ओळखू नाही मला आला सुखाचा चेहरा!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 December, 2012 - 21:56

गझल
ओळखू नाही मला आला सुखाचा चेहरा!
कोणताही चेहरा नव्हता पुरेसा हासरा!!

जोडता आली मलाही निरनिराळी माणसे....
सांधता नाही स्वत:चा एकही आला चरा!

तू दिली आहेस अगदी वेगळी मुक्ती मला;
लागले वाटू मला आकाश सुद्धा पिंजरा!

मी घरापासून जेव्हा दूर जाऊ लागलो....
लागला पायात घोटाळू घराचा उंबरा!

शेवटी का होइना, आलोच मी ओठी तिच्या!
जाहलो होतो तिच्या मी काळजाचा कोपरा!!

मी कुठे जाऊ? कुठे फिर्याद माझी नोंदवू?
मारले ज्याने मला तो एक होता सोयरा!

वेचल्या काड्याकुड्या बांधायला मी झोपडी;
शोधला नाही कुणाच्या वळचणीचा आसरा!

शेलकी वाक्ये पहा थुंकेल तो तुमच्यावरी....
त्याचिया तोंडात शब्दांचाच असतो तोबरा!

आज जगताना तुझ्यावाचून ऐसे वाटते....
दोर तुटलेला जणू आडातला मी पोहरा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला लोकांना त्रास द्यायचाय का? की न्यूसन्स व्हॅल्यू वाढवली की लोक लक्ष देतील असं वाटतंय?
तुमच्या आधीच्या गझलेवर तुम्हाला तांत्रिक बाबी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या असतानाही तुम्ही अजून तुमचा आयडी बदलत नाही. दोन मिनिटेही लागत नाहीत हे करायला.
बदाबदा नवीन बाफ टाकताय त्याआधी ते करा. उपकार होतील आमच्यावर.

सतीशा, नकोस पाडु ह्या वेगानी गजला !
मायबोली तुझ्याच नावानी भरली आहे !!

काढुन द्या रे याला कोणी स्वतंत्र ग्रुप !
टाळण्याचा तूला हा च मार्ग उरला आहे !!