भेट

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 December, 2012 - 13:28

गाडी धडाडत होती
रात्रही वाढत होती
समोरील बर्थवर
ती पण जागीच होती १
लाकडी बर्थचा होता
बहाणाच खरतर
झोप कशी लागणार
पाहता तिला समोर २
एक दिसाची ओळख
मनास व्यापून होती
उगाच बोललो काही
प्रीत उमलत होती ३
काय बोललो मी किती
याची नसे आज स्मृती
पण ती रात्र जणू की
देही झिनझिन होती ४
हसतांना डोळे तुझे
किती सुंदर दिसती
मनास माझ्या जणू मी
ठेविले शब्दावरती ५
प्रश्न येताच कळून
काही क्षण थबकून
दिधले उत्तर काही
तिने यावर हासुन ६
त्या मधुर हसण्यान
जीवन आले फुलून
सारी रात्र धड धड
अन सारी रात्र स्वप्न ७
पण ती सुंदर भेट
नच झाली कधी प्रीती
जागी झाली ओढ तरी
नशीबा मान्य नव्हती ८
मग कश्यास नकळे
ती भेटही झाली होती
सारेच प्रवास असे
का विरहीच असती ९
ते हसणे तो प्रवास
जणू कालचा वाटतो
नि घडता यात्रा कधी
अशी तिला मी स्मरतो १०

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता..!

एक दिसाची ओळख
मनास व्यापून होती
उगाच बोललो काही
प्रीत उमलत होती ३

मीही अशाच प्रकारचे कडवे १९९३साली एका कवितेत केले होते. आता आठवत नाही आणि ती कवितेची वहीही हरवली. मात्र आठवेल तसे सांगेन...
पुढेही २००७ला मी चाफा नावाची कविता >> उगाच बोललो काही, प्रीत उमलत होती << या विचारावर केली होती. तीही आठवली.

रचना सुंदर आहे...!
धन्यवाद.