घेते ना?
घाबरलेल्या सामान्य माणसाचा स्वतःवर सोडून सगळ्यांवर विश्वास असतो.

श्री...काय वाटलं असेल त्याला काल?
अशी कशी झोपली मी काल त्याच्याशी बोलताना? त्याच्या शब्दांना आता काही महत्व नाही उरलंय का?
माझ्यासाठी पर्यायी झालंय का त्याचं असणं? मी दमलेले हे मान्य असलं तरी त्यामुळे श्री ला जे वाईट वाटलं असेल ते मी नाकारू शकते का?
आता घरी जाऊन त्याच्या नजरेला नजर देऊ शकते का मी?
समोरच्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नसली कि,समजावं आपण चुकलोय.
का झालं हे सगळं?श्री तुझ्या एका चुकीने आयुष्यच बदललं ना रे आपलं?
शिक्षा अनुभवताना माणूस असाही नाराजच असतो पण...आपली चूक नसताना हि शिक्षा आपल्याला मिळत असली कि
मात्र चिडचिड वाढते, माणसं सैरावेर होतात.ज्याच्या चुकीची शिक्षा आपण भोगतोय ते माणूस आपलं असेल तर जाब हि मागण्याची मुभा नसते.
पण याचा अर्थ मी एकटीच सहन करतेय का?श्री ला काय वाटत असेल? मी स्वार्थी झालीय का?

जे घडले ते घडलेच नसते तर किती बरे झाले असते ना? येणारा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येणारंय हे माहित असलं कि वाईट टाळता आलं असतं ना?
मनात बोलून बोलून ना कंटाळा आलाय मला?
श्री पण त्या प्रसंग नंतर बोलायचा कमी झालाय.गप्प बसतो.काय चालू असेल त्याच्या मनात ह्याचा अंदाज लावणं अशक्य झालंय मला.
अख्खं घर शांत झालंय...हि शांतता खायला उठते मला...श्री बोल ना रे माझ्याशी?
वाईट प्रसंगानंतर लोकांच्या नजरा कश्या बदलतात ना? 'पुरुष' हि जातच वाईट.काय मिळतं यांना दोन क्षणाच्या चोरट्या स्पर्शातून?
काल श्री शी बोलताना का चिडले होते?... चिडणार नाही तर काय करणार? काल सचिनने ऑफिसमध्ये चक्क माझा हात धरला. लांडगे असतात हे पुरुष सगळे.तळपायातली आग मस्तकात पोहोचली.कुणाकडेही स्वत:चे दु:ख मांडणं हे हि पाप असते का?
सगळेच शत्रु वाटतायत मला.आपल्याला गरज असतानाच सगळेच जण आपली साथ अशी सोडून का देतात?
घरी आले तर श्री चे बोलणे काट्यासारखे टोचत होते मला....श्री एकटा बसून बसून इतका विचार करत असेल याचा अंदाज होताच मला
पण....
आग चटके देते हे माहित असले तरी प्रत्यक्ष चटके बसतात तेव्हा ऐकलेले वाक्य जास्त पटते.

कधीकधी एकटेपणा वाटतो.वाटतं कि श्री ने प्रेमाने जवळ घ्यावं,धीर द्यावा.
पण पाण्यात डूबणाऱ्या माणसाने दुसऱ्या डूबत्या माणसाकडून मदत कशी मागायची?आणि मदत मागितलीच तर त्याचा फायदा तरी काय होणार?
तो हि पाण्यात आणि आपणही पाण्यात...त्याचे क्षणही शेवटचे आणि आपलेही शेवटचेच....
त्याच्या त्या उरलेल्या काही क्षणातूनही काही क्षण उधार कसे मागायचे आपण? इतकं स्वार्थी व्हायचं का?

कधीकधी असा वाटतं कि श्री ला गदागद हलवावं आणि सांगावं कि,उठ उठ श्री, बघ तुझ्याविना तुझी अनु एकटी पडलीय.तिची साथ हवीय तिला.
पण.....
काहीच होणार नाही माहितीय मला.कुणी धीर दिला ना कि मला हुरूप चढतो. वाटते कि परिस्थिती सुधारेल.पण श्री च्या डोळ्यातली उदासीनता पाहिली ना कि
मी पुन्हा हरते."
अनु घरी पोचली. मोठ्या हिमतीने तिने श्री कडे पाहिले.श्री तिच्या कडे पाहून फक्त हसला...ते हसणं रहस्यमय होतं...
अनु तशीच स्वयंपाक घरात गेली.तिचे डोळे भरलेले होते.
ती मनात किंचाळली....
"श्री नको ना रे असे करूस.लवकर बरा हो.तुला पुन्हा हसताना पहायचंय मला. अगदी मनापासून....

गुदमरत असशील तू हि तुझ्या तळघरात.....
पण बघ तुझ्या शेजारचे तळघर माझेच आहे..."

आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. दोघांच्या मनातली घालमेल छान उतरली आहे. शुले च्या थोड्या चुकांवर काम करा तेव्हढे. Happy

पुलेशु

आशिष, अतिशय सुरेख कथाबीज. त्या दोघांची घालमेल खरच चांगली उतरलीये शब्दांत.
मांडणीवर अजून काम करता येईल का?
जसं... अनूच्या नजरेतून तळघर फक्तं तिच्या स्वगतातून उलगडतं. पण श्री चं तळघर ... <<रस्त्यावरचे 'वाहने सावकाश चालवा' असे बोर्ड कित्येकदा वाचून पुढे भराभर जाणारी माणसं आपण.
तुमच्या आमच्या सारखाच हा श्री. >> अशा कुणा तिर्‍हाइताच्या निवेदनातून सुरुवात होतेय.
तसंच श्री स्वतःच्या शारिरिक इच्छांविषयी मोठ्यानं बोलतोय... अनु स्वतःशीही बोलत नाही? (उदात्तीकरण?)

अर्चना२७११ ,dhanashree navgekar ,दाद:
प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद.

दाद:
खरतर मी कथा फक्त श्री च्या दृष्टीकोनातून लिहिली होती.
पण त्या नंतर कथेत अनु ची मनस्थिती हि असयला हवी असे सल्ले फेसबुक वर मिळाले.
म्हणून अनुची मनस्थिती हि लिहिली.
श्री प्रमाणे अनुच्या हि मनात शारीरिक इच्छा हि जाग्या होत असतीलच.
कथा लिहिताना कथेची लांबी जास्त वाढली त्यामुळे घाई झाली माझी.
पुढच्या वेळी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेन.

एखाद्याच्या मनाचे सगळेच्या सगळे भाव मांडणं आणि एकवटून घेणं कठीण आहे.

khup Chan aavadli katha..pudhchya lilhanasathi shubheccha