वाटवे बाईंचं रसग्रहण

Submitted by pkarandikar50 on 22 December, 2012 - 09:51

वाटवे बाईंचं रसग्रहण
म.ए.सो. प्रशाळा [बारामती] मधल्या मराठीच्या आमच्या शिक्षिका श्रीमती नीलांबरी वाटवे [बाई] यांचं सध्याचं वय ९२ आहे. मला आठवतं की मी आठवी किंवा नववीत असताना त्यांनी हट्टाने मला म.सा.प. च्या मराठीच्या परीक्षेला बसवलं होतं. शाळेतल्या नेहमीच्या अभ्यासाचा मुलांना कंटाळा असतो आणि ही तर अवांतर परीक्षा. पण शाळेचे तास संपल्यावर बाई माझ्या एकट्याचा एक 'स्पेशल' तास घेत. त्यांनी माझी तयारी चांगली करून घेतल्यामुळेच मला त्या परीक्षेत खूप छान गुण मिळाले. पुढे मी एस.एस.सी. ला असताना, पाठ्यपुस्तकातले वेचे ज्या मूळ पुस्तकातून - कादंबरी, कथा-संग्रह, निबंध-संग्रह, भाषण-संग्रह इ. - ज्या पुस्तकातून घेतले आहेत ती पुस्तकं मला शाळेच्या लायब्ररीतून वाचायला मिळावीत अशी व्यवस्था बाईंनी केली आणि ती सगळी पुस्तकं वाचून काढणं मला भाग पडलं. त्याबाबत काही कुरकूर करायची सोय नव्हतीच कारण 'वाटवे बाई-वाक्यं प्रमाणं' असा दंडक आमच्या शाळेत होता. "अभ्यास काही फक्त धड्याचा करायचा नसतो तर त्या लेखकाचा करायचा असतो. शिवाय त्यामुळे धडा चांगला समजतो" असं कारण त्यांनी त्यावेळी दिलं होतं. पुढे मी कॉलेजला पुण्याला आलो आणि आमचा संपर्क अगदीच कमी झाला. नंतर मी बदलीच्या सरकारी नोकरीत शिरलो आणि बाईसुद्धा पुण्याला बदलून गेल्या. शाळेच्या अमृत-महोत्सवाच्या निमित्ताने माजी शिक्षक-विद्यार्थी मेळावा झाला त्यावेळी बाईंची गाठ पडली होती. अर्थात, तेंव्हाही, मी विविध-गुण-दर्शनाच्या कार्यक्रमात भाग न घेतल्याबद्दल त्यांनी मला झापून घेतलंच. त्यानंतर मात्र आमची भेट काही झाली नाही. काही महिन्यांपूर्वी त्या काही निमित्ताने बारामतीला गेल्या होत्या, तेंव्हा माझ्या एका ज्येष्ठ मित्राने - अनिल कुंचुर- [तोही त्यांचा माजी विद्यार्थी] माझी 'उजवण' ही कादंबरी त्यांना वाचायला दिली. बाईंनी त्यावर दिलेला अभिप्राय असाआहे:-
---------------------------------------------------------------------------------------
प्रिय अनिल,
अनेक आशिर्वाद.
प्रभाकर करंदीकर लिखित 'उजवण' वाचले. आज ते परत करत आहे. एक विचार प्रवर्तक पुस्तक वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.
"यज्ञी ज्यांनी शिर अर्पियले, मानवतेचे मंदिर घडवले, परी जयांच्या समाधीवर नाही चिता नाही पणती, तेथे कर माझे जुळती " या बा.भ. बोरकरांच्या कवितेचे स्मरण झाले. फार प्राचीन काळापासून आजतागायत असेच चालू आहे. ज्या वेळी सर्व समाजाचे, अनुभवावर आधारलेले गुणाधिष्ठीत, उपयुक्त जीवन संपले त्यावेळी सर्वत्र अनाचार माजला. स्वतःला विद्वान, संशोधक, सुधारणावादी समजणारे लोक कमालीचे स्वार्थी, स्वयंकेंद्री बनले. सत्ता, मालमत्ता आणि विद्वत्ता यांच्या उपयोगाने समाजात दोन वर्ग निर्माण झाले. शोषित, दडपलेले, अडाणी, अक्षरशत्रू, दरिद्री, दैववादी बहुजनांचा एक वर्ग आणि जुलुमी सत्ताधार्‍यांचा दुसरा वर्ग. त्यातूनच वर्णव्यवस्था, अस्पृश्यता वगैरे अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या.
'उजवण' ची नायिका संध्या सोनावणे ही सर्वांगसुंदर, सुसंस्कारित, पदवीधर, गरिबांची कनवाळू, स्वजन -स्वभाव -स्वदेश- स्वातंत्र्य हे ध्येय स्वतःसमोर ठेवणारी, धडपडी, जिद्दी, कष्टाळू तरुणी आहे. ती ढोंगी, मतलबी, लबाडांची कशी शिकार झाली हे वाचताना चीड आली आणि वाईट वाटले. तिचा मृत्यु [की योजनाबद्ध केलेला खून?] वाचून डोळे भरून आले. जाणीवपूर्वक पाहिल्यास आपल्या भोवती अशा किती तरी संध्या दिसतील. तिच्या "अपघाती" मृत्युनंतर पुढे काय झाले याचे निवेदन करताना लेखकाने वापरलेली "फँटसी" अशक्य वाटत नाही. अशाही परिस्थितीत दादासाहेब लोंढे असे काही नि:स्वार्थी, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत म्हणून तर गेल्या काही वर्षांत "शोषितां"मध्ये जागृती होत आहे.
जमल्यास प्रभाकर करंदीकर लिखित "आदिबंध" ही कादंबरी वाचायला पाठव.
तुझी,
वाटवे बाई. १/१०/२०१२, बारामती.
-------------------------------------------------------------------------------------------
बाईंनी नुसतं माझं पुस्तक वाचलं, एव्हढ्यानेही मला खूप बरं वाटलं असतं पण त्यापुढे जाऊन, त्याचं सुंदर रसग्रहणही लिहून त्यांनी माझ्या मित्राकडे पाठवलं याचा मला झालेला आनंद शब्दातीत आहे. 'उजवण' चं शेवटचं प्रकरण 'गुगली' गेलं अशी प्रतिक्रिया माझ्या काही वाचक-मित्रांनी बोलून दाखवली होती. एकाने तर म्हटलं होतं, " ह्या गोष्टीचा शेवट कसा करावा ते कळलं नाही म्हणून म्हणा किंवा लिहिताना कंटाळा आल्यामुळे म्हणा तुम्ही तिचा असा शेवट केला असावा असं मला वाटलं." ९२ वर्षे वयाच्या एका व्यक्तिला मात्र ती 'फँटसी' अजिबात खटकू नये आणि उलट ती शक्य-कोटीतली वाटावी याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. कोणत्याही साहित्यकृतीचं 'मनोरंजन-मूल्य' बाजूला ठेवून, थेट तिच्या गाभ्यापर्यंत शिरण्याची ही हातोटी त्यांना, हयातभर साहित्याचं वाचन आणि अभ्यास करून साध्य झाली असावी. या वयातही त्यांची नव-नवीन साहित्य वाचण्याची भूक शिल्लक आहे, हे विशेष.
'एक साक्षेपी वाचक मिळाला तरी लेखकाला आपण केलेल्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं' असं मी फ्क्त ऐकत आलो होतो. वाटवे बाईंनी मला त्याचा साक्षात्कार घडवला!

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान