श्श्शश्श्श...गप्प

Submitted by ashishcrane on 24 December, 2012 - 22:10

श्श्शश्श्श...गप्प

टेबलावर हाताच्या मुठीवर हनुवटी ठेऊन ती आई विचार करत होती. सकाळ रोजचीच आणि विचार ही रोजचेच. पण, नवीन नसले तरी काही जुने विचार नव्याने तितकेच त्रास देणारे असतात.

मनात म्हणत होती ती.
"माझं काय चुकलं? मुलाची बायको 'सून' बनून घरात येते. 'आलेल्या सुनेला स्वत:ची मुलगी मानून जपा' असा सल्ला जग देतं. सासू म्हणजे कुणी राक्षस असते का? आईच असते ना ती? तिची नसली तरी, तिच्या मुलाची तरी आई असते ना ती? आपल्या मुलाचं वाईट व्हावं असा विचार तरी करेल का ती? सून घरात येईल आणि घर सांभाळेल अशी भाबडी आशा असते तिची.
चूक आहे का ही आशा?"

तसं पाहायला गेलं तर त्या आईच्या बाजूला कुणीच नव्हते. पण दिसतं तसं असतं कुठे.
तिथे त्या आईला प्रश्नांनी वेढलेले होते.
मनातल्या मनात हिशोब सुटतोय का हे पाहत होती ती आई.
"ही माझी सून माझ्या शब्दात नाही राहत. अगदी एकूण एक शब्द ऐक अशी आशा नाहीच माझी. प्रत्येक माणूस वेगळा, त्याची मतं वेगळी. इतके मलाही कळते. पण, ज्या गोष्टी मी सांगते, त्याच गोष्टी जर हिला हीच्या आईने सांगितल्या असत्या तर त्याही हिने अश्याच झिडकारल्या असत्या का?
सासूने आई बनावं. मग, सुनेनं मुलगी का बनू नये? दुसऱ्याशी वाईट वागण्याची सवय नसते कुणाला.
'पण आपण जे वागलो, ते वाईट आहे की नाही हे समोरचा ठरवतो' इथेच सगळं चुकतं."

स्वत: स्वत:लाच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वत:च स्वताला देऊनही कधीकधी समाधान नाही होत आपलं. अशीच गात होती त्या आईची.
विचार पाठलाग सोडत नव्हते. चिडचिड, त्रास, त्रागा आणि मुकेपण हे जेव्हा एकत्र धरतात, तेव्हा नरक म्हणजे काय ते कळतं.
आई म्हणत होती, "माझा मुलगा असं म्हणताना हल्ली विचार करावा लागतो. 'माझ्या' या 'माझा' मध्ये भागीदार आलाय नवीन. हीच ती भागीदार. जग नाव ठेवायला तयार असतं. मग भले तुम्ही काही चांगले करा वा ना करा. चालीरीती सांभाळाव्याच लागतात. पण, हे हीला नाही कळत.
जग आम्हाला हसेल. ते मान्य आहे का हीला? जग पुढे गेलंय. पण, स्त्री अजून मागेच आहे हे मान्य करायलाच ही पिढी तयार होत नाही."

पाण्याचा एक थेंब टपकन हातावर पडला अन शहाऱ्याने ती आई भानावर आली.
हातावरचा थेंब हाताने फुसून मनात म्हणू लागली,
"मुलाला सांगावे तर, सून म्हणेल की सासू चहाड्या करते.
नुसता मनस्ताप आहे हा. पण बोलून कुणाला दाखवायचा? लगेच कुणीतरी मला 'सासू' म्हणेल ही भीती वाटते.
सांगायला कुणी न मिळणं यापेक्षा दुसरा मोठा शाप नाही. आता त्याला आमच्यासाठी वेळ नसतो. अडगळ आहोत का आम्ही? बायको आली म्हणजे सगळी नाती तुटतात का?"

"आई, ए आई, डबा तयार आहे गं? कसला विचार करत बसलीयस इतका? डबा दे चल मला. जाऊ दे मला. उशीर झालाय आधीच." त्या तिच्या मुलाने त्या आईला विचारलं.
"अअअ... काय बोललास?"
"डबा देतेस ना?"
"हो रे. हा घे. घाई नको करूस रे. सांभाळून जा रे बाळा."

(विचार मुलाच्या मनातले.)
"आयला या ट्रेनच्या. गर्दी नुसती. नुसती लोकांची कटकट. गोंधळ नुसता.
जरा शांतता नाही. ना इथे, ना घरी.
काय सावरावं आणि कुणाला आवरावं हे न कळणं म्हणजे Silent Suicide
लग्न करून चुकलो की काय असा प्रश्न पडू लागलाय आता? लोक लग्न करतातच का? कोण खुश आहे लग्न करून? ना मी, ना ती, ना आई, ना कुणीच.हीला बोलावं तर ती गप्प नि तिला बोलावं तर ही गप्प."
नशिबाने मिळालेल्या चौथ्या सीटवर बसून तो विचार करत होता. घाटकोपर स्टेशन आलेले कमी झालेल्या गर्दी वरून कळले त्याला.
ट्रेनमध्ये चौथ्या सीटवर बसलेल्याला धक्के देण्याचा गर्दीला हक्कच असतो. त्याच धक्क्यामुळे त्याच्या विचारात भंग पडला. गर्दी कमी झाली, तशी पुन्हा विचारांनी त्याला स्वताकडे खेचले.
"आईला घर कामात मदत हवी. तिचं वय झालंय आता. लग्न केलं मी.
सून आणली पण, ती ही ऑफिसला जाते मग, तिला तरी वेळ कुठून मिळणार? ती ही दमतेच. कळतं मला. पण सांगू कुणाला मी हे?
आईला सांगू? आई म्हणेल की, 'बदललास रे तू लग्न झाल्यावर. बायकोचा झालास. आईला दुरावालास.'"
नियती कधीकधी अशी परिस्थितीनिर्माण करते की, हवंहवं असणारं ही नकोसं वाटू लागतं.
कुर्ला स्टेशन येऊन गेलं आणि तो पुन्हा मनात बोलू लागला.
"जॉब सोडायला सांगू का हिला मी? जॉब सोडला तर लोनचे हप्ते कसे द्यायचे? आमच्याच घरासाठी घेतलंय ना ते?
पुरुषासारखा पुरुष मी आणि बायकोच्या पगाराची गरज लागते मला! श्या! हा पैसा चीजच बेकार आहे.
सहन नाही होत हे. रोज रोज तीच भांडणं. घरी जाऊच नको असं वाटतंय."
थोड्या वेळाने दादर आलं. तो उतरला ट्रेन मधून... रस्त्यावर विचार करण्यासाठी.

ती समोर पाहत होती पण, तिला काहीच दिसत नव्हतं. कारण, मनात विचार चालू असले की नजर स्वतःचं काम बंद करते. तिच्या मनात विचार थैमान घालत होते.
"घर! माझे घर! खरंच माझे आहे का घर? ही सगळी माणसं खरंच माझी आहेत का?
माझी आहेत म्हणून अशी वागतात ती माझ्याशी?
घरात नवीन बाळ येतं, तेव्हा ते ही अनोळखीच असतं ना? त्याला तुम्ही त्याच्या गुण दोषासकट स्वीकारता, मग हेच नियम सुनेच्या बाबतीत का लागू पडत नाहीत? जो तो तिला बदलण्याचा प्रयत्न का करतो? घरातल्या सुनेला हे सगळे प्रश्न पडावेच का?
ही सगळी माणसं वाईट आहेत असे मी अजिबात म्हणत नाही. कारण माणसं वाईट नसतातच. फक्त ती आपल्या मनासारखी नाही वागली की ती आपल्याला वाईट वाटू लागतात."

हातातली पेन्सिलीला ओठांनी स्पर्शून ती खोल विचारात बुडाली होती.

"काय काय बदलायचं? किती बदलायचं? बदल्यावरही समोरच्याचं समाधान होईल की नाही ही सुद्धा एक शंकाच.
समोरच्याला नाही पटले की पुन्हा बदला स्वतःला. बदल बदल आणि बदलच.
बदलूनच राहायचं, तर मग 'यांनी मला स्वीकारले' असे म्हणणे कितीपत खरे ठरेल?
मला ना असं वाटतंय की, आपण एका गाडीत बसलोय. गाडीने अचानक वेग घेतलाय. वेग ही वेगाहून वेगवान झालाय.
मी जागेवर बसलेय. वारा जोरात चेहऱ्यावर येतोय. झोंबतोय. भीती वाटतेय. मी डोळे गच्च बंद करून घेतलेयत. पुढे काय होणार माहित नाहीये. समोरची चित्र भराभर भराभर बदलतायत. श्वास घेणं कठीण होतंय. धाप लागलीय.
कुठेतरी ही गाडी थांबावी, वेग कमी व्हावा आणि पुन्हा श्वासाशी भेट व्हावी असं वाटतंय."

एसीच्या गार हवेत बसूनही तिला त्या क्षणी घाम फुटला होता. पण त्या घामाकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता तिथं? ती तर एकाच काम करत होती. विचार, विचार आणि विचार.

"लवकर उठायचं, डबे बनवायचे. त्या जेवणात चवही आपल्या हाताची नको. चव चुकली की, दोन शब्द ऐकून घ्यायचे. अश्या सुंदर सकाळच्या सुरुवातीनंतर ऑफिसला जायचं ट्रेनचे धक्के खात. तिथे वेळेवर पोहचायचं. मनातले विचार बाजूला ठेऊन काम करायचं. वेळ संपली की, तेच धक्के खात घरी जायचं. स्वत:च्या शरीराला अजिबात न जुमानता पुन्हा किचनमध्ये जायचं. जेवण बनवायचं. भांडी घासायची.
पण... अजिबात दमायचं नाही
इतकं काम करून झालं की,ओंझळ पहायची स्वतःची. ती रिकामीच दिसणार. दिसलेच तर त्यात दोन शब्द दिसतील...कुणाच्या तरी तक्रारीचे."
मनात रडायला येत होत तिला. पण मनात असलेलं दरवेळी करायला कुठं जमतं आपल्याला?

मनातला राग तिला प्रश्न विचारात होता.
"आई हाक मारल्याने खरंच कुणी आई होतं का? जे नियम तुम्ही मला लावता, तेच स्वत:च्या मुलीला लावता का?
जर याचे उत्तर 'नाही' असे असेल, तर तुम्ही मला मुलगी मानलंय हा स्वत:चा गैरसमज दूर करा.
घरात जाताना भीती वाटते. वाटते की, आज काय नवीन होणार?
माझ्या रंगापासून छंदापर्यंत. छंदापासून व्यंगापर्यंत प्रत्येक गोष्टीत विरोध.
वीट आलाय. पण सांगावं कुणाला?
त्या आईला की त्या आईच्या मुलाला? यातले माझे कोण? कोणीच नाही!"

"मिस काव्या, लक्ष कुठेय तुमचे? काम करा काम. पगार देतो आम्ही. युजलेस!" बॉसने दम भरलाच तिला.
"सॉरी सर."

"नमस्कार वाचकांनो. ओळखलंत मला? अहो हे लोक मला 'घर' मानतात. मी भिंतींचा बनलोय.
पण मी भिंतीत राहून इथे मनातल्या भिंती बघतोय.
सगळे चांगले आहेत. पण, बोलके नाहीयेयत. नुसते गुदमरताहेत. आतल्या आत.
ज्याला त्याला स्वतःचा इगो आहे आणि त्याला 'स्वाभिमान' नाव देऊन जो तो जगतोय.
जगतोय कुठे? खरंतर मरतोय. मरतोय आणि मारतोय... आनंदाला...स्वत:च्या आणि समोरच्याच्या.
खरंतर त्यांच्यापेक्षा जास्त मी गुदमरतोय.
जो तो आपली बाजू मांडतोय. पण, तुमची सगळ्यांची बाजू वेगवेगळी का?.
तुम्ही एकाच बाजूला बाजूबाजूला हवे होता."

सगळं कळूनही सगळेच शांत होते. पण, मनात किंचाळत होते.
शांत वास्तूत गोंगाट नांदत होता.
रडत होते, पडत होते, जळत होते, पळत होते, दमून बसत होते.
पण एकमेकांशी सगळं मोकळेपणी एकत्र बसून बोलावं असं एकालाही वाटत नव्हतं.
सगळं कसं होतं?
श्श्शश्श्श...गप्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे चांगले आहेत....पण बोलके नाहीयेयत...नुसते गुदमरतायत....आतल्या आत...
ज्याला त्याला स्वतःचा इगो आहे...आणि त्याला 'स्वाभिमान' नाव देऊन जो तो जगतोय....
जगतोय कुठे....?खरंतर मरतोय.....मरतोय आणि मारतोय....आनंदाला >>>>>> सहमत १००%

कथेच्या विषयात नावीन्य अजिबात वाटले नाही. तीच ती घीसीपीटी रडकथा!

मांडणी चा प्रयत्न (तिघांचे मनोगत!) स्तुत्य आहे, पण फॉरमॅट जुना आहे व मांडणी विस्कळीत आहे. एकाचे मनोगत कुठे संपते व दुसर्‍याचे कुठे सुरू होते हे वाचकाला मागाहून समजते. मध्ये डॉटेड लाईन किंवा तत्सम काहीतरी करून तीन सेक्शन्स वेगळे करता येतील.

बाकी त्या त्या पात्राच्या मनातल्या डायलॉग विषयी बर्‍याच ठिकाणी असहमती दर्शविण्याची इछा होते आहे, पण ते तुमचे नव्हेत तर त्या पात्राच्या मनचे विचार आहेत असे मानून मी तो मोह आवरता घेतेय. Happy

बाकी त्या त्या पात्राच्या मनातल्या डायलॉग विषयी बर्‍याच ठिकाणी असहमती दर्शविण्याची इछा होते आहे, पण ते तुमचे नव्हेत तर त्या पात्राच्या मनचे विचार आहेत असे मानून मी तो मोह आवरता घेतेय. <<<
+१ Happy

काहीशी विस्कळीत वाटली. सविस्तर काही काळाने कळवतो, अर्थात, परवानगी असल्यासच.

कळावे

गंभीर समीक्षक

बाकी त्या त्या पात्राच्या मनातल्या डायलॉग विषयी बर्‍याच ठिकाणी असहमती दर्शविण्याची इछा होते आहे, पण ते तुमचे नव्हेत तर त्या पात्राच्या मनचे विचार आहेत असे मानून मी तो मोह आवरता घेतेय>> Wink

निम्बु , मनिमाऊ आपण मोह आवरून माझ्यावर जी कृपा केली त्याबद्दल आभारी आहे.
Happy Lol

ज्या चुका दाखवल्यात त्या सुधारायचा प्रयत्न करेन.

गंभीर समीक्षक:
परवानगी कशाला? बोला हवे ते...आम्ही ऐकूच सगळे.जमले तर नक्की आचरणात आणू

मी कल्याणी:

खरंतर या कथेला शेवटच नाही.
हि कथा प्रत्येक संसाराची, जी वर्षानुवर्षे अशीच चालत आली.
काहीकाही जण म्हणतात, कि " तीच ती घीसीपीटी रडकथा! "
पण तीच तीच कथा लिहूनही कथेत, किंवा कथेतल्या कोणत्याही माणसात काहीच फरक नाही पडला इतक्या वर्षा नंतर हि.
कथेच्या शेवटी 'घर' बोलतेय अशी कल्पना केली आहे.
कथेत कोणालाच चुकीचे ठरवता येत नाही, सगळे जण आपापल्या जागेवर योग्य वाटतात.
कथेचा शेवट करणं शक्य नाही झाले कारण, घरातले सगळे एकमेकांशी मोकळेपणाने बोलले तरच संसार सुखाचा होऊ शकतो.पण तसे नाही होत.
व.पु काळे म्हणतात.
"संवाद नाहीत म्हणून वाद होतात"

बरी आहे,

पण तीच तीच कथा लिहूनही कथेत, किंवा कथेतल्या कोणत्याही माणसात काहीच फरक नाही पडला इतक्या वर्षा नंतर हि.>>> +१

निंबुडाच्या मताशी सहमत ,
वाचुन झाल्यावर बर्‍याच वेळाने हे कुणाचे मनोगत आहे ते कळते , ते टाळायला हवे होते , बाकि नविन काहिच नाहि
घरोघरच्या मातीच्या चुली आणुन तुम्ही त्याला पोतेरा दिलाय असे वाटले .

शुभेच्छा .